आपण मित्र कुणाला म्हणतो? ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, ज्याच्या प्रगतीसाठी आपण कायम तत्पर आहोत, ज्याचं सुख-दुःख आपलं मानतो, ज्याच्या खोट्या बढेजावपणाला आपण आवर घालतो, मग एक उद्योजक म्हणून आपण आपल्या बॅलन्स शीटबरोबर मैत्री का नाही करत?
खरं तर साधारण समज असा आहे की, जो व्यक्ती व्यवसाय करतो त्यांनीच आपली बॅलन्स शीट तयार करावी, कारण ते कायद्याने जरुरीचे आहे. पण तसं नाहीए, बॅलन्स शीट हे प्रत्येक व्यक्तीने तयार केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बॅलन्स शीटबरोबर मैत्री केलीच पाहिजे.
बॅलन्स शीट हे एक पत्रक आहे, ज्यामध्ये आपली संपत्ती आणि देणी याची माहिती असते. बऱ्याच वेळेला आपली बॅलन्स शीट ही खरा आरसा आपल्या समोर मांडत नाही, काही कारणास्तव किंवा माहितीच्या अभावामुळे आपण चुकीची किंवा अपूर्ण बॅलन्स शीट तयार करत असतो. त्यामुळे आपल्याला निर्णय घेणे कठीण जाते. बॅलन्स शीट अचूक तयार केली असेल, तर आपल्याला खर्चाचे, इन्व्हेस्टमेंटचे निर्णय त्या आधारे घेणे सोपे जाते.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
बॅलन्स शीटचे घटक :
बॅलन्स शीटमध्ये साधारण खालीलप्रमाणे घटक असतात, त्याचे मुलत: दोन प्रमुख घटकांमध्ये विभागणी केलेली असते Liabilities आणि Assets.
Liabilities म्हणजे आपल्याला दुसऱ्याला असलेली देणी त्यामध्ये ढोबळ मानाने खालील गोष्टींचा समावेश होतो :
Capital (भांडवल) : प्रत्येक व्यक्ती हा आपल्या व्यवसायामध्ये काही रक्कम अथवा वस्तू रूपाने आपलं स्वतःच काहीतरी वर्गणी देत असतो, त्याला भांडवल म्हणतात, खरतर हे भांडवल बॅलन्स शीटला असायचं कारण म्हणजे, तुमचा व्यवसाय तुम्हाला किती रक्कम देणं लागतो ही रक्कम म्हणजे भांडवल.
Long Term Liabilities (दीर्घकालीन देणी) : व्यवसाय सुरू करताना किंवा तो वृद्धिंगत करण्यासाठी अनेक वेळेला कर्ज घेत असतो, जी कर्ज दीर्घ मुदतीमध्ये परतफेड करायची असतात, त्याचे विभाजन परत Secured आणि Unsecured अशा दोन घटकांत होते, त्याचप्रमाणे बँकेकडून घेतलेली कर्ज, Financial Institute कडून घेतलेली कर्ज आणि मित्रमंडळी, नातेवाईक आणि इतर माध्यमातून घेतलेली कर्ज यामध्येसुद्धा त्याची पुन्हा वर्गवारी करता येते.
Short Term Liabilities (अंशकालीन देणी) : व्यवसाय करताना बऱ्याच वेळेला आपल्याला माल उधारीवर घेणे, हातउसने पैसे घेणे तसेच व्यवसायातील इतर देणी, जे साधारण एक वर्ष मुदतीच्या आत फेडायचे आहेत, अशा देण्याची वर्गीकरण ह्या अंतर्गत होते.
Contingent Liability (अनिश्चित देणी) : अनिश्चित देणी ही बऱ्याच वेळेला बॅलन्स शीटमध्ये दाखवली जात नाहीत, खरतर हा एक महत्त्वाचा भाग आहे, अनिश्चित देणी म्हणजे जी रक्कम एखाद्या ठराविक घटनेमुळे आपल्याला द्यावी लागू शकते.
उदा. आपण एखाद्या व्यक्तीला जामीनदार आहोत आणि उद्या त्यानी हफ्ते नाही भरले, तर ती देणी आपल्या माथी येणार असतात, अनिश्चित देणी ही बॅलन्स शीटच्या बेरजेमध्ये येत नाही, पण ते दाखवणं आवश्यक असते, ज्यामुळे आपल्याला अचूक माहिती उपलब्ध राहते.
Assets म्हणजे आपली संपत्ती किंवा आपल्याला दुसऱ्याकडून असलेली येणी, त्यामध्ये ढोबळमानाने खालील गोष्टींचा समावेश होतो :
Fixed Assets किंवा Non Current Assets : ज्या गोष्टीवर आपण खर्च केला आहे आणि जी गोष्ट आपल्याकडे दीर्घ काळ उपलब्ध असणार आहे, त्याला fixed assets असे म्हणतात उदा. मशिनरी, फर्निचर, जागा, ऑफिस, फॅक्टरी जे आपल्या मालकीचे आहे आणि जे दीर्घकाळ आहे.
Investment (गुंतवणूक) : Investment म्हणजे भविष्य निर्वाहसाठी किंवा अडीअडचणीच्या काळासाठी केलेली गुंतवणूक, investment ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची आहे, आताचेच उदाहरण घ्यायचे झाले तर Covid-19 मुळे अनेक लोकांना अनेक आर्थिक संकटातून दिव्य पार करावे लागले, पण ज्यांनी योग्य गुंतवणूक केली होती त्यांना या परिस्थितीमध्ये तरणे सोपे झाले.
Current Assets : Current Assets म्हणजे ज्या संपत्तीमध्ये कमी वेळात सतत बदल होत जातो, उदा. कॅश, बँक बॅलन्स, व्यापारातील येणी, स्टॉक, इतर कुणाला दिलेली उसनवारी इ.
वरील सर्व घटक हे बॅलन्स शीटचा भाग आहेत, पण एवढीच माहिती ही निर्णय घेण्यासाठी पुरेशी नाही, निर्णय घेण्यासाठी काही गणित आणि प्रमाण मांडावे लागतात, त्याची माहिती थोडक्यात खाली देत आहे.
Net worth: Assets – Liabilities
Net worth नेहमीच पॉजिटिव्ह आकडा दर्शवला पाहिजे. जर Assets वजा Liabilities निगेटीव्ह येत असेल, तर धोक्याची घंटा समजावे.
Current Ratio: Current Assets ÷ Current Liabilities
Current Ratio साधारण २ असणे हे योग्य मानले जाते, जर current ratio हा दोनपेक्षा कमी असेल, तर आपलं working capital वर जास्त भार येत आहे, असे समजावे.
Liquid Ratio: Liquid Assets ÷ Liquid Liabilities
Debt-Equity Ratio: (Capital + General Reserve) ÷ Loans
याप्रमाणे अजून काही प्रमाण निश्चित केलेली आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला जीवाभावाच्या मित्राप्रमाणे वेळोवेळी सावध करण्याचे काम करत असतात. म्हणून बॅलन्सशीटशी मैत्री करूया आणि आपल्या आर्थिक नाड्या आपल्याच हातात ठेवूया.
– सीए कमलेश जोशी
(लेखक पुणेस्थित चार्टर्ड अकाउंटंट व कर सल्लागार आहेत.)
संपर्क – 9422530196 / 8237723906
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.