आपल्या फेसबुक पेजचे पहिले १०,००० फॉलोवर्स कसे वाढवाल?

सर्व सोशल मीडियांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाणारे फेसबुक आज १.७९ अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. (डिसेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार) जगभरातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक इंटरनेट वापरकर्ते फेसबुकचा वापर करतात आणि त्यामुळे आपला उद्योग प्रमोट करण्यासाठी, नवीन ग्राहक शोधण्यासाठी तसेच आपल्या उत्पादनासाठी निष्ठावंत ग्राहक मिळविण्यासाठीचे हे एक उत्तम साधन आहे.

हे सर्व करण्यासाठी आपल्याला आधी आपले फेसबुक पेज तयार करावे लागेल आणि त्या पेजला भरपूर लाइक्स आणि फॉलोवर्स मिळवून द्यावे लागतील. आपल्या फेसबुक पेजला भरपूर लाइक्स असणे का महत्त्वाचे असते ते आता पाहू.

आपल्या फेसबुक पेजवर भरपूर लाइक्स असणे का आवश्यक आहे?

आपली लोकप्रियता दर्शवते

एखाद्या पेजचे किती लाइक्स आहेत यावरून त्या उद्योगाची लोकप्रियता ठरवली जाते. एखादे फेसबुक पेज ज्याचे १,००,००० लाइक्स आहेत तो उद्योग नक्कीच १,००० फेसबुक पेज लाइक्स असलेल्या उद्योगापेक्षा मोठा व लोकप्रिय असणार असे मानले जाते. यामुळे विश्वास निर्माण होतो.

जर आपल्याला फेसबुक पेजचे फॉलोवर्स आणि विश्वास यांचा संबंध असून असून किती असणार असे वाटत असेल तर हे जाणून घ्या की, २०११-१२ मध्ये अमेरिकेच्या राज्य विभागाने त्यांचे फेसबुक फॅन्स १,००,००० वरून २०,००,००० करण्यासाठी ६,३०,००० खर्च केले होते. त्यांनी असे का केले असेल? कारण आजच्या युगात एखाद्या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी भरपूर फेसबुक लाइक्स असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहा वर्षांआधी याला इतके महत्त्व नव्हते, त्याने काही फरकसुद्धा पडत नसे, परंतु आज हा ‘प्रसिद्धीचा सोशल पुरावा’ म्हणून मानला जात आहे.

जास्त फॉलोवर्स, जास्त भेटी

आपले जितके जास्त फॉलोवर्स असतात तितक्या आपल्या पोस्ट्स जास्त लोकांपर्यंत पोचतात. यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्या जाहिराती पाहून/आपल्या उद्योगाची लोकप्रियता पाहून आपले ग्राहक होऊ शकतात. हे जरी खरे असले तरी एक लक्षात ठेवा की, आपल्या सर्वच फॉलॉवर्सना आपल्या पोस्ट्स दिसत नाहीत.

आपल्या फॉलोवर्सपैकी खूप कमी (४ टक्क्यांहून कमी) लोकांना आपली पोस्ट दिसते. हे गणित कमी-अधिक प्रमाणात बदलते; परंतु एक लक्षात घ्या की, जर आपल्या फेसबुक पेजचे १०,००० फॉलोवर्स असतील तर त्यातील केवळ ३००-४०० लोकांपर्यंतच आपली ऑरगॅनिक पोस्ट पोचते.

एस.ई.ओ.साठी उपयुक्त

सोशल मीडिया प्रोफाइलमुळे आपले नाव सर्च इंजिनमध्ये वर येईल हे जरी गुगलने अधिकृतपणे सांगितले नसेल तरी बर्‍याच अभ्यासकांनुसार जर इतर सर्व सारखे असेल तर सोशल मीडियावर मोठा असलेला उद्योग इतरांच्या तुलनेत वरचढ ठरतो. शून्यातून सुरुवात करून १०,००० फेसबुक फॉलोवर्सपर्यंत कसे पोहोचायचे.

आपल्याला लक्षात आलेच असेल की, फेसबुकवर भरपूर फॉलोवर्स असणे आपल्या उद्योगासाठी आणि वेबसाइटसाठी किती महत्त्वाचे आहे. आता आपण शुन्यापासून १०,००० फॉलोवर्सपर्यंत जायची एक-एक पायरी पाहू.

पायरी १ : फेसबुक पेज असणे अत्यावश्यक आहे

सोशल मीडियाचा अनुभव असणार्‍यांना हे कदाचित वायफळ वाटेल; परंतु सोशल मीडियात जे नवीन आहेत त्यांसाठी व्यक्तिगत पेज आणि बिझनेस पेज यामध्ये फरक असतो हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपल्याला आपल्या मित्रपरिवारांशी जोडले राहण्यासाठी फेसबुक वापरायचे असेल तर त्यासाठी आपण वैयक्तिक फेसबुक पेज/प्रोफाइल तयार करू शकता; परंतु जर आपल्याला आपल्या उद्योगासाठी फॉलोवर्स जमवायचे व एकत्र आणायचे असतील तर त्यासाठी आपल्याला बिझनेस पेज तयार करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्वात पहिली पायरी म्हणजे आपल्या उद्योगाचे फेसबुक बिझनेस पेज तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे ते व्यवस्थित सांभाळणे.

पायरी २ : फेसबुक बिझनेस पेज तयार करणे

जेव्हा आपण फेसबुक पेजचे ऑप्टिमायझेशन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की – पेजचे शीर्षक (युजरनेम) अनुकूल असावे. आकर्षक वर्णन (डिस्क्रिप्शन) लिहिणे, योग्य माहिती देणे, उद्योगाचा सर्व तपशील व्यवस्थित लिहिणे आणि अर्थातच मनोरंजक माहिती, लेख इ. पोस्ट करणे – सर्व प्रकारच्या उद्योजकांसाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आपण आपल्या फेसबुकवर ज्या प्रकारच्या पोस्ट्स करतो त्यावरूनसुद्धा आपल्या पेजची गुणवत्ता ठरते. ज्या पेजचे ऑप्टिमायझेशन योग्य झालेले असते ते पेज लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता जास्त असते.

पायरी ३ : आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करणे

आपल्या बिझनेस पेजसोबत आपले स्वतःचे (पर्सनल) अकाऊंट असणेही महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे असतात :

आपल्या ओळखीचे लोक यामुळे फेसबुक पेजचा कंटेंट लाइक, शेअर वगैरे करतात ज्याने फेसबुकच्या नियमांनुसार आपली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या पोस्ट्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पर्सनल अकाऊंट अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या पर्सनल अकाऊंटवर जितके जास्त मित्र असतील तितक्या आपण शेअर केलेल्या पोस्ट्स जास्त लोकांपर्यंत पोहोचतात हे यात साहजिक आहे.

पायरी ४ : फेसबुक लाइक बॉक्स वेबसाइटवर आणणे

ज्याप्रमाणे दोन व्यक्तींनी एकत्र केलेले काम हे एकेकट्याने करण्यापेक्षा जास्त चांगले, जलद आणि योग्य होते त्याचप्रमाणे फेसबुक पेज व आपली वेबसाइट यांना एकत्र जोडून जर काम केले तर ते जास्त सुलभ आणि प्रभावी होते. आपली वेबसाइट फेसबुक पेजच्या ‘अबाऊट’ सेक्शनमध्ये लिहिणे, वेबसाइटवरील कंटेंट फेसबुकवर शेअर करणे हे पर्याय तर आहेतच, शिवाय आपल्या फेसबुक पेजची झलक व ते लाइक करण्यासाठीचे बटन आपण आपल्या वेबसाइटवर दाखवू शकतो. याचे बरेच फायदे असतात :

या बॉक्सचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लोकांना आपले पेज लाइक करण्यासाठी फेसबुक उघडावे लागत नाही, तर ते तिथल्या तिथे पेज लाइक करू शकतात. यात एक लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ते म्हणजे हा बॉक्स आपल्या वेबसाइटवर अशा ठिकाणी असावा जिथे लोकांचे सहज लक्ष जाईल. नाही तर याचा हवा तितका उपयोग होणार नाही.

पायरी ५ : लोकांना आपल्या पोस्ट्समध्ये जास्तीत जास्त गुंतवणे

आपले पेज उत्तम तयार आहे; परंतु लोक आपल्या पोस्ट्स पाहताच नाहीयेत किंवा पाहूनही उघडून वाचत, लाइक किंवा शेअर करत नाहीयेत, असे होणे खूप घातक आहे. त्यामुळे आपले पेज जर उत्तमरीत्या तयार असेल तर त्यावर योग्य पोस्ट्स करणे, लोकांना पेजवर आणणे व त्यानंतर विविध मार्गांनी त्यांना आपले ग्राहक करणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त लोक आपल्या पोस्ट्समध्ये गुंतावेत यासाठी आपण पुढील गोष्टींची काळजी घ्यावी :

  • आपण आपले फेसबुक पेज निव्वळ उद्योगासंबंधीच्याच कामांसाठी वापरावे. इतर काहीही असोत, कितीही चांगले असोत, ते मी माझ्या पर्सनल अकाऊंटवरूनच शेअर करेन, त्यासाठी पेज वापरणार नाही’ हे ठामपणे ठरवावे.
  • आपल्या कोणत्या प्रकारच्या पोस्ट्स लोकांना आवडतात व कोणत्या पोस्ट्स कमी आवडतात किंवा आवडत नाहीत यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फेसबुकने इंसाइट्ससारखे बरेच पर्याय आपल्यासाठी उपलब्ध केले आहेत.

पायरी ६ : निव्वळ लिंक्स नाहीत तर मनोरंजक व उत्तम दर्जाच्या पोस्ट्स करणे

बरेच जण आपल्या वेबसाइटवरील पोस्ट्सच्या नुसत्या लिंक्स आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करतात. त्याचा फायदा होतो, परंतु हवा तितका नाही. सुरुवातीला फोटोज किंवा व्हिडीओज तयार करणे जरी शक्य नसेल तरी आपण ज्या लिंक्स शेअर करतो त्याला आकर्षक डिस्क्रिप्शन अर्थत तपशील देणे, त्यात योग्य ठिकाणी हॅशटॅग वापरणे सहज शक्य आहे.

याशिवाय स्टेटस पोस्ट करणे अर्थात काही माहिती, विचार वगैरे लेखी रूपात फेसबुक पेजवर पोस्ट करणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे. हे सर्व एका दिवसात जमेलच असे नाही; परंतु आपण जसजसे फेसबुक पेज वापरत जाऊ, इतर मोठ्या पेजेसचा अभ्यास करू तसतसे यातील बारकावे आपल्याला कळत जातील. अनेक लोक आपल्या पोस्ट्स न वाचतासुद्धा त्या लाइक करतात. त्यामुळे लोकांना असं करण्याची संधी द्या.

आपली पोस्ट चांगली व माहितीपर वाटेल यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. यामुळे आपल्या वेबसाइटवरील वाचक वाढण्याला प्रोत्साहन मिळणार नाही, परंतु आपल्या फेसबुक पोस्ट्स जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागतील. यामुळे आपोआपच पुढे आपले वेबसाइटवर येणारे वाचकही वाढतील, शिवाय प्रसिद्धीसुद्धा वाढेल.

पायरी ७ : फोटोज, व्हिडीओज म्हणजेच भावना शेअर करा

जर आपण फेसबुकवरील मोठमोठी पेजेस पाहिलीत तर आपल्याला कळेल की, केवळ लेखी कंटेंटशिवाय फोटोज, व्हिडीओज, इन्फोग्राफ्स, चार्ट्स, जी.आय.एफ्स अशा अनेकविध प्रकारच्या पोस्ट्स ते शेअर करतात. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे लोकांना आपल्या पेजवर नवनवीन गोष्टी मिळाल्याने ते दीर्घकाळापर्यंत आपल्या पेजशी जोडले राहतात व याचा आपण विक्री वाढविण्यासाठी उपयोग करू शकतो. या प्रकारच्या कंटेंटला इतर कंटेंटपेक्षा लाइक, कमेंट्स, शेअर्स जास्त मिळतात व जलद गतीने पेज मोठे करण्याला मदत होते.

पायरी ८ : लाइकर्स आणि फॉलोवर्सना विविध स्पेशल ऑफर्स/ सवलती देणे

आपले फेसबुक पेज एखाद्याने का फॉलो करावे? या प्रश्नाच्या उत्तरात सर्वात महत्त्वाचे उत्तर म्हणजे सवलती. यासाठी खूप काही मोठे करण्याची आवश्यकता नाही. एखादी स्पर्धा घेणे, विशेष कंटेंट त्यांना देणे, काही सवलती जसे ५ टक्के सूट वगैरे देणे अशा गोष्टी आपण करू शकतो. यामुळेसुद्धा लोक आपल्या दीर्घकाळ संपर्कात राहतात.

पायरी ९ : आपले पेज प्रसिद्ध करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावेत.

बर्‍याच जणांची अशी अपेक्षा असते की, माझा उद्योग उत्तम आहे, माझे बरेच ग्राहकही आहेत, त्यामुळे माझं पेज आपोआप मोठं होईल; परंतु प्रत्यक्षात तसं होणं कठीणच, नाही तर खुद्द फेसबुकने स्वतःचे प्रमोशन केले नसते. त्यामुळे आपल्यालाच कष्ट घेऊन आपले पेज मोठे करायचे आहे हे मनाशी पक्के करावे. याशिवाय या पेजमधून आपल्याला नेमके कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे हेसुद्धा आधीच ठरवावे. उदा. विक्री वाढवणे, ग्राहकांशी नाते निर्माण करणे, ऑनलाइन प्रेझेन्स वाढविणे वगैरे.

पायरी १० : पेड प्रमोशन गरजेचे

आपण कितीही प्रयत्न केले तरी फेसबुकच्या नियमांनुसार आपली पोस्ट ठरावीक लोकांपर्यंतच ऑरगॅनिक पोहोचते. जर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे असेल तर फेसबुकचे पेड प्रमोशन वापरणे अनिवार्य आहे. जर आपण हे ऐकल्यावर आपला विचार बदलण्याचा विचार करत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.

फेसबुक प्रमोशन हे काही महाग नाही. केवळ ६० रुपयांपासून आपण फेसबुक प्रमोशन करू शकतो. फेसबुक प्रमोशन हे अत्यंत उपयोगी व वापरण्यास सोपे साधन आहे. यात प्रमोशन करण्याच्या पद्धतीसुद्धा बर्‍याच उपलब्ध आहेत. आपण जितके जास्त काळ ते वापरतो तितकी त्याबद्दल सखोल माहिती आपल्याला होत जाते.

फेसबुक प्रमोशनचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपण एखादी वस्तू अमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या वेबसाइटवर पाहतो, परंतु खरेदी करत नाही. त्यानंतर आपण फेसबुक लॉगइन केल्यापासून पुढील बराच काळ आपल्याला त्या वस्तूची जाहिरात, त्यावरील ऑफर्स, त्या वस्तूशी संबंधित इतर वस्तू फेसबुकच्या आपल्या वॉलवर दिसतात.

याचा अर्थ असा नाही की, फेसबुक प्रमोशन करून आपण लाइक्स विकत घेतो. कारण एखादे पेज लाइक करायचे का नाही हा निर्णय सर्वस्वी वापरकर्त्यांचा असतो. फेसबुक केवळ आपले पेज जास्तीत जास्त व संबंधित लोकांपर्यंत पोचवते. त्यामुळे आपली जाहिरात उत्तम असेल तर आपले पेज नक्कीच प्रसिद्ध होते आणि नसेल तर त्या जाहिरातीला फार प्रतिसाद मिळत नाही. आपली जाहिरात साधारणपणे किती चालेल याचाही अंदाज फेसबुक आधीच वर्तवते.

आपल्या उद्योगाला मोठे करण्यासाठी फेसबुकचा वापर करणे हा उत्तम निर्णय आहे; परंतु त्याचसोबत महत्त्वाचे आहे ते म्हणजे त्यात लक्ष घालणे.

कारण जोवर आपण त्यात लक्ष घालत नाही, तोवर त्याचे लाइक्स भरपूर वाढणे शक्य नाही व जर ते पेज फार लोकांपर्यंत पोचतच नसेल तर त्याचा फार काही उपयोगही नाही. त्यामुळे वरील दहा पायर्‍या वापरून आपल्या फेसबुक पेजला प्रसिद्धी मिळविणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?