Advertisement
व्यक्तिमत्त्व विकास

आपल्या विचारांवर ताबा कसा मिळवाल?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मनाचा अभ्यास करत असताना व त्याला आपल्या यशामध्ये भागीदार बनवत असताना आपण ध्येय कसे ठरवावे, त्याचा आराखडा कसा तयार करावा, ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा याचा विचार केला. बाहेर निर्माण झालेल्या सर्व गोष्टी आधी आपल्या किंवा कोणाच्या तरी मनातच, कल्पनेच्या स्वरूपात तयार झाल्या व नंतर त्या अस्तित्वात आल्या.

आपले मन एका दिवसात ५०,००० विचार करते व त्यात आपल्या ध्येयाचे किती विचार असतात व इतर किती गोष्टींत आपले लक्ष विखुरले जाते, यावर आपण किती यशस्वी होतो हे अवलंबून असते, हेही आपण पाहिले. आता हा सर्व विचार करत असताना, आपल्या मनाचे एक कार्य अव्याहत चालू असते व ते आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करते आणि ते म्हणजे आपल्या भावना! आज ह्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर विचार करू. सोप्या पद्धतीने हा विषय समजून घेऊ.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

स्थूल अर्थाने आनंद, दुःख, राग, लोभ, तिरस्कार, उत्साह, निराशा, सकारात्मक, नकारात्मक अशा अनेक अवस्थांत आपले मन असते. आपले मन अनेक भावना धारण करते आणि आधी वारंवार सांगितल्याप्रमाणे आपल्या मनात येणार्‍या, वाढणार्‍या व टिकणार्‍या भावनांना आपणच जबाबदार असतो.

बर्‍याच वेळा आपण दुसर्‍याच्या वागण्यामुळे व एखाद्या प्रसंगामुळे आपल्या भावना बनल्याचे सागतो; पण तुम्ही या सर्वांची जबाबदारी घ्या, कारण तुमच्या जीवनात घडणार्‍या घटनांना तुम्हीच जबाबदार आहात. आज आपण ‘भावना’ या विषयाचा विचार ध्येयपूर्तीच्या, यश मिळवणे या दृष्टिकोनातून करणार आहोत.

प्राचीन काळापासून या विषयावर विचार झाला असून आताही आधुनिक विज्ञान मानते की, ताणतणाव, राग, चिंता, निराशा हे आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. प्रत्येक मिनिटाला आपले विचार व भावना आपल्या जगण्याची व जीवनाची दिशा व दशा ठरवत असतात व नियंत्रित करीत असतात. मग त्यांत आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, इतरांशी संवाद व संबंध असे अनेक विषय समाविष्ट आहेत.

मग आपल्या विचारांवर व भावनांवर नियंत्रण करणे आपल्याला शक्य आहे का? अर्थातच शक्य आहे.

प्रश्न हा आहे की, आपल्याला असे नियंत्रण करण्याची गरज वाटते का? जर, तुमचे काही ध्येय असेल, तर तशी गरज आहे. मग प्रश्न उरतो, तुम्हाला तशी इच्छा आहे का व तुम्ही ते कराल का? तुमचे ध्येय किती निश्चित, अढळ व ज्वलंत आहे, त्यांवर तुम्ही भावनांवर नियंत्रण कराल की नाही, हे अवलंबून आहे.

कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेली प्रत्येक भावना क्षणिक असते. ती जास्त वेळ धारण करायची की नाही हे तुम्ही ठरवता. एकच सारखी परिस्थिती ओढवलेली दोन माणसे त्यातून निराळ्या पद्धतीने बाहेर येऊन यशस्वी वा अयशस्वी झालेली तुम्ही पाहिली असतील.

फरक पडला तो त्यांनी परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादात आणि प्रतिसादात फरक पडला, त्यांनी केलेल्या भावनांवरील कमी-अधिक नियंत्रणामुळे, त्यांनी त्या त्या वेळी केलेल्या विचारांमुळे व घेतलेल्या निर्णयांमुळे. लक्षात येतेय, मनाचे, विचारांचे व भावनांचे महत्त्व?

आनंद, उत्साह, दुःख, राग, निराशा अशी मनाची कोणतीही अवस्था, निरनिराळी माणसे कमी-अधिक वेळ धारण करताना तुम्ही पाहत असता. त्याला कारण म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत व सवय. दुसरे कारण, प्रत्येक व्यक्तीचे ध्येय व त्याची मनातील तीव्रता.

मग कसे ठेवणार मनावर, भावनांवर नियंत्रण?

आधी आपण अभ्यास केला त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला काय हवे आहे, तुमचे ध्येय काय, ते ठरवले आहेच. त्या ध्येयावर विश्‍वास ठेवून त्याचा आराखडा ठरवला आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी कोणती साधने, व्यक्ती, संस्था लागतील तेही तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही त्या ध्येयाचाच विचार करून पाठपुरावा करत आहात.

लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात काय घडेल यावर तुमचे नियंत्रण नाही, पण तुम्ही त्यावर काय प्रतिसाद देता ते महत्त्वाचे आहे. चांगली संधी सगळ्यांनाच मिळते. तुमच्या ती लक्षात येते का? तुम्ही ती संधी वेळेवर घेता का? अडचणी व संकटेही सगळ्यांवर येतात, तुम्ही त्यांना घाबरून मागे पळता का? त्यांना कसे तोंड देता? त्यातून काही शिकता का? या सर्व गोष्टी, तुमचे विचार व भावना तुम्ही कशा हाताळता यावर अवलंबून आहे.

आघाडीचे पाच तज्ज्ञ फलंदाज ५० धावांत बाद झाले असले तरी शेवटचे पाच कच्चे फलंदाजही एकूण धावसंख्या ३५० वर नेऊन ठेवतात, असे होताना तुम्ही पाहिलेय ना? का बरे पहिल्या पाचांना बाद करणारे गोलंदाज, पुढच्या पाचांना स्वस्तात बाद करू शकत नाहीत? कारण, ते शेवटचे फलंदाज, मन व भावनांवर नियंत्रण ठेवून परिस्थितीची जबाबदारी घेतात. फलंदाजाने चूक केल्याशिवाय गोलंदाज त्याला बाद करू शकत नाही.

तुमच्या मनाची अवस्था समतोल राहून, तुम्ही तुमच्या ध्येयावर सर्व शारीरिक व मानसिक शक्ती केंद्रित केल्या पाहिजेत. इतर व्यक्ती, घटना यामुळे तुमचे मन व भावना विचलित होऊन चालणार नाहीत, किंबहुना त्या व्यक्ती वा घटना तुम्हाला तुमच्या मनाच्या निर्धारापासून परावृत्त करू शकत नाहीत, तुमच्या संमतीशिवाय! आता तुम्हीच विचार करा, की कोणत्या गोष्टीस किती महत्त्व द्यायचे, कसला व किती विचार करायचा, किती वेळ मानसिक शक्ती त्या त्या प्रसंगी खर्च करायची?

मनाचा समतोल राखण्यासाठी, तुम्हाला होत असणार्‍या मदतीबद्दल कृतज्ञ राहा. वस्तू, व्यक्ती, घटना, संस्था यांचे वेळोवेळी आभार माना. त्यांना गृहीत धरू नका. या सर्वांच्या सहकार्यानेच तुमची प्रगती होत आहे, याचे भान ठेवा. तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही.

यासाठीच आजूबाजूचा परिसर, मित्र, नातेवाईक, शेजारी, ग्राहक, सेवा व माल पुरवठादार, बँका, सरकार या सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवा. यामुळे या आघाडीवर शांतता नांदून तुमचे लक्ष तुमच्या कामात एकाग्र राहील. कृतज्ञता ही मनाची फार मोठी शक्ती आहे.

ती तुम्हाला नम्र बनवते व त्यामुळे लोकांच्या सहकार्यास तुम्ही पात्र होता. बहुतांशी मोठ्या यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशाचे श्रेय इतरांना देत असतात, हे लक्ष देऊन पाहा. त्यामागे कृतज्ञतेची भावनाच असते.

मनाचा समतोल राखण्यासाठी, तुम्हाला राग येणार्‍या व्यक्ती, प्रसंगात तुम्हाला सावध राहायला हवं. तुम्ही रागावून, ओरडून, चिडून कोणीही बदलत नाही व परिस्थिती सुधारत नाही, हे लवकर समजून घ्या. राग, भांडण, तंटे, वादंग यात वेळ जातो, मनस्ताप होतो, संबंध बिघडतात.

तुम्हीही कधी चुकता, त्यामुळे अशा कोणत्याही दुःख, राग, निराशा, त्रास, तणाव देणार्‍या प्रसंगात, असा विचार करा की, त्यात तुमची काही जबाबदारी आहे का? तुमच्या ध्येयासंबंधी काही आहे का? तुम्ही ती परिस्थिती सुधारण्यासाठी काही करू शकता का?

असा विचार करून, त्या व्यक्तीला माफ करून, तो प्रसंग विसरून पुढे चला. ते ओझे मनावर घेऊ नका. त्वरित आपल्या ध्येयाचे विचार मनात लादा व कामाला लागा. तुम्हाला किंवा समोरच्याला राग आला असेल, तर बुद्धीच्या व न्यायाच्या वापराने सत्य शोधा.

भावनेने आंधळे होऊ नका. तुमच्या चुकीमुळे कोणाला राग आला असेल, तर तुम्हाला सुधारायची संधी आहे. दुसर्‍याच्या चुकीमुळे तुम्हाला राग येत असेल, तर त्याला माफ करा, समजवा, शिकवा. त्यामुळे तो शिकेल व संबंध सुधारतील.

विचार करा, एखाद्या क्षणिक छोट्या प्रसंगात तुम्हाला कोणतीही भावना निर्माण होते व त्याला दिलेल्या चुकीच्या प्रतिसादाने पुढे मोठा प्रसंग तयार होतो. तुम्ही त्याच वेळी प्रसंगाचा विचार करून, त्या भावनेचा लगेच निचरा करू शकता.

मनाचा समतोल राखण्यासाठी, तुम्हाला तुमच्या चुकांची जबाबदारी घ्यायला हवी. तुमच्या चुकीमुळे कोणाला त्रास, नुकसान, वगैरे झाले असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारून लगेच मनापासून माफी मागा. त्यात कमीपणा मानलात, तर पुढे कित्येक दिवस, महिने, वर्षे तुम्ही ती अपराधीपणाची भावना मनात ठेवून बरीच मानसिक शक्ती वाया घालवाल; पण यासाठी प्रसंगाचा न्यायाने विचार करून, आपली चूक असल्यास तुम्ही ती मानली पाहिजे व तसे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

सदसद्विवेक- बुद्धी जागृत ठेवून, प्रामाणिकपणे विचार करून वागा व त्यामुळे स्वच्छ मनाने किती तरी मोठी कामे तुम्ही करू शकाल. वरील वर्णनावरून तुमच्या लक्षात आले असेल की, भावना तीव्र होतात तेव्हा मन चुका करू लागते. क्षणिक भावनेपायी तोंडातून चुकीचा शब्द व हातून चुकीची कृती होऊ शकते, ज्याचे दूरगामी परिणाम भोगायला लागू शकतात.

आपल्या ध्येयापुढे या सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत. अशा व्यक्ती, प्रसंग, वस्तू याविषयी नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. माफी मागून किंवा माफ करून त्यांना मनातून पुसून टाका. हे सोपे आहे का?

करून बघा, पण हे गरजेचे नक्की आहे म्हणून करावेच लागेल. नाही तर, अशा शेकडो भावना निर्माण करणार्‍या अनेक छोट्या-छोट्या प्रसंगांतच तुम्ही अडकून बसाल आणि तुम्हाला आवडणारे काम व तुमचे ध्येय यावरचे तुमचे लक्ष उडेल. जरा स्वतःच्या मनाचा व जीवनाचा किंवा/आणि आजूबाजूच्या काही व्यक्तींच्या स्वभाव, सवयींचा अभ्यास केलात, तर तुम्ही किंवा बाकीच्यांनी यश, कीर्ती, संपत्ती, ज्ञान कमी-अधिक कसे मिळविले, ते लगेच समजेल व लक्षात येईल.

कोणत्याही परिस्थितीत तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, भावनांवर नियंत्रण ठेवा. आवश्यक ती कर्तव्ये पार पाडताना भावनाशून्य होऊ नका. १००% नसले तरी फक्त ७०% लक्ष्य व एकाग्रता ध्येयावर ठेवली तरी प्रचंड यश पदरी पडेल. हा लेख वाचतानाही तुमचे लक्ष त्याकडे आहे का?

तुम्हाला हे विचार पटतात की पटत नाहीत? तुम्हाला राग/निराशा येतेय की आनंद/उत्साह वाटतोय? यावर येत्या पाच मिनिटांत तुम्ही या लेखाचा वापर आयुष्यात प्रगती करण्यासाठी करणार की नाही, याचा निर्णय तुम्ही घ्याल. त्यानुसार तुमच्या विचारांची व कृतीची दिशा ठरेल.

हा तुमचा भावनिक निर्णय क्षणिक असणार आहे, पण त्याचे परिणाम दूरगामी असणार आहेत. मग मित्रांनो, घेतलात का निर्णय? काय निर्णय घेतलात? आयुष्य तुमचे, मर्जी तुमची.

– सतीश रानडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!