जलद गतीने वाढणार्या व्यापारावर भारत सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस म्हणजेच GeM ची (जेम) सुरुवात करण्यात आली. कोणताही पात्र व्यक्ती जेमची सुविधा वापरून व्यापार करू शकतो.
‘जेम’वर जवळपास ३८ लाखांपेक्षा जास्त वस्तू व सेवा देणार्यांची नोंदणी झाली आहे. ग्रामपंचायत ते केंद्र सरकारचे विविध विभाग असे सगळे यावर खरेदी करतात. १ डिसेंबर २०१६ च्या सुधारीत खरेदी धोरणाप्रमाणे गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसमधून वस्तू व सेवा खरेदी करणे शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व संस्थेस आता बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध सरकारी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये यासह सर्व राज्य सरकारी आस्थापना आणि केंद्र सरकारी आस्थापना यांना हे बंधन आहे. तसेच निमसरकारी, सरकारशी संलग्न आणि सहकारी संस्था यांनाही हा नियम लागू आहे.
‘जेम’द्वारे ऑनलाइन खरेदी करण्याची सोय आहे, तसेच वस्तू वा सेवांच्या विक्रेत्यांना ही मोफत संधी देणारी प्रणाली आहे. gem.gov.in या पोर्टलवर जाऊन पुरवठादार म्हणून आपण स्वत:ची नोंदणी करू शकता.
केंद्र व राज्य सरकारने व्यवसाय सुलभतेचा अवलंब याद्वारे केल्याचे दिसून येते. जेम या नव्या ऑनलाइन प्रणालीत मानवी हस्तक्षेपही कमी करण्यात आलेला असून पुरवठादारांनादेखील ३० ते ९० दिवसांत त्यांचे देयक मिळालेच पाहिजे अशी अट आहे.
या पोर्टलवरील नोंदणी अतिशय सोपी असून उत्पादक किंवा विक्रेता यांना आपली दर्जेदार उत्पादने, चांगल्या सेवा अधिक पर्यायांसह या माध्यमातून विक्री करता येतात. तसेच सरकारी कार्यालयांना याद्वारे माफक किमतीत आणि दर्जेदार पुरवठादार मिळणार आहेत.
त्यामुळे त्याचा वापर करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कोणत्याही खरेदी करणार्या सरकारी कार्यालयास यावर मोफत खाते बनवता येते.
यावर खरेदी फक्त सरकारी विभाग किंवा आस्थापना करू शकतात, तर विक्री मात्र कोणीही करू शकतो. सरपंच, ग्रामसेवक, सरकारी अधिकारी यांना यावर खाते उघडसाठी फक्त २०-२५ मिनिटे लागतात.
फक्त ई-मेल आयडी, आधार नंबर आणि आधार लिंक केलेला मोबाइल याद्वारे खाते उघडणे शक्य आहे. ‘जेम’वर थेट खरेदी २५ हजार रुपये एक वस्तू किंवा त्यापेक्षा अधिक आणि ५ लाख रुपये यापेक्षा कमी असल्यास एल-वन पर्चेस याद्वारे अवघ्या १५-२० मिनिटात खरेदी करणे शक्य आहे.
यापेक्षा जास्त रक्कम किंवा एकत्रित जास्त वस्तू असल्यास बीड म्हणजेच टेंडरने खरेदी होते. १ रुपयापासून हजारो कोटींची बीड प्रसिद्ध करून खरेदी करणे शक्य आहे.
प्रसाद अडके : 9834713794
(लेखक जेम नोंदणी सल्लागार आहेत.)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.