Advertisement
कसा सुरू करावा हाऊसकीपिंग व्यवसाय?
उद्योगसंधी

कसा सुरू करावा हाऊसकीपिंग व्यवसाय?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

‘हाऊसकीपिंग’ हा शब्द वाचून एखाद्या माणसाला वाटेल की, असा काय उद्योग असतो का? हाऊसकीपिंग म्हणजे घर व्यवस्थित ठेवणे. हे तर आमच्या गृहिणी वर्षानुवर्षे अतिशय उत्तमरीत्या करत आहेत, परंतु ‘हाऊसकीपिंग’ हा एक उत्तम व्यवसाय आहे. जर कोणी हा व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असेल तर त्याच्यासाठी उत्तम संधी या उद्योगात आहेत.

बर्‍याच ठिकाणी लॉजवर आपण पाहतो की, त्या ठिकाणी चांगली स्वच्छता नसते. कारण येथील रखवाली हे तिथे असलेला कोणी तरी पोरगा किंवा एखादा झाडूवाला करत असतो. याउलट जर आपण मोठ्या शहरांतील 3 तारांकित, 5 तारांकित हॉटेल्स पाहिली तर तेथे स्वच्छता, टापटीपपणा खूप असतो. कारण तेथे ते काम हाऊसकीपिंग डिपार्टमेंट करत असते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो तर अशा ठिकाणी अस्ताव्यस्त टेबल, त्यावर पडलेल्या फाइल्स, फाइल्सनी तुडुंब भरलेली कपाटं, वेडेवाकडे भरलेले माळे, घाणीने भरलेले कोपरे दिसतात. स्वच्छतागृहांत तर नाक धरूनच जावे लागते याउलट एखाद्या मोठ्या खासगी कंपनीला भेट दिलीत तर तुम्ही पाहाल की कंपनीच्या गेटपासून अगदी स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वच्छ, नीटनेटकी आहे. ही सगळी व्यवस्था अशा कंपनींमध्ये पाहते हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग या क्षेत्रात अगदी राष्ट्रीय पातळीवर आदराने घेतले जाणारे नाव आहे ते म्हणजे ‘भारत विकास ग्रुप’चे (बी.व्ही.जी.) हणमंतराव गायकवाड.

या क्षेत्रात उतरू इच्छिणार्‍यांनी हणमंतराव गायकवाडांचा उद्योजकीय प्रवास जरूर वाचावा. पुण्याच्या टेल्को कंपनीपासून अगदी थेट भारताच्या राष्ट्रपती भवनाचे हाऊसकीपिंग यांच्या कंपनीतर्फे केले जाते.

उद्योग कुठे करता येईल?

शहरी भागात या उद्योगाला पुष्कळ वाव आहे.

1) वसाहती : शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे लोकांनी शहरांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे. त्यामुळे शहरांत बर्‍याच कॉलनीज, सोसायटी उभ्या राहिल्या आहेत. अशा ठिकाणी अगदी बागकामापासून सार्वजनिक हॉल, रस्ते, खेळाचे मैदान इत्यादी सर्व गोष्टी हाऊसकीपिंगच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिल्या जातात.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

2) फ्लॅट व बंगला मालक : शहरात एक तर न्यूक्‍लिअर कुटुंब म्हणजे नवरा, बायको, एक मूल, फार तर फार दोन, त्यात दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे हाऊसकीपिंग हा प्रकार रविवार ते रविवार असा असतो. आठवडाभर काम केल्यानंतर लोक विश्रांती घेतील का हाऊसकीपिंग करतील? इथे अगदी रंगकाम, पार्टी अरेंजमेंटसारखी कामेसुद्धा मिळू शकतात. बंगला मालकांना तर पूर्णवेळ अशी कामे करणारी एजन्सी हवी असते. कारण बंगला मेन्टेन करणे सोपे काम नाही. झाडू मारणारा वेगळा, फर्निचर पुसणारा वेगळा अशी वेगवेगळी माणसे ठेवणे परवडत नाही.

3) उपाहारगृहे, मीडियम व तारांकित हॉटेल्स : हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये या व्यवसायाला फार मोठा वाव आहे, पण या इंडस्ट्रीत लागणारे कौशल्य फार उच्च प्रतीचे असते. इथे हायजिन फारच महत्त्वाचे असते. म्हणून अगदी किचनपासून ते ग्राहकाच्या टेबलापर्यंत दिलेल्या सूचनेनुसारच काम होणे आवश्यक असते. त्याला वर्क इंन्स्ट्रक्शन म्हटले जाते.

4) रुग्णालये : येथे लागणारी सेवा ही हॉटेलपेक्षा वेगळी असते. इथं रुग्ण असल्याने लागणारी स्वच्छता अतिशय उच्च दर्जाची असणे आवश्यक आहे. रुग्णाला संसर्ग होऊ शकतो, काम करणार्‍या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो म्हणून काळजी घेणे आवश्यक असते. आजकाल बहुतेक संस्था या आयएसओ नामांकन घेत असतात. त्यामुळे काही गोष्टी मेन्टेन कराव्याच लागतात. जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्ड, आयसीयू आणि प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणच्या हाऊसकीपिंगच्या आवश्यकता वेगळी असते हे लक्षात घेऊन काम करावे लागेल.

5) खाजगी कार्यालये व बँका : ऑफिस खूप प्रकारचे असतात. सेल्स ऑफिस, संस्थेचे ऑफिस, एखाद्या सीएचे ऑफिस ही काही त्याची उदाहरणं झाली. ऑफिसमध्येही लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. इथेही संधी आहेत. बँकेतील हाऊस किपींग हे जोखमीचे काम आहे. कारण येथे प्रत्यक्ष पैशांची देवाणघेवाण होत असते.

6) शाळा, कॉलेज व इतर संस्था : शाळा, कॉलेज आदी ठिकाणी मुलांचे वर्ग, स्टाफ रूम, प्रयोगशाळा, लायब्ररी अशा अनेक ठिकाणी हाऊसकीपिंगची आवश्यकता असते.

7) मंगल कार्यालये, नाट्य व चित्रपटगृहे : आपण एखाद्या मंगलकार्याला म्हणजे लग्नकार्याला वगैरे जातो तेव्हा ते मंगल कार्यालय किती नीटनेटके, स्वच्छ व व्यवस्थित आहे हे नुसते आवर्जून पाहात नाही तर चार लोकांनाही सांगतो. अशा ठिकाणी हा एक पब्लिसिटीचा मुद्दादेखील होतो.

8) बस स्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळ : ही तिन्ही ठिकाणे अशी आहेत की, ज्या ठिकाणी तुम्हाला काही वेळा तर तासन्तास घालवावे लागतात. कारण गाडी वा विमानाला उशीर होणे, रद्द होणे अशी अनेक कारणे असतात. तसेच माणसांची वर्दळ फार असते. यामुळे होणारा कचरा वगैरेचे वेळेवर निकास होणे गरजेचे असते अन्यथा प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे इथे अतिशय चांगल्या हाऊसकीपिंगला भरपूर वाव आहे.

उद्योगाला सुरुवात कशी करावी?

मार्केट सर्व्हे : कुठल्याही उद्योगाची सुरुवात करताना प्रथम करावा लागतो तो मार्केट सर्व्हे. उद्योगाच्या संधी कोठे कोठे आहेत हे मी तुम्हाला वर सांगितले आहेच, परंतु तुम्ही तुमच्या भागात त्या कशा करता येतील ते तपासून पाहा. त्याचा आराखडा तयार करा, म्हणजे तुम्हाला तो उद्योग सुरू करता येईल.

संस्था नोंदणी : तुम्हाला तुमच्या संस्थेचे जिल्हा उद्योग केंद्रावर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे किंवा ‘उद्योग आधार’ या भारत सरकारच्या संकेतस्थळावरही आता तुम्ही घरच्या घरी ही नोंदणी करू शकता. फर्म प्रोप्रायटरी का पार्टनरशिप का प्रायव्हेट लिमिटेड हा सल्ला तुम्ही आपल्या सीएकडून घेणे योग्य होईल.

कामगार परवाना : हा व्यवसाय मनुष्यबळावर चालणारा आहे. त्यामुळे कामगार परवाना काढणे अनिवार्य आहे. लेबर कमिशनच्या परवानगीने हा मिळेल.

शिफारसपत्र : लेबर लायसेन्स काढण्यासाठी एखाद्या कंपनी वा संस्था यांचे आम्ही यांना काम देऊ अशा आशयाचे शिफारसपत्र आवश्यक असते.

मनुष्यबळ : हे सर्व झाल्यावर मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवले पाहिजे. हाऊसकीपिंगच्या कामाला मनुष्यबळ उपलब्ध होणे थोडे अवघड असते, कारण साफसफाईचे काम करण्यासाठी लोक लवकर तयार होत नाहीत.

प्रशिक्षण : आपण पाहिले आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आवश्यकता असतात. हाऊसकीपिंग म्हणजे निव्वळ ‘झाडूपोछा’ नव्हे, तर ती जागा आणि वस्तू विशिष्ट रचनात्मक पद्धतीने ठेवण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. यात अनेक स्पेशल टूल्स असतात ज्यांच्या वापराने काम सुलभ व व्यवस्थित होते.

हा उद्योग सुरू करू इच्छिणार्‍यांनी प्रथम स्वत: ट्रेनिंग घ्यावे. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे जमल्यास स्वत: काम करून त्याचा अनुभव घ्यावा. तरच त्यातील खाचखळगे ध्यानात येतील असे मला वाटते आणि एक यशस्वी उद्योग उभा राहू शकेल.

– एस. पी. नागठाणे
7028963255
spnagthane@gmail.com
(लेखक अनुभवी उद्योजक असून सध्या काही कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम पाहतात.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!