Advertisement
उद्योगातील प्रकाश व ध्वनी यांचे महत्त्व
उद्योगोपयोगी

उद्योगातील प्रकाश व ध्वनी यांचे महत्त्व

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


तुम्ही कोणत्याही बाजारात थोडा वेळ डोळे मिटून उभे राहून बघा. तुम्हाला वेगवेगळ्या आवाजांचा कल्ला ऐकू येईल. अनेक वेळा तर कल्ला ऐकू आला की आपण बाजारपेठ आली, असे म्हणतो. शाळेतदेखील दंगा करणार्‍या मुलांना शिक्षक हा काही मासळी बाजार नाही असेच बजावतात आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही गेलात तर बाजारात सगळीकडे झगमगाटच झगमगाट दिसून येतो.

आता बाजारपेठा कमी झाल्या आहेत आणि त्यांची जागा मॉल्स घेत आहेत. तेथेदेखील तुम्हाला हाच अनुभव थोड्या वेगळ्या प्रकारे येतो. मॉलमध्ये सतत काही ना काही पार्श्वसंगीत वाजत असते जे ठीकठिकाणी असलेल्या ध्वनिवर्धकातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. मॉलमधील फूड कोर्टमध्ये वेगळे संगीत असते, पार्किंग लॉटमध्ये वेगळे आणि प्रत्येक दुकानात त्यांचे वेगळे संगीत असतेच असते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

मॉलमधील संगीत हे अतिशय संथ आणि खालच्या सुरातले असते. बहुधा ते भारतीय संगीत नसते. पाश्चात्त्य संगीतातही साधारणपणे पियानो किंवा गिटार यांच्या संथ सुरांवर भर असतो; परंतु तुम्ही जर फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये गेलात तर संगीताची लय बरीच जलद असते, संगीताचा ताल जलद असतो तसेच आवाजाची पातळी वरची असते आणि हे जरूर निरीक्षण करा. त्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा बीट असतो. म्हणजेच येथे ताल वाद्याची भरती झालेली असते वाद्यवृंदात.

तुम्ही जर जवळच्या उपाहारगृहात गेलात जेथे जास्तीत जास्त तरुणाईचा भरणा असतो. तर तुम्हाला लक्षात येईल की येथील संगीत अगदी टिपेला जाऊन वाजते आहे आणि तालही अतिशय वरच्या पट्टीचा आहे. काही वेळा तर हा आवाज आणि ताल इतका मोठा असतो की वरिष्ठ वयाच्या लोकांना तो अति होतो किंवा असह्य होतो.

या संगीतामागे एक उद्देश असतो, अर्थात व्यावहारिक. आपल्याला हवे असलेले ग्राहक आकृष्ट करणे, आपला माल त्यांनी घ्यावा अशी परिस्थिती निर्माण करणे आणि आपली उलाढाल वाढवणे. त्यांच्या ग्राहकावर, त्याच्या मन:स्थितीवर, त्याच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या मालावर अवलंबून सुसंवादी संगीताची व्याख्या बदलत जाते.

ख्यातनाम उद्योग निरीक्षक ग्रेनेडा हुंकी यांच्या म्हणण्याप्रमाणे –

“Attract with Light, Keep with Sound, Repeat with Performance.” 

याचा अर्थ असा की तुम्ही लोकांना तुमच्या दुकानात अथवा रेस्टॉरंटमध्ये प्रकाशाद्वारे आकर्षित करता, त्यांना तुमच्या दुकानात संगीताद्वारे थांबवता आणि तुमच्या कामगिरीतून किंवा गुणवत्तेतून त्यांना तुमच्याकडे परत येण्यास भाग पाडता किंवा जरा वेगळ्या शब्दांत प्रकाशामुळे लोक आकर्षित होतात, संगीतामुळे ते आवारात राहण्यास मदत होते आणि जर तुमच्याकडच्या अनुभवांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर ते तुमच्या दुकानात परत परत येतात.

काही व्यापारी आपल्या दुकानात गायत्री मंत्र, मृत्युन्जय मंत्र किंवा हनुमान चालीसा अशा कॅसेट लावून ठेवतात, अगदी दिवसभर. हे अतिशय चुकीचे आहे. अगदी दुहेरी पद्धतीने. हे सगळे मंत्र निरासक्ती, संन्यासी वृत्ती, वैराग्य अशा भावना जागवतात. त्यामुळे तुमच्या ग्राहकास तुमच्या मालाबद्दल किंवा वस्तूंबद्दल हवी तशी आसक्ती वाटत नाही किंवा काही तरी घ्यावेच अशी भावना निर्माण होत नाही आणि तुमचे विक्रेते जे दिवसभर तेच संगीत ऐकत असतात, तेदेखील हा गेला तर दुसरा येईल अशा विरागी वृत्तीने आणि ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ अशा प्रकारे पाट्या टाकतात. उद्योग आणि व्यापार अर्थातच मार खातो, पण लक्षात कोण घेतो. मग हे व्यापारी वास्तूला, मालाला किंवा सरकारला किंवा ग्राहकालाच दोष देऊन मोकळे होतात. ‘ठेविले अनंते’ त्यांच्यामध्येदेखील दृग्गोचर होते ना.

तुम्ही हे दृश्य अनेक वेळा पहिले असेल. बायको एखाद्या किमती वस्तूची खरेदी करत असते. शो पीस म्हणू हवे तर. खूप वेळ घालवते. तिचा नवरा बाहेर passage मध्ये असतो. त्याला ती बोलावते आणि त्याचे मत विचारते. ९९ टक्के वेळा नवरा म्हणतो, नको घेऊ, चल, खूप वेळ झाला किंवा ही गोष्ट काही खास नाही, अशी दुसरीकडे स्वस्तात मिळते, आपल्याकडे अशीच गोष्ट आहे इत्यादी इत्यादी. असे का होते याचा कधी विचार केला आहे का तुम्ही?

तुमचा ग्राहक (स्त्री किंवा पुरुष) तुमच्या प्रकाशाने आकृष्ट झाला आणि संगीताने बांधला गेला आणि त्याची वस्तू विकत घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली; परंतु वस्तू महागाची असल्याने त्याने आपल्या साथीदारास बोलावले. त्या साथीदारांवर ना होता त्या प्रकाशाचा असर ना त्या संगीताचा. तो कसा बरे हो म्हणेल? तेव्हा विक्री करताना एक तर ग्राहकास साथीदार असू देऊ नये किंवा असलाच तर त्या साथीदारास प्रथम आपलेसे करून घ्यावे.

आपला व्यापार चांगल्या पद्धतीने व्हावा असे वाटत असेल तर आपल्या उद्योगाचा शासक ग्रह कोणता ते माहीत असणे जरुरीचे असते. मॉलमध्ये सर्वसाधारणपणे असणारी काही दुकाने आणि त्यांचे शासक ग्रह याप्रमाणे.

(दुकानाची नावे सहजरीत्या कळावीत म्हणून इंग्लिशमध्ये दिली आहेत.)

  • Bakery – शुक्र
  • स्टेशनरी – गुरू
  • बुकशॉप – गुरू
  • रेस्टॉरंट – शुक्र
  • इलेक्ट्रॉनिक्स – राहू
  • इलेक्ट्रिक – मंगळ
  • फर्निचर- शनी
  • कपडे – गुरू
  • शूज – शनी
  • Salon – मंगळ
  • केमिस्ट – रवी
  • Petshop – बुध
  • ज्वेलरी – शुक्र
  • Travel agent – बुध
  • Grocery – गुरू
  • Tea / Coffee शॉप – शुक्र
  • Key maker / Repairer – केतू
  • Ice cream – चंद्र
आपल्या उद्योगाच्या शासक ग्रहानुसार आपण आपल्या दुकानाचा साजशृंगार केल्यास दुकान उत्तम चालण्यास मदत होईल.

आता आपण या विषयात थोडे खोलवर जाऊ. आपण उपाहारगृह किंवा restaurant चा उद्योग विचारात घेऊ. या उद्योगाचा साधारण शासक ग्रह आहे शुक्र; परंतु हे जरी बरोबर असले तरी त्यातील उपप्रकारावर प्रभाव असणारा प्रतिशासक ग्रह वेगळा असू शकतो. सगळीच उपाहारगृहे सारखीच नसतात तसेच सगळ्याच उपाहारगृहांमध्ये आपण फक्त भूक भागवण्यासाठी जात नाही. याचे उपप्रकार असे.

Ethnic Cuisine – जसे मालवणी, गोवन, कोल्हापुरी वगैरे. प्रतिशासक ग्रह – राहू

Fast Food – प्रतिशासक ग्रह – मंगळ. आता तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक फास्ट फूडच्या लोगोत लाल रंग का असतो.

Casual Dining : खानावळ जेथे महिन्याचे पैसे भरून नेहमीचे ग्राहक येतात. प्रतिशासक शनी

Premium Dining – यांना आता थाळी रेस्टॉरंटपण म्हणतात. प्रतिशासक रवी

Barbeque/ Sizzler Speciality – प्रतिशासक रवी

Cafe – प्रतिशासक बुध

Cafeteria / Food Court – येथे अनेक प्रकारचे खाण्याचे जिन्नस उपलब्ध असतात. पाहिजे ते घ्या. प्रतिशासक – चंद्र

Pub – जास्त लोक येथे वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रांना भेटायला येतात. प्रतिशासक बुध

Take Home priority- येथे दाखवण्यासाठी रेस्टॉरंट असते; परंतु खरा धंदा डिलिव्हरीचाच असतो – प्रतिशासक गुरू

All purpose all time – Udupi, इराणी – प्रतिशासक शनी

Food Stall- प्रतिशासक बुध

Buffet – प्रतिशासक बुध

तुमची प्रकाश योजना तसेच ध्वनी योजना ही प्रतिशासक ग्रहास अनुकूल अशी असल्यास त्या श्रेणीमध्ये आपला उद्योग चांगला चालेल.

कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण

आपण पाहिल्याप्रमाणे प्रकाश योजनेने ग्राहक दुकानात येतो आणि ध्वनी योजनेने थांबून राहतो; परंतु त्याचा अनुभव तुमच्या कर्मचार्‍यांचा असतो. तुमचे कर्मचारी हे अंतर्गत सजावटीचे सगळ्यात महत्त्वाचे अंग आहे. त्यांनी ग्राहकास दिलेल्या वागणुकीवर ग्राहकाचा अनुभव अवलंबून असतो. उदाहरणार्थ जर तुम्ही फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये (शासक शुक्र, प्रतिशासक मंगळ) जर अब्दुले गब्दुले सुखवस्तू कॅशियर (प्रतिशासक गुरू) ठेवले, तर तुमच्या मालाचा खप निश्चितच कमी होईल किंवा प्रीमियम डायनिंग रेस्टॉरंट (प्रतिशासक रवी) जर वृद्ध किंवा वरिष्ठ वयाचे वेटर ठेवले तर जास्त लोक तेथे जेवण्यास जाणार नाहीत.

याचप्रमाणे आसन व्यवस्था, सर्व्हिस time, पोशाख, लोगो, रंगसंगती, काऊंटर, स्वयंपाकघर इत्यादी गोष्टींची योजना आखताना शासक व प्रतिशासक ग्रह यांची योग्य काळजी घेणे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय जरूरीचे असते. याबद्दल पुढील भागात आपण सविस्तर विचार करू. वाचकांनी यासंदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्याला शंका मोकळेपणी विचाराव्यात. उद्योग ज्योतिषाचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त यशस्वी उद्योजक निर्माण व्हावेत, अशी मनीषा बाळगून हा लेख संपवितो.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!