भीतीवर नियंत्रण कसे मिळवाल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण व्यवसाय करत असताना व जीवन जगत असताना आपल्याला काही वेळा एका भावनेचा सामना करायला लागतो, ती म्हणजे भीती. एखाद्या गोष्टीची भीती एक मिनिटाची, तासाची, दिवसांची व कायमचीही वाटू शकते. त्यामुळे आपल्या किती शारीरिक, मानसिक व भावनिक शक्तींचे नुकसान होते व आपल्या जीवनाच्या व व्यवसायाच्या ध्येयपूर्तीत अडथळा येतो, ते आपण अनुभवतो. आज या भावनेचा व तिचा मनाने मुकाबला करायचा विचार करू.

भीतीची भावना ही नैसर्गिक व पुरातन आहे. सर्व प्राण्यांत कोणतेही संकट उभे राहिले की भीती वाटून, मुकाबला करण्याचे किंवा पळ काढण्याचे पर्याय असतात. परिस्थिती, सामर्थ्य, बलाबल पाहून जो तो पर्याय निवडला जातो. म्हणजेच, भीती ही नैसर्गिक व आदिम आहे व भीती वाटण्यात गैर काही नाही. स्वसंरक्षणासाठी भीती ही आवश्यकही आहे; पण आज आपल्याला जंगलातील वाघाची भीती वाटत नाही, तर मानवनिर्मित परिस्थितीतूनच अनेक भीती जन्म घेतात.

जर सर्व गोष्टींची सारखी भीती वाटत राहिली तर दैनंदिन जीवन जगणे कठीण होते. म्हणून भीतीला समजावून घेऊन, तिचा मुकाबला कसा करायचा हे पाहू या. भीतीचा उगम हा मनात होतो. एकाच गोष्टीची एकाला भीती वाटते व दुसर्‍याला वाटत नाही, यातच हे सिद्ध होते. ज्याला त्या गोष्टीची भीती वाटत नाही त्याच्याकडे निश्चितच काही वेगळा विचार, ज्ञान, माहिती, अनुभव असतो, त्यामुळे त्याला भीतीवर मात करायला जमते.

कोणतीही आव्हानात्मक परिस्थिती समोर उभी राहिली की भीती वाटते. जुन्या स्मृती, बातम्या, कल्पना, अपघातासारख्या घटनांनी मनात भीतीचा शिरकाव होतो. भीतीचे शरीरावरही परिणाम होतात. हातपाय कापणे, घाम येणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

वय व अनुभवानुसार भीतीचे प्रमाण कमी-अधिक होत असते. जसे की लहानपणी आपल्याला काळोखाची व बुवा येईल याची भीती वाटायची, पण आता मोठे झाल्यावर ती वाटत नाही. याचा अर्थ कोणत्या तरी पद्धतीने व कारणाने भीती नाहीशीही होत असते.

मोटारीचा व आगगाडीचा शोध लागला तेव्हा लोक घाबरून त्यात बसायला तयार नव्हते. आज परिस्थिती काय आहे? पूर्वी कोणत्याही कारणाने, रोगराईनेही मृत्यू व्हायचे व सर्वत्र भीतीचे वातावरण असायचे; पण आज त्यातील बहुसंख्य रोगांवर विज्ञानाने नियंत्रण मिळविल्याने आज आपल्याला त्यांची भीती वाटत नाही. अशीच आपण लहान असताना पालकांची, शिक्षकांची, पोलिसांची, चोरांची किती भीती वाटायची, तशी ती आता आपण मोठे झाल्यावर वाटत नाही. भीतीचे प्रकार व कारणे अनेक असतात.

आपले बालपण, शिक्षण, अनुभव, इतरांचा पगडा व प्रभाव, चालीरीती, समजुती अशा अनेक घटकांचा आपल्या मनावर परिणाम होतो. सत्य परिस्थिती व आपल्याला वाटणारे तिचे स्वरूप यात खूप अंतर असते. त्या फरकामुळे व आपण करून घेतलेल्या समजुतीमुळे भीतीचा जन्म होतो. अगदी अंधाराची, झुरळाची, फटाक्याची, पाण्याची, आगीची यापासून ते गरिबीची, बदनामीची, नुकसानीची, नकाराची, टीकेची, एकटेपणाची, अपयशाची, मृत्यूची भीतीही आपल्याला वाटते.

यातील काही भीती रास्त असतात व त्या नको एवढी जोखीम घेण्यापासून आपल्याला वाचवतात; पण बहुतांश वेळा भीतीचा मनावर एवढा पगडा बसतो की, जीवनात व व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे कार्यही करायचे राहून जाते. आपण आपल्या कल्पनाशक्तीचा गैरवापर करूनही मनात भीतीची निर्मिती करतो.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी म्हणही आपल्याकडे आहे. शिवाय, तुम्ही तुमचा आतापर्यंतचा अनुभव तपासलात तर तुम्हाला असे दिसेल की ९८% वेळा तुम्हाला वाटलेली भीती व तशी परिस्थिती प्रत्यक्षात आलीच नाही.

उदा. साप चावेल का? गाडीचा अपघात होईल, मी पाण्यात पडेन, मला साहेब ओरडतील, माझे नुकसान होईल, मला आजार होईल, माझी माणसे दुरावतील, मला अपयश येईल, लोक हसतील किंवा काय म्हणतील, चोरी होईल, भूकंप होईल. असे हजारो भीतीचे विचार तुमच्या मनात येऊन गेलेत ना?

यातील किती घटना प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात घडल्या? वास्तविक अशा भीती वाटण्याने तुम्ही किती कामे केलीच नाहीत? आता याचा अर्थ तुम्ही भीतीचा बागुलबुवा करून जर आवश्यक काम केले नसेल तर तुमचा वेळ फुकट गेला आहे व तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीत तेवढे मागे पडला आहात.

भीतीवर उपाय काय?

तर जेव्हा व ज्याची भीती वाटते, त्या गोष्टीविषयी माहिती मिळवून त्याचा सांगोपांग विचार करून एक तर ती भीती मनातून काढून टाकणे किंवा ती परिस्थिती आलीच तर तिचा मुकाबला कसा करायचा याचा आराखडा तयार करून त्यावर कृती करणे.

जर प्रत्येक भीतीच्या प्रसंगी आपण हतबल होऊन हातपाय गाळून बसलो तर आपण काहीच करू शकणार नाही, किंबहुना आपल्याला या गोष्टीची इतकी सवय लागेल की, अशा काम न करण्याच्या सबबी आपण सांगू लागू. शिवाय, भीतीवर विचार न केल्याने तुम्ही सामना करू शकणार्‍या व करू न शकणार्‍या संकटांचा वेगळा विचारही तुम्ही करणार नाही. त्यामुळे जी गोष्ट करून भीतीवर नियंत्रण मिळवता येईल, ती गोष्टही करायची राहून जाते व त्यासंबंधी तारतम्याने विचारही आपण करत नाही.

साधे उदाहरण घेऊ या. समजा, तुमच्या मोठ्या घरात एका खोलीत चोर शिरला आहे असे तुम्हाला कळले व तुम्ही भीतीमुळे स्तब्ध बसून राहिलात, तर तुम्ही वेगळा विचार करूच शकणार नाही; पण जर तुम्ही थोड्या धीराने विचार केलात, तर खिडकीतून आवाज करून दुसर्‍यांना बोलावणे, मोठ्याने बोलून तुम्ही जागे असल्याचे दर्शवणे, खोलीला किंवा घराला बाहेरून कडी लावून घेणे वगैरे पर्याय तुम्हाला सुचतील. तुम्हाला अमुक आजार झाल्याचा संशय आला तर तुम्ही घाबरून बसून राहून काही होईल की आवश्यक तपासण्या करून तसा आजार असल्यास वेळेवर उपचार घेणे चांगले होईल?

तुम्हाला वाढणार्‍या महागाईची भीती वाटते?

भीती वाटून महागाई कमी होईल का? ५० वर्षांपूर्वी १००० रुपयांत जी जागा मिळत होती ती आता १ कोटी रुपयांत मिळते. आता भाव अजूनही वाढतील याची भीती वाटून काय उपयोग? त्याऐवजी तुम्ही आर्थिक नियोजनाचा अभ्यास केलात तर? पैसे मिळवण्याचे व वाढविण्याचे मार्ग शोधलेत तर जास्त प्रगती होईल. नाही तर त्याच जागेचा भाव उद्या २ कोटी रुपये होईल व आपण फक्त भीती व काळजी करत पाहात राहू. तुम्ही कोणता पर्याय निवडाल? भीतीचा की ज्ञानाचा, अभ्यासाचा, कृतीचा?

तुम्हाला लोकांशी किंवा भर सभेत बोलण्याची भीती वाटते?

तर ज्यांना तुम्ही बोलताना बघता व ऐकता त्यांचे निरीक्षण करा. तीही तुमच्यासारखीच माणसे आहेत. वाचन, विचार, माहिती संकलन यातून बहुश्रुत व्हा. तुमचा असा काही विचार व मते तयार करा. धीर करून एकदा बोलूनच घ्या. एकदा चार लोकांत बोलल्यावर भीती ५०% कमी होते.

नजरेला नजर भिडवा, बोलताना सभोवार पाहा. मधेच प्रश्न विचारा, एखादा विनोद सांगून ताण हलका करा. काय बोलायचे त्याचा मसुदा लेखी ठेवा. बोलल्यानंतर अभिप्राय घ्या. त्यानुसार आवश्यक सुधारणा करा.

तुम्हाला नुकसानाची भीती वाटते?

तुम्ही करत असलेल्या व्यवहाराचा पूर्ण विचार, अभ्यास, आराखडा तयार केला का? त्यासंबंधी सर्व बाबींचा विचार दुसर्‍या बाजूकडून (ग्राहक, पुरवठादार, भागीदार, सल्लागार, बँक वगैरे) तपासून घेतला का? जर नुकसान झालेच तर ते कमीत कमी कसे होईल त्याची तरतूद करता येईल का?

मग आता सांगा, नुकसान होईल म्हणून तुम्ही व्यवहार-व्यवसायच करणार नाही की आवश्यक काळजी घेऊन, भीतीवर मात करून तुम्ही ते कराल? कुठलाच व्यवसाय-व्यवहार न करून तुमची आर्थिक प्रगती कशी होणार?

तुम्हाला अपयशाची भीती वाटते?

तर विचार करा जगातील सर्व यशस्वी व्यक्ती सुरुवातीला सामान्य व अपयशीच होत्या. त्यांनी ध्येयाचा अभ्यास करून, पाठपुरावा करून यश मिळवले. अपयश हा गुन्हा नाही. तुमच्या अपयशाबद्दल लोक काय म्हणतील, त्याचा विचार करू नका. तुमचा तुमच्या ध्येयावरचा विश्वास महत्त्वाचा. अपयश आल्यास कारणांचा विचार व विश्लेषण करा, पुन्हा आराखडा तयार करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या व पुन्हा कामाला लागा. भीती व निराशेच्या मानसिक अवस्थेत राहून काही फायदा होणार आहे का?

तुम्हाला जवळची माणसे गमावण्याची भीती वाटते?

सर्वांशी बोलत राहा, त्यांना समजून घ्या. जमेल ती मदत करा, तुमच्या अडचणीही त्यांना सांगा, त्यांचा सल्ला घ्या. त्यांचे कौतुक व अभिनंदन करा, त्यांना धीर व आधार द्या. प्रत्यक्ष भेटीगाठी, फोन, मेल या माध्यमांतून संपर्कात राहा. संवाद साधा.

कृती ही भीतीवर मात करायचा उपाय आहे. जोखीम प्रत्येक बाबतीत असतेच. Not taking any risk in life, itself is a big risk असे म्हणतात ते खरं आहे. अज्ञान, माहिती व अभ्यासाचा अभाव, कल्पनाशक्तीचा गैरवापर, निश्चित व अढळ ध्येय नसणे ही भीतीची काही मुख्य कारणे आहेत.

आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांची जबाबदारी आपण घेऊन त्यानुसार व्यवसायाची व आयुष्याची मांडणी करणे शक्य आहे. सतत भिऊन, घाबरून जगायचे की निर्भय होऊन परिस्थितीचा सामना करून आनंदात जगायचे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तुम्ही काय निवडताय?

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?