ढोबळमानाने व्यक्तिमत्त्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची ओळख व विचार, वागणूक, मला प्रेरणा कशातून मिळते, दुसर्या व्यक्तींशी साधलेला संवाद, निर्णय घेण्याची प्रक्रिया, आयुष्यात महत्त्व कशाला द्यायचे याचा विचार, मी एखादी गोष्ट कशी शिकत आहे, आत्मसात करत आहे, कल्पना करण्याची प्रक्रिया, भावना कशा प्रकारे व्यक्त करायच्या वगैरे.
या बाबींचा विचार करून व्यवसाय निवडता येईल, व्यवसायात टिकून राहता येईल, कर्मचारी वर्ग निवडता येईल आणि कर्मचारी वर्ग टिकवता येईल.
मला भरपूर श्रीमंत व्हायचे आहे, मला स्वातंत्र्य हवं आहे, माझ्याकडे कल्पनांचे भांडार आहे, मला व्यवसाय करायचा किडा चावला आहे, अशी वेगवेगळी विचारसरणी घेऊन लोक व्यवसाय करायला उतरतात, परंतु कालांतराने या व्यावसायिकांची खालील प्रकारची श्रेणी तयार होते.
- पूर्णवेळ व्यावसायिक
- अर्धवेळ व्यावसायिक आणि अर्धवेळ नोकरी
- अर्धवेळ व्यावसायिक आणि पूर्णवेळ नोकरी
- माझ्या नोकरीची शाश्वती नाही म्हणून मी आता व्यवसाय सुरू केला आहे, अशा विचारसरणीची व्यक्ती
- माझे शिक्षण अपूर्ण आहे म्हणून व्यवसायात शिरलेल्या व्यक्ती
- अर्धवेळ व्यवसाय करणार्या गृहिणी वगैरे.
अपयशाचे निदान
जवळजवळ ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना कळते व्यवसाय करणे आणि नफा मिळवणे सोपे नाही किंवा एका उंचीवर व्यवसाय पोहोचवून, त्यावरची उंची गाठता येत नाही आहे. मग सुरू होते कारणमीमांसा, विचारमंथन.
वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगितली जातात, त्यावर उपाय काय करायचे याचा विचार सुरू होतो, परंतु हा चक्रव्यूह फारच कमी लोकांना भेदता आला आहे. यात मानसशास्त्र या अपयशाबद्दल काय संशोधन करते, माझ्या व्यक्तिमत्त्वाशी मानसशास्त्र निगडित आहे, हा विचार क्वचितच केला जातो.
मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व आणि कॉर्पोरेट जगत
माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य याच्यासभोवती मी, कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, माझ्या व्यवसायातील कर्मचारी वर्ग, भागीदार, ग्राहक वगैरे या सगळ्या व्यक्ती वावरत असतात. या सगळ्या व्यक्तींच्या वागण्याचा आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा माझ्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसायावर परिणाम होत आहे हे लक्षात येत नाही.
कॉर्पोरेट जगतामध्ये या बाबींवर वेगळा कर्मचारी वर्ग नेमलेला असतो जो सतत मानवी वागणूक आणि भावभावना यावर अभ्यास आणि संशोधन करून स्वत:च्या व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करून घेत असतात. उदाहरणार्थ- उत्पादन/सेवा निर्माण आणि नवनिर्माण, व्यक्तिमत्त्व याप्रमाणे कर्मचारी वर्गाची नेमणूक करून त्याप्रमाणे त्याला कौशल्य शिकवणे, ग्राहकाच्या मानसिकतेप्रमाणे मार्केटिंग व विक्रीचे धोरण तयार करणे, जाहिराती तयार करणे, ग्राहकाच्या मानसिकतेप्रमाणे त्याला सेवा देणे वगैरे.
त्यामुळे या समाजात वावरणार्या प्रत्येक व्यक्तीला मानसशास्त्र आणि विविध प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांची तोंडओळख होणे आवश्यक आहे.
व्यक्तिमत्त्वाची व्याख्या
ढोबळमानाने व्यक्तिमत्त्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वत:बद्दलची ओळख व विचार, वागणूक, मला प्रेरणा कशातून मिळते, दुसर्या व्यक्तींशी साधलेला संवाद, निर्णय घेण्याची प्रक्रिया, आयुष्यात महत्त्व कशाला द्यायचे याचा विचार, मी एखादी गोष्ट कशी शिकत आहे, आत्मसात करत आहे, कल्पना करण्याची प्रक्रिया, भावना कशा प्रकारे व्यक्त करायच्या वगैरे.
वरील बाबींचा विचार करून व्यवसाय निवडता येईल, व्यवसायात टिकून राहता येईल, कर्मचारी वर्ग निवडता येईल आणि कर्मचारी वर्ग टिकवता येईल.
या विषयांवर वेगवेगळ्या शाखांच्या मानसशास्त्रज्ञांनी मानवी व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंवर काम केलेले आहे. यामुळे एक गोष्ट लक्षात येईल की, तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे व्यवसाय निवडला नाही.
प्रेरणा आणि व्यवसाय
मानव आणि प्रेरणा याचा प्रभावी संबंध आहे. आज जगात जी काही प्रगती झालेली आहे ती त्या व्यक्तीला कशाने तरी प्रेरित केलेले होते म्हणून झाली. साधारणतः खालील तीन गोष्टींनी व्यक्ती प्रेरित होते.
अचीव्हमेंट (ध्येयाच्या एका उंचीवर पोहोचणे)
मला काही तरी ध्येय साध्य करायचे आहे आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्या क्षेत्राच्या उंचीवर पोहोचायचे आहे. उदा. सचिन तेंडुलकर, रॉजर फेडरर, रिचर्ड ब्रॅन्सन, अॅपल, गुगल वगैरे. या सर्व व्यक्तींचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की, त्यांना त्यांच्या क्षेत्राच्या एका विशिष्ट उंचीवर पोहोचायचे आहे या विचारांनी प्रेरित केले.
या व्यक्तींनी व्यवसाय कुठला निवडावा : ज्या उत्पादन/सेवांमध्ये व्यवसाय विस्ताराची (फ्रँचाईस) संधी असेल, नेटवर्क मार्केटिंग जिथे जास्तीत जास्त ग्राहकांकडे पोहोचावे लागते. असा व्यवसाय जिथे टार्गेटचा संबंध येतो.
रिलेशनशिप (लोकांमध्ये सहजासहजी मिसळणे)
अशा व्यक्ती लोकांमध्ये सहजपणे मिसळतात. लोकांचे प्रश्न उत्तमपणे हाताळतात. लोकांचे व्यवस्थित व्यवस्थापन करतात. उदा. अण्णा हजारे, शरद पवार, डॉ. अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, रतन टाटा वगैरे.
कुठला व्यवसाय निवडावा : मानव संशोधन/संसाधन, प्लेसमेंट, समुपदेशक, ट्रेनिंग. जिथे लोकांचे मानसशास्त्र अशा गोष्टींचा संबंध येतो.
पॉवर (प्रभावी व्यक्तिमत्त्व)
या लोकांना आपल्या व्यक्तिमत्त्वामधील प्रभावाची जाणीव असते. अशा लोकांचा समाजातील एका विशिष्ट वर्गावर प्रभाव असतो. त्या वर्गाच्या समस्यांसाठी हे लोक काम करतात. उदा. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, नेपोलियन, हिटलर, अमिताभ बच्चन, संजीव कपूर, ओप्राह विन्फ्रे, धीरुभाई अंबानी, डोनाल्ड ट्रम्प वगैरे.
कुठला व्यवसाय करावा : कोच, उत्पादनाचे मार्केटिंग, रेडिओ जॉकी, समाजसेवा वगैरे.
भावना आणि व्यवसाय
आता आपण अजून एका वेगळ्या संशोधनाचा विचार करू या ज्यात भावना आणि वर्तणूक याचा विचार केला जातो. एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगात स्वत:बद्दल, दुसर्याबद्दल आणि समाजाबद्दल काय विचार करते आणि त्या प्रसंगात त्या व्यक्तीच्या भावना काय असतात हे बघू या.
स्वत:बद्दलचा अविवेकी विचार आणि भावना
मी व्यक्ती म्हणून प्रत्येक काम योग्य रीतीनेच केले पाहिजे, नाही तर मी व्यक्ती म्हणून जगायला नालायक आहे. अशा व्यक्ती परिपूर्ण काम होण्यासाठी सतत चिंता करत असतात.
कुठला व्यवसाय करावा : अशा व्यक्तींनी संशोधनात जावे, कारण एखाद्या गोष्टीतील मूळ जाणून घ्यायचा यांचा अट्टहास असतो जे संशोधनातील मूळ आहे.
दुसर्या व्यक्तींबद्दलचे अविवेकी विचार
दुसर्या व्यक्तीने काम परिपूर्ण आणि योग्य रीतीनेच केले पाहिजे, नाही तर त्याबद्दल त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. असे लोक रागीट असतात. दुसरी व्यक्ती कामचुकार असल्यामुळे माझे काम अडून राहिले आहे आणि माझे रागावणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे, अशा अविवेकी विचाराच्या प्रभावाखाली या व्यक्ती असतात.
कुठला व्यवसाय करावा : अशा लोकांनी जिथे कर्मचारी वर्ग, ग्राहक यांचा संबंध येईल असा व्यवसाय स्वीकारू नये. जिथे एकट्याने व्यवसाय होईल असा व्यवसाय स्वीकारावा.
समूहाबद्दलचे अविवेकी विचार
व्यक्तींच्या समूहाची एक कामाची प्रणाली असलीच पाहिजे (उदा. सरकारी यंत्रणा) नाही तर मला आयुष्यात विकासाची काहीच संधी नाही. असे लोक निराश होतात.
कुठला व्यवसाय करावा : अशा लोकांनी दुसर्याच्या व्यवसायासाठी सल्लागार म्हणून काम करावे. कारण जिथे लोकांचा समूह असतो अशा लोकांसाठी प्रणाली बनवायचे हे काम करतात.
काही ठरावीक लोकांना वरील गोष्टी कळतात. बर्याच लोकांना या गोष्टी कळूनसुद्धा विकास होत नाही. यावर खालील प्रकारचे संशोधन झाले आहे.
वरील संशोधनात चार व्यक्तिमत्त्वांचा विचार झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीला शिकण्याची (बुद्धिमत्ता) एक नैसर्गिक गुणवत्ता असते, परंतु त्याप्रमाणे कृती होत नसते. हेच सूत्र वरील संशोधनात मांडले आहे.
- नकारात्मक व्यक्तिमत्त्व : जे शिकतही नाहीत आणि कुठलीच कृतीसुद्धा करत नाहीत, सतत नन्नाच पाढा वाचत असतात, स्वत:ला, दुसर्यांना आणि समाजाला सतत दोष देत असतात.
- घाण्याचा बैल : जे शिकत असतात, पण त्याचा वापर दुसर्याचे भले करण्यासाठी करत असतात.
- मृगजळाच्या मागे धावणारा : जे शिकत असतात, पण कृती काहीच करत नसतात, फक्त स्वप्ने बघत असतात.
- अलौकिक बुद्धिमत्ता : जे शिकत असतात आणि स्वप्न बघत असतात आणि त्याप्रमाणे कृती करत असतात या व्यक्ती त्याच्या क्षेत्राच्या उंचीवर पोहचतात.
कुठल्याही व्यक्तीने उद्योग सुरू करण्यापूर्वी किंवा ज्यांचा उद्योग आहे आणि एका उंचीवर येऊन अडकला आहे, त्यांनी वरील गोष्टींचा सांगोपांग विचार करावा. मला काय प्रेरित करते, माझ्या व्यक्तिमत्त्वाशी कुठल्या नकारात्मक भावना जोडलेल्या आहेत.
वरील गोष्टींमुळे उद्योगविस्तारासाठी आणि उद्योग टिकवण्यासाठी जी निर्णयप्रक्रिया करावी लागते ती काही प्रमाणात सोपी होईल. उद्योगाशी जोडलेल्या भागीदार, कर्मचारी वर्ग, ग्राहक वगैरेंशी संबंध टिकवणे सोपे होईल. प्रत्येक व्यक्तीकडे नैसर्गिक गुणवत्ता असते, ज्याची त्याला जाणीव नसते.
– नितीन साळकर
(लेखक उद्योजकीय मानसक्षेत्रात काम करतात.)
9321897941
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.