पैशांच्या व्यवस्थापनाचा उल्लेख झाल्यावर खळखळून हसणारी व्यक्तीही तणावात येऊ शकते, पण काळजी करू नका आपले वित्त व्यवस्थापन हे पाकिस्तानविरुद्ध हरत असलेला सामना जिंकण्यासारखं कठीण नाही, पण सुर्याने साउथ आफ्रिकेच्या हातून विश्वचषक खेचून घेणं जेवढे सोपं वाटतं तेवढं सोपं पण नाही.
आपले खिसे नेहमीच रिकामे ठेवून पुढील पगाराची वाट बघत राहणं आवडतं का? नाही ना? मग पुढे वाचा.
१. बजेटिंग : रोज सकाळी जसं न चुकता दात घासता, तेवढ्याच नियमितपणे दर महिन्याच्या अगोदर बजेटिंग करा आणि नंतर प्रत्येक खर्च डोळ्यात तेल घालून लिहा. तेव्हाच तुम्हाला कळेल की पैसा जातो कुठे. अवास्तव खर्च टाळा आणी खिसे भरा. आयुष्यात गोंधळ, गडबड आणि तणाव टाळण्यासाठी बजेटिंग हा रामबाण उपाय आहे. बजेटिंग यशस्वी करण्यास प्रत्येक महिन्यात काही विशिष्ट श्रेणीत कमी खर्च करण्याचे आव्हान घ्या.
- स्वयंचलित बचत : तुमच्या बचत खात्यात स्वयंचलित हस्तांतरण सेट करा. नजरेतून दूर, मनातून दूर.
- उद्दिष्टे स्पष्ट करा : आपत्कालीन निधी, सुट्टी किंवा निवृत्ती यासारखी विशिष्ट उद्दिष्टे ठेवा, जेणेकरून बचत अधिक प्रेरणादायक बनेल.
२. गुंतवणूक : पैशाला कामाला लावा. पैसा तुमच्यापेक्षा कठोर परिश्रम करू शकतो. पैशाचे झाड लावा. त्याला वाढायला वेळ द्या मग पाहा तुम्ही कसे फळ खाऊन आरामात जगू शकता. गुंतवणूक करणे म्हणजे स्टॉक मार्केटच्या व्यावसायिकांसाठीच आहे, असं वाटू शकतं, पण हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. योग्य गुंतवणुकीसह तुमचे पैसे कालांतराने भरभराट करू शकतात.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
- लवकर सुरुवात करा : चक्रवाढ व्याजाची शक्ती जादुई आहे. जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं चांगलं.
- जोखीम ओळखा : अवास्तव जोखीम म्हणजे नकोसा तणाव. लहानशा कालावधीत मोठी जोखीम पत्करण्यापेक्षा छोटी जोखीम, पण मोठा कालावधी जास्त बरा.
- वैविध्य आणा : सर्व अंडी एका टोपलीत ठेऊ नका. विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि स्थावर मालमत्ता यांचा विचार करा. बँकेतल्या ठेवी सगळ्यात सुरक्षित म्हणून सगळे पैसे बँकेत ठेवू नका. मोजून जोखीम घ्या. दीर्घकाळाचा पैसा बँकेत ठेवणे म्हणजे १५ टक्के परतावा लाथाडून ५-६ टक्के परतावा घेणे होय. असा मुर्खपणा गरीब राहण्याचं मुळ कारण आहे.
३. कर्ज व्यवस्थापन : चांगलं, वाईट आणि भयानक सर्व कर्ज समान नाहीत. काही कर्ज फायदेशीर असू शकतात, जसं की गृहकर्ज किंवा शिक्षण कर्ज जे तुमच्या भविष्यात गुंतवणूक करते. परंतु उच्च व्याजदर असलेली कर्ज, जसं की क्रेडिट कार्डचे शिल्लक किंवा कर्जावर घेतलेली मोठी गाडी हे आर्थिक दुर्गतीचं कारण ठरू शकतं.
४. आपत्कालीन निधी : आपत्कालीन निधी म्हणजे तुमची आर्थिक तरतूद अचानक घडणार्या प्रसंगांसाठी. जसं की नोकरी गमावणं, वैद्यकीय खर्च किंवा नातेवाईकांची अचानक भेट. याने तुमचे दैनंदिन व्यवहार जसे की कर्जाचा हप्ता किंवा म्युच्युअल फंड सिप सुरळीत चालू राहण्यास मदत होते. साधारण तीन ते सहा महिन्यांच्या खर्चाचं उद्दिष्ट ठेवा. तेवढा निधी बँकेतून सहज काढता येईल असा ठेवा.
५. निवृत्ती नियोजन : कोणीही कायम काम करत नाही. तुम्हाला सर्वात जास्त काळ काम करणारा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडायचा नसेल, तर तुम्हाला एके दिवशी निवृत्त व्हायचं आहे आणि आरामात निवृत्त होण्यासाठी तुम्हाला एक मजबूत निवृत्ती योजना आवश्यक आहे.
- निवृत्ती खात्यात योगदान द्या : तुमच्या ईपीएफ किंवा पीपीएफशिवाय आर्थिक सल्ला घेऊन म्युच्युअल फंडात निवेश करा. हा दीर्घ काळानंतर लागणारा पैसा आहे. त्यावर चांगला परतावा कमवू शकता.
६. वित्तीय साक्षरता : तुम्ही जितके जास्त जाणाल, तितके चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकता. वित्तीय साक्षरता फक्त लेखापाल किंवा अर्थशास्त्रज्ञांसाठी नाही. ते प्रत्येकासाठी आहे. माझ्या ‘डाय पुअर ऑर लिव्ह रीच’ या पुस्तकाने हजारो लोकांचं आर्थिक जीवन सुधारलं आहे.
७. व्यावसायिक सल्ला घ्या : वैयक्तिक मार्गदर्शनासाठी वित्तीय सल्लागाराशी संपर्क साधा. तुम्ही सगळीच कामे स्वत: नाही करू शकत. सचिनलाही आचरेकर सरांसारखा सल्लागार आवश्यक वाटला. तुम्ही तुमच्या कामात मन लावा. आभाळाएवढे मोठे व्हा. पैसा तुमच्या मागे धावेल.
एक चांगला सल्लागार मित्रासारखा असला पाहिजे. तुम्ही सगळे आर्थिक व्यवहार त्याच्यासोबत चर्चा करून मग निर्णय घेऊ शकता. आयुष्यात एक मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. आर्थिक मेंटर हा सुशिक्षित, अनुभवी आणि तुमच्या हितासाठी काम करणारा असला पाहिजे.
८. तुमची संपत्ती सुरक्षित करा : हा सर्वात रोमांचक विषय नाही, परंतु तुमची संपत्ती संरक्षित करणे खूप महत्त्वाचं आहे. विमा आणि इस्टेट नियोजन तुमची कमावलेली संपत्ती तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवते.
- विमा : योग्य आरोग्य, जीवन, आणि संपत्ती विमा ठेवा.
- मालमत्तेचं नियोजन : एक इच्छापत्र तयार करा आणि तुमची मालमत्ता कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी ट्रस्टचा विचार करा.
लक्षात ठेवा उद्दिष्ट फक्त संपत्ती जमा करणं नाही, तर एक असं जीवन तयार करणे आहे, जिथे तुम्ही हसत खेळत, सतत आर्थिक चिंता न करता जगू शकता. योग्य आर्थिक सवयी, छोटी असली तरीही दीर्घ अवधीची गुंतवणुक आणि चांगला मार्गदर्शक तुम्हाला नक्कीच श्रीमंत बनवू शकतो, पण तो कधीच गुंतवणूकीपासून सुरुवात करणार नाही.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.