विसावे शतक हे औद्योगिक, वाहन तसेच दूरदर्शन या क्षेत्रांत क्रांती आणणारे शतक होते. एकविसाव्या शतकाने मात्र तंत्रज्ञान व जागतिकीकरण यात आमूलाग्र बदल घडवून आणला. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे आज मानवाची विचारसरणी आधुनिक झाली आहे. त्याचे राहणीमानही बदलले.
एवढेच नाही तर इंटरनेट, फेसबुक व व्हॉटस्अॅप यांसारख्या सोशल मीडिया व नेटवर्किंगच्या माध्यमातून तोर काहीसा ‘सामाजिक’ झाला व जगातील सर्वांशी जोडला गेला. तंत्रज्ञान व आधुनिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रांत प्रगती झाली. पूर्वी इंटरनेटचा वापर फक्त ईमेल पाठवण्यासाठी होत असे; पण आज इंटरनेटने सर्वच काही ‘आभासी’ म्हणजे व्हर्च्युअल जगात नेऊन ठेवले आहे.
माणसाचे एकमेकांना भेटणे, संवाद साधणे, भावना व्यक्त करणे, बोलणे, एवढेच नाही तर त्याच्या सर्वच आठवणींची देवाणघेवाण इंटरनेटमुळे व्हर्च्युअल स्वरूपाची झाली आहे. सतत मोबाइलमध्ये गुंतून तो मुका व बहिरा झाल्यासारखे वाटत असले तरी फेसबुक व व्हॉट्सअॅपमुळे तो एक निरीक्षक व काहीसा लेखकदेखील होत चालला आहे.
आमंत्रण देण्यापासून शुभेच्छा मिळण्यापर्यंत तो इंटरनेटमय झाला आहे. त्याचे भौतिक विश्व कालबाह्य झाले असून तो पूर्णपणे व्हर्च्युअल विश्वात हरवला आहे. बँकेच्या व्यवहारापासून ते रेल्वे व विमानाच्या तिकिटांपर्यंत तो आधुनिक झाला आहे. अर्थात सतत ऑनलाइन झाला आहे.
माणसाच्या या बदललेल्या जीवनशैलीला इंटरनेट व त्याचे उपयोग कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे व्यवसाय, उत्पादन, विक्री आणि विपणन या क्षेत्रांतील प्रत्येक पैलूमध्ये इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक्स या तंत्रज्ञानामुळे प्रचंड बदल घडून आले आहेत. ‘तत्त्वे तीच पण पद्धत वेगळी’ अशा स्वरूपाचे बदल व्यवस्थापन विपणन पद्धतीत होऊ लागले आहेत.
आपल्या व्यवसायाचे रूपांतर उद्योजकाला आता ई-व्यवसायात करण्याची वेळ आली आहे. उत्पादनाची प्रसिद्धी व विक्री इंटरनेटच्या माध्यमातून करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ई-व्यवसायासंबंधी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आपले उत्पादन इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे हे जाणून घ्यायचे आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्या मालाची म्हणजे उत्पादनाची विक्री करणे म्हणजे ई-मार्केटिंग किंवा ई-विपणन होय. आपला व्यवसाय आणि उत्पादन यांचा व्याप कितीही मोठा असो, त्याची वाढ व विक्री करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक/इंटरनेटचा वापर करणे, ही बाब आता नेहमीच्या विपणन पद्धतीचाच एक अविभाज्य भाग बनली आहे.
ई-मार्केटिंगला इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग असेदेखील म्हणतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हजारो-करोडो लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे आपल्या मालाची किंवा प्रॉडक्टची माहिती आपण स्वत: ग्राहकांकडे प्रत्यक्ष न जाता किंवा ग्राहकांना प्रत्यक्ष आपल्याकडे न बोलावता आपण इंटरनेटद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
त्यामुळे मार्केटिंगच्या जुन्या पद्धतीमध्ये विक्री करताना जो वेगळा खर्च आपल्याला करावा लागायचा तो खर्च आपण वाचवू शकतो. शिवाय ग्राहकदेखील अशा ऑनलाइन प्रॉडक्ट्सला आवडीने पसंत करतात, कारण खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष दुकानाला भेट देण्यासाठी खर्च होणारा वेळ व पैसा ग्राहक वाचवू इच्छितात.
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग हे ग्राहक व उद्योजक या दोघांकरिता खूप फायदेशीर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मार्केटिंगमुळे गुंतवणुकीचा परतावा म्हणजेच Return on investment (ROI) नक्कीच वाढला आहे.
आज ग्राहकांपर्यंत पोहोचायचे म्हणजे इंटरनेट माध्यम वापरलेच पाहिजे, अशी काहीशी अट आज तंत्रज्ञानाने विपणन किंवा मार्केटिंग क्षेत्रात, व्यवसाय, उद्योगधंद्यात निर्माण केली आहे. इंटरनेट तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय व्यवस्थापन सुरू झाले आहेत. त्यातील काही व्यवस्थापन पद्धती इथे दिल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ऑर्डर घेणे
यामध्ये ग्राहक आपली ऑर्डर ई-मेलद्वारे कंपनीच्या मालकाला पाठवतो. त्यासाठी कंपनीने आपला ई-मेल अॅड्रेस आपल्या वेबसाइटवर देणे अनिवार्य असते. उद्योजक आपल्या ग्राहकांकडून ऑर्डर स्वीकारण्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्या वेबसाइटवर ठेवू शकतात.
ग्राहकांनी तो फॉर्म ऑनलाइन भरून आपली ऑर्डर कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करायची असते. प्रॉडक्ट खरेदी करण्याबाबत या पद्धतीमध्ये ग्राहक व मालक यांच्यात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसते.
इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून प्रॉडक्टची रक्कम स्वीकारणे
या व्यवस्थापन पद्धतीत ग्राहक आपल्या निवड केलेल्या वस्तूची किंवा मालाची रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनीला ऑनलाइन भरून ती वस्तू खरेदी करू शकतो. वरील पहिली पद्धत या पद्धतीशी जोडून आणखी एक नवीन व्यवस्थापन पद्धत तयार करता येते.
ऑनलाइन स्टोअर आणि डायरेक्ट पेमेंट
या व्यवस्थापन पद्धतीत कंपनी आपल्या उत्पादनाची सर्व माहिती, संबंधित फोटो हे आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. या प्रकारामध्ये कंपनी आपल्या वेबसाइटवर एक ‘आभासी’ स्टोअर उपलब्ध करते.
या स्टोअरमध्ये कंपनी आपले सर्व प्रकारचे उत्पादन व त्यांची किंमत व त्या उत्पादनाची वेगवेगळी माहिती जसे प्रकार, आकार, रंग, मुदत. इ. माहिती त्या प्रॉडक्टच्या फोटोसहित उपलब्ध असते. इथे ग्राहकाला स्टोअरमधील प्रत्येक वस्तू आपण प्रत्यक्ष हाताळत आहोत असा आभास होतो.
तो त्याला हव्या त्या वस्तूंची निवड करतो व निवड केलेल्या मालाची माहिती उत्पादकाला देतो व वरील दुसर्या पद्धतीत सांगितल्याप्रमाणे कंपनीला ई-पेमेंट करतो. त्यानंतर कंपनी ग्राहकाने खरेदी केलेला माल त्या ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवून देतो.
आज उद्योजक क्षेत्रात आपल्या व्यवसायाची किंवा कंपनीची वेबासाइट असणे ही प्रत्येक उद्योजकाची गरज झाली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून उद्योजक आपल्या उद्योगाची माहिती जगातील कानाकोपर्यात पोहोचवू शकतात. ती माहिती तो जगाला सर्वकाळ उपलब्ध करून देऊ शकतो.
आपल्या उद्योगातील सेवांमध्ये जर उद्योजकाने काही बदल केलेत, तर ते बदल तो आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून त्याची माहिती सर्व जगाला देऊ शकतो. वेबसाइटमुळे उद्योजक ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनात उद्योजक आपली चांगली प्रतिमा तयार करू शकतो.
वेबसाइटमुळे उद्योजकाला बरेच फायदे होतात; परंतु त्यामुळे उद्योजकाने वेबसाइटवरच अवलंबून राहणे योग्य नाही, कारण बरेच उद्योजक एक प्रोफेशनल वेबसाइट बनवण्यासाठी अमाप खर्च करतात, पण ही वेबसाइट जर परिणामकारकरीत्या वापरली नाही, तर उद्योजकाला वेबसाइटच्या माध्यमातून इंटरनेट मार्केटिंग नीटसे करता येणार नाही, आपल्या उत्पादनाविषयी प्रसिद्धी देता येत नाही. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाची प्रसिद्धी किंवा विपणन करायचे असेल, तर उद्योजकाने स्वत:चा एक प्रभावशाली इंटरनेट मार्केटिंग प्लॅन किंवा व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
- या इंटरनेट मार्केटिंग प्लॅनमध्ये उद्योजकाने त्याला नक्की कोणते परिणाम हवे आहेत?
- त्याच्या उत्पादन विक्री व नफ्याविषयी काय अपेक्षा आहेत?
- तो स्वत:च्या प्रयत्नातून त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो का? त्या पूर्ण करण्यासाठी त्याला किती गुंतवणूक करावी लागेल?
- त्याला किती व कोणत्या प्रकारचे ग्राहक आकर्षित करायचे आहेत?
या सर्व गोष्टींचा नीट विचार उद्योजकाने करायचा असतो.
आपल्याला भेटायला येणार्या प्रत्येक व्यक्तीला आपला ग्राहक कसे बनवायचे याचाही सखोल विचार उद्योजकाने करायचा आहे. आज बर्याच व्यक्ती इंटरनेटचा वापर करून उद्योजकाच्या वेबसाइटला भेट देऊन त्याच्या उद्योगाविषयी माहिती मिळवत असतात.
वेबसाइटला भेट देणार्या या व्यक्तींना आकर्षित करून आपले ग्राहक बनवण्यासाठी उद्योजकाने आपल्या वेबसाइटचे नीट निरीक्षण व परीक्षण करायचे असते. असे केल्याने आपण ग्राहकांना वेबसाइटच्या माध्यमातून आकर्षित करताना वेबसाइटच्या बाबतीत कुठे कमी तर पडत नाही ना, हे उद्योजकाच्या लक्षात येईल.
यासाठी उद्योजकाने आपली वेबसाइट व्यवस्थित सुरू आहे का? व ग्राहकांच्या कॉम्प्युटरवर ती व्यवस्थित उघडते की नाही? ती मध्येच बंद पडते का? या सर्व गोष्टींची खात्री करायला हवी. उद्योजकाने आपण आपल्या वेबसाइटसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरत आहोत हे कधीच कोणाला सांगू नये.
ग्राहकाला सतत नवीन माहिती हवी असते. त्यामुळे त्याला आपल्या उत्पादनाविषयी सतत काही तरी नवीन व आकर्षक अशी माहिती, ऑफर म्हणजे सवलती उद्योजकाने आपल्या वेबसाइटवर द्यायला हवी.
ही नवीन माहिती फोटो किंवा व्हिडीओ या स्वरूपात तो आपल्या वेबसाइटवर दाखवू शकतो. ती अपलोड करण्यासाठी उद्योजकाला नवीन वेब पेजेस तयार करावे लागतात.
त्यामुळे त्या वेबसाइटची व्यवस्थापन सिस्टीम हे सर्व नवीन बदल करण्यासाठी तुमच्या वेबसाइटवर अपलोड करण्यास तुम्हाला परवानगी देते का? ते बदल तुम्ही स्वत: वेबसाइटवर करू शकणार का? तसा अधिकार तुम्हाला दिलेला आहे का? किंवा हे सर्व बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेब डेव्हलपरची मदत घ्यावी लागणार आहे का? या सर्व गोष्टींचा विचार उद्योजकाला करावा लागतो.
वेबसाइट डेव्हलपरची मदत घ्यायची म्हणजे त्याला काही पैसे देणे आलेच, त्यामुळे खर्चही वाढणार. म्हणून मग दुसरा मार्ग असा की, तुमच्याकडे तुमची वेबसाइट व्यवस्थित अपटुडेेट ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रोसेस/पद्धत आधीच तयार ठेवावी लागेल.
त्यासाठी काही सॉफ्टवेअर कोड तुम्हाला लागत असतील, तर ते कोड व्यवस्थित रिझल्ट देतात का किंवा माहिती अपलोड करण्यास वेळ लावतात हे लक्षात घ्यावे लागेल.
आपल्या वेबसाइटला भेट देणार्या ग्राहकांकडून त्यांच्या आवडीनिवडी व अपेक्षांबद्दल बरेच काही शिकण्यासाठी ‘वेबसाइट विश्लेषणा’चा वापर करावा लागतो. उद्योजक जेव्हा वेबसाइट बनवतो तेव्हा आपली वेबसाइट प्रत्येकाने पाहायला पाहिजे, अशी त्याची इच्छा असते.
जोपर्यंत तुम्हाला तुमच्या वेबसाइटला भेट देणार्यांचे वर्तन, शोध घेण्याची मानसिकता माहिती नसते तोपर्यंत तुम्ही तुमची वेबसाइट व व्यवसाय किंवा उत्पादन प्रमोट करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाला हे माहीत असायला हवे की, आपल्या वेबसाइटला रोज किती ग्राहक भेट देतात? त्या ग्राहकांची आर्थिक पातळी कशी आहे?
ते कोणत्या माध्यमाचा वापर करून आपल्या वेबसाइटला भेट देतात? जसे कॉम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक, अॅन्ड्रॉइड फोन, अॅपल फोन किंवा आयफोन इ. आपल्या वेबसाइटवर सर्फिंग करताना ग्राहक काय शोधतात, म्हणजे ते कोणते शब्द कीबोर्डवरून वापरतात?
कोणत्या पेजेसला ते जास्त भेट देतात? कोणत्या प्रकारचे ग्राहक संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतात? आपल्या उत्पादनाची आवश्यकता असणारे ग्राहक जगाच्या, देशाच्या किंवा राज्याच्या कोणत्या भागात जास्त आहेत याची माहिती उद्योजकाने मिळवायला हवी.
इंटरनेट मार्केटिंग करताना उद्योजकाने आपली वेबसाइट प्रसिद्ध करण्यासाठी पे-पर-क्लिक (PPC) अॅडव्हर्टायझिंग आणि अशा अनेक प्रकारच्या पद्धती वापरायला हव्यात. या पद्धतीचा वापर केल्याने उद्योजकाला आपल्या वेबसाइटच्या सर्च इंजिनकडून भेट देणार्यांची गर्दी (ट्रॅफिक) मिळेल. या PPC पद्धतीमुळे वेबसाइटला भेट देणार्या काही व्यक्ती आपले ग्राहक बनण्याची शक्यता जास्त असते.
ग्राहक काही विशिष्ट शब्द टाईप करून उत्पादनाची माहिती मिळवतात. ते विशिष्ट शब्द जर आपल्याला माहिती झाले, तर झझउ चा वापर करून भेट देणार्यांचे रूपांतर ग्राहकांमध्ये करण्यास उपयोग होतो. तुम्ही तुमच्या वेबसाइटवरील माहितीमध्ये हे ‘विशिष्ट की-वर्ड’ वापरले, तर तुमची वेबसाइट नेहमी ग्राहकांसमोर उपलब्ध होईल.
इंटरनेट तंत्रज्ञानामुळे व त्याद्वारे केलेल्या विपणन पद्धतीमुळे आपण चोवीस तास सतत जगाशी जोडले जाऊ शकतो. आपण आपला माल जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात विक्री करू शकतो. आपल्या उद्योगासंदर्भात इतर कुठेही ऑफिस न उघडता किंवा कुठल्याही डिस्ट्रिब्युटरला मध्यस्थी न ठेवता आपण जगातील कुठल्याही देशात आपल्या मालाची निर्यात करू शकता.
आज इंटरनेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सोशल मीडियाचा आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवण्यासाठी चांगला फायदा करून घेऊ शकतो. जागतिक बाजारपेठेत आपण आपला व्यवसाय वाढवून जगातील कानाकोपर्यात आपल्या व्यवसायाची व आपली ओळख निर्माण करू शकतो.
– डॉ. वैशाली वाढे
संपर्क : ९७६९९४३७८५
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.