आदर्श ग्राहक ओळखण्याची आणि निर्धारित करण्याची शिस्त


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


या विषयाचा विचार करताना प्रथम ‘शिस्त’ या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. शब्दकोश आपणास सांगतात की, शिस्त म्हणजे अयोग्य वागणूक सुधारण्यासाठी शिक्षेचा वापर करून लोकांना नियम किंवा आचारसंहिता पाळण्याच्या प्रशिक्षणाचा सराव; पण बरेच जण उद्योगात शिरतात, कारण त्यांना स्वत:चे स्वामी/धनी (बॉस) व्हायचे असते. त्यांना नियम व आचारसंहिता नकोशा असतात.

त्यांना आपले सारेच बरोबर असे वाटते. त्यामुळे मग उद्योगात अपयश येऊ लागले की, ते निराश होऊ लागतात. ते टाळायचे तर अपयशाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्वतःकडे, आपल्या वागण्याकडे त्रयस्थ म्हणून पाहावे लागते. हीच त्रयस्थ वृत्ती सुरुवातीपासून स्वतःकडे पाहताना ठेवली तर मालकपण डोक्यात न जाता यशाच्या मार्गावर वाटचाल करता येते. आता आपण पाहू की ह्या आचारसंहितेतील नियम कुठले, की जे पाळल्यावर उद्योजकाला घवघवीत यशप्राप्ती होऊ शकते.

आदर्श ग्राहक ओळखण्याची आणि निर्धारित करण्याची शिस्त

आदर्श ग्राहक म्हणजे अशा सुयोग्य व्यक्ती ज्या आपले उत्पादन किंवा सेवा पुरेशा प्रमाणात अशा किमतीमध्ये खरेदी करू शकतील जी किंमत आपल्याला तो व्यवसाय चालवणे व त्यात टिकून राहणे यासाठी आकारावी लागेल. खरे तर आपला सुयोग्य ग्राहक आपल्या लक्ष्य बाजाराचा (Target Market) एक लहान भाग असतो.

उदाहरणार्थ आपला लक्ष्य बाजार मुंबईतील मध्यमवयीन व्यक्ती असतील; पण त्यातील प्रत्येक जण आपला सुयोग्य ग्राहक नसेल, कारण उत्पन्न, राहण्याचे ठिकाण इत्यादी गोष्टींमुळे त्यातील बरेच जण आपल्या उत्पादनाचे ग्राहक बनू शकणार नाहीत.

या व्यतिरिक्त व्यक्तिगत आवडीनिवडीही त्यातील बर्‍याच जणांना दूर ठेवेल. बर्‍याच जणांना व्यवसायाची एखादी कल्पना सुचल्यावर व्यवसाय सुरू करण्याची प्रचंड घाई होते. मग ‘जेथे नगार्‍याची घाई तेथे टिमकी काय जायी’ या न्यायाने या शिस्तीचा विसर पडतो. त्यांना बाजार संशोधन म्हणजे वेळेचा अपव्यय वाटू लागतो.

कधी कधी बाजार संशोधनाचे निष्कर्ष उत्पादन/सेवा यांच्या आराखड्यात यथायोग्य रूपांतरित होत नाहीत त्यामुळे जेव्हा त्यांची उत्पादने/सेवा बाजारात येते तेव्हा ग्राहकांच्या गरजा व इच्छा यांच्याशी मेळ साधला जात नाही. मग उत्पादन/सेवा यांच्या आकृतिबंधाची पुनर्मांडणी किंवा सुयोग्य ग्राहकांच्या शोधात वणवण पदरी येते. यात वेळ व पैसे याचा प्रचंड अपव्यय  होऊन नुकसानीचे कारण ठरते.

व्यवसायासाठी नवीन अग्रांचा (leads) स्थिर व भाकीत करण्याजोगा प्रवाह निर्माण करणारी विपणनाची (marketing) योजना विकसित करण्यासाठी चाचणी, त्रुटी आणि चिकाटी/सातत्य यावर आधारित शिस्त

कुठल्याही उद्योगधंद्यासाठी सतत नवनवीन अग्रे लागतात. विपणनाची योजना अशी हवी की, त्या अग्रांचा अखंडित व अपेक्षित ओघ चालू राहावा. त्यासाठी योजना वारंवार प्रत्यक्ष उद्योगधंद्यात अजमावली पाहिजे. विपणन योजनेच्या अशा कसोटीत त्यात आढळलेल्या कमतरता भरून काढल्या पाहिजेत. यात कंटाळा व थकवा आल्याने बरेच उद्योजक यात खंड पाडतात. म्हणून चिकाटी हवी. नाही तर त्याचा दुष्परिणाम व्यवसायावर होतो.

प्रभावी विपणनासाठी, आपल्या स्पर्धात्मक फायद्याबद्दल आणि आपल्या अनन्य विक्री प्रस्तावाबद्दल (USP : Unique Selling Proposition) आपल्याला अगदी स्पष्टता हवी.

आपले उत्पादन किंवा सेवा याबद्दल कुठली गोष्ट त्यांना आज इतर कोणत्याही समान उत्पादन आणि सेवा यांच्या तुलनेत ग्राहकांसाठी श्रेष्ठ आणि अधिक मौल्यवान बनवतात? हे माहिती हवे. त्यासाठी आपले उत्पादन/सेवा यांचा इतरांच्या उत्पादन/सेवा यांबरोबर तौलनिक अभ्यास हवा. त्यासाठी इतरांच्या उत्पादन/सेवा यांची माहिती मिळवून ती आपली उत्पादन/सेवा यांबरोबर ताडून पाहण्याचे कष्ट घेण्याची शिस्त हवी.

आपण आपल्या ग्राहकांना दुसरा कोणीही देऊ शकणार नाही असा किती उघड फायदा देऊ करता? हे ओळखून ग्राहकांसमोर मांडायला हवे. सेवांमध्ये लोक गुंतलेले असतात आणि कोणी दोन व्यक्ती सारख्या नसतात! त्यामुळे दोन भिन्न संघटनांमधून येणारी एकाच प्रकारची सेवासुद्धा वेगवेगळी असते. याची जाण हवी.

अथपासून इतिपर्यंत एक पूर्ण विक्री (sales) प्रणाली

विक्रीप्रणाली विकसित करण्यासाठी शिस्त ज्यामुळे योग्य अग्रे भक्कम उल्लेखनीय ग्राहकांमध्ये रूपांतरित केली जातील. प्रभावी विपणन योजनेने हवी तेवढी नवनवीन अग्रे जरूर मिळत राहतील, पण ते पुरेसे नाही.

ही अग्रे जर मागणीत परिवर्तित झाली तर उत्पादन पुरवठा किंवा सेवा पुरवून त्या मागणीचा महसूल बनवता येतो, पण त्यासाठी विक्री प्रणालीमध्ये कुठले घटक निसटलेले आहेत किंवा कमी मात्रेत आहेत अथवा सुयोग्य प्रकारे जुळलेले नाहीत याचे परीक्षण करून या त्रुटी टप्प्या-टप्प्याने काढाव्या लागतील. विकसित व परिपूर्ण विक्री प्रणालीने संभाव्य ग्राहकांना तार्किक आणि भावनिकरीत्या गुंतवायला पाहिजे.

म्हणजे ती ग्राहकांना बुद्धीच्या पातळीवर तर पटेलच; पण ती त्यांच्या हृदयातही हात घालेल. आदर्श विक्री प्रक्रिया ही पुनरावर्तनीय आणि मोजता येण्याजोगी असते. म्हणजे एकवार जबरदस्त सौदा करून त्याच्या किमयेत/चर्चेत ती दंग राहत नाही, तर सर्वोत्कृष्ट सौदे वारंवार घडवते. ही विक्री प्रक्रिया कशी चालली आहे व त्याची परिणामकता मोजता येते. थोडक्यात ती कलेच्या गूढ पातळीवरून शास्त्रीय मोजमापाच्या आकलनीय पातळीवर शिस्तीने आणता येते.

प्रतिक्रिया देत राहण्याऐवजी क्रियाप्रधान (proactive) होणे आवश्यक

क्रियाप्रधान होण्यासाठी स्वयं-शिस्त ठेवणे आवश्यक आहे. उद्योगधंद्यात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीचे चालक घटक कुठले? त्यातील प्रत्येकाचा काय व किती परिणाम? या छाननीत उद्योजक घुसतात. यात त्यांचे बुद्धिरंजन होत असल्याने ते नकळत त्यात गुंगून जातात. यात आपले किती कष्ट व वेळ वाया जात आहे याचे त्यांना भान राहत नाही.

समस्येचे विविध प्रकारे पृथक्करण करत आपण त्यात समस्येवरच ध्यान करत आहोत हे भान सुटते; परंतु समस्येचे अधिकाधिक सखोल विश्‍लेषण करत राहण्याऐवजी उत्तर/तोडगा/उकल यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सुरुवातीस सापडलेला तोडगा कदाचित अपुरा असेल, पण त्यावर लक्ष देऊन त्याला सर्वोत्कृष्ट कसे बनवता येईल यावर अक्कलहुशारी लावायला हवी. बुद्धीचा कस तेथे लागायला हवा.

महत्त्वाच्या गोष्टींवर एकाग्रता

कमी किंवा शून्य मूल्यांच्या कृतींच्या फाट्यात घुसण्याऐवजी उद्योजक यांनी प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासात सर्वातच महत्त्वाच्या गोष्टींवर एकाग्रता पुन: पुन्हा साधणे आवश्यक आहे.

उद्योगात रोज काहीना काही तातडीची कामे येतात. उदाहरणार्थ कर खात्याकडून आलेल्या कृतींमध्ये व्यस्त असणे हे परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या समान नसते. निश्चित इच्छित परिणामांसह परिणामाभिमुख बना. जीटीडी काम करवून घेणे (डेव्हिड अ‍ॅलन यांच्या GTD: Getting Things Done) पुस्तकातील काल-व्यवस्थापनाची पद्धती वाचा) ही एक उत्तम प्रणाली आहे जी काम करते.

दीर्घ मुदतीसाठी स्थिर राहण्याची स्वयंशिस्त

उद्योजकांना दीर्घ मुदतीसाठी स्थिर राहण्याची स्वयंशिस्त आवश्यक आहे. व्यवसायात अनेक मोह येतात. उदाहरणार्थ  आपल्या व्यवसाय योजनेशी विसंगत उत्पादन किंवा सेवा केवळ ती बाजारात चालते म्हणून देण्याचा मोह. व्यवसायात आणि आयुष्यात दीर्घकालीन दृष्टिकोन यशस्वी ठरतो; पण अल्प मुदतीत यश येत नाही असे पाहून अनेक उद्योजक विचलित होतात.

ते दुसर्‍याची नक्कल करायला जातात. मग नको असलेले तंत्रज्ञान केवळ अत्याधुनिक म्हणून स्वीकारले जाते किंवा नको असलेला थाटमाट/दिखावा विपणनाच्या नावावर खपवला जातो.

व्यवसाय नातेसंबंधावर उभारला जातो. नातेसंबंध कार्यजालातून (networking) निर्माण होतात. हा रातोरात होणारा खेळ नव्हे. उद्योजकांनी एक हजार दिवसांचा नियम लक्षात ठेवायला हवा. तेवढे दिवस त्यांनी आपला उपक्रम सांभाळला तर यशाची शक्यता खूप वाढते. आवडीचे ज्ञान ते विश्वास ठेवण्याचे ज्ञान यामधील प्रगतीसाठी वेळ लागतो.

आपणच आपले स्वामी असल्याने जे आवडते ते स्वीकारावे, अशी धारणा बळकट होऊ शकते. तीच आपल्याला धंद्याला नको असलेल्या गोष्टी करायला भाग पाडते. हे धंद्यातील टक्केटोणपे खाल्ल्यावर ध्यानात येते. हे ज्ञान अनुभवजन्य असल्याने हळूहळू येते, कारण डोक्यातील धनीपणाची नशाही हळूहळू ठेचा खाऊन उतरते.

स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ काढा

स्वतःसाठी आणि कौटुंबिक आनंद घेण्यासाठी समर्पित वेळ बाजूला ठेवण्याची स्वतःला शिस्त लावावी. आमच्याकडे बरेच उद्योजक ताणतणावग्रस्त असल्याने येतात. या ताणतणावाच्या मुळाशी स्वत:साठी वेळ बाजूला न ठेवल्याने मनोरंजन, आवडते छंद जोपासून, शिथिलीकरणातून मन ताजेतवाने करणे बंद किंवा कमी होणे असते. काही तर आपला विश्रांतीचा वेळही व्यवसायासाठी कमी करून तणावग्रस्त होतात.

काहींच्या बाबत कुटुंबाचा वेळ व्यवसायासाठी किंवा व्यवसायाची चिंता वाहण्यासाठी वापरल्याने कौटुंबिक नातेसंबंध ताणले जातात. कुटुंबीय त्या व्यवसायाचा द्वेष करू लागतात किंवा त्यांना  त्या उद्योजकाच्या कर्तृत्वाचे काहीही कौतुक राहत नाही किंवा दुःखाबद्दल सहानुभूती राहत नाही.

कौटुंबिक तुटलेपणाचा व्यावसायिक यशावर विपरीत परिणाम होत राहतो. त्यामुळे  उद्योजक म्हणून आपल्याला जी काही स्वातंत्र्ये मिळाली आहेत त्याचे लाभ स्वतःस तसेच आपल्या कुटुंबीयांस मिळवून दिले पाहिजेत. यासाठी अनुशासन हवे.

थोडक्यात उद्योगधंद्यात शिरणे म्हणजे त्याची बांधिलकी स्वीकारणे व त्याला आनुषंगिक शिस्त बाळगणे आवश्यक आहे. यामुळे उद्योजक उद्योगधंद्यात यशस्वी तर होतीलच; पण त्यांचे वैयक्तिक जीवनही सुखी व आनंदी होईल.

– संदीप नेमळेकर
संपर्क : 9987209747

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?