उद्योजकता

कसे कराल आपल्या ‘छंदा’ला व्यवसायात परावर्तित?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! आपल्या आवाडीनिवडीतून घेतलेला स्वतःचा शोध म्हणजे छंद अशी आपण याची नक्कीच व्याख्या करू शकतो. नाना प्रकारचे छंद असतात आणि आपल्या या आवडीनिवडी जोपासत प्रत्येकजण जगत असतो.

कुणी टपाल तिकीट जमवतो तर कोणी विविध जुनी नाणी संग्रहित करतो. कोणाला गड किल्ले खुणावतात तर कोणाला बाग काम… अशी खूप मोठी यादी असू शकते. पण आपण या गोष्टीला थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. आपली आवड, छंद जर व्यवसायात बदलता आली तर? आपल्या आवडीचे काम हेच आपल्या अर्थार्जनाचे साधन बनू शकले तर?

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

स्वत:च्या आवडीचे काम करण्यात जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो, परंतु आपल्या आवडीला, आपल्या छंदाला आपण गंभीरपणे अर्थार्जनाचे साधन म्हणून परावर्तित करण्याच्या विचारात असाल तर अनेक गोष्टींचा आपण अभ्यास करून यात उतरायला हवे. त्यासाठी विविध पातळ्यांवर आपल्या आवडीनिवडीचे परिक्षण स्वत:पुरते करायला हवे.

पहिल्या टप्प्यात म्हणजेच आपल्या आवडीला व्यवसायात रुपांतरीत करण्याच्या विचारांच्यावेळीच आपण आपल्या निर्णयाला व्यवस्थित चाचपून पाहायला हवे. छंद जोपसणे आणि त्याचे उद्योगात परिवर्तन करणे या दोन गोष्टी दोन वेगळ्या बाजू आहेत.

कारण पहिल्या बाजूला आपण आपली आवड ही नि:स्वार्थपणे जोपासत असतो. परंतु दुसर्‍या बाजूला जेव्हा तो अर्थार्जनाचा विषय येतो तेव्हा त्यामध्ये व्यवहार डोकावतो. त्यामुळे दोन्हीचा मेळ साधणे जमले पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू.

प्रथम आपली आवड काय आहे याचा नीट अभ्यास करावा. सुरुवात करण्यापूर्वीच अपयशाच्या भीतीने अनेक जण माघार घेतात. लोक काय म्हणतील याचे मनावर प्रचंड दडपण घेऊन विचार करतात अशाने सुरुवात कठीण होऊ शकते. त्यामुळे त्रयस्थपणे आपल्या निर्णयाकडे पाहा. चौफेर विचार करा. अनेक शक्याशक्यता तपासून पाहा.

आपल्याला अंतरमनातून हे माहीत असते की आपल्या छंदातून अर्थार्जन शक्य आहे पण भीतीमुळे आपण मागे पडतो. मागे ओढले जातो. आपल्यापैकी अनेकांना एकापेक्षा जास्त आवडी असू शकतात. जसे की उदा. एखाद्याला चित्र काढायला खूप आवडते आणि त्याचवेळी त्याला गायनाचीही आवड आहे मग अशावेळी योग्य निर्णय तोच असू शकतो जो दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून घेतला जाईल.

चित्रकला, लाकुडकाम, भटकंती, मातीकाम, बागकाम, कूकिंग, बेकिंग, लेखन, गायन, नृत्य, एक ना अनेक आवडी असतात. या काही आपण प्राथमिक आणि प्रातिनिधिक आवडींची उदाहरणे पाहिली. याव्यतिरिक्त छोट्यातल्या छोट्या अशा अनेक आवडीनिवडींची यादी असू शकते. ज्यांना आपल्या आवडीनिवडी नीट कळतात त्यांच्यासाठी निर्णय घेताना थोडा कमी त्रास होवू शकतो.

जर याउलट असे अनेक लोक असतात त्यांना त्यांच्यातील कलागुणांची जाणीवसुद्धा नसते अथवा जाणीव असली तरी आपल्या या जमेच्या बाजूचा आपल्या अर्थार्जनासाठी चांगला उपयोग होवू शकतो याची त्यांना पुसटशी कल्पनाही नसते. अशावेळी आपणच आपला शांतपणे मागोवा घेतला पाहिजे. आपल्याशी संवाद साधून आपण आपल्या या गोष्टीची स्वत:ला जाणीव करून दिली पाहिजे.

एक उदाहरण पाहू. ‘स्त्री’ अनेक आघाड्यांवर आज लढत असते. स्त्री शिक्षणाने सज्ञान झालीय. परंतु घर आणि संसार सांभाळताना अनेक वेळा तिलाच घर सांभाळण्याची जबाबदारी एक हाती पेलावी लागते. अशा अनेक स्त्री आपल्या आजुबाजूला असतात ज्या गृहीणी आहेत. मुलांच्या संगोपनासोबत घरातील थोरामोठ्यांच्या सेवेची जबाबदारी तिने आनंदानी पेललेली असते. मुलं मोठी होतात.

जबाबदार्‍या हळूहळू कमी होतात तेव्हा तिच्या हाती मोकळा वेळ उरू लागतो. तेव्हा तिला प्रश्‍न पडू लागतो या रिकाम्या वेळेचा उपयोग कसा करावा. अशावेळी जर त्या त्यांच्या आवडीविषयी सजग असतील तर त्यांना नक्कीच याचा फायदा होवू शकतो.

याशिवाय अनेक लोकांना नोकरी करताना त्यामध्ये समाधान मिळत नसते. कामातून मिळणारे समाधान सोबतच तुटपुंजा पगार यामुळे अनेक वेळा ताणतणाव वाढत असतो. यासाठी अनेक लोक विविध संधींचा विचार करत असतात. परंतु योग्य दिशा सापडत नसते. अनेक पर्याय असतात परंतु कुठे आर्थिक गुंतवणूक मोठी लागते तर कधी आपल्याला पेलेल असे ते पर्याय नसतात.

मग आपल्या आवडीला आपल्या अर्थार्जनासाठी वापरण्याचा विचार करता येऊ शकतो. परंतु लगेचच हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावणे योग्य नाही त्यामुळे नीट विचारपूर्वक थांबून पुढे जाता येईल.

आता आपल्या आवडीविषयी आपण आपल्यामध्ये सजगता निर्माण केली परंतु जर त्याचे योग्य नियोजन जमले नाही तर यातून मिळणार आनंदही गमावून बसू अशी एक धास्ती असते. आपल्या निर्णयावर ठाम झाल्यावर पुढला टप्पा आहे उद्योगाची संकल्पना समजून घेण्याची. ‘उद्योग’ म्हणजे काय? त्याची परिभाषा काय? आपल्या आवडीला उद्योगात परावर्तित करताना कोणकोणत्या गोष्टींची गरज असते.

पूर्व तयारी काय असावी? आपली आवड अथवा छंद ज्या क्षेत्रात मोडतो त्या क्षेत्रातील उद्योग संधी कशी आहे? हे सारे अभ्यासने गरजेचे आहे. आपण ज्या क्षेत्रात उतरू इच्छितोय त्या क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक, उद्योग यांचा अभ्यास करावा. आर्थिक नियोजनासोबतच इतर अनेक गोष्टींचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच आपण काही टप्पे पाहू.

१. एक नियोजन आराखडा तयार करा

आपला छंद, आवड ही आतापर्यंत आपण फावल्या वेळात जोपासत असतो. जर आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करायचे आहे तर टप्याटप्याने पुढे जा. सुरुवातीला तुमची नोकरी अथवा अर्थार्जनाचे इतर जर काही माध्यम असेल तर ते लगेच बंद करू नका. त्या सोबतच हे ही काम सुरू करा आणि यातून मिळालेली रक्कम बचत करा.

सहा महिने ते एक वर्षापर्यंत आपले खर्च भागवले जातील एवढी आर्थिक तरतूद करून मगच आपल्या आवडीला पूर्ण वेळासाठी अर्थार्जनाचे साधन म्हणून वेळ द्या. आता जास्तीत जास्त मेहनत सुरू करा आणि संपूर्ण वेळ यासाठी द्या. म्हणजेच हळूहळू पाया भरा.

२. पहिली विक्री अथवा पहिला ग्राहक मिळवण्यावर भर द्या:

घाई न करता पाऊले उचला. आपण लगेचच आपल्या आवडीचे रूपांतर करोडो रुपयांच्या उलढालीच्या व्यवसायात करू असे दिवा स्वप्न पाहू नका. सुरुवातीच्या काळात विक्री अथव ग्राहक जोडणी याला महत्त्व असेल. हे तुमच्या अवडीवरसुद्धा निर्भर असेल. सुरुवातीच्या काळात आपल्या हातात विक्रीसाठी माध्यमेही कमी असतात आणि गुंतवणूकही कमी असते त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर महत्वाचा ठरतो.

सद्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर आपण यासाठी बखुबीने करू शकतो. आपल्या उत्पादन अथवा सेवेवर आपला विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे परंतु लोकांना थोडा वेळ द्या तुमच्या उत्पादन अथवा सेवेला समजून घेण्यासाठी.

३. आपला जास्तीत जास्त वेळ द्या

घर-संसार, मुले, मित्र आदी प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असते. त्यांनाही वेळ द्यावा लागतोच अशावेळी आपल्याकडे काही मोजके तास असतात त्याचा जास्तीत जास्त वेळ कामासाठी द्यावा. आपण उद्योगात नव्यान येत असतो. त्याचसोबत आपल्या आवडीला आपल्या उद्योगात परावर्तित करत असतो अशावेळी आपण योग्य तो उद्योजकीय गरजेनुसार वेळेच्या व्यवस्थापनाचा बदल आपल्या जीवनशैलीत करायला हवा. ज्यामुळे उद्योगाचा पाया भक्कम होईल.

४. ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करा

आजचं युग हे डिजिटल युग आहे. आज मोठ्या प्रमाणावर लोकं विविध सोशल मिडिया साइटवर सतत ऑनलाइन असतात. त्यामुळे लोकांचा जास्तीत जास्त वेळ या प्लॅटफॉर्मवर जात असतो. काळाची गरज ओळखून प्रत्येक उद्योगाला स्वत:चा ऑनलाइन प्लेटफॉर्म तयार करण्याची गरज असते. वेबसाईट, सोशिल मीडिया प्रोफाइल प्लॅटफॉर्म तयार करायला हवे. तुमच्या उत्पादनाच्या ब्रॅण्डिंमध्ये याचे महत्वाचे योगदान असते.

५. नेटवर्क

ऑनलाइन प्लॅटफॉर्मशिवाय नेटवर्किंग ही महत्त्वाचे आहे. विविध नेटवर्किंग ग्रुप्सशी जोडले जा. मौखिक प्रसिद्धीही तुमच्या उद्योगाला वाढवण्यास मदत करते. जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या. प्रसार आणि प्रसिद्धी करा. याशिवाय जास्तीत जास्त अभ्यास करा. स्वतःच्या उद्योगाची एक ओळख तयार करा.

विक्री, व्यवस्थापन, मार्केटिंग, अशा विविध बाजू समजून घ्या. आपल्या उद्योगात त्याचा आवर्जून कल्पकतेने आणि हुशारीने वापर करा. या सर्व गोष्टी समजून घेण्यात अथवा कृती करण्यात जेवढा जास्त वेळ तुम्ही लावाल तेवढश जास्त वेळ यश तुम्हाला हुलकावणी देईल. खरंतर योग्य वेळेची वाट पाहणे कधीही चांगलेच परंतु ती येईपर्यंत हातावर हात धरून बसून राहणेही योग्य नाही. तुमच्यासमोर येणार्‍या आव्हानांना सामोरे जा.

तुमच्या आवडीला उद्योगात परावर्तित करताना जर त्याच्या बाजारपेठेचा अभ्यास केला असेल आणि योग्य ती बाजारपेठ उपलब्ध असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल. संधीचे सोने करा.

– प्रतिभा राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!