बिझनेस नेटवर्किंग :: ओळखीतून व्यवसाय वाढवण्याची पद्धत


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुम्ही उद्योग-व्यवसाय करत आहात. तुम्हाला उद्योगवाढीसाठी, त्यातील उद्दिष्ट गाठण्यासाठी तुमची विक्री किंवा उलाढाल वाढवायची आहे. तुम्हाला भरपूर ग्राहक हवे आहेत. बरोबर ना? मग, तुम्ही त्यासाठी काय करता? पेपरमध्ये, टी.व्ही.वर, रस्त्यावर किंवा रेल्वेत जाहिरात देता, सेल्समन नेमता, कार्यक्रमाचे पुरस्कर्ते होता? की दारोदार फिरून विक्री करता? या सर्व प्रकारच्या अनुभवात वेळ, मेहनत, पैसे भरपूर प्रमाणात खर्च होतात.

त्यासाठी लागणारी माणसं, पैसा वगैरे छोट्या किंवा मध्यम आकाराच्या व्यावसायिकांकडे असतोच असे नाही. शिवाय, या पद्धती वापरायला लागणारी कौशल्ये किंवा गुंतवणूक आपण करू शकतोच असे नाही. म्हणूनच, आपण या एका परिणामकारक व किफायतशीर पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. ती पद्धत म्हणजे,

ओळखीच्या माध्यमातून उद्योजकांनी एकमेकांचा व्यवसाय वाढवणे, म्हणजेच बिझनेस नेटवर्किंग.

ओळखीच्या माणसांकडून, असे म्हटल्यावर घाबरून जाऊ नका! याचा अर्थ, तुम्ही व्यवसाय चालू केलाय, तुमची अशी-अशी उत्पादने-सेवा आहेत, त्या तुम्ही घ्या, असे सांगून सगळ्या नातेवाईक व मित्रांना फोन करून किंवा भेटून, मागे लागणे नव्हे किंवा बिझनेस नेटवर्किंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग (एम.एल.एम.) नव्हे. ते वेगळे स्वतंत्र विषय व पद्धती आहेत.

बिझनेस नेटवर्किंगमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ, तुम्हाला हवी तेवढी करत असता. त्यासाठी उद्योजकांशी ओळखी व लोकसंपर्क वाढवणे, भेटी-गाठी, संवाद-संभाषण, माहितीची प्रामाणिक देवाण-घेवाण, एकमेकांसाठी संधी निर्माण करणे, अशा अनेक पद्धतीने हे करता येते. उद्योजक एकमेकांच्या अडचणी, समस्या चांगल्या तर्हेशने समजून घेऊ शकतात.

पुढाकार, सहभाग, समज, बहुश्रुतता, संपर्काच्या पद्धती, सहकार्य, संयम, सतत शिकण्याची तयारी अशा गुणांच्या विकासाने, आपला लोकव्यवहार वाढवून बिझनेस नेटवर्किंग करता येते, शिकता येते व त्यातून आपला व इतरांचा उद्योगही वाढवता येतो.

तुम्ही कोणाला ओळखता यापेक्षा तुम्हाला कोण ओळखते हे महत्त्वाचे. जो तुम्हाला ओळखतो, त्याची तुमच्याविषयी प्रतिमा काय आहे, हे महत्त्वाचे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तुम्हाला ओळखतो, तोच तुमचा ग्राहक असेल असे नाही, तर त्या ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संभाव्य ग्राहकांशी संपर्क करून देणे, म्हणजे बिझनेस नेटवर्किंग.

का आणि कसा देईल तो मधला ओळखीचा माणूस तुम्हाला ग्राहक किंवा का करेल तो तुम्हाला मदत? कुठे सापडेल तो मधला माणूस?

संबंधित कृती : तुम्ही ज्यांना ओळखता त्यांना तुमचा व्यवसाय माहीत आहे का? नसेल, तर अशा पाच व्यक्तींना आज त्याविषयी सविस्तर सांगा. काही विकायचा प्रयत्न करू नका. त्यांनी ऐकून घेतले का? कोणत्याही पाच अनोळखी व्यक्तींना भेटून त्यांची ओळख करून घ्या. त्यांचे नोकरी-व्यवसाय समजून घ्या.

ओळखीतून व्यवसायवृद्धी : एक सतत आनंदाचा प्रवास

वर विचार केल्याप्रमाणे, ओळखीतून व्यवसाय वाढवण्याची परिणामकारक व किफायतशीर पद्धत म्हणजेच बिझनेस नेटवर्किंग. आपण पूर्वीपासून हे करतच आहोत. तुमच्या आजूबाजूच्या सर्व आनंदी, यशस्वी व समृद्ध माणसांचा अभ्यास केलात तर तुम्हाला ते सहज आढळून येईल. व्यावसायिक व सामाजिक जीवनात लोकसंपर्क व लोकसंग्रहवाढीचे महत्त्व मोठे आहे. तर, आता नेटवर्किंग प्रक्रिया समजून घेऊ.

ही प्रक्रिया पैसे देऊन जाहिरात करण्यापेक्षा वेगळी आहे. यात तुम्ही तुमचे दुसरे महत्त्वाचे संसाधन खर्च करावे लागते, ते म्हणजे वेळ. आज ओळख झाली आणि उद्याच ऑर्डर मिळाली, असे फार क्वचितच होते, मात्र नेहमीच नेटवर्किंग संयमाने बराच वेळ शिकावे, रुजवावे लागते.

१. ओळख : कोणत्याही मीटिंगमध्ये, प्रदर्शनात, प्रवासात, समारंभात आपली नवीन माणसांशी ओळख होते. त्यात आपल्याला नाव, गाव, व्यवसाय वगैरे कळते. आपणही आपली हीच माहिती दुसऱ्याला देतो. अशा पहिल्या भेटीत महत्त्वाचे असे काही प्रभावीपणे सांगितले गेल्यास, तुम्ही एकमेकांच्यात रस घेऊ लागता.

२. माहिती : पुढील भेटी ठरवून तुम्ही एकमेकांना माहिती देता. त्यात तुमची वैयक्तिक शिक्षण, अनुभव, कुटुंब, उद्योग करण्याचे कारण वगैरे अशी माहिती असते. तुमची उत्पादने, मोठे ग्राहक, विक्रीची उद्दिष्टे, तुमचे ऑफिस, कारखाना, तुम्हाला मिळालेले मान, पुरस्कार वगैरे माहिती तुम्ही एकमेकांना देता आणि समजून घेता. हे एकाच वेळी होत नाही, तर अनेक प्रसंगांतून होत असते.

३. नाते निर्माण बनणे : सतत संपर्कातून, मिळालेल्या माहितीतून, निरीक्षण व प्रत्यक्ष अनुभवातून तुमच्यात एक नाते तयार होते. हे नाते demos, seminars, meetings, functions यातून वाढत असते. तुम्ही स्वेच्छेने व आनंदाने हे नातेसंबंध वाढवता.

४. विश्वास : अशा नातेसंबंधाच्या जपणुकीतून विश्वासनिर्मिती होते. विश्वास तुमच्याबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या उत्पादनाबद्दल, तुमच्या नीतिमत्तेबद्दल!

५. व्यवसाय-वाढ : या विश्वासातून एकमेकांच्या प्रगतीस पूरक अशा गोष्टी तुम्हाला दिसू लागतात, त्या करण्याची इच्छा होते व तुम्ही त्या करता व करतच राहता. हे आंब्याचे झाड लावण्यासारखे आहे. चार-पाच वर्षे तुम्ही झाड वाढण्याची काळजी घेता व पुढे वर्षानुवर्षे ते झाड तुम्हाला (हजारो) फळे देत राहते.

टाटा-बिर्ला-अंबानी, एल.आय.सी., स्टेट बँक ऑफ इंडिया, बेडेकर, चितळे व अशा हजारो उद्योजकांनी व ब्रँड्सनी आपल्या मनात विश्वासाचे घर तयार केले आहे, ते एका प्रकारचे नेटवर्किंग तंत्रच आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, उद्योजकाने, यात स्वत: पुढाकार घेऊन, व्यवस्थित आखणी करून, संयमाने व आनंदाने राबवण्याची ही पद्धत आहे.

संबंधित कृती : तुम्ही ज्यांना ओळखता अशा वीस प्रभावशाली व्यक्तींबरोबरील तुमच्या नेटवर्किंग पातळीचा विचार करा. वरीलपैकी कुठल्या पातळीवर आहात तुम्ही? १ ते ५? काय करायला हवंय पुढे? Visiting Cards, जी तुम्ही लोकांकडून घेऊन, नुसतीच शेकड्याने जमवून ठेवली आहेत, दररोज त्यातील दहा-दहा जणांना तरी मेल करा, फोन करा. त्यांना आपण कसे, कुठे भेटलो ते सांगा, संबंध जागवा, एकमेकांना समजून घ्यायला व मदत करायला भेटायचे ठरवा आणि भेटा.

तुमच्या उद्योगाचे या वर्षीचे ध्येय काय?

मागील दोन मुद्द्यांतून आपण ओळखीतून एकमेकांना मदत करून उद्योजक व्यवसाय कसा वाढवतात, त्याची ओळख करून घेतली. ओळख-माहिती-नातेसंबंध-विश्वास व त्यातून व्यवसायवाढ कशी होते, ते समजून घेतले; परंतु या सगळ्याच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे, तुमचे व्यवसायातील ध्येय किंवा उद्दिष्ट. तुमचे ध्येयच तुम्ही कोणते काम किती, कोणत्या दिशेने, कधी करावे, हे ठरवत असते. त्याविषयी अभ्यास करू या.

विविध कंपन्या, उद्योजक १ एप्रिलपासून आर्थिक वर्ष चालू होत असल्याने, पूर्ण वर्षाचे विक्रीचे किंवा नफ्याचे ध्येय ठेवून काम सुरू करतात. बऱ्याचदा त्यांना हा प्रश्न पडतो की, आता त्यासाठी किती जणांना, कोणाला भेटावे, कधी भेटावे, ग्राहक कसे मिळवावे? तसेच, त्या ध्येयाचे, त्रैमासिक किंवा मासिक भागही करतात. उदा. क्रिकेटमध्ये, ५० षटकांच्या सामन्यात, तो जिंकायला ५० षटकांत समजा ३५० धावा करायच्या आहेत.

तर, या अवाढव्य संख्येचे दडपण निश्चित येते; पण प्रतिषटकाचा धावांचा दर (Required Run Rate) ठरवून ही समस्या सोडवतात. म्हणजे प्रत्येक षटकात ७.० च्या गतीने धावा करायच्या आहेत, असे ठरवतात. आता, हा आकडा सोपा वाटतो व फलंदाज मनावरील दडपण दूर करून, तेवढ्याच धावा करायचा प्रयत्न करतो. जर त्याने एका वेळी एका षटकाची काळजी केली, तर ५० षटकांत तो संघ सामना जिंकतो.

तसेच, एक ग्राहक मिळवण्यासाठी किंवा रुपये एक लाखाची विक्री करण्यासाठी किती संभाव्य ग्राहकांना भेटावे, सांगावे, कळवावे लागेल, त्याला conversion rate म्हणतात. उदा. एखाद्या विमा प्रतिनिधीला एक पॉलिसी विकण्यास दहा जणांना त्याविषयी सांगावे लागते, तर त्याचा conversion rate १० आहे. म्हणजे, वर्षाला त्याचे जर १०० पॉलिसी विकण्याचे ध्येय असेल तर त्याला १००० संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचावे लागेल, म्हणजे महिन्याला साधारण ८०-९० जणांना भेटावे लागेल.

तुमचे targeted conversion rate नक्की ठरले तरच तुम्हाला किती नवीन लोकांना भेटायचे आहे, त्यांच्याशी ओळखी वाढवायच्या आहेत, हे कळेल. तुम्ही प्रभावशाली व्यक्तींना, ज्या तुम्हाला अनेक संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतील, तुमच्या व्यवसायाची, उत्पादन-सेवांची, तुम्हाला हव्या असलेल्या ग्राहकांची सविस्तर माहिती वारंवार द्यायला हवी. त्यांच्या संपर्कात राहून त्यांचा विश्वास संपादन करायला हवा.

याप्रमाणे, तुमच्या बिझनेस नेटवर्किंगचा तुम्हाला फायदा होण्यासाठी, तुमचे उद्दिष्ट किंवा ध्येय निश्चित असणे, तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचा, आकाराचा, वयाचा, भागातला ग्राहक शोधत आहात हेही नक्की ठरवायला हवे. तरच, होणाऱ्या शेकडो ओळखींचा फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याने तुमच्याकडूनच वस्तू किंवा सेवा का घ्यावी, याचे प्रबळ कारण तुम्हीच तयार करायला हवे.

संबंधित कृती : अजून ठरवले नसल्यास, आपले वार्षिक आणि येत्या महिन्याचे विक्री/नफ्याचे लक्ष्य ठरवणे व लिहून काढणे. तुमचा ग्राहक कोण व conversion rate किती आहे, तो ठरवून, दर महिन्याला किती जणांशी तुमच्या व्यवसायासंबंधी बोलावे लागेल, त्याचे गणित मांडा व त्यांना कसे, कुठे, केव्हा भेटणार, त्याचे नियोजन करा व लिहून काढा.

एकमेकांची सविस्तर भेट

निरनिराळ्या ठिकाणी, समारंभात, प्रदर्शनात, संमेलनात, नाट्यगृहात, प्रवासात, ग्राहकांकडे, पुरवठादाराकडे, बँकेत अशा विविध ठिकाणी आपली अनेक जणांशी भेट होते, तोंडओळख होते. व्हिजिटिंग कार्डची देवाणघेवाणही होते. बिझनेस नेटवर्किंग करत असताना, अशा सर्व व्यक्तींची नोंद संदर्भासह ठेवणे गरजेचे असते.

अर्थातच, नंतर लगेच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्या नवीन ओळखीच्या व्यक्तीच्या मागे लागणे, भेटायचा प्रयत्न करणे अजिबात योग्य नसते. त्याचप्रमाणे आपणही, त्या व्यक्तीचा व्यवसाय समजून घेऊन, एकमेकांना कशी मदत करू शकू, हेही पहाणे संयुक्तिक असते. तसे करण्यासाठी, एकमेकांना सविस्तर भेटून, ओळख व माहिती, विश्वास वाढविणे म्हणजेच वन-टू-वन मीटिंग.

पूर्वपरवानगीने, दिवस, वेळ व ठिकाण ठरवून, आपल्या किंवा त्या व्यक्तीच्या कार्यालयात भेट ठरवावी. साधारण कमीत कमी दोन तास वेळ ठेवावी. यात अर्धा-अर्धा वेळ प्रत्येकाविषयी बोलण्यास दोघांनाही मिळतो.

प्रत्येकाने, स्वत:विषयी खालील माहिती सांगावी :
  • आपले बालपण, कुटुंब, शिक्षण, नोकरी
  • व्यवसाय का व कसा चालू केला?
  • तुमची उत्पादने व सेवा
  • तुमचे ध्येय, धोरण व तत्त्व
  • तुमचे ऑफिस, कारखाना, विक्रीचे तंत्र
  • तुमचे नावाजलेले ग्राहक
  • तुमच्यासमोरील आव्हाने
  • तुमचे ग्राहक कोण, प्रकार, आकार, ठिकाण?
  • तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे?

साधारण वरील मुद्द्यांना धरून बोलणे होते व दुसऱ्याने ते नोंदही करून घ्यावे. काही अधिक माहिती हवी असल्यास विचारावी. बऱ्याच वेळा, अशा दोन-चार मीटिंग्जही होतात. यामधून, तुम्हाला माहितीबरोबरच एकमेकांचे बोलणे, वागणे, व्यक्तिमत्त्व, स्वभाव याचीही ओळख होते. त्या व्यक्तीला कशी मदत करता येईल, हे तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्ती व संस्था यातून मुद्दाम प्रयत्नाने शोधून काढू शकता, कारण बिझनेस नेटवर्किंगच्या पद्धतीने, दुसराही तुमच्यासाठी हेच प्रयत्न करतो.

अशा मीटिंगनंतर अधिक माहिती, विचार, कल्पना, ओळखी, सल्ला, मार्गदर्शन यांची देवाणघेवाण सुरू होते. वन-टू-वन मीटिंगचे आणि पर्यायाने बिझनेस नेटवर्किंगचे यश हे तुमच्या मनमोकळेपणावर व प्रामाणिक हेतूवरच अवलंबून असते.

संबंधित कृती : तुमच्या नुकत्याच ओळखीच्या झालेल्या व्यक्तींना फोन करून, त्यातील कमीत कमी दहा व्यक्तींबरोबर वन-टू-वन मीटिंगची येत्या पंधरा दिवसांत ठिकाण, तारीख व वेळ ठरवा. त्याचबरोबर, अशा वेळी तुम्ही तुमच्याविषयी काय बोलणार, त्याची वरील मुद्द्यांच्या आधारे लेखी तयारी करा व त्याचा सराव करून ते अधिकाधिक सुधारा.

बिझनेस नेटवर्किंगची साधने

बिझनेस नेटवर्किंग करत असताना, निरनिराळ्या पद्धतीने आपण व आपले उद्योजक मित्र एकमेकांना आपापल्या उद्योगाची माहिती देत असतात, की ज्यामुळे ते एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यास आवश्यक कामे करू शकतात. त्यातील काही पद्धतींचा विचार करू. या पद्धती तुमच्या संभाषण कलेचा कस लावून तुमच्याविषयी व तुमच्या उत्पादनांविषयी समोरच्याला रस घ्यायला लावून तुमच्याशी संबंध वाढवायला मदत करतात.

१. एक मिनिटाचे सादरीकरण :

नवीन ओळख होत असताना, एखाद्या सभा-सभारंभात चटकन प्रभावीपणे पण अत्यंत थोड्या वेळात वापरायची ही पद्धत आहे. तुमच्या व कंपनीच्या नावाबरोबरच, खालील माहितीचा वापर करून, परिस्थितीला व समोरच्या व्यक्तीला पूरक असे मोजके शब्द वापरून हे करायचे असते.

तुमची उत्पादने व सेवा, तुमचे ध्येय, धोरण व तत्त्व, अनुभव, तुमचे नावाजलेले ग्राहक, तुमचा एखादा यशस्वी प्रकल्प/ऑर्डर वगैरे.

कोणालाही तुमचे ऐकत बसायला वेळ नसतो. अशा वेळी अनोळखी व्यक्तीचे लक्ष वेधून घेता येईल व छोट्या ओळखीतून तुम्ही त्याच्या लक्षात राहाल, असे सादरीकरण सरावानेच जमवावे लागते. प्रत्यक्ष व्हिजिटिंग कार्ड देण्यापेक्षाही हे बोलके कार्ड देणेच अनेकदा प्रभावी ठरते.

२. विक्रीसंबंधी सादरीकरण (Sales Presentation) :

तुमच्या उत्पादन किंवा सेवांमध्ये ज्यांनी रुची दाखवली आहे, अशा एक वा अनेक लोकांसमोर हे केले जाते. गरजेनुसार हे पंधरा मिनिटांपासून एक तासापर्यंतही असू शकते. सादरीकरणाची सुरुवात व शेवट व्यवस्थितपणे केल्याने ऐकणार्या वर चांगला परिणाम करू शकता. शेवटी प्रश्नोत्तराचे सत्रही ठेवतात ज्यात तुम्ही लोकांचे शंका-निरसन करू शकता.

वरील मुद्द्यांसारखे तुमची माहिती विस्तृत प्रमाणात देणारे मुद्दे तुम्ही सांगू शकता, चित्र किंवा दृक्-श्राव्य चित्रफीतही दाखवू शकता. तुमच्याकडून सेवा घेण्याचे कारण व विशेषत: तुम्हाला प्रभावीपणे सांगता आली पाहिजे. तुम्ही PPT, प्रोजेक्टरद्वारे हे सादरीकरण सुलभतेने, परिणामकारकरीत्या करू शकता.

वरील दोन प्रकारांतून तुम्हाला समोरच्याला तुमची माहिती, ओळख देऊन, त्याचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळते व तो तुम्हाला स्वत:कडून किंवा इतरांकडून व्यवसायवाढीची संधी निर्माण करून देतो.

संबंधित कृती : तुमची साधारण ३०-४० शब्दांची प्रभावी ओळख लिहून काढा व आरशात पाहून ती बोलून पाहा. वरील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुमचे दहा-बारा स्लाइड्सचे दहा मिनिटांचे सेल्स प्रेझेन्टेशन तयार करा. तुम्ही ज्यांची वेळ घेतली आहे, त्यांना भेटताना हे दाखवा.

बिझनेस नेटवर्किंगची आणखी साधने

आतापर्यंत आपण उद्योजकांनी एकमेकांची माहिती व ओळख करून देण्याची दोन साधने अभ्यासली. एक मिनिट सादरीकरण व विक्रीसंबंधी सादरीकरण. अजून बऱ्याच मार्गांनी नेटवर्किंग आणि त्यातील कुशलता वाढवता येते. अशा साधनांचा व पद्धतीचा वापर समजून घेऊन त्यात ध्येयपूर्वक वेळ, पैसा व मेहनत यांचे नियोजन करावे लागते. आज अजून काही साधनांचा विचार करू.

क्लब किंवा संस्थेची नियमित मिटिंग

काही बिझनेस नेटवर्किंग क्लणब व उद्योजकांच्या इतर संस्था नियमितपणे साप्ताहिक किंवा मासिक मीटिंग ठरवतात. त्यात हॉल-हॉटेलचे भाडे, चहा-नाश्ता वगैरे अशा खर्चाचे शुल्क घेतले जाते. त्यांत क्लब किंवा संस्थेचे सभासद व इतर पाहुणे भाग घेतात. एकमेकांची ओळख, माहिती, प्रशिक्षण वगैरे करून एकमेकांना उद्योग वाढवायला मदत करतात. एकाच ठिकाणी बरेच जण नियमित भेटत असल्याने वेळ व पैशाची बचत होऊन, नेटवर्किंग परिणामकारकरीत्या होते. सॅटरडे क्लब, MIC, MBC, IBG, मी उद्योजक, BNI अशा अनेक संस्था, क्लब महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

समस्यांचे निराकरण

निरनिराळ्या क्षेत्रांतील, विभागांतील, वयाचे व अनुभवाचे अनेक उद्योजक एकत्र येऊन एकमेकांच्या उत्पादन, कर्मचारी, अर्थ, विक्री, कायदे, करविषयक समस्या ऐकून घेतात, विचारविनिमय-मंथन करतात, त्या आपसात किंवा आपल्या ओळखीच्या तज्ज्ञांकडून सोडवून घेतात. त्यासाठी Problem Solving Methods किंवा Brain Storming methods वापरतात.

सहवास-मैत्री-मजा-मनोरंजन

बरेच उद्योजक गटागटाने एकत्र येऊन सभा, समारंभ, स्नेहसंमेलन, भोजन, कुटुंबाबरोबर सहल असे उपक्रम तीन-सहा महिन्यांतून काढतात. त्यामुळे, एकमेकांशी मैत्री-विश्वास वाढणे, मनोरंजन-प्रशिक्षण होणे, मानवी संबंधांची जाण वाढणे, साचेबद्ध परिघाबाहेरील जग समजणे असे फायदे होतात. अशा कार्यक्रमास bonding activities ही म्हणतात.

विशिष्ट उद्योजकांचे संघ, संस्था, गट वगैरे

एखाद्या शहर, राज्य, देश, खंड यातील किंवा एखाद्या उद्योग प्रकाराचे अनेक उद्योजक सरकारी किंवा खासगी प्रकाराने एकत्र येतात, संपर्कात राहतात व एकमेकांच्या मदतीस तयार असतात. त्यांच्या नियमित मीटिंग होत नसल्या तरी ते छापील मासिक-पत्रिका, ईमेल, वेबसाइट, वार्षिक संमेलन, प्रशिक्षण कार्यक्रम, परदेश दौरे यानिमित्ताने संपर्कात राहतात. महाराष्ट्र व्यापारी मंडळ, MACCIA, BIA, ASSOCHEM, Export Promotion Councils अशा अनेक असोसिएशन, चेंबर्स आणि फेडरेशन आहेत.

मित्रांनो, साधने व संस्था तर अनेक आहेत. त्यात गुंतून व गोंधळून न जाता, आपले व आपल्या उद्योगाचे ध्येय ठरवून, त्यानुसार वरीलपैकी योग्य साधनांचा अभ्यास, त्यात सहभागपूर्ण कृती करून प्रगती व विकासाकडे निश्चित प्रवास करणे गरजेचे आहे.

संबंधित कृती : तुमच्याजवळील व ओळखीच्या चार-पाच उद्योजकांना एकत्र भेटा. प्रत्येकी एक आव्हान व समस्या तिथे मांडा व ती सोडवण्यासाठी प्रत्येकाकडून सूचना, सल्ला, मदत घ्या. तुमच्या आसपास होत असलेल्या उद्योजकांच्या मीटिंगची माहिती मिळवा व त्यात भाग घ्यायचे नियोजन करा.

ओळखींची देवाणघेवाण

ओळख-माहिती-संबंध-विश्वास या पायऱ्या पार करून उद्योजक एकमेकांना मदत करण्याची तयारी कशी करतात, ते आपण पाहिले. त्यासाठी कोणती व कशी तयारी करतात तेही पाहिलं. आता, एकमेकांच्या उद्योगांची माहिती, गरजा, अडचणी कळल्यावर आपण एकमेकांना समस्या सोडविण्यासाठी व व्यवसायवाढीसाठी मदत करू शकतो.

दुसऱ्या उद्योजकाने आपले उत्पादन आपल्याकडून खरेदी करणे, एवढेच करून नेटवर्किंग थांबत नाही, तर आपापल्या संपर्कातील इतर अनेक जणांना त्यांनी आपली ओळख करून देणे, यात व्यवसायवाढीची अमर्याद संधी निर्माण होते. अशा तऱ्हेने ओळख करून देण्यालाच Contact Sharing म्हणतात. उदा. रमेशचा भेटवस्तू विकण्याचा व्यवसाय आहे व सुरेशचा विमा देण्याचा व्यवसाय आहे.

ते एकमेकांना उत्पादन व सेवा विकू शकतात; पण सुरेशने त्याच्या इतर विमा, कॉर्पोरेट किंवा बँकिंग क्षेत्रातील २५-३० व्यक्तींबरोबर रमेशची व त्याच्या भेटवस्तूंची ओळख करून दिल्यास, रमेशचा व्यवसाय अनेकपट वाढायला बरीच मदत होते. आपण आपल्या मोबाइलमधील ओळखीच्या लोकांशी Contact Sharing कसे करावे ते समजून घेऊ या. त्यासाठी निवडक १५ – २० जणांना, स्पष्ट पण मोजक्या शब्दांत खालील प्रकारे पोस्ट करा व त्यांनाही तसेच करावयास सांगा:

तुमचे नाव, तुमचे ठिकाण, व्यवसाय, तुम्ही कोणत्या ओळखी देऊ शकता, तुम्हाला कोणत्या ओळखी हव्या आहेत. वरील माहिती कळल्यावर, कोणाला ज्या ओळखी हव्या आहेत, त्या तुमच्याकडे असतील, तर खालील प्रकारे ती ओळख द्या.

बिझनेस नेटवर्किंगमागील मूळ नैसर्गिक नियम

आपण बिझनेस नेटवर्किंग म्हणजे काय, ओळख-माहिती-संबंध-विश्वास व त्यातून एकमेकांचा व्यवसाय वाढविण्यासाठी उद्योजक कोणत्या पद्धती वापरतात, त्यासाठी कशी तयारी करावी, याविषयी विचार-अभ्यास केला. तर प्रत्यक्ष ओळखी एकमेकांना देऊन आपण व्यवसायवाढीच्या संधी कशा निर्माण करू शकतो, त्याचाही अनुभव घेतला.

अर्थात, प्रत्येकाच्या अभ्यासानुसार, व्यक्तिमत्त्वानुसार, हेतुनुसार किंवा त्याने घेतलेल्या मेहनतीनुसार कमी-अधिक यश प्रत्येकाला मिळाले असेल. परंतु, अशी मदत केवळ उद्योजकांनीच नव्हे, तर सर्वांनी एकमेकांना का करावी, कशी करावी व ती करता येते, हे सांगणारा नैसर्गिक, तात्त्विक किंवा आध्यात्मिक नियम आहे, तो म्हणजे मिळण्याआधी देण्याचा नियम, Law of Giving (before receiving). या मूळ नियमाचा किंवा तत्त्वाचा विचार करू या.

हा मूळ नियम असे सांगतो की,दिल्यावरच मिळते, पेराल ते उगवते, एक वस्तू द्याल तर ती अनेक पटींनी तुमच्याकडे परत येते वगैरे-वगैरे. हे प्रत्यक्षपणे सहज समजून घेता येते. मी सारखा श्वा्स घेईन, सोडणारच नाही असे तुम्ही म्हणू शकता का? आपण जीवनात जेमतेम एखादी सेवा, नोकरी-चाकरी, धंदा केला, करत आहोत, पण जन्म घेतल्यापासून आपण हजारो वस्तू व सेवा घेतल्याच आहेत.

आपल्याला या सत्याची जाणीव व त्यासंबंधी कृतज्ञता आहे का? आता, आपल्या उद्योजकांच्या संस्था, ग्रुप किंवा क्लबचा विचार करा. जर सर्व जण, मला व्यवसाय हवा, म्हणून हात पसरून दुसऱ्याने देण्याची वाटच बघत बसतील, तर कोणाला काय मिळेल?

तुम्ही सभासद असाल त्या संस्थेचा, सोसायटीचा किंवा व्हॉटसअॅप ग्रुपचाही विचार करा, सर्व जण, दुसरे कोणी तरी काही तरी देईल, पोस्ट करील व मग आपण ते वाचू व आपला फायदा होईल, अशी वाट बघत बसतील, तर काहीच मिळणार नाही किंवा कोणतीच पोस्ट येणार नाही.

इथेच, या नियमाच्या समजून घेण्यानेच, एकमेकांना सहकार्य, मदत, आधार देण्याची सुरुवात होते.

आपणच पुढाकार घेऊन द्यायची सुरुवात करायची असते. आपण नुसतेच जमिनीकडे बघत बसून झाड येण्याची व पीक, फळे येण्याची वाट बघत बसतो की आधी बी पेरतो? बिझनेस नेटवर्किंगमध्येही फक्त contacts द्यायला हवेत, असे नसून आपण एकमेकांना माहिती, ज्ञान, सल्ला, पुस्तक, मदत, आधार, आर्थिक मदत, समस्या-समाधान अशा अनेक तऱ्हेने देऊ शकतो. आपण दुसऱ्यांना सदिच्छा, शुभेच्छा, स्मितहास्य, आनंद तरी देऊ शकता ना? कोणाची काही समस्या ऐकून घेणे किंवा त्याला मानसिक आधार देण्यासाठी बोलणे, वेळ देणे, हेही खूप मोलाचे ठरते.

फक्त मलाच फायदा व्हावा, ही मानसिकता चुकीची आहे. तर, सर्वांना पुढे नेणारा, एकत्रित मदतीचा व विकासाचा नियमच सर्वकाळ चालतो आणि आपण जिथे कुठेही, कोणत्याही पातळीवर व ऐपतीचे असू, तरी आपण काही ना काही देऊ शकतच असतो.

कधीही, मी काहीही देऊ शकत नाही, माझ्याकडे आल्यावर देईन, असे म्हणू नका. नियम उलटा आहे, तुम्ही दिल्यावरच तुमच्याकडे येणार असते. चांगल्या हेतूने, संपूर्ण विश्वासाने, कोणाला मदत किंवा काही तरी देऊन तर बघा, नाही तर नुसते वाट बघत बसाल.

संबंधित कृती : कोणत्याही पाच उद्योजकांना किंवा इतरांना (वर सुचवलेल्या अनेक पर्यायांतून) तुम्ही काय देऊ शकता, ते लगेच द्या. तुम्हाला आतापर्यंतच्या आयुष्यात ज्यांची मदत झाली, अशा व्यक्ती किंवा संस्था यांच्याशी भेटा, बोला आणि/किंवा मनातल्या मनात त्यांचे आभार माना.

बिझनेस नेटवर्किंग करण्यातील चुका

बिझनेस नेटवर्किंग करण्याची पद्धत, ते करण्याची गरज व त्यामागील नैसर्गिक तत्त्व आपण समजून घेतले. काहीजण असे म्हणतात की, मी अनेक वर्षे नेटवर्किंग करतोय, पण मला त्यातून काहीच मिळत नाही किंवा व्यवसायही वाढत नाही.

त्या वेळेस, कदाचित त्या व्यक्तीने, नेटवर्किंगचे मूलतत्त्व समजून न घेता झटपट लाभाची अपेक्षा ठेवलेली असते. नेटवर्किंगचा फायदा न होण्याची आणखी कोणती स्पष्ट कारणे असतात, ती पाहूया. ती कारणे किंवा त्या चुका खालीलप्रमाणे असतात :

  • माणसे भेटल्यावर भराभर आणि भरपूर, व्हिजिटिंग कार्ड्स देण्या-घेण्याला नेटवर्किंग समजणे.
  • व्यवसायात कोणतेही ध्येय नसणे व काही तरी होण्याची वाट पाहत राहणे.
  • संभाषण, संवाद करण्याचे कौशल्य नसणे आणि ते विकसित करण्याचे प्रयत्न न करणे.
  • फक्त आपलाच व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांच्या मागे लागणे. काहीही करून पहिल्या दोन भेटींत विक्री करण्याचा प्रयत्न करणे.
  • दुसऱ्याला व दुसऱ्याचा व्यवसाय नीट ऐकून, लक्षपूर्वक समजून न घेणे. त्यामुळे कोणालाही व्यवसाय वाढवायला मदत करता येत नाही किंवा करत नाही.
  • आपल्या मीटिंगच्या वेळा न पाळणे, उद्धट वागणूक असणे, सहकार्याची भावना नसणे, वागण्यात खुलेपणा न ठेवणे.
  • नेटवर्किंग क्लबच्या मीटिंगमध्ये सेवा देण्याऐवजी, पाहुण्यासारखी सेवेची अपेक्षा ठेवणे.
  • ओळखीच्या पलीकडे जाऊन माहिती, नाते व विश्वास या पायर्याे पार न करणे.
  • मिळालेल्या ओळखींचा योग्य पाठपुरावा, वापर न करणे किंवा त्यांस योग्य उत्पादन/सेवा न पुरवणे.
  • काहीही न पेरता, आपोआप झाड येईल व फळे देईल, अशी अपेक्षा ठेवून वाट पहात बसणे.

अशा काहीही चुकीच्या वागणुकीमुळे, त्या व्यक्तीची, उद्योजकाची प्रतिमा त्याच्या वर्तुळांत बिघडते व एकमेकांत व्यवसायवाढीच्या संधी त्यास मिळत नाहीत व मग, या गोष्टींची स्वत: जबाबदारी न घेता, नेटवर्किंग चालत नाही, असा दोष ती व्यक्ती देत राहते. अर्थातच आपल्या व्यवसायवाढीसाठी पोषक व आवश्यक असे व्यक्तिमत्त्व आपल्याला वरील चुका टाळून, अभ्यासाने व सवयीने बनवावे लागते आणि ते कोणालाही शक्य आहे.

वरील मुद्द्यांच्या वर्णनातून, ओळखीतून व्यवसाय कसा वाढवायचा, म्हणजेच बिझनेस नेटवर्किंगविषयी माहिती-ज्ञान देण्याचा व त्यावर विचार-अभ्यास करण्याचा व आपल्या सहउद्योजकांना एकत्र आणून सगळ्यांनी आपापसात ज्ञान, माहिती, अनुभव वाटून वाढवावा, असा प्रयत्न आपण केला. त्यांत दहा मुद्द्यांची मालिका गुंफली.

दोन व्यक्ती विश्वासाने एकत्र आल्या तर एक आणि एक दोनच न होता अकराही होऊ शकतात, तर शेकडो जण एकत्र आले, तर ज्ञान, विचार, बुद्धी, शक्ती, कार्य हे किती प्रचंड प्रमाणात प्रकट व उपलब्ध होतील, यावर विचार व कृती व्हावी.

– सतीश रानडे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?