वितरण साखळीतील ‘इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट’

वितरण साखळी कार्यक्षम होण्यासाठी या साखळीला वस्तूंचा पुरवठा हा सुरळीत म्हणजेच कोणत्याही अडथळ्याविना झाला पाहिजे. यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. यासाठी वस्तू निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल व वस्तू तयार झाल्यानंतर तिचे वितरण याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

या दोनही गोष्टी सुरळीत होण्यासाठी वाहतुकीच्या साधनांचे काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक ठरते. यासाठी वाहतुकीची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत, त्यांचा तुलनात्मक खर्च किती आहे याबरोबर वाहतुकीस लागणारा वेळ इ. सर्व बाबींचा विचार करावा लागतो.

वस्तूंचा आणि कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी त्यांची साठवण व साठवणीचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ठरते. या दृष्टीने गोदामांची रचना, साठवणीची क्षमता तसेच गोदामे नक्की कोणत्या ठिकाणी असावीत याचे नियोजन, गोदाम भाड्याने घ्यावीत की कंपनीने बांधावीत इ. अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक असते.

वितरण साखळीमध्ये वस्तूंचे संरक्षण व्हावे यासाठी लागणारे पॅकिंग व मटेरियल हॅन्डलिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा विचार करावा लागतो. म्हणून पुरवठा साखळी ही कार्यक्षमतेने चालण्यासाठी वस्तूंचा पुरवठा हा अबाधित कसा ठेवता येईल या महत्त्वाच्या विषयाचा समावेश यात होतो.

पुरवठा साखळी कार्यक्षम करण्यासाठी ज्याप्रमाणे वाहतूक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वस्तूंची व कच्च्या मालाची उपलब्धता तितकीच आवश्यक आहे.

ही उपलब्धता विनाअडथळा व्हावी म्हणून मालाची साठवण करणे आवश्यक असते, परंतु नुसतीच साठवण करून प्रश्न सुटत नाही. या साठवणीचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. यालाच इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट असे म्हटले जाते. साठवणीचे व्यवस्थापन म्हणजेच इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट.

याचे उद्देश म्हणजे, वस्तूंचा साठा एका ठरावीक मर्यादेपलीकडे जाऊ न देणे (ओव्हर स्टॉकिंग), तसेच तो ठरावीक मर्यादेपेक्षा खाली न येऊ देणे (अंडर स्टॉकिंग), साठवणीचा खर्च मर्यादित करणे, वस्तूंचे योग्य ते संरक्षण करणे आणि ज्या वेळी मागणी असेल त्या वेळी वस्तू उपलब्ध करून देणे, पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी, उत्पादित वस्तू की ज्या विक्रीस तयार आहेत, कच्चा माल आणि संस्थेला लागणाऱ्या इतर दैनंदिन वस्तू यांच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे ही मोठी जबाबदारीची बाब आहे.

यासाठी वेगवेगळी तंत्रे, उदा. (ए.बी.सी., अ‍ॅनालेसिस, साठ्याची जास्तीत जास्त संख्या (मॅक्झिमम लेव्हल) व कमीत कमी संस्था (मिनिमम लेव्हल) ठरवणे. इ. वापरावी लागतात. तसेच साठ्याचे रेकॉर्ड व्यवस्थित, बिनचूक आणि योग्य जागी ठेवणे हेसुद्धा एक महत्त्वाचे काम आहे.

रेकॉर्डवर असलेली साठ्याची संख्या व प्रत्यक्षात असलेली संख्या यांची वेळोवेळी तपासणी करून काही गैरप्रकार किंवा चुका होत नाहीत ना याचीही खबरदारी घ्यावी लागते. या दृष्टीने इन्व्हेंटरी मॅनेजमेंट महत्त्वाचे ठरते. हल्ली माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे शक्य झाले आहे. तसेच निर्णय घेण्याचा वेगही वाढला आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम कशी करता येईल, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पुरवठा साखळी ही पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक कशी होईल याचा विचार आता आपण केला पाहिजे. तसेच ज्याला आपण वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो ते कशा पद्धतीने केले जाते किंवा करता येईल याचाही विचार केला पाहिजे.

याबरोबरच स्ट्रॅटेजिक सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये सप्लाय चेन ही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने कार्यक्षम करता येईल याचाही विचार केला पाहिजे.

– नेहा पेडणेकर-क्षीरसागर
संपर्क : 9833749799

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?