वास्तुशास्त्राचं व्यवसायातील महत्त्व


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


“मी व्यापारी आहे. एक गाळा भाड्याने घेतला आहे. आता एक गाळा मला विकत मिळतो आहे. मुख्य बाजारात आहे; परंतु त्याचा दरवाजा दक्षिणमुखी आहे. तो एका गल्‍लीच्या अगदी कोपर्‍यात आहे. त्याच्या बाजूचे आणखी दोन गाळे बंद आहेत. त्यांचा धंदा तेथे चालला नाही. मी बघतो आहे त्या गाळ्याच्या बरोबर समोर सोसायटीचे toilet आहे.

काय करावे हे कळत नाही. जागा बरीच स्वस्तात उपलब्ध होत आहे, घरापासून जवळ आहे; पण ज्याला ज्याला भेटलो तो म्हणतो, जागा घेऊ नको. माझी मनःस्थिती त्यामुळे द्विधा आहे. माझे असले-नसलेले पैसे गोळा करून, कर्ज घेऊन मी जागा घेणार, मग काही प्रॉब्लेम झाल्यास काय करायचं?”

तिढा मोठा होता मी त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला. त्यानंतर त्याच्या जागेवर गेलो. वास्तुपरीक्षणात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गोष्टी ज्या जातकाच्या नजरेतून सुटतात त्या उद्योग ज्योतिषाला लगेच दिसून आल्याने निदान सुलभ होते.

त्याने दाखवलेला गाळा एका इमारतीच्या अगदी आतील बाजूला होता. ती इमारत मंडईची होती. बिल्डरने कुठल्या तरी योजनेअंतर्गत बांधून शासनास हस्तांतरण केलेली, त्यामुळे गाळे लॉटरी पद्धतीने विकले गेले होते. बरेच गाळे चालू झालेले होते. बांधकामाचा दर्जा यथातथाच होता.

या माणसाने दाखवलेला गाळा एका बोळकांडीच्या शेवटी होता. त्याच्यासमोरच त्या इमारतीचे common toilet होते. त्याच्या बाजूचे दोन गाळे बंद होते. रस्त्याजवळचा एक गाळा चालू होता. त्यातला व्यापारी भाजीपाला विकत होता. गाळा दक्षिणमुखी होता व त्याच्या इतर दिशा पूर्व, उत्तर आणि पश्‍चिम या पूर्णपणे बंद होत्या.

अगदी खिडक्यादेखील नव्हत्या. बाहेर येऊन निरीक्षण केल्यावर लक्षात आले की, या इमारतीच्या चारही बाजूला मोठ्या मोठ्या अनेक मजली इमारती होत्या, ज्यांनी ही इमारत पूर्णपणे वेढली गेली होती.

इतर बाबी जसे प्लॉटचा आकार, जमिनीचा उतार वगैरेदेखील वास्तुशास्त्रानुसार पूरक नव्हत्या. “आपण आता तुझ्या आत्ताच्या दुकानावर जाऊ या.” त्याच्या दुकानावर आल्यावर कळले की, त्याचा व्यापार हा सगळा second hand वस्तूंचा आहे. जुने, भंगार, टाकाऊ जे जे काही तुम्हाआम्हाला नको ते याला हवे. अगदी रदीपासून लोखंडापर्यंत आणि पाण्याच्या पाइप्सपासून मोटारसायकलपर्यंत.

हा गाळा पूर्वाभिमुख होता. उत्तर दिशा मोकळी होती. गाळा अगदी वर्दळीच्या रस्त्यावर होता. म्हणजे general वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आधीच्या गाळ्यापेक्षा बराच उजवा होता.

मी त्याला त्याच्या धंद्याची कार्यपद्धती विचारली. तो म्हणाला, लोक जाता-येता माझ्या दुकानावर वस्तू देऊन जातात. मी घासाघीस करून किंमत ठरवतो व त्यांना देतो. तशीच वस्तू घेणारे गिर्‍हाईकदेखील माझ्याकडे येऊन त्यांना पाहिजे त्या वस्तू घेऊन जातात.

त्याला मी सांगितले, “तू निश्‍चिंतपणे आणि निश्‍चितपणे बाजारातील गाळा विकत घे. त्यात तुला फायदाच फायदा आहे.”

“पण मग वास्तूचं काय?”

“त्या दुकानाची वास्तू तुझ्या धंद्यासाठी उत्तमच आहे. अशी जागा तुला शोधूनही सापडणार नाही. वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रात matching ला फार महत्त्व आहे. सर्वसाधारण वास्तू सर्वसाधारण शुभ, अशुभ इत्यादी सांगते, परंतु उद्योगवास्तू specific matching करते. तुझा धंदा हा dumping चा आहे आणि पूर्णपणे purchase वर अवलंबून आहे, sales वर नाही. ही इमारत हेच एक dumping आहे. दिशा, दशा आणि स्थलनिर्देशासकट, त्यामुळे तुझा व्यवसाय तेथे उत्तम चालेल”.

या गोष्टीस आज 8 वर्षे होत आली आहेत. या व्यापार्‍याने तो गाळा विकत घेतला. त्याचा व्यापार तेथे एवढा फळफळला की, त्याने कर्ज पूर्णपणे मुदतीआधीच फेडले. त्याउपर त्याने गावी घर बांधले आणि शेजारचे दोन्ही गाळे त्याने विकत घेतले आहेत. आता दुकानातही दोन नोकर असून एकंदर व्यवसायात व्यवस्थित बस्तान बसले आहे.

उद्योग ज्योतिषाची प्रक्रिया मुळात matching ची आहे. Those who can adapt can survive. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती’. लव्हाळ्याने महापुराशी जुळवून घेतल्याने ते जगले. तोच व्यापार, धंदा, व्यवसाय जगतो जो आजूबाजूच्या परिस्थितीला पूरक असतो किंवा आजूबाजूची परिस्थिती त्या व्यवसायाला पूरक असते.

येथेच बघा ना, मोठ्या इमारतींनी वेढलेली छोटी इमारत, दक्षिणमुखी आणि उलटा उतार, यामुळे जागा सर्वसाधारण वास्तुशास्त्रानुसार टाकाऊ ठरली; परंतु जातकाचा धंदाच टाकाऊ गोष्टींचा असल्यामुळे त्याला ती इष्टापत्तीच ठरली. अर्थात त्याच्या पत्रिकेतील ग्रहमान व दशा पूरक असल्यामुळे त्याला परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेता आला. यालाच म्हणतात टाकाऊपासून टिकाऊ.

– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : 9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?