व्यक्तिमत्त्व विकास

चारित्र्य कसे घडवावे?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते आणि हे संस्कार ज्या वेळी जाणिवेच्या पृष्ठभागावर दृग्गोचर होत नसतात त्या वेळीही ते इतके प्रबल असतात की खाली नेणिवेत त्यांचे कार्य चाललेच असते.

आपण प्रतिक्षणी जे काय आहोत, त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कारपुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कारसमष्टीचाच परिणाम होय. चारित्र्य चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहता हेच, प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ह्याच संस्कारसमष्टीच्या द्वारा नियमित होत असते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

शुभसंस्कारांचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते, कुसंस्कारांचा वरचष्मा झाल्यास माणूस दुश्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचार चिंतील आणि वाईट कामे करीलतर तिचे मन ह्या सार्‍यांच्या वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग ते तिला न कळत तिच्या विचारांना व कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करतील. ह्या वाईट संस्कारांचे कार्य वस्तुत: नेहमी चालूच असते.

थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्कारांचे फल असे होईल की ती वाईट कृत्ये करीत जाईल, आणि परिणामी ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य ठरेल. ती कुसंस्कारसमष्टी तिच्या जीवनात कुकर्मप्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरकशक्ती होऊन बसेल.

ती व्यक्ती या संस्कारांच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल, ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना, तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगील व चांगली कामे करील तर त्याच्या संस्कारांची समष्टीही चांगलीच होईल आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील.

माणूस जेव्हा चांगली कृत्ये व चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठायी निर्माण होते, तेव्हा मग त्याची इच्छा नसताही-नव्हे, बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याने मनाशी ठरविले तरीदेखील ह्या समस्त संस्कारांचे समष्टिस्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही.

ते संस्कारच मज्जाव करून त्याला वाइटापासून परावृत्त करतील. त्या वेळी तो आपल्या शुभ संस्कारांच्या हातातील निव्वळ बाहुलेच म्हणता येईल, जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील ‘बनले’ असे म्हणता येईल. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावयाचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका.

प्रसंगविशेषी एखादा ठोंब्यादेखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल. माणसावर, तो अगदी मामुली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा. वस्तुत: त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खर्‍या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी य:कश्चित माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु ज्याच्या चारित्र्याच्या लोभनीय गौरव सर्वच अवस्थांतून निरंतर प्रकट होत असतो तोच खराखरा थोर पुरुष म्हणावा, खरी श्रेष्ठता त्याच्याच ठायी वसत असते.

जगात जी कार्ये आपल्याला दिसत आहेत, मनुष्यसमाजात जी काही गती प्रतीत होत आहे, सभोवार जी सारी कर्मे आढळत आहेत ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होत. यंत्र-उपकरणांचा संभार, नगर-नगरींचा संसार, जहाजे-युद्धनौका आदींचा विस्तार, – सारेच माणसाच्या इच्छाशक्तीचा केवळ बहि:प्रकाश होय.

ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते व चारित्र्य कर्मांनी घडवले जात असते. म्हणूनच जशी कर्मे असतील तसाच इच्छाशक्तीचा बहि:प्रकाश वा बाह्य आविष्कार होणार. ह्या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्तिसंपन्न पुरुषश्रेष्ठ उदयास आले आहेत, त्यांतील सर्वजण प्रबल कर्मी होते.

अवघ्या दुनियेची उलथापालथ करून टाकण्यापुरती प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती. ही शक्ती त्यांनी युगानुयुगींच्या सतत कर्मांमधून मिळवली होती. आपण जे काय झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ होय. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण गोष्ट. विचारच टिकतात, ते स्थायी असतात, ते पसरतातही दूरवर – खूप दूरपर्यंत प्रवास करू शकतात.

आपण केलेल्या प्रत्येक विचारावर आपल्या चारित्र्याची छटा पडत असते आणि म्हणूनच शुद्ध नि पवित्र व्यक्तीच्या थट्टेला आणि शिव्यांनासुद्धा तिच्या हृदयातील प्रेमाचा व पावित्र्याचा सुवास असतो आणि त्यांनी आपले कल्याणच होते. महत्कार्य करण्यासाठी मोठे व चिकाटीचे प्रयत्न बराच काळपर्यंत करावे लागतात. काही व्यक्तींना या कार्यात अपयश आले तरी त्याची तमा बाळगण्याचे कारण नाही.

अध्यात्म्याच्या धगधगीत अग्नीच्या साहाय्याने मनुष्याच्या हृदयातील स्वार्थ व इतर असत्प्रवृत्ती नष्ट करण्याच्या या प्रयत्नात त्या असत्प्रवृत्तींनी व त्या स्वार्थीपणाने जोरदार बंड उभारावे, थैमान घालावे हे जसे स्वाभाविक आहे, तसेच असा प्रयत्न करणार्‍यांच्या मार्गात अडचणी येणे, दुर्लंघ्य विपत्तींना तोंड द्यावे लागणे व काहींचा त्यापुढे निरूपाय होऊन त्यांना अपयश येणे हेही स्वाभाविक आहे.

मांगल्याकडे जाणारा या जगातील मार्ग अत्यंत बिकट, त्रासदायक, किंबहुना निसरड्या कड्यासारखाच असतो. तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकांनी कोसळावे यात नवल मुळीच नाही; अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश येते हीच खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. या मार्गात हजारो प्रमाद होतील, अनेकदा ठेच लागेल; परंतु यातूनच चारित्र्य तावूनसुलाखून निघते.

वैराग्य येण्यासाठी, अनासक्त होण्यासाठी मन हे शुद्ध, सात्त्विक व विवेकी असावयास हवे. अभ्यास वा पुन:पुन: प्रयत्न का करावा? त्याचे कारण असे :- आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदुळणार्‍या तरंगासारखी असते. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार. असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि ‘सवय’ बनतात. ‘‘सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय’’  असे म्हणण्याचा प्रघात आहे.

केवळ दुसराच नव्हे, तर सवय ही माणसाचा प्रधान स्वभाव होय – नव्हे, ती माणसाचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयीचे फळ होय. ही वस्तुस्थिती तुम्हा-आम्हाला केवढा तरी दिलासा देते, कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयींनी बनलेला असेल तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो – तसे करणे आपल्याच हाती आहे.

आमच्या मनामधे हे जे तरंग वा लाटा उठत असतात त्यांचा प्रत्येकाचा परिणाम असे एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच ‘संस्कार’ म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिन्हांची म्हणजे संस्कारांची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणूस बनतो. जर चांगल्याचा प्रभाव पडेल तर माणूस चांगला होईल, वाइटाचा वरचष्मा होईल तर माणूस वाईट बनेल.

जर आनंदीपणाचे प्राबल्य होईल तर माणूस सुखी बनेल. वाईट सवयींवर एकमेव उपाय आहे – त्यांविरूद्ध  सवयी अंगी बाणवून घेणे. ज्या सार्‍या वाईट सवयी आमच्यात संस्कारबद्ध होऊन बसल्या आहेत, त्या चांगल्या सवयींनी कह्यात आणून दूर करावयास हव्यात. सदा चांगली कामे करीत चला, सदैव पवित्र विचार बाळगीत चला; हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

अमुक माणसाच्या उद्धाराची आता काही आशा नाही असे कदापि म्हणू नका, कारण वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज; आणि या सवयी नव्या व चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयींची पुनरावृत्ती, आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल – सुधरू शकेल.

त्याग करा, ह्या जगाचा – ह्या संसाराचा त्याग करा. आज आपण कुत्र्यांच्या एखाद्या टोळक्यासारखे आहोत – सारे सैपाकघरात शिरलो आहोत, मांसाचा एक तुकडा खात आहोत, आणि कुणी मधेच केव्हाही येऊन आपल्याला हाकलून न देवो म्हणून भयाने सारखे इकडेतिकडे बघत आहोत. असे वागण्याऐवजी राजासारखे होऊन जा – जाणून असा की हे सारे जग तुमचे आहे, तुमच्या मालकीचे आहे.

जोवर तुम्ही या जगाचा, ह्या संसाराचा त्याग करीत नाही, जोवर हे जग, हा संसार तुम्हाला बांधत राहील, तोवर तो तसला मनोभाव तुमच्या ठायी उदयास येणे कदापि शक्य नाही. तुम्ही जर ह्या जगाचा, ह्या संसाराचा बाह्य त्याग करू शकत नसाल, शरीराने त्याग करू शकत नसाल, तर निदान मनाने सार्‍याचा त्याग करा. अंत:करणाच्या अगदी बुडापासून सार्‍याचा त्याग करा – अगदी मनोमन, प्राणोप्राण सार्‍याचा त्याग करा. वैराग्यसंपन्न व्हा – तीव्र वैराग्य बाणवा.

हाच खराखरा त्याग आहे, हेच खरेखरे आत्मसमर्पण आहे – ह्या वैराग्यखेरीज धर्मलाभ होणे, आध्यात्मिकतेची प्राप्ती होणे सुतराम् शक्य नाही. कोणत्याही प्रकारची वासना बाळगू नका, कारण ज्याची वासना धराल तेच मिळेल, आणि तेच भंयकर बंधनास कारणीभूत होईल – त्याने भयंकर बंधन ओढवेल.

– स्वामी विवेकानंद


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!