भारतात तुमची मिळकत, निवास, कामाचा अनुभव ते वय अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी पाहिल्या जातात. या सर्व गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी, सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा सिबिल निर्देशांक. तुम्ही बँकेच्या सर्व पात्रता-निकष पूर्ण केले तरी तुमच्या कमी सिबिल निर्देशांकामुळे तुमचा क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता खूप दाट असते.
तर मग सिबिल निर्देशांक म्हणजे नक्की काय? त्याला नेमकं कर्ज घेण्यामध्ये इतकं महत्त्व का आहे? जर क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करण्यासाठीची ही तुमची पहिलीच वेळ असेल, तर सिबिल निर्देशांकाबद्दल तुम्हाला पुढील गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे :
सिबिल निर्देशांक म्हणजे काय?
दी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लि. ही संस्था व्यक्तीच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेची नोंद ठेवते. सर्व बँका आणि क्रेडिट कार्ड सेवा पुरविणाऱ्या संस्था तिचे सभासद असतात आणि या संस्थेस आपल्याकडील कर्ज आणि क्रेडिट कार्डधारक ग्राहकांच्या खात्यांची माहिती पुरवितात.
या माहितीच्या आधारे, सिबिल ब्युरो एखाद्या व्यक्तीच्या कर्जाचा इतिहासाचा सारांश ३ अंकी संख्येच्या रुपात मांडते. ही संख्या ३०० ते ९०० च्या मधील असते.
सिबिल निर्देशांकाचे महत्त्व :
सिबिल निर्देशांक मांडताना/मोजताना तुमचा कर्जाचा इतिहास लक्षात घेतला जातो. यामध्ये निर्देशांक मोजताना ब्युरो स्वतःचे नियम आणि प्रक्रिया वापरते. पण यामध्ये सर्वात जास्त महत्त्व तुम्ही यापूर्वी क्रेडिट कार्डच्या स्वरूपात घेतलेले किंवा प्रत्यक्ष घेतलेले कर्ज कसे हाताळले आहे, याला दिलं जातं.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे की नाही हे ठरवण्याच्या बँकेच्या कामात सिबिल निर्देशांक हा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जेणेकरून उत्तम सिबिल हा सदर व्यक्ती ही कर्ज जबाबदारीने हाताळते, याबद्दल त्यांना खात्री देतो. ज्यांचा कर्जाचा इतिहास चांगला नाही आणि जे कदाचित कर्ज फेडणार नाहीत अशा लोकांना कर्ज देण्यातला धोका सिबीलमुळे कमी करण्यास मदत होते.
चांगला आणि वाईट सिबिल निर्देशांक
सामान्यतः जितका सिबिल ९०० च्या जवळ असेल, तितके तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देणाऱ्याच्या दृष्टीने जास्त विश्वासार्ह ठरता. बऱ्याच बँका ७०० किंवा त्याहून अधिक सिबिल असलेल्या ग्राहकांना प्राधान्य देतात. ६५० आणि त्याहुन कमी सिबिल असलेल्या व्यक्तीनां कर्ज मिळविताना अडचणींचा सामना करावा लागतो.
चांगल्या सिबीलचे फायदे
७०० किंवा अधिक सिबिल असलेल्या व्यक्तींचे कर्ज आणि क्रेडिट कार्डचे अर्ज जलदगतीने पुढे पाठवले जातात. तसेच अशा व्यक्तींना पतपुरवठादाराशी कराराबद्दल बोलताना तो आपल्या बाजूने वळवण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्ही गृहकर्ज घेत आहात, तर तुमच्या उत्तम सिबीलचा वापर कमी व्याज दराने कर्ज मिळवण्यासाठी करून स्वतःचे लाखो रुपये वाचवू शकता.
सिबिल निर्देशांक तपासणे
सिबिल निर्देशांक कुठूनही ऑनलाईन पद्धतीने सहज तपासता येतो. यासाठी गरज आहे ती फक्त सिबिलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची. तिथून आपला सिबिल रिपोर्ट वर्षातून एकदा मोफत मिळवता येतो. तसेच सभासदत्व घेतल्यास आपण आपला रिपोर्ट कधीही आणि कितीही वेळा मिळवू शकतो.
सिबिल निर्देशांकाच्या माध्यमातून आपली विश्वासार्हता सुधारणे
आता बँका किंवा इतर पतपुरवठा करणाऱ्या संस्था अर्जदाराच्या सिबिल निर्देशांकावर जास्त जोर देतात. त्यामुळे कोणत्याही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल तपासणे महत्वाचे आहे. कारण असे अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण याचासुद्धा क्रेडिट रिपोर्टवर प्रभाव पडू शकतो.
सिबिल निर्देशांक आणि त्याचे महत्त्व याबद्दलची वरील माहिती आपल्याला आपला सिबिल सुधारण्यासाठी आणि विश्वासार्हता अधिकाधिक वाढवण्यासाठी नक्कीच सहाय्य करेल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.