बिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात? – भाग १


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो वा आपल्या व्यवसायाचा पुढील आराखडा तयार करत असतो, तेव्हा पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

एम.बी.ए कॉलेज किंवा इतर कोर्सद्वारे या पद्धती शिकवल्या जातात, परंतु सामान्य उद्योजकांपर्यंत सोप्या भाषेत या पद्धती पोहोचू शकत नाहीत.त्यामुळे या लेखामार्फत व्यवसायाची स्ट्रॅटेजी कशी बनवावी, त्यासाठी कोणकोणते सिद्धांत आहेत, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी टाळाव्या हे तुमच्यासमोर मांडत आहे.

१. स्पर्धा : कोणताही व्यवसाय असतो, त्याला स्पर्धक असतातच. आता जरी नसतील तरी भविष्यात येणारच. आपल्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहण्यासाठी स्ट्रॅटेजी अत्यंत महत्त्वाची असते.

२. संसाधनांची मर्यादा : प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळी संसाधने लागतात. जसे मशीन, पैसा, कामगार, कच्चा माल. ही सर्व संसाधने मर्यादित आहेत. एक उत्तम स्ट्रॅटेजी आपल्याला वर्तमानातच नाही तर भविष्यातसुद्धा किती आणि केव्हा संसाधने लागणार आहेत याचा अंदाज दर्शवते. त्यानुसार आपण वेळेत नियोजन करून ही संसाधने योग्य वेळी उपलब्ध करू शकतो.

३. बिकटता : कोणताही व्यवसाय हा साधा सोपा नसतो. त्यात अनेक प्रकारच्या गुंतागुंती असतात. त्या गुंत्यात न अडकता आपल्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी स्ट्रॅटेजी अत्यंत महत्त्वाची असते.

व्यवसायाची ट्रॅटेजी कशी बनवावी?

१. व्हिजन आणि मिशन

या दोन गोष्टी जरी आपल्याला सोप्या वाटत असतील आणि काहीतरी छान वाटेल असं व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट आपण लिहू असा विचार करणे चुकीचे आहे. आपल्या व्यवसायाच्या स्ट्रॅटेजीची दिशा ही व्हिजन आणि मिशनद्वारे ठरते. त्यामुळे हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • व्हिजन स्टेटमेंट हे भविष्याबद्दल सांगते. म्हणजे, एखाद्या व्यवसायाला अंतिमत: काय करायचे आहे हे व्हिजन स्टेटमेंट सांगते.
  • मिशन स्टेटमेंट हे वर्तमानकाळ दाखवते. अर्थात, एखादा व्यवसायाचे रोजच्या कामात काय उद्दिष्ट आहे ते मिशन स्टेटमेंट सांगते.

‘टाटा मोटर्स’चे व्हिजन व मिशन पाहू.. त्यावरून आपल्याला अंदाज येईल.

व्हिजन

By FY 2024, we will become the most aspirational Indian auto brand, consistently winning, by
– Delivering superior financial returns
– Driving sustainable mobility solutions
– Exceeding customer expectations, and
– Creating a highly engaged work force

अर्थात २०२४ पर्यंत वरील चार विषयांत सर्वोत्तम कामगिरी करून भारतातील ऑटो इंडस्ट्रीमधील सर्वात महत्त्वाकांक्षी ब्रॅण्ड होणे.

मिशन

We innovate mobility solutions with passion to enhance the quality of life.

अर्थात, आम्ही जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण मोबिलिटी सोल्युशन्स शोधतो.

२. व्यवसायाचे सामर्थ्य आणि कमकुवत बाजूंचा अभ्यास करणे.

एकदा का आपले मिशन आणि व्हिजन ठरले की पुढील पायरी म्हणजे आपल्या व्यवसायाचा अभ्यास करणे. सर्वात प्रथम आपल्या व्यवसायाच्या जमेच्या बाजू कोणत्या याची यादी करावी. जसे आपले दुकान मार्केटच्या मध्यभागी आहे किंवा आपल्याकडे उत्तम कर्मचारी आहेत, इत्यादी.

त्यानंतर आपल्या कमकुवत बाजूंचा विचार करावा. जसे आपण ठराविकच प्रॉडक्ट्स ठेवतो, आपले लॉयल कस्टमर्स कमी आहेत, इत्यादी. या बाजूंचा विचार केल्यावर आपल्याला आपल्या व्यवसायाची सद्यस्थिती लक्षात येईल. हे सर्व घटक बदलणे आपल्या अर्थात व्यवसायाच्या आवाक्यात असते.

३. संधी आणि धोके

आपल्या हातात असलेल्या गोष्टींनंतर आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा विचार करावा. संधी अर्थात ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या आहेत, जसे आपल्या इंडस्ट्रीसाठी सरकारने काही विशेष योजना आखल्या असतील, भारतात डिजिटलायझेशन होत आहे आणि याचा आपल्या ऑनलाईन शॉपला फायदा होत आहे, इत्यादी.

तसेच धोक्यांपासून सावधान होण्यासाठी त्यांचाही विचार करायला हवा. जसे आपल्याला अनेक स्पर्धक आहेत. आपले ग्राहक कोरोनासारख्या कारणांमुळे कमी पैसे खर्च करू लागले आहेत, इत्यादी.

४. आपल्या समोर कोणते पर्याय आहेत हे शोधणे

वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यात आपण प्रगती करू शकतो व कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला विशिष्ट स्ट्रॅटेजीची गरज आहे. उदा. आपल्याला जर समजले की आपल्या मार्केटमध्ये सरकारने नवीन योजना आणल्यामुळे अनेक स्पर्धक वाढणार आहेत, तर आपण त्याबद्दल स्ट्रॅटेजी तयार करू.

५. योग्य स्ट्रॅटेजी निवडणे

आपल्याला एकदा हे लक्षात आले की आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी स्ट्रॅटेजी बनवायची आहे का त्यापुढील पायरी म्हणजे योग्य पर्यायाची निवड. उदा. जर आपल्याला हे माहीत आहे की आपल्या मार्केटमध्ये स्पर्धा वाढणार आहे तर आपण आपले उत्पादन वाढवू शकतो, किंमत कमी करू शकतो, लॉयल (निष्ठावंत) ग्राहक वाढवू शकतो किंवा आपला प्रचार व जाहिरात वाढवू शकतो. परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांमार्फत आपण यापैकी कोणत्या गोष्टी करायच्या हे ठरवणे.

स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटचे टप्पे :

कोणतीही स्ट्रॅटेजी ही खालील तीन टप्प्यांत कार्यरत होते.

पायरी १ : स्ट्रॅटेजी तयार करणे

आतापर्यंत आपण जे काही पाहिले ती झाली पहिली पायरी. त्या गोष्टी करून आपली स्ट्रॅटेजी आता तयार झाली आहे.

पायरी २ : स्ट्रॅटेजी वापरणे

आपली स्ट्रॅटेजी कितीही उत्तम असली तरी ती वापरल्याशिवाय तिला काहीच अर्थ नाही. त्यामुळे योग्य प्रकारे स्ट्रॅटेजी वापरणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी आपण वेगवेगळ्या टप्प्यांत काय करणार आहोत हे ठरवावे.

जसे आपल्या वरील उदाहरणात आपण पहिल्या महिन्यात जाहिरात वाढवणार आहोत, दुसर्‍या महिन्यात लॉयल ग्राहकांसाठी स्कीम आणणार आहोत, असे करत करत पुढील वर्षभरात किंवा ठराविक काळात आपले ध्येय कसे गाठले जाईल हे ठरवून त्याप्रमाणे कृती करणे.

३. स्ट्रॅटेजीचे मूल्यमापन

आपण विचार करत असाल की स्ट्रॅटेजी पूर्णपणे आचरणात आल्यावरच तिचे मूल्यमापन करावे तर ते अत्यंत चुकीचे आहे. पहिल्या दिवसापासूनच स्ट्रॅटेजीचे मूल्यमापन व्हायला हवे. जर आपली स्ट्रॅटेजी कामी येत नसेल तर त्यात पैसे आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा नवीन स्ट्रॅटेजी बनवून ती वापरणे योग्य राहील.

या पद्धतीने आपण जर स्ट्रॅटेजी तयार केली व आचरणात आणली तर आपल्याला नक्कीच प्रगतीचा वेग वाढवता येईल.

या संपूर्ण कामात आपण वेगवेगळे सिद्धांत वापरू शकतो. त्यातील काही सिद्धांत आता आपण पाहू.

स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या व्यवसायाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी काही सिद्धांत वापरले जातात –

७-एस फ्रेमवर्क

कोणताही व्यवसाय हा त्याच्या सात मुख्य घटकांनी बनलेला असतो –

१. स्ट्रॅटेजी : स्ट्रॅटेजी अर्थात व्यवसायाची उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. यावरून व्यवसायाचे भविष्य समजते.

२. स्ट्रक्चर (आराखडा) : आपल्या व्यवसायाचे स्ट्रक्चर म्हणजे आपल्या व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे- जसे प्रायव्हेट कंपनी/ एकल-मालकी/ पब्लिक कंपनी, इत्यादी. यातून आपल्याला आपली काम करण्याची ताकद आणि पद्धत समजते.

३. सिस्टिम : आपल्या व्यवसायाच्या स्ट्रक्चरमध्ये ज्या प्रकारे कामं होतात, त्याला सिस्टिम म्हणतात. जसे कोणती व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार आहे, कोण कुणाला ऑर्डर्स देतं, एखादं काम कशाप्रकारे होतं, इत्यादी. व्यवसायाची सिस्टिम ही व्यवसायाची लवचिकता दाखवते.

४. स्टाईल : स्टाईल अर्थात व्यवसायातील लोकांचे नेतृत्व गुण व नेतृत्व पद्धत. ते उत्तम काम करून आपल्या उदाहरणातून इतरांना प्रेरणा देतात का आपल्या कौशल्यांमार्फत इतरांकडून काम करवून घेतात, इत्यादी.

५. स्टाफ : व्यवसायात कोणत्या प्रकारचे व किती कर्मचारी काम करतात याचा अभ्यास करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण व्यवसायाचे वर्तमानच नाही तर भविष्यसुद्धा कर्मचारी कशाप्रकारे काम करतात यावरच ठरते.

६. स्किल्स : आपल्या कर्मचार्‍यांसोबत आपल्या व्यवसायाकडे कोणकोणती कौशल्ये आहेत हे आपल्याला स्किल्स सांगतात. उदा. आपल्या व्यवसायात उत्तम मार्केटिंग करणारे लोक आहेत, आपले कर्मचारी ग्राहकांना सहज हाताळतात, इत्यादी.

७. शेअर्ड व्हॅल्यूज : सातवा आणि सर्वात महत्त्वाचा एस म्हणजे शेअर्ड व्हॅल्यूज. शेअर्ड व्हॅल्यूज म्हणजे कंपनी कोणत्या मूल्यतत्त्वांवर चालते. कोणत्याही परिस्थितीत आपला व्यवसाय कोणते निर्णय घेईल हे यावर ठरते त्यामुळे हा शेवटचा एस जो आकृतीतसुद्धा मध्यभागी आहे तो बाकी सर्व एस ना एकत्र बांधून ठेवतो.

– शैवाली बर्वे
9967796252

बिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात? – भाग २

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?