हल्ली युपीआय वापरून कोणाला पैसे द्यायचे असतील, जीपे करतो/करते, असं अगदी सहज आणि सर्रास ऐकायला मिळते. शिवाय बर्याच दुकानांमध्ये ‘गुगल पे’चा क्यूआर कोड पाहायला मिळतो. उद्योजक म्हणून आपल्या व्यवसायासाठी असा क्यूआर कोड कसा मिळवायचा, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर या लेखात तुम्हाला त्याची उत्तरे मिळतील.
‘गुगल पे’च्या व्यावसायिक सेवेचा आपल्या उद्योगामध्ये उपयोग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या उद्योगाची नोंदणी ‘गुगल पे’मध्ये करावी लागेल. ही नोंदणी स्मार्टफोन किंवा डेस्कटॉप यापैकी कोणत्याही एका माध्यमातून करता येईल.
खालील पायर्यांच्या आधारे स्मार्टफोनद्वारे नोंदणी करता येते.
१. आपल्या मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘गुगल पे फॉर बिझनेस’ हे अॅप डाउनलोड करा आणि ते पूर्ण इन्स्टॉल झाल्यावर उघडा.
२. यानंतर पुढे दिलेल्या यादीतून आपल्या मोबाइलमधील उपलब्ध गुगल खात्यांपैकी कोणतेही एक खाते निवडा. आपल्याला हवे असलेले खाते मोबाइलमध्ये नसल्यास ‘अॅड अकाउंट’वर क्लिक करून ते जोडता येऊ शकते किंवा नवीन बनवता येईल. आता ‘गेट स्टार्टेड’च्या बटणावर क्लिक करा.
३. आता अॅपकडून आपल्या मोबाइलमधील काही गोष्टींचा (उदा. लोकेशन, कॉल मॅनेजर) वापर करण्याची परवानगी मागितली जाईल.
४. यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन पर्याय दिसतील. यापैकी पहिला पर्याय निवडा. आता आपल्या उद्योगाचा मोबाइल नंबर विचारला जाईल. हा मोबाइल क्रमांक आपल्या व्यवसायाच्या बँक खात्याशी लिंक केलेला असावा. हा मोबाइल नंबर ग्राहकांना पेमेंट करताना दिसेल. तसेच सदर क्रमांक ओटीपीद्वारे पडताळला जाईल.
५. ओटीपीद्वारे पडताळणी झाल्यावर आपल्या व्यवसायाचे नोंदणीकृत नाव विचारले जाईल. तसेच उद्योगाच्या मालकाचे नाव विचारले जाईल.
६. यानंतर दिलेल्या चार पर्यायांमधून आपल्या व्यवसायाच्या मालकीचा प्रकार निवडा. आता आपण पुरवत असलेल्या वस्तू किंवा सेवेनुसार आपल्या व्यवसायाची श्रेणी निवडा.
७. यानंतर आपल्या व्यवसायाच्या जागेचा पिनकोडसहित संपूर्ण पत्ता द्या. तसेच त्याखाली दिलेल्या मॅपवर सदर जागा सुनिश्चित करा. जर आपण घरपोच सेवा देत असाल, तर नकाशाखालील चेकबॉक्स टिक करा. आता ‘कंटिन्यू’ बटणावर क्लिक करा.
८. यानंतर आपल्या बँक खात्याशी लिंक असलेला पॅन क्रमांक विचारला जाईल. तसेच संबंधित पॅन कार्डचा फोटोसुद्धा विचारला जाईल. इथेच जीएसटी क्रमांकसुद्धा देता येईल. आता ‘कंटिन्यू’च्या बटणावर क्लिक करा.
९. आता जे बँक खाते ‘गुगल पे फॉर बिझनेस’सोबत जोडायचे आहे, ती बँक पुढील यादीतून निवडा. यानंतर आपल्या खात्याचा शाखा क्रमांक/ आयएफएससी कोड किंवा शाखेचे नाव दिलेल्या यादीतून निवडा. पुढे आपला बँक खाते क्रमांक भरा आणि फाईंड बँक अकाउंट वर क्लिक करा.
१०. आता पडताळणीसाठी या यामध्ये एक रुपया जमा केला जाईल. हा व्यवहार यशस्वी झाल्यास बँक अकाउंंट सापडल्याचा निरोप स्क्रीनवर दिसेल. सोबतच ‘कन्फर्म बँक अकाउंट’चे बटण असेल. त्यावर क्लिक करा.
आता आपला व्यवसाय ‘गुगल’वर दाखवावा का, असे ‘गुगल’कडून विचारले जाईल. आपल्याला ही सेवा हवी असल्यास ‘कंटिन्यू’वर क्लिक करा. अन्यथा स्किप करू शकता.
११. यापुढे आपण भरलेल्या माहितीचा सारांश दिसेल. यातील माहिती तपासून घ्या. काही बदल हवे असल्यास करता येईल. ते करून झाले की ‘सबमिट’वर क्लिक करा.
आता ‘गुगल पे’ टीमकडून आपण नोंदणीच्या वेळी दिलेली माहितीचे परीक्षण होईल. पुढील ४८ तासांत मान्यतेचा किंवा अधिक माहितीसाठी विचारणा करणारा ई-मेल आपल्याला येईल.
याची सद्यस्थिती ‘जीपे फॉर बिझनेस’ अॅपमध्ये तपासू शकता. यानंतर पुढील १५ दिवसांत आपण दिलेल्या पत्त्यावर प्रिंटेड क्युआर कोड घरपोच येईल. तसेच आपल्या मोबाइलमधिक अॅपमधून आपण इमेज स्वरूपातसुद्धा डाउनलोड करू शकता.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.