यंत्रसामुग्री खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

आपण जेव्हा व्यवसायाची निवड करतो त्या वेळेस त्याला लागणार्‍या यंत्रसामुग्रीचा विचार सर्वात आधी करावा लागतो, कारण जर आपले प्रॉडक्शन व्यवस्थित चालू असेल तर प्रॉडक्शन, मार्केटिंग व इतर सर्व व्यवस्थित होईल. यंत्रसामुग्री घेताना कोणती काळजी घ्यावी याची आज आपण माहिती करून घेऊ.

सर्वप्रथम आपल्याला हवी असलेली यंत्रसामुग्री कोणकोणत्या कंपनी बनवतात हे पाहावे. या यंत्रे तयार करणार्‍या कंपनींमध्ये कोणत्या कोणत्या कंपनी नावाजलेल्या आहेत हे पाहणे गरजेचे असते; पण एखादी नवीन कंपनी असेल तर तीसुद्धा चांगली यंत्रे बनवत असू शकते, हेही लक्षात घ्यावे.

त्यामुळे प्रॉडक्शन क्षमतेवर यंत्रसामुग्रीची किंमत ठरते हे लक्षात ठेवावे. यामुळे बाजारात अशी विविध मॉडेल्स उपलब्ध असतात. त्यांची नीट माहिती समजून घ्यावी व मगच निर्णय घ्यावा.

यंत्रासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स हासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मशीन बिघडल्यावर तिचे स्पेअर पार्ट्स जर लवकर किंवा आपल्या गावात अथवा शहरात लगेच मिळणार असतील तर दुरुस्ती लवकरात लवकर होते. याउलट जर ते बनवून घ्यावे लागत असतील तर आपले प्रॉडक्शन यंत्र दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार.

माणसे बसून राहतील त्याहीपेक्षा आपले उत्पादन न झाल्यावर आपण ते बाजारात न देता आल्यामुळे आपल्या ऑर्डर्स जातील व आपले नुकसान होईल.

आपण जर आपल्याकडे स्पेअर पार्ट्स ठेवायचे म्हटले तर नगदी पैसे टाकावे लागतील. काही प्रमाणात आपल्याकडे स्पेअर पार्ट्स ठेवावेच लागतात, जेणेकरून वेळेवर धावावे लागणार नाही.

प्रत्येक वेळी आपल्याला दुरुस्ती करण्यास जमेलच असे नाही. कंपनीकडून सर्व्हिस जर चांगली असेल तर देखरेख आपल्या समोर होते. कंपनी मोठी असेल तर त्यासाठी वेगळी माणसे असतात, पण जर छोटी असेल तर त्याचा आपल्याला विचार करावा लागतो.

काही यंत्रांकरिता फाउंडेशन करणे आवश्यक असतात. ते करत असताना सेफ्टी हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आपले कामगार सुरक्षितरीत्या काम करू शकतात. काही मालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे दुर्घटना घडतात.

यंत्रांना लागणार्‍या वायरिंगपण चांगल्या व मशीनला आवश्यक असणार्‍या विद्युत दाबाच्या असणे आवश्यक आहे. त्यामध्ये हयगय नको. यंत्राचे चालू-बंद करावयाचे स्विच ऑपरेट करावयास सोपे व योग्य जागी असणे आवश्यक आहे. कामगारांसाठी सेफ्टी ड्रेसेस, बूट, गॉगल, हैंडग्लोव्हज, प्रथमोपचार पेटी त्यामध्ये सर्व प्रकारचे मेडिसिन असणे आवश्यक आहे.

यंत्र खरेदी करताना टूलबॉक्स घेणे आवश्यक आहे. काम झाल्यावर योग्य जागी मिळणे आवश्यक असते, जेणेकरून दुसर्‍या पाळीच्या कामगारांना ते सहज मिळावे.

यंत्र फिटिंगच्या वेळेस त्यावर व्यवस्थित प्रकाश पडणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर इलेक्ट्रिक लाइट व्यवस्थित मशीनवर पडतो. कामगारांना त्यामुळे त्रास होत नाही व ते न थकता आपले काम व्यवस्थित करत राहतात.

यंत्रसामुग्री खरेदी करताना…

विविध फंक्शन प्रथम स्वतः समजून घ्या किंवा आपल्याकडील एखादा माणूस त्यामध्ये माहीतगार असला पाहिजे. वेळेवर त्याला छोट्यामोठ्या दुरुस्त्या करता आल्या पाहिजेत, जेणेकरून आपले प्रॉडक्शन सुरळीत चालू राहील.

यंत्रसामुग्री खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की आपल्या कामगारांना ती सहज हाताळता आली पाहिजेत. यंत्रे जर अत्यंत आधुनिक असतील तर त्याप्रमाणे आपल्या कामगारांना प्रशिक्षित करावे लागेल. जर त्या आपल्या कामगारांना हाताळता नाही आल्या तर यंत्राचे नुकसान होते.

यंत्राची क्षमता ही आपल्याला किती उत्पादन करावयाचे आहे ह्यावर अवलंबून असते.

आज आपण किती उत्पादन करू शकतो व आपले उत्पादन लोकांना आवडल्यावर किंवा चांगल्या ऑर्डर मिळू लागल्यावर त्याची क्षमता किती असायला पाहिजे या सर्व गोष्टींवर यंत्राची पारख अवलंबून असते.

मार्केटमध्ये किती कंपनीज आपल्याला हव्या असलेली यंत्रे बनवतात, त्यांची सेवा कशी आहे, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता कशी आहे, आपल्याला लागणार्‍या प्रॉडक्ट्सची अचूकता किती आहे याचा विचार करावा. म्हणजे चालू प्रॉडक्ट्सची अचूकता जर जास्त असेल तर उत्पादनाच्या वेळेस आपला कच्चा माल वाया न जाता आपली उत्पादन क्षमता वाढते व आपले नफा वाढतो.

यंत्रसामुग्री ही आपल्या उत्पादनाच्या लाइनमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे आपला हँडलिंग टाइम वाचल्यास आपले उत्पादन वाढण्यास मदत होते. विद्युत लोडिंग हे त्या त्या यंत्रावर अवलंबून असते. विद्युत घेण्याआधी त्याचे स्लॅब समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आज असलेल्या मशीनरी व उद्या लागणार्‍या मशीन्स ह्याचा विचार करून घेणे महत्त्वाचे आहे. कारण विद्युतजोडणी केल्यावर ते कमी पडले तर पुन्हा विद्युत संमती मिळवताना वेळ, पैसा, श्रम सर्व वाया जातात.

अशा रीतीने यंत्रसामुग्री घेऊन जर वेळोवेळी येणारी छोटी-छोटी दुरुस्ती करत राहून वर्षातून एकदा ज्या वेळेस ऑफ सीजन किंवा कमी उत्पादन असेल त्या वेळेस त्यांची पूर्ण दुरुस्ती व ऑइलिंग, ग्रीसिंग करून घेणे, जेणेकरून मशीन्स सुरळीत चालू राहून आपले उत्पादन होत राहील.

कोणत्याही एका माणसावर अवलंबून न राहता नवनवीन माणसे यंत्र हाताळण्यासाठी तयार करत राहिले पाहिजे, कारण कामगार कधी धोका देतील याची खात्री नाही. अशा रीतीने यंत्रसामुग्री घेऊन आपण स्वतःचे प्रॉडक्शन चालू ठेवून आपले नुकसान व वेळ दोन्ही वाचवण्यास मदत होईल व आपली प्रगती होण्यास हातभार लागेल.

– संजय भारंबे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?