Advertisement
Advertisement
उद्योगोपयोगी

Investor ला आकर्षित करणारं प्रेझेंटेशन कसं बनवायचं?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

आपण कोणत्याही गुंतवणूकदाराकडे जेव्हा जातो तेव्हा आपलं लक्ष्य असतं गुंतवणूक मिळवण्याचं आणि गुंतवणूकदाराच लक्ष्य असतं अशी संधी शोधणं ज्यातून त्याला नफा मिळत राहील. यासाठी गुंतवणूकदाराला भेटून केवळ त्याला सगळं तोंडी सांगण्यापेक्षा एक प्रेझेंटेशन तयार केलं, तर आपल्या बोलण्यावर त्याला जास्त विश्वास बसतो. कारण केवळ बोलण्यापेक्षा कधीही लेखी गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो.

हे प्रेझेंटेशन तयार करताना त्यात पुढील गोष्टींचा समावेश असावा. प्रत्येक मुद्दा नीट समजण्यासाठी आपण नवीन हॉटेल सुरू करत आहोत व त्यासाठी गुंतवणूकदार शोधत आहोत असं उदाहरण घेऊ.


वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/smartudyojak

लोकांची गरज : सर्वात आधी लोकांची एक गरज दाखवायची. उदा. आपलं हॉटेल येण्या आधी त्या भागात उत्तम दर्जाचं व खिशाला परवडणारं हॉटेल नव्हतं, लोकांना त्याच त्या जुन्या हॉटेल मध्ये खावं लागायचं…असं काही. अर्थात आपल्या व्यवसायाचा जो सर्वात स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याची लोकांना गरज आहे/ होती हे दाखवायचं.

आदर्श परिस्थिती : गरज दाखविल्यानंतर लोकांसाठी सर्वोत्तम परिस्थिती कशी असेल हे दाखवावे. आपल्या हॉटेलच्या उदाहरणानुसार लोकांना कमीत कमी किमतीत उत्तम दर्जाचं जेवण मिळेल, फक्त भारतीयच नाही तर परदेशी पदार्थ सुद्धा उपलब्ध असतील, वगैरे. अर्थात आपण त्या लोकांची गरज भागावणार आहोत हे दाखवायचं आहे.

उत्पादन : यानंतर आपलं उत्पादन नक्की काय आहे हे सांगावं. यात आय उत्पादनाची सर्व माहिती असेल. जसे भारतीयच नाही तर परदेशी खाद्यपदार्थ उपलब्ध असलेलं हॉटेल.

बिझनेस मॉडेल : बिझनेस मॉडेल म्हणजे आपल्या व्यवसायाची सिस्टीम. अर्थात कच्चा माल येण्यापासून त्याचे उत्पादन बनून ते ग्राहकापर्यंत पोहचण्यापर्यंत आणि त्यातून नफा मिळण्यापर्यंत सर्व. हॉटेलचं उदाहरण पाहिलं तर भाज्या, इतर गोष्टी कुठून विकत आणणार, पदार्थ किती व कसे बनवणार, किती आचारी असणार, कोणत्या लोकांना टार्गेट करणार वगैरे वगैरे सर्व यात येईल.

प्लॅन प्रत्यक्ष सुरू कसा होणार? : आतापर्यंत आपण केवळ काय करणार ते सांगितलं आहे. आता आपल्याला ते कसं करणार हे सांगायचं आहे. अर्थात आजच्या दिवसापासून प्रत्यक्ष हॉटेल सुरू कसं होणार आणि कसं वाढणार हे सांगायचं आहे. यासाठी आपण चार्टचा वापर करून प्रत्यक्ष रस्ता दाखवू शकतो.

स्पर्धकांचा आढावा : सध्या आपले स्पर्धक कोण आहेत, त्यांची आपल्यासोबत कशाप्रकारे बरोबरी होऊ शकते, नवीन स्पर्धक निर्माण होऊ शकतात का हे यात सांगायचे आहे. यात आपण त्या स्पर्धकांवर कशी मात करू हे सांगणे अपेक्षित नाही. असलेल्या आणि येणाऱ्या स्पर्धकांची आपल्याला आतापासून जाणीव आहे हे यातून दाखवायचे आहे.

टीम : यात आपल्या व्यवसायाची टीम गुंतवणूकदाराला दाखवायची आहे. अर्थात संस्थापक कोण कोण आहेत, कर्मचारी किती आहेत ही सर्व माहिती यात येईल. आपला पैसा कुणाच्या हातात जाणार आहे, हे गुंतवणूकदाराला कळण्यासाठी टीमची माहिती देणं गरजेचं आहे.

तीन वर्षांचा प्लॅन : यानंतर आपला पुढील तीन वर्षांचा ढोबळ प्लॅन दाखवावा. यात विविध टार्गेट्स असू शकतात. जसे किती विस्तार करायचा आहे, किती नफा कमवायचा आहे, कोणत्या लोकांपर्यंत पोहचायचे आहे, इत्यादी.

गुंतवणूकीचा वापर कसा होईल व परतावा कसा दिला जाईल : गुंतवणूकदाराने दिलेले पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाणार आहेत व त्यातून त्याला कसा व केव्हा परतावा मिळेल हे सांगणे अपेक्षित आहे. आपण जर सांगितले की आधीची कर्ज फेडून किंवा नुकसान भरून काढून व्यवसाय पुढे चालविण्यासाठी पैसे हवे आहेत तर कुणीच गुंतवणूक करणार नाही. हॉटेलचे उदाहरण पाहिले तर नवीन जागा घेण्यासाठी आणि प्रमोशन साठी गुंतवणुकीचा वापर करणार आहोत. व्यवसाय सुरू झाल्या नंतर सहा महिन्यांनी दर महिन्याला ठराविक किंमत परतावा म्हणून दिली जाईल. असे काही आपण सांगू शकतो.

प्लॅन ‘बी’ : बऱ्याच जणांचे प्रेझेंटेशन हे वरच्या मुद्द्यावर थांबते. पण त्यापुढे जाऊन आपण गुंतवणूकदाराला प्लॅन ‘बी’ सांगायला हवा. प्लॅन ‘बी’ म्हणजे जर आपण आधी जे सांगितलं आहे तसं झालं नाही आणि नुकसानच होत असेल तर गुंतवणूकदाराला आपण परतावा कसा देणार. प्रत्येक व्यवसायानुसार हा प्लॅन ‘बी’ वेगळा असू शकतो. यामुळे आपले पैसे सुरक्षित हातात जात आहेत याची खात्री गुंतवणूकदाराला होते. यामुळे गुंतवणूक मिळण्याची शक्यता वाढते.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आपण समोरच्याला जर त्याचा फायदा दाखवण्यात यशस्वी झालो तर तो आपल्या व्यवसायात गुंतवणूक नक्कीच करेल. यासाठी छोट्या-छोट्या युक्त्या वापरून विश्वास निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

याचा अर्थ असा नाही की गुंतवणूकदाराची फसवणूक करायची आहे, तर खरोखरच दोघांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. याने आपल्याला गुंतवणूक मिळून आपला व्यवसाय वाढेल शिवाय गुंतवणूकदारही खुश असल्याने आपल्याला पैशांची चणचण भासणार नाही.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!