तुमचं Goal Statement ठरलं का? ते लिहून काढून खिशात ठेवा, शिवाय सतत नजरेसमोर राहील असे ठेवा. आता एकदा काय करायचे व कोणत्या दिवसापर्यंत हे नक्की ठरविल्यावर, आपण प्रकल्पाचा आराखडा तयार करू या.
सर्वात आधी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या माहिती, ज्ञान, वस्तू, कच्चा माल, बाजार, संस्था, व्यक्ती, जागा, पैसा लागेल अशा साधनांची सविस्तर यादी करावी. त्याची उपलब्धता आपल्याला निश्चित करावी लागेल. त्यासाठी क्रमबद्ध कार्यक्रम लिहून काढा.
समजा तुम्हाला तुमचे उत्पादन व विक्री सध्याच्या १ हजारापासून १० हजारापर्यंत बारा महिन्यांत वाढवायची आहे, तर दर तिमाहीत किती वाढ कराल? दर महिन्यात किती वाढ कराल? त्यासाठी कोणती वाढीव साधने वापराल? कोणत्या नवीन भौगोलिक भागात विक्री वाढवाल? त्यासाठी भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ यांची काय व्यवस्था आहे?
खालील पाच खात्यांचे काम तुम्हाला करायचे आहे किंवा करून घ्यायचे आहे :
लिखित आराखडा (Business Plan) : व्यवसाय आराखडा तयार करताना, तुम्ही ठरविलेल्या सर्व गोष्टी लिखित स्वरूपात असणे गरजेचे आहे. त्यामुळे अंमलबजावणी करण्यास मदत होते.
मार्केटिंगचे तंत्र (Business Development) : बिझनेस डेव्हलप्मेंट म्हणजे व्यवसाय वाढ. ती वाढ संख्यात्मक, गुणात्मक, भौगोलिक फायद्यातील वाढ अशी अनेक तऱ्हेची असू शकते. त्या वाढीचे तुमचे उद्दिष्ट काय व त्यासाठीचा कार्यक्रम, साधने, प्रक्रिया यांचा अंतर्भाव या विषयात होतो.
पैशाचे व्यवस्थापन (Money and Finance) : व्यवसायासाठी लागणारे बीज व खेळते भांडवल, कर्ज किंवा भागीदार, व्याज, बँक खाती, जमा-खर्चाचे लिखाण यासंबंधीची कार्यवाही म्हणजे पैशाचे व्यवस्थापन.
उत्पादकता व परिणामकारकता (Productivity) : असलेल्या साधनांमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वीज, कच्चा माल, जाहिरात खर्च, मनुष्यबळ, प्रवास खर्च या व अशा अनेक बाबींमध्ये लक्ष घातले तर हे खर्च वाचविले किंवा कमी केले जाऊ शकतात. तांत्रिक पद्धतीत बदल करूनही लक्षणीय बचत करता येते.
व्यवस्था व पद्धती : (Systems and Processes) : आपल्या उद्योगात अनेक कार्ये सांभाळण्यासाठी अनेक व्यक्ती असतील किंवा व्यवसाय छोटा असल्याने तुम्ही एकटेच ती करत असाल. ही कार्ये करण्यासाठीची निश्चित पद्धत जर तयार करून लिहून ठेवली तर ती वाचून व थोड्या प्रशिक्षणाने कोणतीही व्यक्ती ते कार्य करू शकते, हे या विषयाचे मर्म आहे. यामुळे कोणा एका व्यक्तीसाठी काम अडत नाही व कामाच्या दर्जात सातत्य राहते.
वरीलपैकी आपल्या ध्येयाच्या दृष्टीने आवश्यक पण आपण करू शकत नाही, अशा गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागेल.
जसे की तुम्ही चांगले उत्पादन बनवू शकता, पण तुम्हाला विक्री करणे जमत नाही, तर त्यासाठी दुसर्या व्यक्तीची नेमणूक करा. याला Delegation म्हणतात. लक्षात ठेवा, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मित्र, शेजारी, नातेवाईक, सहकारी, भागीदार अशा अनेक जणांची मदत लागणार आहे व होणार आहे. म्हणून, सर्वांना घेऊन पुढे जाण्याची तयारी ठेवा.
कर्मचारी, पुरवठादार, बँका, ग्राहक व इतर संपर्कात येणाऱ्यांचा Contact Database तयार करा. त्यांच्याशी संपर्कात राहा. त्यासाठी मानवी स्नेहसंबंध सुधारण्यावर भर द्या. नवीन पद्धती, व्यवस्था, नियम शिकण्याची तयारी करा.
जी गोष्ट तुम्ही लिहून काढता, जी मोजता येते, ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होते. तुम्हाला तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी या आराखड्यात लिहिलेल्या पायऱ्यांचा व आकड्यांचा उपयोग होतो. तुम्ही जिथे मागे पडता, चुकता, त्यांत दुरुस्ती करून तुम्ही यश मिळविण्याच्या मार्गावर पुन्हा चालू शकता.
आता थोडें आकड्यांशी खेळू या. समजा, तुमचे एक वर्षाचे ध्येय व तारीख ठरली. आता ते बारा महिने किंवा/व 52 आठवड्यांत विभागा. पहा, किती छोटे व सोपे झाले ते. क्रिकेटच्या सामन्यातही एका षटकात किती धावा करायच्या ते ठरवूनच ३००-३५० धावा ५० षटकांत उभारतात, हे तुम्ही पाहिले आहेच. लक्षात ठेवा, ध्येयाकडे बघत तुम्ही एक-एक पाऊल टाकत पुढे जात राहायचे आहे.
प्रत्येक पावलाचे महत्त्व आहे आणि ते टाकले तरच आपण पुढे जाणार आहोत. चमत्काराची अपेक्षा जरूर ठेवा, पण तो चमत्कार आपणच घडविणार आहोत! तर त्यानुसार तुमच्या ध्येयाचा दर आठवड्याचा व दिवसाचा कार्यक्रम व आराखडा तयार करा.
दिवसभरात किती काम करायचे, कोणाला भेटायचे, कोणाला फोन करायचे, ईमेल पाठवायच्या, कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, कोणाकडे कोणत्या कामाविषयी अहवाल मागवायचा, हे सर्व लिहून काढा. अशा यादीला to-do-list म्हणतात. करायची कामे लिहून काढल्यावर ती कामे होण्याची व आपण करण्याची शक्यता खूपच वाढते.
दिवसाच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या, वर्षाच्या शेवटी या to-do-list चा आढावा घ्या. तुम्ही कोठे कमी पडलात त्याचा अभ्यास करून त्या सुधारणा करण्यास काय करावे लागेल, कोणाची मदत लागेल, कोणते बदल करावे लागतील याचा विचार करून, पुढील कार्यक्रमात आवश्यक बदल करा.
पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैशाचे हिशेब. तुमचे वार्षिक जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. याला income expenditure budget म्हणतात. तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करा. त्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनाची वा सेवेची वाजवी किंमत ठरवता येईल. अशा अंदाजपत्रकाचे महिन्याच्या पातळीवरचे कोष्टक तयार करा व त्याचा आढावा घ्या.
या सर्व गोष्टी लिहून काढून तुम्ही एक आंतरिक शिस्त तयार करता व तिचे पालन केल्यास तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होते. तुमचे बँक बँलन्स वाढतंय का यावर लक्ष ठेवा. तुमचं Net-worth म्हणजे तुमची एकंदर संपत्ती वाढली पाहिजे. या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी त्या लिहून ठेवून त्यांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
या तुम्ही बनविलेल्या आराखड्याचा मुख्य उपयोग तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाची कायम आठवण देणे हा होय. याला Monitoring Control म्हणतात. त्याचा उपयोग Budget Review साठी होतो. त्यामुळे तुम्ही सदैव ध्येयाचा विचार करता व इतर गोष्टींत तुमचे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण खूप कमी होते. आता तुम्हाला मनाची कार्ये ज्यांचा आपण मागील लेखात अभ्यास केला, एकाग्रता, तर्क, गणित, आत्मविश्वास, संयम, आयोजन, भावना, स्मरणशक्ती त्यांची मदत आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशी होईल, हे समजायला मदत होईल.
तुम्ही जेवढा काटेकोर अभ्यास व विचार करून ध्येयाचा आराखडा बनवाल तेवढा तो प्रत्यक्षात यायला मदत होईल, तुम्हाला तुमची प्रगती मोजणे शक्य होईल व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे जमेल.
लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात घडणार्या घटनांना तुम्हीच जबाबदार आहात.
तर, जबाबदारी घ्या आणि व्हा पुढे!
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.