Advertisement
उद्योगोपयोगी

कशी करावी डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक उद्योजकाचे विपणन म्हणजेच ‘मार्केटिंग’ या गोष्टीशी फार जवळचा संबंध असतो. कारण कोणतेही उत्पादन अथवा सेवा यांच्या विक्रीत वाढ करून उलढाल वाढवायची म्हटली की प्रथम आपल्याला त्या उत्पादन अथवा सेवेच्या विपणनाचा बारकाईने विचार करावा लागतो. जितके चांगले मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समिकरण मानले जाते.

प्रत्येक उद्योजक हा आपआपल्या परीने आपल्या उत्पादन वा सेवेची मार्केटिंग ही करण्याचा प्रयत्न करतच असतो. यामध्ये त्याचे मार्केटिंगसाठीचे बजेट हा एक मुख्य मुद्दा असतो. कारण लघु आणि सूक्ष्म उद्योजक यांचे मार्केटिंगचे बजेट कमी असते त्यामुळे त्यांच्या विक्रीत होणारी वाढ हीही तुलनेत कमीच असते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अशा लघु आणि सूक्ष्म क्षेत्रातल्या उद्योगकांसाठी डिजिटल मार्केटिंग हे एक चांगले माध्यम आहे, ज्याद्वारे ते आपल्या कमी बजेटमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत आपले उत्पादन वा सेवा पोहोचवू शकतात आणि आपल्या विक्रीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. यासाठी आवश्यकता फक्त दोनच गोष्टींची असणार आहे, ज्यात प्रथम म्हणजे तुमची नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी हवी आणि दुसरी म्हणजे जे शिकलोय ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची.

या दोन गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना या सदराचा नक्की लाभ होईल याची पूर्ण खात्री आहे. हे सदर वाचून यात दिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष करत असताना काही अडचणी आल्या अथवा एखादी गोष्ट समजण्यात काही अडचण आली तर केव्हाही संपर्क करू शकता.

‘डिजिटल मार्केटिंग’ हे काय नवीन?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे कॉम्प्यूटर, टॅबलेट, मोबाईल फोन इत्यादी आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून आपले उत्पादन, सेवा वा ब्रॅण्डचे केले जाणारे मार्केटिंग. 1990 साली या संकल्पनेचा उदय झाला.

अमेरिकेत यालाचा ‘इंटरनेट मार्केटिंग’, इटलीमध्ये ‘वेब मार्केटिंग’ आणि इंग्लंड व उर्वरीत जगात ‘डिजिटल मार्केटिंग’ म्हणून ओळखले जाते. याचे वैशिष्ट्य हे आहे की हे मार्केटिंगचे एकमेव साधन आहे, जिथे तुमचा ग्राहक त्याचा अभिप्राय तुमच्यापर्यंत सरळ पोहोचवू शकतो. उदा. दूरदर्शन अथवा वृत्तपत्रात एखादी जाहिरात प्रसिद्ध केलीत तर त्यावर ग्राहकाची वा प्रेक्षकाची प्रतिक्रिया काय आहे, हे तुम्हाला त्वरीत कळायला मार्ग नसतो.

मात्र तुम्ही फेसबुक पेज अथवा इमेलद्वारे ग्राहकापर्यंत एखादी जाहिरात पोहोचवलीत तर तो त्यावर आपली प्रतिक्रिया लगेच नोंदवू शकतो. यामुळे तुमच्या जाहिरातीला आणि तुमच्या मार्केटिंग स्ट्रेटेजीला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आहे हे तुम्हाला त्वरीत कळू शकेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून ती अधिकाधिक ग्राहकाला आकर्षित करणारी करता येऊ शकेल.

ग्राहकाच्या आवडीनिवडी, त्याचा खरेदी करण्याचा कल, आपल्या आणि आपल्या स्पर्धकाच्या ब्रॅण्डबद्दल त्याच्या प्रतिक्रिया या आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून कळू शकतात. ग्राहक आपल्याशी थेट संवाद साधू शकत असल्यामुळे त्याच्या समस्या, तक्रारी, गार्‍हाणी या आपल्याला कळू शकतात, जेणेकरून आपण आपल्या उत्पादन अथवा सेवेचा दर्जा सुधारू शकतो.

नरेंद्र मोदी यांचा वेब माध्यमातून केलेला प्रचार हे डिजिटल मार्केटिंगचे एक चांगले उदाहरण म्हणून घेता येईल. नरेंद्र मोदींनी प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग यशस्वीरित्या करून अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचू शकले आणि ज्याचा परिणाम स्वरूप तरुण वर्गाची पहिली पसंती ही मोदी होते. तसेच तीन वर्षांपूर्वी आलेले ‘व्हाय धिज कोलावरी’ हे गाणेसुद्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.

डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी

डिजिटल माध्यमातून मार्केटिंग करायची तर त्याच्या नियोजनात सुसूत्रता असली तरच ती अधिक परिणामकारक होऊ शकते. यासाठी तुम्ही त्याच्या नियोजनावर अधिक बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

खाली पाच पायर्‍या देत आहे ज्याचा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

ध्येयनिश्‍चिती : आपल्याला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून काय साध्य करायचे आहे, हे निश्‍चित ठरलेले असायला हवे तरच आपण त्याप्रकारे नियोजन करून आपले लक्ष्य साध्य करू शकू. एखाद्या छोट्या उद्योजकालासुद्धा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमाने टप्प्या-टप्प्याने मोठे ध्येय साध्य करणे शक्य आहे.

Marketing Funnel

मार्केटिंग फनेल

मार्केटिंग फनेल तयार करा : फनेल म्हणजे नरसाळे. ज्यामध्ये ग्राहकाला आपल्या उत्पादन वा सेवेबद्दल माहिती मिळण्यापासून ते तो ते खरेदी करेपर्यंतची प्रक्रिया येते. ज्याप्रकारे नरसाळ्याचे वरील तोंड हे मोठे असते जेणेकरून त्यात जास्तीत जास्त ओतता येते आणि खाली खाली त्याची छाननी होऊन ते निमुळते होत जाते आणि शेवटी फक्त शुद्ध पदार्थ उरतो त्याच क्रमाने आपल्याला आपल्या डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये संभाव्य ग्राहकाचे नियोजन करणे गरजेचे आहे. याच्या उतरत्या पायर्‍या खाली देत आहे.

1) जागृती :

डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या कंपनीबद्दल, ब्रॅण्डबद्दल, आपली उत्पादने अथवा सेवेबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करणे गरजेचे आहे. या पहिल्या पायरीला आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये पाहोचणे गरजेचे आहे यासाठी आपण फेसबुक मार्केटिंग तथा बल्क इमेलसारखे पर्याय वापरू शकतो.

आपण कोण आहोत, काय करतो, आपले वेगळेपण काय, ग्राहकाने आपल्याला का निवडावे, आपल्या स्पर्धकात आणि आपल्यात काय फरक आहे या सर्व प्रश्‍नांची उत्तर या पहिल्या टप्प्यात देणं गरजेचं आहे.

2) स्वारस्य असलेल्यांना गाठणे :

आपण पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांपर्यंत पोहोचलो की त्यापैकी त्यांना आपल्यामध्ये स्वारस्व आहे अशा नेमक्या ग्राहकांना गाठणे गरजेचे आहे. उदा. फेसबुकवरील आपले प्रोमोशन पाहून एखादा ग्राहक आकर्षित झाला आणि त्याने त्या प्रोमोशनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले तर तो आपल्या संकेतस्थळावरील अशा एखाद्या वेबपेजवर जाईल की जिथे त्याला आपल्या उत्पादन अथवा सेवेची नेमकी आणि सविस्तर माहिती मिळेल असे पाहावे, जेणेकरून त्याची खरेदी करण्याची इच्छा होईल.

3) आकर्षित करणे :

वरील टप्प्यात स्वारस्य असलेले ग्राहक गाठून त्यांना आपल्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. उदा. वरील टप्प्यात ज्या ग्राहकाने आपल्या संकेतस्थळावर येऊन आपल्या उत्पादन वा सेवेबद्दल माहिती मिळवली आहे, त्याच्याशी प्रत्यक्षात पुढील पाठपुरावा करता यावा यासाठी इमेल पत्ता किंवा संपर्क क्रमांक आपल्याला तेथे एखाद्या फॉर्मद्वारे घेता येऊ शकतो.

4) खरेदीसाठी उद्युक्त करणे :

वरील तीन टप्प्यांमध्ये जे ग्राहक गाळले जाऊन या शेवटच्या टप्प्यापर्यंत आले आहेत, त्यांच्यावर व्यक्तिगत प्रयत्न करून त्यांना खरेदीसाठी उद्युक्त करणे गरजेचे आहे. यासाठी आपण त्यांना कंपनीतर्फे व्यक्तिगत इमेल पाठवणं अथवा प्रत्यक्ष फोन करणं आदी करू शकतो.

या चार टप्प्यांच्या नरसाळ्याच्या प्रत्येक टप्प्यातील ग्राहकाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्याद्वारे आपल्याला आपली डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी अधिक सुधारता येऊ शकेल.

पहिल्या टप्प्यात आपण साधारण किती लोकांपर्यंत पोहोचलो आणि शेवटच्या टप्प्यात किती विक्री झाली याचा नेमका गुणोत्तर प्रमाणाचा अंदाज आला की आपण आपलं विक्रीचं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी पहिल्या टप्प्यात किती लोकांपर्यंत पोहोचायचं हे ठरवू शकतो.

उदा. एखाद्या कपडे विकणार्‍याने या नरसाळ्याचा उपयोग केला आणि त्याच्या लक्षात आले की 1 हजार लोकांपर्यंत पोहोचले की त्यापैकी वीस लोक प्रत्यक्ष खरेदी करतात, तर त्याला तर दोनशे कपडे विकायचे असतील तर किमान 10 हजार लोकांना नरसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात गाठावे लागेल.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून काय मिळवायचे आहे, याची ध्येयनिश्‍चिती केली आणि या नरसाळ्याचा उपयोग केला तर आपल्याला नक्की यश मिळेल. डिजिटल मार्केटिंगसाठी वापरली जाणारी साधने अगणित आहेत. पण त्यापैकी आपल्याला कोणतं साधन उपयोगी पडू शकेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंगच्या विविध साधनांचा आणि त्याच्या प्रत्यक्ष उपयोग कसा करावा याबद्दलची माहिती या लेखामधून मिळेल.

– शैलेश राजपूत
(लेखक ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे संपादक आहेत.)
संपर्क : 9773301292


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!