स्वतःच्या पैशांवर कसा सुरू करायचा व्यवसाय?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे तर सर्वात प्रथम कोणता प्रश्न पडतो? तर तो म्हणजे भांडवल, पैसा, फंडिंग. भांडवल उभे कसे करायचे या प्रश्नामुळेच आपल्यापैकी बहुतांश लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनातला मनातच ठेवतात. अशा लोकांसाठी हा लेख आहे.

‘बुटस्ट्रॅपिंग’ म्हणजे वेगळे असे काही नाही, तुम्ही तुमच्या पैशातून व्यवसाय सुरू करणे व वाढवणे. अनेकजण याच पद्धतीने आपला व्यवसाय सुरू करतात, त्याला एक शिस्त नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय फिरून फिरून आहे त्याच स्टेजला येतो आणि ते तिथल्या तिथेच राहतात. यामुळेच आपल्याला व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची उपयुक्तता लक्षात आली पाहिजे, कारण भांडवलाच्या योग्य नियोजन आणि वितरणातूनच व्यवसायाची वाढ करता येणे शक्य आहे.

सर्वात आधी आपल्याला व्यवसाय वाढवण्यात भांडवलाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही व्यवसायाची सुरुवात कितीही छोट्या स्वरूपात केलीत तरी त्याचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा हे भांडवल पहिल्या पिढीतील उद्योजकांकडे किंवा लघुउद्योजकांकडे नसते. त्यावेळी तुम्हाला बाहेरून गुंतवणूक घेऊन त्याचा वापर करून विस्तार करता येतो.

उदाहरणार्थ तुम्ही स्वतःच्या ब्रॅण्डचे एक आइसक्रीम पार्सल सुरू केले व तुमचा त्याद्वारे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या पार्लरला चांगला जम बसला आहे. आता तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवनवीन कार्यक्षेत्रे निवडून त्या ठिकाणी तुमची आइसक्रीम पार्लर सुरू करावी लागतील.

तुम्हाला पाहिले पार्लर स्थापन करण्यात समजा दोन लाख रुपये खर्च आला असेल, तर अशाच प्रकारे आणखी पाच ते दहा पार्लर सुरू करण्यासाठी दहा ते वीस लाख रुपयांची गुंतवणूक गरजेची आहे.

स्टार्टअपविश्वात अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक करणारे हे एंजल इन्व्हेस्टर व व्हेंचर कॅपिटल कंपन्या असतात. एंजल इन्व्हेस्टर व व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून गुंतवणूक मिळवणार्‍यांची संख्या अतिशय कमी आहे. जे स्टार्टअप भविष्यात खूप मोठे होतील, नाव कमावतील अशा युनिकॉर्न स्टार्टअप्समध्येच गुंतवणूक करण्यावर या गुंतवणूकदारांचा भर असतो.

त्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप सुरू करत असाल तर बुटस्ट्रॅपिंगच्या बळावर विस्तार करण्याची योजना आखूनच सुरुवात करा. भविष्यात तुम्हाला गुंतवणूक मिळालीच तर तुमच्या विस्ताराला गती मिळेल, मात्र नाही मिळाली तरी विस्तार थांबणार नाही.

बुटस्ट्रॅपिंगद्वारे व्यवसाय मोठा करण्याच्या पायर्‍या

🔸 व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःचे जमा पैसे, कुटुंबियांची तसेच मित्रपरिवाराची जी मदत मिळेल त्या आधारावर व्यवसाय सुरू करा. व्यवसायाची सुरुवात करताना एका गोष्टीची काळजी घ्या की, सुरुवातीला मोठी कर्ज किंवा मोठे हफ्ते म्हणजेच इएमआय मागे लावून घेऊ नका. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी जेवढी राशी लागणार आहे, ती शक्यतो बिनव्याजी असावी.

🔸 व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून हिशेब ठेवा. तुमच्याकडे अकाउंटंट नसेल किंवा अकाउंटिंग सिस्टिम नसेल तरीही साध्या रजिस्टरमध्ये किंवा एक्सल शीटमध्ये प्रत्येक दिवसाचा जमा-खर्च ठेवा.

🔸 सुरुवातीपासून खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च जितक्या आटोक्यात ठेवाल तितका जास्त नफा कमवाल. जास्तीत जास्त नफा कमावणे यावरच लक्ष्य केंद्रित करा.

🔸 तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायातून जेव्हा तुम्ही नफा कमवू लागाल तेव्हा तो धंद्यातून बाहेर न काढता पुन्हा धंद्यातच गुंतवा. या नफ्यातूनच तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करता येणार आहे.

🔸 व्यवसायाच्या विस्ताराच्या योजनेनुसार तुम्ही आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकता. बँकेकडून कर्ज घेताना शक्यतो सरकारी बँकेला प्राधान्य द्या, कारण त्यात व्याजदर कमी असतो. खाजगी बँका, सहकारी बँका किंवा एनबीएफसीमधून कर्ज घेणे सोपे आहे, मात्र जास्त व्याजदारामुळे तुम्ही चक्रवाढ पद्धतीने असलेल्या व्याजदराच्या जाळ्यात अडकाल आणि तुम्ही कमावलेला नफा बँकेच्या व्याजातच खर्ची होईल.

🔸 क्रेडिट कार्ड्सचा वापर करणार असाल, तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वापरा. क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल मुदत कालावधीत भरण्याची शिस्त पहिल्या दिवसापासून लावा.

अशा पद्धतीने एका व्यवसायातील नफा विस्तारित प्रकल्पात लावू शकता. बुटस्ट्रॅपिंग करून स्टार्टअप मोठा करताना वेळ जास्त जाईल, पण शाश्वत प्रगती कराल. शिवाय तुमच्या व्यवसायाची संपूर्ण मालकी तुमची असेल, तुम्हाला कोणाला भागभांडवल देण्याची म्हणजे इक्‍विटी देण्याची आवश्यकता नाही.

अनेक तरुण “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” या उक्तीप्रमाणे इन्व्हेस्टर आणि फंडिंगची वाट बघण्यातच सगळा कालावधी घालवतात. पाच-पाच, दहा-दहा वर्ष काही त्यांना इन्व्हेस्टर मिळत नाही आणि त्यांचा स्टार्टअप हा फक्त त्यांच्या डोक्यात आणि कागदावरच राहतो. त्यापेक्षा तुम्ही बुटस्ट्रॅपिंग करून स्वतःचा स्टार्टअप सुरू करा. कष्ट घ्या, बचत करा. कधी ना कधी तुमचेही विमान उडेल आणि आकाशाला गवसणी घालेल.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?