‘वर्क फ्रॉम होम’ खूप मोठे उद्योगविश्व


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


नोकरी व व्यवसाय म्हटलं की, सर्वसाधारण रोज सकाळी उठणे, ठरावीक वेळेत व्यवसाय-नोकरीच्या ठिकाणी कार्यालयात पोहोचणे, त्यासाठी धकाधकीचा १ ते २ तासांचा प्रवास, रेल्वे व बसची तुफान गर्दी, परत कार्यालय सुटल्यानंतर तितक्याच गर्दीत परतीचा प्रवास.

असे वाटते की, हे जीवन म्हणजे एखाद्या चक्राला जुंपलेला बैलच. एखादा व्यवसाय किंवा दुकान म्हटलं की, ठरावीक वेळेत दुकान उघडा; ग्राहकांची वाट बघा, रात्री १० पर्यंत दुकान व व्यवसाय चालू ठेवा. माणूस कसा बांधला जातो.

अशा प्रकारच्या माणसाला जनावराप्रमाणे बांधून ठेवल्याप्रमाणे व्यवसाय व नोकरी करणार्‍यांना जीवनाचा कंटाळा आलेला असतो. समजा, तुम्हाला सकाळी उठून कोणत्याही कार्यालयात नोकरीसाठी पोहोचायचे नाही किंवा दुकान उघडण्यासाठी जायचे नाही, त्यासाठी तुम्हाला कोठेही शहरात गर्दी, गोंगाटात राहायचे नाही.

अगदी लांब गावी, निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही राहून एखादे ऑनलाइन काम, नोकरी व व्यवसाय करू शकता. रोज सकाळी तुमच्या वेळेत लवकर उठा, तयार व्हा. अंदाजे ९ ते १० वाजता तुमचा कॉम्प्युटर ऑन करा व कामाला सुरुवात करा. दुपारी १ ते २ दरम्यान जेवणासाठी सुट्टी घ्या व ६ वाजता काम बंद करा. घराच्या एका खोलीत व कोपर्‍यात तुम्ही काम करा.

अगदी दिवसभर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत. ना प्रवासाची दगदग, ना शहरात महागड्या ठिकाणी राहण्याची गरज, ना गर्दी व प्रदूषणाच्या ठिकाणी राहण्याची गरज, ना कोणत्या बॉसचे टेन्शन, ना कामाची वा नोकरी जाण्याची काळजी. तुम्ही तुमचे बॉस, तुमच्या वेळेत काम करा, तुमच्या प्रगतीचा आलेख तुम्ही ठरवा, तुमचे कौशल्य तुम्ही वाढवा, तुम्हाला किती पैसा वाढवायचा आहे हे तुम्ही ठरवा.

व्यवसाय अजून वाढवायचा असल्यास तुमच्यासारख्या अनेकांची साहाय्यक म्हणून नेमणूक करा. ही अनोखी वर्क फ्रॉम होम दुनिया खूप कमी लोकांना भारतात माहीत आहे. काही फसव्या जाहिराती व कंपन्यांमुळे याबद्दल बरेच गैरसमज आहेत, परंतु जगभर लाखो लोक अशा प्रकारचे घरात बसून काम करताहेत व महिना चांगली कमाई करत आहेत. हजारो प्रकारच्या अशा व्यवसाय संधी उपलब्ध आहेत.

हा व्यवसाय अगदी कोणीही, कसाही, कधीही सुरू करू शकत नाही किंवा त्यात यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी संपूर्णपणे अभ्यास, पूर्वतयारी, संसाधने, जागा, मार्केटिंग, योग्य तो सल्ला आवश्यक असतो.

प्रथम स्वत:चे सेल्फ अ‍ॅनॅलिसिस करून आपणास योग्य कोणता व्यवसाय आहे ते शोधावे लागते, या व्यवसायातील बारकावे जाणून घ्यावे लागतात, तो व्यवसाय उभा करण्यासाठी लागणार्‍या भांडवलाचाही विचार करावा लागतो, त्या व्यवसायासाठी लागणारे कौशल्य अवगत करून त्यात पारंगत व्हावे लागते, त्याचे मार्केटिंग कसे करायचे हेही शिकून घ्यावे लागते, चांगल्या प्रकारे इंग्रजी व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. असे वर्क फ्रॉम होमचे कोणते प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊ या.

१) कंटेंट रायटिंग :

आज कोणत्याही व्यवसायासाठी कंटेंटला खूप महत्त्व आले आहे, मग ते वेबसाइटसाठी, ब्लॉगसाठी, जाहिरातीसाठी, बिझनेस कॅटलॉग इत्यादी बर्‍याच गरजेसाठी कंटेंट लिहावे लागते. जगभरातील व्यावसायिक लोक अशा प्रकारचे काम करणार्‍यांना आऊटसोर्स करतात, ते काम तुम्ही घरबसल्या करू शकता.

दरमहा १५ ते ३० हजारपर्यंत कमाई होते, यासाठी इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व व इंटरनेट सर्फिंगचे चांगले कौशल्य असणे आवश्यक असते. हे काम तुम्हाला अनेक जाहिरात संस्था, कॉर्पोरेट क्लायंट, व लहानमोठे व्यावसायिक यांंच्याकडून मिळते.

२) अ‍ॅकॅडमिक हेल्प :

जगभरातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे रिपोर्ट बनवणे, होमवर्क करणे, संशोधन करणे, त्यांचे काही लिखाण करणे, डेटा जमा करणे, त्या डेटाचे अ‍ॅनॅलिसिस करणे इत्यादी काम असते. जे विद्यार्थी नोकरी करून शिक्षण घेतात त्यांना वेळ मिळत नाही, तेव्हा ते अशा बाहेरच्याची मदत घेतात, त्यासाठी चांगली फीही देतात. अशा व्यवसायासाठी चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे असते. महिना तुम्ही ३० ते ४० हजार कमावू शकता. त्यासाठी जगभरातून विद्यार्थी मिळतात.

३) व्हर्च्युअल असिस्टन्स :

म्हणजे एखादी व्यक्ती व्यावसायिकाला ऑनलाइन मदतनीस म्हणून काम पाहाते. उदा. नामवंत सल्लागार, डॉक्टर, वकील, कंपन्यांचे मोठे अधिकारी, मोठे व्यावसायिक यांच्या व्यस्त कामामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी ऑनलाइन मदतनीसाची गरज असते.

उदा. मेल चेक करणे, पत्र लिहिणे, तिकीट बुक करणे, अपाइंटमेंट फिक्स करणे, हिशोब ठेवणे, फोन अटेंड करणे इत्यादी कामे पाहावी लागतात, त्यामुळे ह्या व्यावसायिकांचा बराच वेळ वाचतो.अशा एक व्यक्ती किंवा व्यावसायिक साहाय्यकासाठी महिना २५ ते ३० हजार रुपये देतात.

४) लोगोमेकर :

आज संपूर्ण जगात करोडो व्यवसाय व ब्रँड नव्याने सुरू होत असतात त्या प्रत्येक व्यवसायासाठी इतरांपेक्षा आकर्षक वेगळा असा लोगो बनवून पाहिजे असतो. तेव्हा ते अशा ऑनलाइन लोगो मेंबरची मदत घेतात, त्याने त्याच्या व्यवसायाचे नाव, उत्पादन यांचा अभ्यास करून योग्य त्या लोगोचे पर्याय सुचवायचे असतात.

लहान व्यावसायिक एका लोगोसाठी ३ ते ५ हजार रुपये फी देतात, तर मध्यम व्यावसायिक १० ते २० हजार व कॉर्पोरेट कंपन्या ५० ते ८० हजारांपर्यंत एका लोगोसाठी फी देतात. तुम्हाला दरमहा ३ ते ४ लोगोंची कामे मिळू शकतात त्यातून तुम्हाला ३० ते ८० हजारांपर्यंत कमाई होऊ शकते, त्यासाठी ब्रँडिंग व ग्राफिक्सचे ज्ञान तुम्हाला शिकावे लागते.

५) सोशल मीडिया :

आज प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीला आपला चांगला सोशल मीडिया प्रेझेंट्स असावा असे वाटत असते. त्यामध्ये फेसबुक, गुगल प्लस, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, इंस्ट्राग्राम, लिंकडेन इत्यादी प्रोफाइल बनवणे, त्यावर सतत अ‍ॅक्टिव्ह राहणे, नेटवर्किंग करणे इत्यादी काम पाहावे लागते, त्यामुळे त्या व्यक्तीला व व्यवसायाला प्रसिद्धी मिळते.

एक क्लाइंट सर्वसाधारणपणे दरमहा ८ ते १५ हजार फी देतो. तुम्ही एकाच वेळी तीन क्लायंटचे काम करू शकता. तुम्हाला दरमहा ३५ ते ४० हजारांची कमाई होते.

६) ब्लॉगर :

ब्लॉगिंग हा एक जगातील सर्वात जुना ऑनलाइन व्यवसाय आहे. इंटरनेटच्या जन्मापासून बरेच लोक हा व्यवसाय करीत आहेत. जगभरात २५ लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह ब्लॉगर आहेत. हजारो विषयांवर लोक ब्लॉगिंग करतात. अशा ब्लॉगरना जाहिराती व स्पॉन्सर पोस्टपासून पैसा मिळतो.

एक ब्लॉगर दरमहा २० हजार ते काही लाखांपर्यंत कमाई करतात. काही मोठे ब्लॉगर एकाच वेळी ८ ते १० ब्लॉगर मिळून चालवतात. त्यांची कमाई लाखोंच्या घरात असते. मी काही उदाहरणांदाखल व्यवसाय सांगितले, पण असे हजारो प्रकारचे व्यवसाय आहेत जे प्रत्येक शिकलेली व्यक्ती हे व्यवसाय करू शकते.

ह्यासाठी किमान एक कॉम्प्युटर, इंटरनेटचे कनेक्शन, इंग्रजी चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येणे, कॉम्प्युटर ज्ञान, चांगल्या प्रकारे इंटरनेट सर्फिंग करता यावे लागते. प्रत्येक व्यक्ती कोणता ना कोणता असा ऑनलाइन व्यवसाय करू शकतो. त्यांना थोडीशी अधिक माहिती व श्रम घ्यावे लागतील. सर्वसाधारण २ ते ५ लाखांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय उभा करता येतो.

जसजसे ह्या व्यवसायात तुम्ही जुने होत जाल, तसतसे ह्या व्यवसायात तुमची कमाई वाढत जाते. इतर काही अशा प्रकारच्या व्यवसायांची उदाहरणे पाहा – फ्रीलान्स प्रोग्रॅमिंग, अ‍ॅप्लिकेशन मार्केटिंग, प्रॉडक्ट रिटेलिंग, ई-बुक्स, बिझनेस रिपोर्ट आणि प्लॅन्स, सॉफ्टवेअर सेलिंग, ऑनलाइन स्पेस सेलिंग, डेटा एन्ट्री, ऑनलाइन मार्केट रीसर्च,

डेटा मायनिंग, इंटरनेट रीसर्च, ऑनलाइन कौन्सेलिंग, अ‍ॅडसेन्स, एसईओ, रिक्रूटमेंट, ऑनलाइन सल्लागार, ऑनलाइन ट्रॅव्हल्स गाइड, बुककीपिंग, ई-कॉमर्स बँक अँड मॅनेजमेंट, सोशल सर्व्हिसेस, पेमेंट फॉलोअप अँड कलेक्शन, कस्टमर रिलेशनशिप, नोट्स मेकिंग, अनुवादक इत्यादी हजारो प्रकारचे तांत्रिक व अतांत्रिक व्यवसाय ऑनलाइन उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात प्रत्येकाने प्रत्येक घरात हा व्यवसाय सुरू करावा म्हणजे प्रत्येक जण व्यावसायिक होईल व संपूर्ण बेकारी नष्ट होऊन संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धी येईल.

– प्रा. प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?