प्रगतिशील उद्योग

पासपोर्ट ऑफिसबाहेर फॉर्म भरणारा आज करोंडोंच्या शूज कंपनीचा मालक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रचंड कष्ट, काम करण्याची गोडी, बुद्धीमत्ता आणि चिकाटी हे सर्व गुण माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. यश हे जात पात, धर्म पंथ तसेच भाषा पाहून मिळत नाही. यश हे कुणालाही मिळतं. केवळ ते यश मिळवण्यासाठी पुरक गुण माणसात असले पाहिजे. मराठी समाजात एक विषय नेहमी चघळला जातो. तो असा की मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो, तो आळशी आहे, तो उद्योग करत नाही. पण या सर्व गोष्टी अंधश्रद्धा आहेत, हे ‘जीवन इंडस्ट्रीज’चे मालक उत्तम केंजळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

गरीब घराण्यात जन्माला येऊनही आज त्यांचा करोडोंचा turnover आहे. हे त्यांना कसं शक्य झालं? असं त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या भूतकाळावर मात केली आणि सर्वांनाच हेवा वाटेल असे उद्योजकीय विश्व निर्माण केले? हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तुम्हा वाचकांना लागलेली असेल. चला तर मग आपण जाणून घेऊया त्यांच्या या यशाचे रहस्य…

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उत्तम केंजळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील तडवळे गावी झाला. बालपण प्रचंड हालाकीत गेलं. कौटुंबिक तणावामुळे ते त्यांच्या आजोळी वाढले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईमध्ये भाड्याने घर घेतले. तेव्हा त्यांचे वडील उत्तम यांना मुंबईत घेऊन आले. त्यावेळेस ते चौथीत शिकत होते. अभ्यासात त्यांची विशेष प्रगती नव्हती.

बाराखडीसुद्धा नीट बोलता येत नव्हती. पण आपण मागे पडता कामा नये, या विचाराने ते अभ्यासात रस घेऊ लागले आणि त्यांची शालेय प्रगती होऊ लागली. चौथीनंतर मात्र वडिलांना मुंबईत घराची व्यवस्था करता आली नाही. म्हणून पुन्हा उत्तम यांना गावी जावे लागले. इयत्ता सातवीत असताना उत्तम पुन्हा मुंबईत आले, ते मुंबईकर होण्यासाठीच.

वडिलांनी १३ हजार रुपयांत व्याजावर एक झोपडं विकत घेतलं. वडील निवृत्त होईपर्यंत हे तेरा हजार ते फेडत होते. यावरून आपल्याला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होते. त्यांनंतर एका सदगृहस्थाच्या मदतीने त्यांच्या वडीलांनी भिवंडीमध्ये फॅक्टरी स्थापन केली. पुढे त्यांनी एक रिक्षा घेऊन एका माणसाला चालवायला दिली व ते गावी निघून गेले. तिथे ते शेती करू लागले.

रिक्षाची कमाई वसून करून उत्तम आपल्या वडिलांना ती कमाई गावी पाठवू लागले. त्यांचे वडील जरी गावी गेले तरी उत्तम यांना मुंबई सोडवेना. या लखलखत्या मुंबई नगरीत आपलंही एक घर असावं, आपणही आपलं नशीब आजमवून बघावं ही स्वप्ने मुंबईत येणारे प्रत्येक जण पाहतात. ही स्वप्ने आता उत्तम केंजळे यांच्या डोळ्यात झळकू लागली होती.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


लाला लजपतराय कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत होते. सुरुवातीला आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते सकाळी पेपरची लाइन टाकू लागले, घराघरात दुधाच्या बॅगा टाकू लागले, पेंटिंगची कामे घेऊ लागले. डेअरीमध्ये, वरळी नाक्याजवळील कोकाकोलामध्ये अंगमेहनतीची लोडरची कामेसुद्धा त्यांनी केली.

यासाठी त्यांना दिवसाला ८ रुपये मिळायचे. त्यासोबत शिक्षणही सुरू होते. गावावरून आलेले असल्यामुळे अकरावीत त्यांना know आणि no यातला फरकही कळत नव्हता. त्यांचे उच्चार अशुद्ध होते. पण त्यांना हिंदीमध्ये चांगले मार्क्स मिळू लागले. त्यानंतर त्यांच्यात जी कमतरता आहे, ती त्यांनी कुशलतेने भरून काढली.

ज्या मुलाचे उच्चार चांगले नव्हते, तो मुलगा तेरावीत गेल्यावर कॉलेजच्या हायकिंग आणि ऍथ्लेटिक्सचा सेक्रेटरी झाला, तसेच ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षात कॉलेज युनियनचे चेअरमॅन झाले, हे किती कौतुकास्पद आहे. कॉलेजच्या एका सिनियर व निपूण धावपटूला त्यांनी पराभूत केलं. अशी एकेक पायरी ते वर चढत होते. त्यानंतर ते पोलिसांच्या स्विमींग पुलावर कोच झाले. तिथे त्यांना आठशे रुपये पगार मिळत होता.

पासपोर्ट ऑफिसबाहेर फॉर्म भरून द्यायला सुरुवात

एकदा ते पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले असता एका एजेंटला त्यांनी १० रुपयाचे फॉर्म्स २५ रुपयाला विकताना पाहिले. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. धंदा कसा करावा याचं मिळालेलं पहिलं शिक्षण होतं ते. मुळातच जिद्दी असलेले उत्तम केंजळे यांनी ठरवलं की आपणही येथे बसून धंदा करायचा. पण जुने एजेंट त्यांना तिथे प्रवेश करू देत नव्हते.

त्यांनी पासपोर्ट ऑफिसच्या जवळ असलेल्या चहावाल्याकडे उभं राहून त्या व्यवसायाचे निरीक्षण केले व नंतर स्वतःच या उद्योगात उतरले. सुरुवातीला तेथील जुन्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. पण त्या सर्वांवर मात करीत त्यांनी आपले बस्तान बसवलेच. कारण ज्याचा निश्चय ठाम असतो, त्याला पराभूत करणे जवळ जवळ अशक्यच आहे.

आधी दिवसाला वीस रुपये मिळू लागले आणि पाहता पाहता वीसाचे शंभर झाले आणि शंभराचे हजार झाले. ते त्या कामात इतके निपूण झाले की पासपोर्ट फॉर्मच्या कोणत्या पानावर कुठे काय लिहिले आहे, हे त्यांना पाठ होते. गावावरून आलेल्या त्यांच्या भावाला स्वा. सावरकर स्मारकात रायफल शुटिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते घेऊन गेले. त्यांच्या भावाला मुंबई काही मानवली नाही. म्हणूण तो गावी निघून गेला. पण मुळातच उत्साही असलेले उत्तम केंजळे मात्र रायफल शुटिंगमध्ये चॅम्पियन झाले. आता रायफल शुटींगमध्ये उत्तम यांना अनेक पदके मिळू लागली.

मुंबई बाहेर स्पर्धा असल्यास ते स्पर्धा झाल्यावर तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना होत असत. ते पदक घेण्यासाठीही थांबत नसत. कारण ते नोकरी व उद्योगही करत होते. ही त्यांची गरज होती. हा प्रवास अत्यंत खडतर जरी असला तरी त्यात ते आनंद मानत होते. असे म्हटले जाते की आपण आनंदी असलो की आनंद आकर्षून घेत असतो. हेच त्यांच्याबाबतीत झाले. पुढे आपल्याला रोजगारीसंबंधी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी टॅक्सी आणि कंडक्टरचा बॅच मिळवला. त्यांनी पहिल्यांदा फियाट गाडी घेतली. आज त्यांच्याकडे बर्‍याच गाड्या आहेत. मग ते सोसायटीमधल्या टाक्या स्वच्छ करण्याच्या व्यवसायात उतरले.

त्यांनी एका व्यक्तीकडून चाळीस हजार रुपयांचं सामान घेतलं. सामान घेण्यसाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून हप्त्या हप्त्याने पैसे देऊ लागले. सुरुवातीस त्यांनी टाक्या मोफत स्वच्छ केल्या व त्या अनुभवामुळे त्यांना बरीच कामे मिळत गेली. टाकी स्वच्छ करतानाचे फोटो त्यांनी काढले, शुटिंग केलं. या सर्व गोष्टी त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी वापरल्या. स्वतःचे ब्रोशल छापले. ते स्वतः बाईकवरुन ब्रोशल वाटू लागले. नंतर त्यासाठी त्यांनी दोन मुले कामाला ठेवली आणि हा उद्योजकीय व्याप वाढत गेला.

पासपोर्ट ऑफिससमोर काचेची बिल्डिंग स्वच्छ करणारी एक मशीन त्यांनी पाहिली. त्यामुळे त्यांचं कुतूहल जागं झालं. त्यांनी स्वच्छता करणार्‍या काकांशी मैत्री केली व ती मशीन न्याहाळली, तिचे माप घेतले व एका वेल्डर मित्राला गाठून तशा प्रकारचे मशीन स्वतःच तयार केले. ती मशीन तयार व्हायला एक वर्षचा काळ लागला. ३१ डिसेंबरला ती मशीन लिलावती हॉस्पिटलला दिली.

त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मग तशा १७-१८ मशीन्स तयार झाल्या. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचं काम सुरु होतं, पासपोर्ट ऑफिसचंही काम सुरु होतं. एका वेळेला बर्‍याच गोष्टींची सांगड ते घालत होते. आपण कल्पना करु शकतो की हे किती कठीण आहे. पण तरीही त्यांनी ते पूर्णत्यास नेलं. २००९-१० मध्ये त्यांनी गोव्याचं काम मिळवलं. त्या कामाचं बजेट ४०-४५ लाखांत गेलं. आता यश आणि उत्तम केंजळे यांचं अतूट नातं निर्माण झालं होतं. लाखाचे टर्नओव्हर करोडोत होऊ लागले.

हे सगळं करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या गावच्या शाळेला त्यांनी बेंच, संगणक दान केले. आपल्याला जे मिळतं त्यातला काही भाग समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करणे हे यशस्वी उद्योजकाचे कर्तव्यच असते. त्याचप्रकारे कामा सोबत त्यांनी शिक्षणाचीही कास धरली. त्यांनी ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं, डबल ग्रॅज्यूएट झाले, पुढे बिजनेस मॅनेजमेंट केलं, त्यानंतर न्यू लॉ कॉलेजमधून लॉ केलं.

त्यांचं म्हणणं आहे की नुसतं काम करुन उपयोग नाही, तर शिक्षण महत्वाचं. प्रत्येक माणसाने शिकलंच पाहिजे, असं ते आवर्जून सांगतात. त्यांची अशी धारणा आहे की शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. म्हणून तुम्ही आयुष्यभर शिकू शकता.

बांधकाम व्यवसायात पदार्पण

हे सर्व करीत असताना त्यांनी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातही आपले पाय रोवले. तेरावीत असताना ज्या चाळीत ते राहत होते. ती चाळ डेव्हेलपमेंटला जाणार होती. तिथल्या लोकांच्या आग्रहामुळे उत्तम केंजळे यांना एसआरए कमिटीत स्थान मिळालं. उत्तम केंजळे यांची ख्याती तरुण वर्गातही होती. म्हणूनच लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

काही झाले तरी उत्तम हा आपला आणि सद्गुणी मुलगा आहे, तो कुणलाही फसवणार नाही हा विश्वास लोकांच्या मनात त्यांनी रुजवला होता व तो विश्वास त्यांनी सत्यात आणून दाखवला. त्या कमिटीत असताना त्यांनी सुमारे ५५० लोकांना घरे मिळवून दिली. एकाही माणसावर उत्तम केंजळे यांनी अन्याय होऊ दिला नाही. आता जरी ते त्या सोसायटीत राहत नसले तरी आजही तेथील लोकांच्या ओठांवर उत्तम केंजळे हे नाव असते.

एसआरए प्रोजेक्टचा हा अनुभव त्यांना कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात उपयोगी पडला. आपण केलेले कोणतेही काम, मिळालेला कोणताही अनुभव वाया जात नाही. आपल्या अनुभवाला कसं कॅश करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तम केंजळे. अर्थात त्यांच्या नावातच उत्तम आहे. सातार्‍याला जागा घेऊन त्यांनी बिल्डिंग्स उभारल्या आहेत. अजूनही त्यांचे हे काम सुरु आहे.

मग त्यांनी शूझ बनवणारी कंपनी विकत घेतली व त्यातूनही नफा कमवला. आता त्यांच्या कंपनीत हेल्मेट, सेल्फ्टी बेल्ट, जॅकेटचेसुद्धा उत्पादन होऊ लागले आहे. त्यांची सेल्स टीम तयार झाली, त्यांनी स्वतःचं कॉल सेंटर सुरू केलं. डिस्ट्रीब्यूशनचं एक विशाल जाळं त्यांनी रचलं.

पूर्वी इतरांच्या एक्झीबिशनला भेट देताना त्यांना कधीही वाटलं नसेल की त्याचं स्वतःचं प्रॉडक्ट एक्झीबिशनमध्ये असेल. त्यांनी चेन्नईला एक्झीबिशन केलं. त्यांचा ब्रॅण्ड आता तयार झाला होता, तो लोकांना दिसू लागला होता व त्याच्या वापराने लोक संतुष्ट होत होते.

उत्तम केंजळे यांचं म्हणणं आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमचं प्रॉड्क्ट हे ब्रॅण्ड झालं पाहिजे. कारण पैसे प्रॉड्क्टला मिळत नाही. तर पैसे ब्रॅण्डला मिळतात. हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवलं पाहिजे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याला अभिनव कल्पना मांडता आली पाहिजे.

आता फायर सेफटीचा एक नॉर्म्स आला आहे. तीस मजल्यांच्यावर असलेल्या बिल्डिंगला एक एक्सर्टनल लिफ्ट असावी लागते. ही मशीन त्यांनी ४०-४५ लाखांमध्ये तयार केली. यासाठी आठ महिने लागले. परंतु महत्त्वाची बाब अशी की भारतात ही मशीन तयार करणारे ते प्रथम होते. भारताच्या बाहेर या मशीन्स उपलब्ध होत्या. परंतु त्यांचा बजेट करोडोंमध्ये होता. केवळ काही लाखांमध्ये ही मशीन तयार करण्याची किमया उत्तम केंजळे यांनी साधली. लोधा प्रायमरो, चिंचपोकळी येथे ही मशीन बसवली गेली.

अभिनव कल्पनेमुळे ते सतत काहीतरी वेगळं करत राहिले आणि त्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी जिथे जिथे आपले पाय रोवले, तिथे तिथे त्यांनी जणू सोने उगवले आहे. मग त्यांनी वेविंगची मशीन तयार केली. आज त्यांना पाहून लोकांना वाटतं की हा माणूस किती मजेत आहे. पण हा जो आनंद आहे, तो दिव्य आहे. कारण तो कष्टाने मिळालेला आनंद आहे.

दुबईला सेफ्टीसाठी इंटरनॅशनल शो होत असतो. त्यात ते गेली दोन वर्षे सहभाग घेत आहेत. दुबईच्या लोकांनाही त्यांच्या मशीन्स आवडत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीचं टर्न ओव्हर साडे चार करोड होतं. ८ करोडचं या वर्षीचं त्यांचं टार्गेट आहे. तसेच पुढच्या वर्षी हे टर्नओव्हर २०-२१ करोडपर्यंत पोहोचू शकतं.

त्यांना येत्या डिसेंबरपर्यंत सबंध भारतात त्यांचे प्रोडक्ट्स पोहोचवायचे आहेत. तसेच जगभरातही त्यांना हे जाळे विणायचे आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या कंपनीचे एसएमई आयपिओ आणि पब्लिक आयपिओ सुद्धा येणार आहेत. अर्थात प्रचंड परिश्रम, चिकाटी आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर ते हे सर्व टार्गेट पूर्ण करू शकतील.

उत्तम यांचा हा प्रवास एखाद्या उत्कंठावर्धक चित्रपटासारखा आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. मेहनत व चिकाटी प्रत्येकामध्येच असते. पण मग असे का होते की उत्तम केंजळेसारखे काही जण एका उच्च स्थराला जाऊन पोहोचतात? तर आज त्यांनी जे यश संपादन केले आहे, आज ते एक स्मार्ट उद्योजक झाले आहेत. त्याचं कारण त्यांनी स्मार्ट वर्क केले आहे. केवळ काम करुन उपयोग नाही. तर ते काम तुम्हाला स्मार्ट्ली करता आलं पाहिजे. उत्तम केंजळे यांची ही यशोगाथा वाचून अनेक नव-उद्योजकांना प्रेरणा मिळेल, अशी खात्री आहे.

संपर्क : उत्तम केंजळे – ९८६९०१६६५७


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.