मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेली मशरूम शेती


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते.

ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते.

मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्‍यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.

मशरूमच्या विविध जाती आपल्याकडे पाहायला मिळतात. बटन, शिंपला, धानपेढ्यांवरील या जातींची लागवड केली जाते. १९८३ साली स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय अळिंबी संशोधन केंद्राच्या’ माध्यमातून विविध मशरूम्सच्या जाती संशोधित करण्यात आलेल्या आहेत.

जसे की काबुलभिंगरी/धिंगरी, यू-३, एस-११, एस-७६, एस-७९१, एनसीएस-१००, एनसीएस-१०१/१०२, एनसीबी-६, एनसीबी-१३ इत्यादी. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे व त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

बटन मशरूम

बटन मशरूम :

बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत या पद्धतीत कंपोस्ट तयार करून पिशव्यांमध्ये भरले जाते व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. बारा अंश सेल्सिअस तापमानात हे उत्पादन घेतले जाते. बटन मशरूमची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांत होते.

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) :

नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

मशरूम लागवड प्रक्रिया :

मशरूम लागवडीचे विविध टप्पे आहेत. प्रथम पाण्यात ‘काड’ भिजवून मग त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर पिशव्यांमधून बी भरून उगवले जाते. चौदा ते वीस दिवसांनंतर पिशवी काढली जाते व नंतर बी पेरणी केली जाते. पिशवी फाडल्यानंतर चार-पाच दिवसांतच मशरूमची पूर्ण वाढ झालेली असते. मशरूम दोन दिवसांत उन्हात पूर्णत: उत्तम वाळते. वाळवलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

मशरूम उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी :

  • परिसर स्वच्छ ठेवावा.
  • उत्पादन बंदिस्त जागेत घ्यावे.
  • मशरूमच्या खोलीत खेळती हवा असावी.
  • काडाचे निर्जंतुकीकरण महत्त्वाचे.
  • काडणी वेळेत करावी.

मशरूमचे औषधी गुणधर्म :

  • मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे.
  • किडनीच्या रोगांवर उपयोगी
  • लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार
  • पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.

मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते.

इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते. मशरूमला भावही चांगला मिळतो. घाऊक बाजारात आपल्याकडे ताजा मशरूम ५० ते १०० ₹. प्रति किलो मिळतो. ॠतुमानानुसार यात कमीजास्त फरक पडतो. उन्हाळ्यात हिवाळ्याच्या मानाने भाव जास्त मिळतो.

वाळलेला मशरूम हा ताज्या मशरूमपेक्षा विक्रीला अधिक सोपा आहे. वाळवलेला मशरूम सीलबंद ठेवल्यास कमीत कमी तीन वर्षे टिकतो. त्याला प्रतिकिलो अडीचशे ते तीनशे रुपये दर मिळतो. आपल्या देशातच दिल्ली, मुंबई, श्रीनगर, चेन्नई, चंदीगढ आदी विविध शहरांमध्ये मशरूमला मोठी मागणी आहे.

आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

– प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?