१. रोल म्हणजे भूमिका. प्रत्येक सेल्सपर्सनची त्याच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये एक भूमिका-रोल असतो. हा रोल इतरांच्या टीमवर्क पलीकडे जाऊन आणखी काही तरी असतो. काही तरी स्पेशलायझेशनमुळे हा रोल तुमच्याकडे मॅनेजमेंट देत असते. असा काही रोल असावा, मिळवावा, द्यावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
२. प्रत्येक कामात काही अडथळे किंवा प्रतिकूल घटना अटळ असतात. कंपनी अडचणीत येणे, व्यवस्थापनात बदल किंवा उलथापालथ होणे, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन सिस्टम, नवीन प्रोसीजर यामुळे जुन्या कर्मचार्यांची कोंडी होणे असे प्रकार नव्या युगात घडणार, हे गृहीत धरून या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता स्वतःमध्ये बदल करणे आणि नवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते, हे लक्षात ठेवा. अशा तर्हेची संकटे येण्यापूर्वीच त्यांचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे.
३. आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या सोयीसुविधांसाठी व्यवस्थापनाला आपल्या अडचणी, समस्या लेखी नोट देऊन कळविणे इष्ट असते. काय चुकते आहे, जे चुकते आहे त्यावर आपल्याला काय उपाय करावा असे वाटते आहे, पुन्हा ही समस्या उद्भवू नये यासाठी काय करायला हवे, हे त्यात नम्रपणे लिहावे.
ही आपली वैयक्तिक समस्या आहे, की सर्वांची आहे त्याचाही उल्लेख करावा; परंतु युनियनबाजीच्या भूमिकेतून आपण ही नोट देत आहोत असा त्याचा आविर्भाव नसावा.
४. जर इतरांनी तुमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटत असेल; तर तुम्हीही इतरांच्या अडचणीत त्यांच्यामागे उभे राहायला हवे. वस्तू किंवा सेवा यांची विक्री करीत असताना आपला सहकारी ग्राहकासमोर कमी पडतो आहे असे वाटले तर तुम्ही त्याच्या आवर्जून मदतीला जा.
५. ग्राहक बोलत असताना आळस, आळोखेपिळोखे, जांभया देऊ नका, डोळे मिटू नका. उलट त्या व्यक्तीच्या डोळ्याशी डोळे भिडवून आणि तो बोलत असलेल्या आशयाच्या अनुरूप गांभीर्य किंवा प्रसन्नता दर्शवून दाद, प्रतिसाद द्या.
त्याच्या वाक्यातला एखादा शब्द रीपीट करा किंवा त्याच्या वाक्यामधील आशय वेगळ्या शब्दात सांगून आपल्याला त्याचे म्हणणे समजले आहे, एखादा पूरक किंवा उपप्रश्न विचारूनदेखील त्याचे बोलणे आपल्याला महत्त्वाचे वाटत आहे आणि आणखी जाणून घेण्याची उत्सुकता आहे हे त्याला दाखवून द्या. जर तुम्ही त्याच्या नोट्स घेऊ शकलात तर त्याला अधिक आनंद झालेला आढळेल.
६. ग्राहकांशी बोलताना कधीही तोंडातल्या तोंडात पुटपुटू नये. प्रत्येक शब्द निर्दोष पद्धतीने, प्रसन्नपणे आणि साधेपणाने बोलावा.
७. सेल्सपर्सनने स्टोअर, शॉप, मॉल, सर्व्हिस सेंटर अशा कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये तो काम करीत असला तरी सेक्सविषयक बोलणे किंवा तत्सम भाव सूचित करणे किंवा सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करणे असे कधीही करू नये.
८. प्रत्येक व्यवसायाची म्हणून नीतिमत्ता असते. त्याला प्रोफेशनल किंवा बिझनेस एथिक्स असे म्हणतात. तुमच्या व्यवसायाचे एथिक्स म्हणजे नीतिमत्ता काय आहे ती समजून घ्या आणि त्याप्रमाणे ती आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून वागा.
९. ‘कोड ऑफ कन्डक्ट फॉर ए सेल्सपर्सन’ ही जगप्रसिद्ध पुस्तिका असे सांगते की, प्रत्येक सेल्समन, सेल्सगर्ल, सेल्सपर्सन याने पुढील आचारसंहिता पाळली पाहिजे : –
-
- मी माझे करीअर यशस्वी करण्यासाठी दुसर्या व्यक्तीला दुखावणार किंवा तिच्या करीअरमध्ये अडथळे आणणार नाही.
- कोणत्याही कायद्याचे किंवा व्यवस्थापनांच्या नियमांचे उल्लंघन करून विक्री वाढवण्याचा किंवा माझी करीयर प्रमोट करण्याचा प्रयत्न मी करणार नाही.
- व्यावसायिक नीतिमत्तेचे मी पालन करीन.
- विक्री व्यवसाय करीत असताना मी माझ्या सामाजिक बांधीलकीला जपेन.
- ज्यामुळे मला माझ्या मुलाबाळांसमोर किंवा इष्टमित्र, नातेवाईकांसमोर बोलायला संकोच होईल, मान खाली घालावी लागेल, असे काहीही माझ्या हातून मी होऊ देणार नाही.
- मी माझा अनुभव, ज्ञान आणि माहिती यांचा लाभ मोकळेपणाने माझे सहकारी आणि व्यवस्थापनाला देईन.
१०. काही विक्रते फक्त दुकानाच्या काऊंटरमागे उभे राहून काम करतात; परंतु त्यांच्याहीपेक्षा अधिक संख्येने विक्रेते फील्डवर्कमध्ये असतात. त्यांना आपले कॉन्टॅक्ट आणि सपोर्र्ट्स यांचे एक मोठे नेटवर्क उभारावे लागते.
हे नेटवर्क उभारण्याकरता व्हिजिटिंग कार्ड्स, वृत्तपत्रातील छोट्या आणि मोठ्या जाहिराती, विविध सभा, समारंभातून येणारी मान्यवरांची नावे, टेलिफोन डिरेक्टरीज, यलो पेसेज, उद्योग, व्यापार, व्यवसाय क्षेत्रांतील प्रातिनिधिक संस्थांच्या रेडिमेड डिरेक्टरीज अशा असंख्य सोर्स आणि रिसोर्सचा वापर करून आपल्याला उपयोगी अशा व्यक्तींचे, संस्थांचे नाव, पत्ते, फोन नंबर, मोबाइल नंबर, ई-मेल अॅड्रेस, वाढदिवस, मॅरेज अॅनिव्हर्सरीज, पोस्टिंग, ट्रान्स्फर्स अशा प्रकारचा डाटा गोळा करावा लागतो आणि त्याचा हुशारीने वापरही करावा लागतो.
११. प्रत्येक कंपनीत जरी मराठी, हिंदी, इंग्रजी अशी बोलली जात असली तरी व्यवहारांच्या अनुषंगाने त्या कंपनीत भाषा एक वेगळी साचा, वळण घेऊन बोलली जाते. त्या कंपनीत काम करताना कंपनीत प्रचलित शब्द, संज्ञा आणि वाक्प्रचार हे लक्षात घेऊन जर तुम्ही बोललात, लिहिलेत तर कंपनीच्या सिस्टममध्ये तुम्ही अधिक चांगल्या रीतीने अॅडजेस्ट होता.
१२. तुमच्या शॉप, स्टोअर, मॉल किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये तुमचे नातेवाईक किंवा मित्र यांना कधीही बोलावू नका किंवा तिथे त्यांच्या भेटी घेऊ नका. त्यांना, तुम्हाला आणि व्यवस्थापनाला ते अडचणीचे, ऑकवर्ड ठरू शकते. जिथे एखाद्या फंक्शनसाठी सर्वांच्याच कुटुंबांना निमंत्रण असेल तिथेच फक्त कुटुंबाला न्या.
१३. स्टाफ मीटिंग किंवा डेली ब्रीफिंग कधीही चुकवू नका.
१४. तुमच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकार्यांपेक्षा अधिक चांगल्या किंवा किमती वाहनातून येऊ नका किंवा त्यांच्या डोळ्यात खुपेल अशा किमती वस्तू ते वापरत असताना तुम्ही वापरू नका.
१५. प्रत्येक ऑफिसमध्ये एक फायनल बॉस असला तरी त्याच्या हाताखाली अनेक छोटे छोटे पदाधिकारी असतात. या सर्व हायरारकीची किंवा पदव्यवस्थेची जाणीव ठेवून प्रत्येक टप्प्यावरील अधिकार्याला आवश्यक तो मान आणि महत्त्व तुमच्या वागण्याबोलण्यातून द्या.
१६. फायनल बॉसपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचू शकत नसल्यास त्याच्यापर्यंत तुमचे नाव पोहोचवू शकतात अशा त्यांच्या जवळच्या, कामाला लागणार्या ड्रायव्हर, पीए, रिसेप्शनिस्ट यांच्याकडे मुद्दाम सांगतो आहोत असे न वाटता अशा प्रकारे फीडबॅक द्या की, तो तुमच्या नावासकट थेट फायनल बॉसपर्यंत पोहोचेल.
१७. बहुसंख्य कर्मचारी आणि अधिकारी हे मेंढ्यांप्रमाणे कळपाने एकाच दिशेने, एकामागोमाग जात असतात. तुम्ही अशी एक सामान्य मेंढी नाही आणि तुम्हाला स्वतःची दिशा, गती आणि मार्ग आहे असे मॅनेजमेंटला दाखवण्याची एकही संधी इतर मेंढ्यांना नाराज न करता सोडू नका.
१८. वरिष्ठ आणि अनुभवी असे जे सहकारी असतात त्यांनी तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. त्यांच्याशी सलगी निर्माण करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या.
१९. तुमच्या सहकार्यांशी बोलताना तुम्ही पुढील मुद्द्यांवर कटुता येऊ न देता टीकाटिप्पणी करू शकता : – त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांना लागत असलेला वेळ, त्यांचा कामामागील दृष्टिकोन, त्यांचे कम्युनिकेशन स्किल, त्यांचे ऑफिस प्रोसीजरविषयीचे ज्ञान; परंतु ते आळशी आहेत, खोटारडे आहेत, निरुपयोगी आहेत, असे कधीही म्हणू नका.
तर अशा सहकार्यांबद्दल बोलायची वेळ आली तर त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची गरज आहे, त्यांना पुन्हा मोटिव्हेट करण्याची गरज आहे, त्यांना नव्या ठिकाणी नवी जबाबदारी देण्याची गरज आहे, अशी वाक्ये वापरा.
२०. तुमच्या आस्थापनामध्ये जेव्हा काही तरी नवे, वेगळे, अनपेक्षित घडत असते तेव्हा पुढील प्रश्न मनात ठेवून त्याचे विश्लेषण कराः- हे का घडते आहे की बिघडले आहे, हे घडण्यापूर्वी मला त्याचा अंदाज आला होता का, यामुळे नेमका कोणाचा फायदा होणार आहे, मला याचा काही फायदा होईल का, मी याला पाठिंबा द्यावा की विरोध करावा?
२१. तुमच्या शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरच्या कुठे कुठे शाखा आहेत, तिथे कोणत्या वस्तू किंवा सेवा आहेत याची माहिती आणि तिथल्या पत्ते व फोन नंबरची सूची तुमच्याजवळ कायम हवी. तुमच्या बॉस आणि वरिष्ठ अधिकार्यांचे मोबाइल नंबर आणि घरचे नंबर जवळ हवेत, परंतु त्यांचा वापर तारतम्याने इमर्जन्सीतच करायचा याचे भान हवे.
२२. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात, विक्री कौशल्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा एक कुणी तरी गॉडफादर किंवा गुरू आस्थापनाच्या आत किंवा बाहेर शोधा आणि त्याचे मार्गदर्शन घेऊन पुढे चला.
२३. भीती, नर्व्हसनेस, नकाराची छाया, स्वतःविषयी आशंका, अनिश्चितता, आपण अनलकी आहोत असा समज यापासून दूर रहा.
२४. जेव्हा कस्टमर दाद देत नाही, खरेदी करीत नाहीत, सेवा स्वीकारीत नाहीत तेव्हा कारण असू शकतेः- तुम्ही बेस्ट चॉइस नाही. यापूर्वीचा तुमच्या कंपनीचा किंवा शोरूमचा त्याचा अनुभव सुखद, आनंददायी नाही, ग्राहकाचे अन्य कोणत्या दुकान किंवा कंपनीशी वैयक्तिक स्नेहसंबंध, हितसंबंध आहेत, तुमची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्राइज ही त्याच्या जवळच्या माहितीतल्या कंपनीपेक्षा, दुकानापेक्षा वेगळी किंवा स्वस्त नाही.
तुम्ही त्या ग्राहकाला तुमच्याकडून वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यामुळे ती अधिक किफायतशीर आणि विश्वासार्ह गुणवत्तापूर्ण आहे हे पटवून देण्यात अपयशी ठरला आहात.
२५. तुमची वस्तू विशेषतः सेवा घेणारे ग्राहक वारंवार, पुनःपुन्हा येतील जेव्हा तुम्ही पुढील अटी/अपेक्षा पूर्ण करता : – तुमची वस्तू/वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचली का, तुम्ही प्रॉमिस केलेल्या गोष्टी त्यात होत्या का, काही अडचणी, समस्या उद्भवल्यास त्या वेळच्या वेळी दूर केल्या गेल्या का, ग्राहकाकडून संपर्क न होताही तुम्ही आपणहून प्रॉडक्ट सर्व्हिसच्या संदर्भात त्याचे समाधान आजही होत आहे ना
याविषयी चौकशी-फॉलोअप केलात का, तुमच्या कंपनीतील ग्राहकाला संपर्क करायची व्यक्ती वेळच्या वेळी तिला फोनवर उपलब्ध झाली का, ती नसल्यास अन्य व्यक्तीने त्या ग्राहकाचे समाधान केले का, तुम्ही पुनःपुन्हा जावे असे विश्वासार्ह विक्रेते आहात, हा विश्वास त्याच्या मनात निर्माण करू शकला का?
२६. वस्तू/सेवा यांची विक्री करणार्या सेल्सगर्ल्स, सेल्सपर्सन यांच्याकडून वारंवार होणार्या नेहमीच्या काही चुका अशाः- केवळ पैशाच्या किंवा कमिशनच्या लोभाने किंवा टार्गेट पूर्ण करण्याच्या घाईने गिर्हाईकाला नीट समजून न घेता, न देता त्याच्या गळ्यात वस्तू मारून मोकळे होणे, आपण ती वस्तू/सेवा विकलेली असतानादेखील अन्य व्यक्ती किंवा व्यवस्थापनावर जबाबदारी ढकलून देणे किंवा आपल्याऐवजी परिस्थितीला दोष देणे, स्वतःलाच आपण विकत असलेल्या वस्तू/सेवेवर विश्वास नसणे.
२७. कस्टमर केअर म्हणजे काय? तर त्यात पुढील गोष्टी येतातः- कस्टमरचे प्रश्न त्याने पॉइंटआऊट करताच सोडवणे, सांगितल्या वेळी फोन करून बोलणे, ग्राहकाशी प्रामाणिकपणे व्यवहार करणे, ग्राहकाशी वारंवार संपर्क, संवाद करणे, ग्राहकाची खरी गरज लक्षात घेऊन
त्याच प्रकारची वस्तू/सेवा देणे, ग्राहकाच्या सोयीच्या वेळी त्याच्याशी संपर्क साधणे, आपली फसवणूक किंवा शोषण होत आहे असा संशय त्याच्या मनात येईल असे काहीही न करणे, वस्तू/सेवेची गुणवत्ता राखणे म्हणजे कस्टमर केअर असते.
२८. सेल्समनशिपवर जगभरात जी हजारो पुस्तके उपलब्ध आहेत त्या सर्वांत एक वाक्य नेहमी आढळते आणि ते म्हणजे, तुमच्या दुकानातील वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहक जेव्हा येतो तेव्हा तो प्रसंग त्याला संस्मरणीय, आठवणीत राहणारा, आठवण बनून राहणारा व्हायला हवा. असा तो होण्यासाठी पुढीलपैकी काही करायला हवे :-
सेल्सपर्सनचा एक्सेप्शनली फ्रेंडली अॅप्रोच, क्विकनेस, आऊट ऑफ दि वे जाऊन ग्राहकाला वस्तू/सेवा कशी सुखद आहे याचे प्रात्यक्षिक, त्याच्याबरोबर आलेल्या मुले किंवा अन्य नातेवाईकांशी इंटरेस्ट घेऊन केलेले बोलणे, ग्राहकाच्या एखाद्या अन्य समस्येविषयी दिलेला सल्ला आणि भेटवस्तू जी त्याला अपेक्षित नव्हती.
२९. विक्रेत्यांचा एक वर्ग हा फिरत्या विक्रेत्यांचा असतो. ही मंडळी एखाद्या शॉप, स्टोअर्स, मॉलमध्ये काऊंटरमागे न उभे राहता ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन आपल्या वस्तू किंवा सेवेची विक्री करीत असतात. या वर्गातही करीअर करण्यासाठी फार मोठा स्कोप आहे आणि साधारणत: शंभरपैकी ६५ ते ७० टक्के विक्रेते हे फिरते विक्रेते असतात.
त्यांना गावात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, परदेशात मालाची विक्री करण्यासाठी बस, रेल्वे, विमान अशा विविध वाहनांनी फिरावे लागते. इंग्रजी आणि हिंदीचे ज्ञान हा फिरत्या विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा निकष मानला जातो, कारण बहुसंख्य व्यापारी आणि व्यवस्थापक हे प्राधान्याने इंग्रजी आणि अन्यथा हिंदी जाणणारे असतात.
३०. प्राचीन काळापासून जो इतिहास घडला त्यातला राज्य किंवा भूप्रदेश जिंकण्यासाठी राजांनी केलेल्या मोहिमा आणि लढाया वगळता जगाचा इतिहास हा प्राधान्याने जगभर मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी, बाजारपेठा शोधण्यासाठी, माल मिळवण्यासाठी, मग तो कधी सोन्यासारखा धातू असेल किंवा मसाल्यासारखे पदार्थ असतील- विक्रेत्यांनीच मुख्यतः जगभर फिरून घडविला आहे. सिंदबादपासून कोलंबसपर्यंत सारे विक्रेते होते. इंग्रजदेखील भारतात मसाल्यांच्या पदार्थांच्या व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले.
३१. काऊंटरच्या मागे काम करणार्या विक्रेत्यापेक्षा फिरत्या विक्रेत्याचे काम शारीरिक कष्ट आणि मानसिक तयारीच्या दृष्टीने अधिक अवघड आणि आव्हानात्मक असते. ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत, मिळेल ते खात-पीत, सोय होईल तिथे राहात हे फिरते विक्रेते वस्तू किंवा सेवा यांची ग्राहकांपर्यंत जाऊन विक्री करीत असतात. कमजोर शरीरयष्टी, मुखदुर्बळ व्यक्ती किंवा एकाहून अधिक भाषांमध्ये बोलू न शकणार्या व्यक्ती यांचा या फिरत्या विक्रेत्यांच्या व्यवसायात टिकाव लागू शकत नाही.
३२. कुशल विक्रेत्याला आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची गुणावगुणांची, पॅकिंग काय वजनात, काय प्लॅस्टिक, पुठ्ठा अशा काय प्रकारच्या वेष्टनात मिळते; घाऊक दर, किरकोळ दर, प्रतिस्पर्ध्यांचे दर काय आहेत, वस्तूच्या किमतीतील सूट किंवा भेटवस्तू काय आहेत; वस्तूंमधील उदा. औषध असल्यास घटक द्रव्ये कोणती आहेत, त्याचा नेमका उपयोग काय आहे; या सर्व गोष्टींची माहिती देता आली पाहिजे.
३३. फिरत्या विक्रेत्यांचे तीन गट आहेतः १) कारखाने आणि संस्थांना, दुकानांना वस्तू दाखवून ऑर्डर घेणारे, २) थेट ग्राहकांपर्यंत जाऊन वस्तू किंवा सेवा विकणारे, ३) प्रतिनिधी (सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह). शिवाय दुकानामध्ये काऊंटरमागे उभे राहून विकणारे विक्रेते हा वेगळा वर्ग.
३४. विक्री हा कुठल्याही उद्योग, व्यापार, व्यवसायाचा पाया असतो. केवढी मोठी आर्थिक गुंतवणूक केली, कितीही उत्तम उत्पादन केले, तरीदेखील जोपर्यंत विक्रेता ते विकत नाही तोपर्यंत त्याला काहीही मूल्य नसते. राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीचा पाया विक्री हाच असतो.
३५. चांगला विक्रेता होण्यासाठी आपली तब्येत, प्रकृती उत्तम राखणे आणि कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. सौजन्य आणि सहनशीलता हे या व्यवसायात महत्त्वाचे आहेत. विक्रीसाठी झुकते घेणे ही गोष्ट कमीपणाची मानण्याची गरज नाही.
‘झुकता वही हैं, जिसमें जान होती हैं।
अकडे रहना मुडदे की पहचान होती हैं!!’
हे लक्षात ठेवावे.
३६. प्रत्येक विक्रेत्याने आपण योग्य पद्धतीने काम करतो आहोत ना, योग्य तेच काम करतो आहोत ना, उत्तमपणे काम करतो आहोत ना आणि हे काम आपल्याला आपल्या उद्दिष्टांकडे नेत आहे ना याची तपासणी केली पाहिजे. विक्रेत्याची सफलता ही त्याच्या उत्पन्नात नसून केलेल्या विक्रीत आणि त्याहून ग्राहकाला लाभलेल्या समाधानात असते.
चांगल्या विक्रेत्यामध्ये पुढील गुण असावेतः- सभोवतालच्या परिस्थितीचे डोळे, कान उघडे ठेवून सतत निरीक्षण करणारा, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणारा, अफाट मेहनतीची तयारी ठेवणारा, आत्मविश्वासाने भरलेला, पण फाजील आत्मविश्वास नसणारा, परिपूर्तीची आस असणारा, वास्तवदर्शी, स्वप्नवेडा, योजनाबद्ध आखणी करणारा, आचारविचार स्वातंत्र्य जपणारा, रिस्क घेणारा, मन संयमी, समतोल ठेवणारा, प्रत्येक समस्येवर सोल्यूशन शोधणारा, एकाग्रचित्ताने काम करणारा, ग्राहकाचा विश्वास जपणारा, नवीनतेचा ध्यास बाळगणारा, चातुर्य आणि चिकाटी असणारा!
पुढील दोष विक्रेत्यात नसावेतः- त्याचा स्वभाव उतावळा नसावा. समोरच्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाही अशा कम्युनिकेशनचा नसावा. पाठपुरावा करण्याची सवय नसलेला नसावा, सामाजिकतेचे भान न ठेवणारा नसावा, उत्तराला प्रत्युत्तर करणारा नसावा, इच्छाशक्तीचा अभाव नसावा.
३७. एक इंग्रजी सुभाषित आहे – जर स्वतःला विकाल तरच वस्तू विकू शकाल, म्हणजे तुम्हाला स्वतःला आधी ग्राहकाच्या मनापर्यंत भिडावे लागेल, त्याने तुम्हाला स्वीकारले तरच तो तुम्ही दिलेली वस्तू खरेदी करेल.
३८. पुढील प्रश्नांची होय, अशी उत्तरे बहुसंख्येने जे देऊ शकतात ते उत्तम विक्रेते होऊ शकतात. होय, असे उत्तर अपेक्षित असलेले हे प्रश्न असे ः-
१) आपण कुठलाही नवा उपक्रम हाती घेता का? २) दैनंदिन जीवनातील बदल उदा. प्रवास, धडपड, अनिश्चितता आपल्याला चालते का? ३) एखाद्या गोष्टीची काही दिवस आधी आखणी करायला आपल्याला आवडते का? ४) अपयश येण्याची शक्यता असली तरी धाडसाने एखादे काम करता का?
५) प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी शेवटापर्यंत नेता का? ६) अनोळखी माणसांशी संवाद करण्याची संधी घेता का? ७) आपण झटपट निर्णय घेऊ शकता का? ८) आपण सदैव जागरूक राहता का? ९)काम आधी मजा नंतर, हे तंत्र पाळता का? १०) कोणतीही गोष्ट जिद्दीने पूर्ण करता का?
३९. जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात गुरूची गरज असते. आपण विक्रेते जरी असलात तरी आपल्याला व्यवस्थापनात एखादा गुरू शोधण्याची गरज असते. तसा तो तिथे नसेल तर बाहेर अशा मार्गदर्शक गुरूची निवड करावी. या गुरूची पुढील वैशिष्ट्ये असावीतः-
१) तो वयाने आपल्यापेक्षा मोठा असावा, २) तो आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी असावा, ३) आपल्यापेक्षा त्याचे व्यवहारज्ञान अधिक असावे, ४)अधिक अनुभवी असावा, ५) वेळप्रसंगी ठामपणे मागे उभे राहणारा असावा, ६) आपले म्हणणे लक्षपूर्वक ऐकणारा असावा, ७) आवश्यक तेवढा वेळ देणारा असावा, ८)जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असावा, ९)शिष्याला स्फूर्ती देणारा असावा, १०) संभाव्य संकटाचा आधीच अंदाज घेऊन निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणारा असावा.
४०. वृत्तपत्रातील जाहिराती, होर्डिंग्ज किंवा टीव्हीवरील जाहिरातींपेक्षा माऊथ पब्लिसिटीने वस्तू किंवा सेवेची विक्री अधिक होते आणि ही माऊथ पब्लिसिटी निर्माण करण्याचे सामर्थ्य या यंत्रणेच्या शेवटी परंतु ग्राहकासाठी सर्वप्रथम असलेल्या विक्रेत्यामार्फत होते. तुम्ही तुमच्या कंपनीचे, स्टोअर्सचे, शोरूमचे खरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असता आणि जेव्हा तुम्ही उत्तम प्रकारे चांगला माल ग्राहकाला देता तेव्हा तो ग्राहकदेखील तुमचा ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर होतो.
– अनिल थत्ते
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.