उद्योजकाचा सारथी म्हणजेच ‘अकाऊंटंट’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


उच्चविद्याविभूषित व्यक्तींना त्यांच्या ज्ञानामुळे समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचसोबत त्या व्यक्तींवर काही जबाबदार्‍या असतात. काही नैतिक आणि वैधानिक, कायदेशीर जबाबदार्‍या वाढत जातात. समाजात वावरताना अनेक प्रकारच्या कायदेशीर बाबी, कागदपत्र, दस्तऐवज यांचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते, त्याचा तपशील आणि लेखाजोखा ठेवावा लागतो.

त्यासाठी सरकारला नियमितपणे आपल्या संपत्तीचे विवरण, तपशील देणे गरजेचे असते. वैयक्तिक किंवा उद्योजकीय जीवनात हे सर्व स्वत: करणे मोठ्या जिकिरीचे असते. उद्योजकासाठी त्याच्या उद्योगातील हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा भाग असतो. अशा वेळी या सर्वांची नोंद ठेवण्यासाठी, वेळोवेळी त्या त्या गोष्टींचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा हिशेब ठेवण्यासाठी योग्य माणसाची आवश्यकता असते.

या प्रकारचे काम करणारा व्यक्ती म्हणजे लेखापाल, हिशेबनीस किंवा आजच्या रूढार्थाने म्हणायचे तर अकाऊंटंट होय. सर्वसामान्य माणसाला हिशेबशास्त्रातील सर्व संकल्पना माहीत असतील असे नाही. ‘करविषयक’ वेगवेगळे फॉर्म भरून घेण्यासाठी सनदी लेखापालची मदत घेणे अनिवार्य असते.

सनदी लेखापाल हा चॅप्टर अकाऊंटंट नसतो; पण त्याचा एक पाय सरकारी खात्याच्या बुटात आणि दुसरा पाय ग्राहकाच्या बुटात असतो. त्यामुळे त्याला ग्राहकाचे काम कायद्याच्या चौकटीत बसवावे लागते. सीए म्हणजे सनदी लेखापालास नेमके कळते की, कररचनेतील बूट नेमके कोठे चावतात.

पूर्वी एखाद्या माणसाची संपत्ती त्याच्या ‘गोधन’ म्हणजे गाई आणि पशुधनावरून मोजली जायची. काळ बदलला. संपत्ती मोजण्याच्या मापकात ‘ज्ञाना’ची भर पडली. जमीन, प्लॉट, अचल वस्तू, गुंतवणुका यासोबतची संपत्ती टिकवण्याची आणि वाढवण्यासाठी आता ज्ञानाची गरज भासू लागली.

हिशेबनीस म्हणजेच अकाऊंटंट हा केवळ आपली माहिती सांभाळणारा विश्वासू सेवक असतो. अकाऊंटंट हा खरं तर व्यावसायिकाचा गुराखी असतो तर व्यापार्‍याचा तो सारथी असतो, असं म्हणायला काहीच हरकत नाही. खर्‍या अकाऊंटंटला ग्राहकाच्या एकूण उलाढालीत काही स्वारस्य नसावे. केवळ त्याच्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळावा.

बारा बलुतेदार पद्धतीत माणसांच्या कामावरून आडनावे, कुळे ठरली असावीत. उदा. सुतार, कासार, सोनार, राऊत, सराफ, वाणी, वैद्य इत्यादी. औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाच्या प्रमाणात वाढ झाली. शेतीच्या उत्पन्नाबरोबरच उत्पादन आणि व्यापार क्षेत्राची वाढ व्हायला सुरुवात झाली.

उत्पादन आणि व्यापारात पुन्हा धंदेवाईक माणसाला निष्ठावंत सहकार्‍याची गरज भासायला लागली. अशा धंदेवाईक माणसाला मदत करणार्‍यांचा एक सुजाण, समंजस वर्ग तयार झाला. त्यातून सचिव, कायदे, फडणवीस, मेहता आणि मुनीमजी असे खर्डेघाशी करणारे अक्षरमित्र तयार झाले.

‘अकाऊंटिंग’ हा एक पवित्र व्यवसाय आहे. हिशेबात खर्च केला तरच खर्चाच्या हिशेबाचा खर्च लागतो; पण अकाऊंटिंग फिल्डमध्ये आता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज तज्ज्ञ मंडळी आहेत. पूर्वी जनरल वैद्यकीय व्यवसाय करणारा एकच वैद्य सर्व ‘वैद्यकीय’ सेवा पुरवत असे. आता प्राथमिक वैद्यकीय सेवा देणारा डॉक्टरही त्याच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडेच जात असतो. त्याप्रमाणेच कायदा आणि अकाऊंटिंग क्षेत्रातही तज्ज्ञ आहेत.

वैद्यकीय, कायदेविषयक आणि करविषयक व्यवसायात बराच फरक आहे. वैद्यकीय व्यवसायात पेशंट हा डॉक्टरच्या नावाचा बोर्ड बघून येत नसतो. म्हणजेच डॉक्टरसाठी परिचय आवश्यक नसतो. डॉक्टरला कोणताही धर्म, जात नसते. त्याउलट अकाऊंटंटकडे पूर्वपरिचय असावा लागतो. आपल्या कामामधून आपण लोकांपर्यंत पोहोचलेले असणे आवश्यक असते. नसेल तर व्यापारी नवीन अकाऊंटंटकडे जाणार नाहीत.

करविषयक कामे टाळून चालत नाही. आपणास काही थोडेसे सर्दीपडसे झाले तर बर्‍याच वेळा डॉक्टरकडे न जाता काही दिवसांत असा छोटासा आजार किंवा दुखणे आपोआप बरे होऊ शकते; पण करविषयक कामात अशी चालढकल चालत नाही.

दिवाणी किंवा फौजदारी कोर्टातील वकिलांकडे जाणारा पक्षकार नाइलाजाने कोर्टाची पायरी चढत असतो. करविषयक कामाच्या पद्धतीत पक्षकाराला ‘अशिल’वाणं राहून चालत नाही. कर आणि मरण कोणास टळत नाही. सरकारचे उत्पनाचे साधन म्हणजे ‘कराचा महसूल’ असतो.

करविषयक कामाच्या बाबतीत निवडलेला सल्लागार हा कुठल्या तरी संदर्भावरून निवडता येतो. शक्यतो अनोळखी सल्लागाराला कोणी करविषयक कामे देत नाही. करविषयक कामे जोखमीचीही आहेत. उदा:- वस्तू व सेवाकर विवरणपत्र मुदतीत सादर केले नाही तर त्याचा दंड वाढतच जाणार असतो. आर्थिक सर्व माहिती कर सल्लागाराला वेळेवर पुरवली तर करकचाट्यातून सुटका होऊ शकते.

१९९१ नंतर संगणकयुग सुरू झाले आणि पूर्वीची अकाऊंटंट जमात लुप्त व्हायला लागली. एकाच सल्लागाराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा अभ्यास आणि पाठपुरावा अशक्य व्हायला लागला. ग्राहकाचा विश्वास कर सल्लागारावर असतोच; पण संगणकीय कार्यप्रणालीवर कमी असतो. कायद्यानेदेखील नागरिकानेच स्वतः सर्व कामे सल्लागाराच्या मदतीशिवाय करावी असेच गृहीत असते.

ऑनलाइन कामे करण्यासाठी ई-मेलचा पासवर्ड, मोबाइल पासवर्ड आणि इंटरनेटमार्फत करांचे पेमेंट या गोष्टी अनिवार्य झाल्या. ‘खर्च कोठे झाला याचे दु:ख नसते, पण खर्चाचा हिशेब लागत नाही याचे मोठे दु:ख असते’, यासाठी मदतीला असतो तो अकाऊंटंट पण आता जमाखर्चासोबत काही जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात.

अकाऊंटंट हा केवळ रोजकीर्द आणि खतावणी म्हणजे कॅशबुक लेजर ठेवणारी व्यक्ती नव्हे, तर व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायवाढीत कायदेविषयक पूर्तता करणारा जवळचा मित्र असतो. शॉप अ‍ॅक्ट लायसेन्स, वजनमापे कायदा, आयकर, इतर अप्रत्यक्ष कर यांचा भरणा आणि अचूक माहिती पोर्टलवर टाकण्यापर्यंतचा हातभार अकाऊंटंटचा असतो.

टॅक्स ऑडिटपूर्वी सर्व बँक स्टेटमेंट, कर्ज, खातेउतारे, येणे देणे यादी जुळवून ठेवावी लागते. जीएसटी, चलन, ई वे बिल तयार करणे आदी आजच्या बदलत्या काळातील अकाऊंटंटला करावी लागणारी महत्त्वाची कामं असतात. यासाठीही विश्‍वासू अकाऊंटंटची गरज असते.

– सदाशिव गायकवाड
(लेखक कर सल्लागार आहेत.)
संपर्क : 9371527111

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?