आपण एक उद्योजक म्हणून दिवसभरात अनेक लोकांना भेटत असतो. आपले आधी फोनवर किंवा आजकाल चॅटवरही बोलणे होते आणि त्यावरून आपण भेटण्याचे ठरवतो, परंतु त्यातील सर्वच लोक आपल्याशी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भेट करतात असे नाही.
त्यामुळे बऱ्याचवेळा विक्री वाढवण्याच्या किंवा नेटवर्किंगच्या नावाखाली आपला बराच वेळ फुकट जातो. तर अशावेळी नक्की आपल्या उपयोगाचे कोण आणि कोणासोबत आपण राहिलो तर आपला वेळ व्यर्थ जाईल हे आता आपण पाहू.
१. आपल्यातील संभाषणात तेच पुढाकार घेतात
कधीकधी अचानक एक अनोळखी व्यक्ती आपल्या व्यवसायात प्रचंड रस दाखवून आपली भेट घेऊ इच्छिते. जसे आपल्याला अचानक फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची friendship request येते, उद्योजक आहे, प्रोफाइल पूर्णसुद्धा आहे असे पाहून आपण ती request स्वीकारतो. पहिला थोडावेळ आपल्या व्यवसायाची चौकशी केली जाते.
आपल्या व्यवसायाबद्दल सांगता सांगता आपण कधी समोरचाच्या व्यवसायाबद्दल चर्चा करू लागतो हे आपल्यालाही समजत नाही. हे संभाषण सुरू करण्याचे कारणसुद्धा तेच तर असते. आपल्याला वाटते आपण आपले प्रमोशन करत आहोत आणि त्यात नकळत आपण समोरच्यांचेच सर्व ऐकून घेतो.
जेव्हा समोरचा संभाषणाची सुरुवातच त्याच्या व्यवसायाच्या माहितीवरून करतो, तेव्हा त्यापासून दूर गेलेलंच चांगलं. कारण ही सुरुवातच आपल्याला सांगत असते की आपले पुढचे सर्व संबंध हे त्या समोरच्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशन/ फायद्यासाठी तयार केले आहेत.
२. जेव्हा समोरच्याला आपले उत्पादन ‘काही महिन्यांनंतर’ घ्यायचे असते
काहीवेळा काही व्यक्ती आपल्याला सांगतात की साधारण एका महिन्यानंतर मला तुमचे उत्पादन विकत घ्यायचे आहे. हे बोलून संभाषण तेच सुरू करतात. आपल्याला वाटते आपल्याला एखादा नवीन ग्राहक मिळाला. परंतु प्रत्यक्षात ते आपल्याला आधी त्यांना हवी असलेली माहिती विचारतात.
सर्व माहिती त्यांनी विचारून आणि आपण सांगून झाल्यावर त्यांचं शेवटचं वाक्य सुद्धा हेच असतं : ‘काही महिन्यांनंतर’ मी आपले उत्पादन नक्की विकत घेईन! आणि त्यापुढे पुन्हा ती व्यक्ती आपल्याला भेटणे कठीणच.
या संभाषणाचा उद्देशच आपल्याकडून माहिती मिळवून घेणे हा असतो. त्यामुळे जेव्हा समोरची व्यक्ती ‘काही महिन्यांनंतर’ आपली ग्राहक होऊ इच्छिते तेव्हा जुजबी माहिती पुरवून ‘काही महिन्यांनंतर’ भेटू/ बोलू असे म्हणणेच उत्तम!
३. पहिल्या भेटीतच एकत्र व्यवसाय करण्याचा प्रस्ताव
जेव्हा समोरचा पहिल्या भेटीतच, जेव्हा तुम्ही एकमेकांना धड ओळखत पण नाही तेव्हाच एकत्र व्यवसाय करण्याचा प्रस्ताव मांडतो, तेव्हा लगेच सावध व्हा. कारण ह्यात बऱ्याचदा समोरचा व्यक्ती तुमची संपूर्ण माहिती काढून आलेला असतो त्यामुळे तो त्याच्या फायद्याचा करार करत असतो.
तुमच्या नाही किंवा काहीवेळा तो निव्वळ आपल्याकडून त्याच्या उपयोगाची माहिती काढून घेण्यासाठी आलेला असतो व त्यामुळे आपला वेळ मात्र फुकट जातो. त्यामुळे जोवर समोरचा तुमच्या संपूर्ण ओळखीचा नाही, तुम्हाला त्यावर विश्वास नाही, तोवर त्यासोबत कोणत्याही मोठ्या करारात पडू नये.
४. त्यांना तुमच्याकडून अशी माहिती हवी असते जी तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना पुरवता
आजकाल आपण सर्वच सोशल मीडिया मार्केटिंग थोड्या-फार प्रमाणात करत असतो. त्यावेळी तुम्ही पाहिले असेल की काही व्यक्ती तुमच्याकडून एखाद्या गोष्टीची माहिती विचारतात. ती माहिती आपल्या उत्पादनांविषयी असेलही परंतु आम्हाला तुमच्याकडून काही खरेदी करायची आहे असं ते कधीच म्हणत नाहीत.
आपण मात्र त्याला आपला भविष्यातील ग्राहक समजून माहिती देऊन जातो आणि त्यापुढे तो एकतर फक्त इतर गप्पा गोष्टी करतो किंवा परत दिसतही नाही, पण आपला अमूल्य वेळ मात्र फुकट गेलेला असतो. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसाय वाढीत मदत करेलच असे नाही; पण याचा अर्थ कुणीच करणार नाही असेही नाही.
त्यामुळे आपल्या अनुभवावरून समोरच्या व्यक्तीला ओळखून अती घाई किंवा अती विलंबही न करता आपल्या वेळेचा जास्तीत जास्त आपल्या व्यवसाय वाढीसाठी उपयोग करावा.
– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.