बचत गट :: काळाची नवी गरज


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माणूस मोठा होतो तसेच त्याची स्वप्नेपण मोठी होतात. माणूस कितीही मोठा झाला तरीही संचयनाचा मूळ स्वभाव त्याचा कमी होत नाही किंवा जात नाही, किंबहुना हा स्वभाव वयाप्रमाणे वा हुद्द्याप्रमाणे वाढत जातो. आजच्या कमाईमधून थोडे थोडे बाजूला ठेवून संचयन करणे हा मानवधर्म आहे.

नोकरदार वर्ग आणि उद्योजक वर्ग, हे संचयन बँक, सहकारी संस्था, जागा ह्या स्वरूपात करत असतात. महिला वर्ग मुख्यत: संचयन दागदागिन्यांच्या स्वरूपात करतात. आज केलेली बचत किंवा संचयन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते आणि त्यावरच आपल्याला आपले समाजातील स्थान आणि ओळख मिळते.

संचयन आणि संघटन ह्या गुणांना एकत्र करून निर्माण झाला एक आगळावेगळा पर्व, ‘बचत गट’. भारतात स्वातंत्र्यानंतर उद्योगांना बरीच गती मिळाली आणि बरेच व्यवसाय, उद्योगधंदे आणि कारखाने उभे राहिले.

त्याचप्रमाणे भारतात काही ठिकाणी संचयन आणि सहकार ह्या गुणांवर मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या सहकारी संस्था; पण कारखानदारी आणि सहकारी संस्था ह्यांच्यासोबत भारताला गरज आहे स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योगांच्या विकासाची. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांनी आधीपासून प्राधान्य दिले स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योगांना.

‘गाव सुधारले की देश सुधारतो’ ह्या भावनेने त्यांनी उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर जास्त भर दिला होता आणि ‘खादी ग्रामोद्योग’सारखी संस्था उदयास आली. भारतातील आर्थिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन, तसेच सूक्ष्म उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने बचत गटांची निर्मिती केली.

बचत गट हे पहिले पाऊल आहे औद्योगिकीकरणाचे. गावागावांत आज बचत गट लाखोंच्या संख्येत निर्माण झाले आहेत आणि होत आहेत. बचत गट म्हणजे काय? कसे निर्माण होतो? हे खाली बघू या.

बचत गट म्हणजे काय?

बचत गट म्हणजे नक्की काय, हे बर्‍याच लोकांना माहीत नसते. एकत्रीकरणाचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे ‘बचत गट’. ‘एक से भले दो और दो से भले तीन’ किंवा ‘एक और एक ग्यारहा’ अशी बरीच हिंदी काव्यं आणि गाणी आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकली आहेत, पण वास्तवतेशी ह्या गाण्यांचा किती संबंध आहे किंवा ह्या गाण्यांचा गूढ अर्थ जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नसुद्धा नाही केला. बचत गट हाच गूढ अर्थ दर्शवितो आणि उद्योगधंद्यात अनुभव देतो.

बचत गट = संचयन + एकत्रीकरण + सामूहिक अध्ययन + एकसंध विचार + स्वप्नांसाठी घेतलेली एकत्रित झेप.

बचत गट का निर्माण होतो?

स्वप्नांना कोणतेही बंधन नसते, पण वास्तवाचा निखारा स्वप्नांच्या पंखांना जाळून टाकतो. त्यामध्येच प्रामुख्याने लोक स्वत:ची ओळख आणि स्वत: स्वत:बद्दल बघितलेली स्वप्नं विसरून जातात. इच्छा असून व्यवसाय किंवा उद्योग सुरू करू शकत नाहीत.

अपुरे भांडवल आणि क्षीण झालेल्या आत्मविश्‍वासामुळे स्वयंरोजगार किंवा सूक्ष्म उद्योगाचे स्वप्न स्वप्नांतच राहते. ‘मला व्यवसाय जमेल का?’ ‘मी घर सांभाळून व्यवसाय कसा करू?’ ‘नोकरीसोबत कोणता जोडधंदा मला योग्य?’ असे बरेच प्रश्‍न आपल्यापैकी बर्‍याच लोकांना पडतात आणि रात्री उशीसोबत झोपून जातात. ह्या सर्व प्रश्‍नांवरचे उत्तर म्हणजे बचत गट.

बचत गटात तुम्ही एकटे नसता आणि सामूहिकदृष्ट्या तुम्ही कोणताही उपक्रम करता. जर तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल तर भांडवल लागते आणि भांडवलअभावी उद्योग सुरू होत नाही, पण बचत गट हा उपक्रमच मुळात आपल्या बचत रकमेवर आहे. बचत गट निर्माण होतो बचत किंवा संचित झालेल्या रकमेवर.

बचत गट बनतो कमीत कमी दहा लोकांनी, मग ते दहा पुरुष असोत वा महिला. दहा लोक एकत्र येतात आणि एक बचत गट निर्माण करतात. बचत गटातील प्रत्येक दरमहा काही ठरावीक रक्कम बचत करतो आणि बचत गटात भविष्यातील उपक्रम किंवा व्यवसायांसाठी संचित करतो. दरमहा संचित केलेली रक्कम कितीही असू शकते.

अशा प्रकारे बचत गटाची प्राथमिक सुरुवात होते. बचत गटात बचत करण्यामागे प्रत्येक सदस्याचा वाटा हा खारीचा असतो. जर उद्योगाचा सेतू बांधायचा असेल तर प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे अनिवार्य आहे. बचत गटातील आज संचित केलेली सूक्ष्म बचत रक्कमसुद्धा उद्याच्या विकासाचे आणि उद्योगधंद्याच्या निर्मितीचे भांडवल ठरू शकते.

बचत गटांची वैशिष्ट्ये

१. सामूहिक समस्या / परिस्थिती / गरज : एका विशिष्ट भागात, प्रभागात काही समान नैसर्गिक/भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती असते किंवा निर्माण होते. त्यामुळे त्या प्रदेशात एकसारखे उद्योगधंदे निर्माण होतात. उदा. सोलापूरमध्ये चादरीचा व्यवसाय; घाटांत, जंगलात मधाचा व्यवसाय. जेव्हा एकसारखी स्थिती एखाद्या भागात असते तेव्हा त्यावर पूरक उद्योगनिर्मितीसाठी बचत गट निर्माण होतो आणि कधी कधी संपूर्ण गाव अशा प्रकल्पात सहभागी होतो.

२. देवाणघेवाण : कधी कधी गावागावांत आंतरिक आणि बाह्य गरजा भागवण्यासाठी वस्तूंची देवाणघेवाण होते आणि काही बचत गट ह्या देवाणघेवाणची कामे करतात.

३. गट सातत्यता : बचत गटांमध्ये एकता राहावी, सातत्यता कायम राहावी, एकजुटीने कामे मार्गी लागावी ह्यासाठीपण बचत गट निर्माण होतात.

४. स्वायत्तता : बचत गट ह्यांच्या माध्यमातून निर्माण होणारे उद्योग किंवा उपक्रम ह्यावर कोणा दुसर्‍याची मक्तेदारी नसते. बचत गट ह्यांची स्वायत्तता असते.

५. प्रायोगिक शिक्षण आणि जाणीव : बचत गटांच्या माध्यमातून विविध शिक्षण आणि प्रशिक्षणांचा लाभ घेता येतो.

बचत गट निर्मितीसाठी लागणारी प्राथमिक मूल्ये

वैयक्तिक जबाबदारी : बचत गट निर्माण करताना किंवा निर्माण झाल्यावर, बचत गटातील प्रत्येक सदस्याची बचत गटाविषयी समान वैयक्तिक जबाबदारी असते. प्रत्येक सदस्याने त्याच्या उपलब्धी आणि कुवतीप्रमाणे समानरीत्या जबाबदारी वाटून घ्यावी.

प्रत्येक सदस्यामध्ये काही तरी गुण किंवा हुशारी असतात, त्यांच्या मदतीने बचत गटातील समस्या सोडवता आल्या तर सर्व प्रश्‍न किंवा समस्यांचे निर्मूलन होते, अशी भावना बचत गटातील प्रत्येक व्यक्तीची/सदस्याची असावी.

परस्परांतील विश्‍वास : बचत गट निर्माण झाल्यावर काही जाणकार व्यक्ती गटाचे नेतृत्व करतात, अशा वेळी बाकीच्या सदस्यांचा आपसांत विश्‍वास असावा. संपूर्ण बचत गट ही संकल्पना विश्‍वासावर उभी आहे. परस्पर विश्‍वास आणि प्रामाणिकपणा बचत गटाला वेगाने प्रगतिशील करतो. अप्रामाणिकपणा आणि विश्‍वासघात हा बचत गटाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

दुसर्‍याविषयी काळजी : दुसर्‍याविषयी काळजी हा परस्परांविषयीच्या अतूट नात्याचा आणि संबंधाचा संकेत आहे. दुसर्‍याविषयी काळजी बचत गटात विश्‍वास निर्माण करते आणि गटाला अभेद्य बनवते.

परस्परांविषयी असलेला आदर : परस्परांविषयी असलेला आदर बचत गटात समतोल आणि सामंजस्य निर्माण करते. गटातील सदस्य एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि प्रयत्नांचा आदर करू लागतात. त्यामुळे विविध कल्पनांना आणि विचारांना वाव मिळतो तसेच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण होते.

बचत गटातील गुण

  • 10 ते 12 लोक एकत्र येऊन सुरू केलेली संस्था/उचललेले पाऊल/चळवळ.
  • सहकारी तत्त्वावर आधारित आणि ‘एकमेकांस साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ह्या विचारसरणीची संस्था.
  • महिला सक्षमीकरणामागचे महत्त्वाचे पाऊल.
  • ग्रामीण भागांतील महिला आत्मविश्‍वास आणि आर्थिक स्थैर्य देण्यामागील चळवळ.
  • सामाजिक समतोल आणि एकात्मतेस पोषक.
  • स्वप्नांना उंच भरारी देण्याचे माध्यम.
  • बचत गटातील उणिवा
  • सदस्यांतील पदासाठी होणारे वाद
  • सदस्यांमधील परस्पर अप्रामाणिकपणा आणि अविश्‍वास
  • राजकीय फायद्यासाठी होणारा वापर
  • माहितीच्या अभावे शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा न मिळणे
  • आर्थिक संस्थांचे असहकाराचे धोरण
  • बचत गटासाठी लागणार्‍या प्राथमिक गोष्टी
  • स्वत:साठी काही तरी करण्याची भावना
  • एकत्रपणे एकसंध होऊन काम करण्याचा ध्यास
  • कमीत कमी दहा लोक एकत्र येऊन बचत गट निर्माण करणे
  • मासिक शुल्क/रक्कम ठरवून घेणे आणि दर महिन्याला न चुकता बचत गटांत बचत रक्कम भरणे
  • मासिक गोष्टींचा संपूर्ण आराखडा बनवणे
  • दरमहा एकदा सर्व सदस्यांची भेट किंवा सभा ठेवणे
  • प्रत्येकाच्या प्रश्‍नांचे किंवा समस्यांचे समाधान करणे
  • भविष्यातील उद्योगधंद्याविषयीचे मार्गदर्शन आणि माहिती मिळवणे
  • बचत गटाच्या विकासाचे प्रमुख टप्पे
  • बचत गटाविषयी काळजी
  • योग्य वर्तन
  • भूतकाळातील उदाहरणांवर मिळालेले धडे
  • योग्य नेतृत्वाची निवड
  • संरक्षणात्मक भावना
  • संघर्ष
  • प्रबोधन
  • परिपक्‍वता

“स्वप्न माझे इवलेसे, दोन्ही बाहूं सामावते,
देऊन उभारी आत्मीयतेला, दहाही दिशांत कीर्ती गाजवते,

मिळून साथ एकमेकांची, झेप माझी उभारते,
उद्योगसेतू बांधताना, बचत गटाची मैत्री माझी वाढवते….!”

– डॉ. शिवांंगी झरकर
9867815253

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?