व्यवसाय शिक्षणाकडे वळणे आवश्यक

जसे प्रत्येक नागरिकाने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेच पाहिजे, असा आपला आग्रह आहे तसेच प्रत्येक नागरिकाला आपण कुठला व्यवसाय करावा वा कुठल्या क्षेत्रात नोकरी करावी, आपले उपजीविकेचे साधन काय असावे, आपल्याला कुठला विषय, कुठलं क्षेत्र आवडते, कुठल्या विषयाचा ध्यास आपल्याला आयुष्यभर पुढे नेणार आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत केली पाहिजे.

किंबहुना आपल्या शिक्षणाच्या रचनेतच अशी निवड करता यावी म्हणून पुरेसा अवकाश दिला पाहिजे. ‘प्राथमिक’च्या पहिल्या आठ वर्षांच्या टप्प्यानंतरचा पुढच्या चार वर्षांचा टप्पा यासाठी असावा असे वाटते.

या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांची आवड शोधणे, त्यांचा कल ओळखणे इ. बाबींसाठी जाणीवपूर्व प्रयत्न करून त्या त्या क्षेत्रातला कार्यानुभव देण्याची सोय असायला हवी. व्यवसाय शिक्षणाकडे या नजरेतून पाहण्याची आवश्यकता आहे.

दहावी पूर्ण करण्याआधीच साधारण २५ टक्के विद्यार्थी शाळेच्या प्रवाहाबाहेर पडतात हे आपण पाहिले. हे विद्यार्थी मजूरीच्या कामाला लागतात किंवा कुठल्या तरी व्यावसायिकासोबत मदतनीस म्हणून काम करतात.

काम करता करता ते काही तरी कौशल्य मिळवतात; त्यात ते तरबेजही होत असतील, पण अनौपचारिकरित्या हे कौशल्य मिळवल्यामुळे त्यांच्यावरचा शाळा सोडल्याचा शिक्का तसाच राहतो. परिणामी त्यांना त्यांच्या कौशल्याचा परतावा पाडून घ्यावा लागतो.

दहावी-बारावी पूर्ण केल्यावरही बहुतांश विद्यार्थी पुढचे शिक्षण चालू ठेवण्याऐवजी छोटी-मोठी नोकरी करणे पसंत करतात. आज महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍यांचे प्रमाण साधारण २० टक्के आहे. यावरून बारावीच्या पुढे शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण फारच कमी आहे, हे आपल्याला लक्षात येते.

एका बाजूला ही परिस्थिती आहे, तर दुसर्‍या बाजूला हवे तसे कामगार मिळत नाहीत अशी उद्योगक्षेत्राची ओरड आहे. उद्योगांना कामगारांना स्वत: प्रशिक्षित करावे लागते, त्यासाठी ज्यादा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.

तरुणांना त्यांच्या योग्य व आवडीचे उत्तम प्रशिक्षण मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना हवे तसे कामगार-व्यवस्थापक मिळत नाहीत हे बेरोजगारीचे हे एक मोठे कारण आहे. उद्योग-व्यवसायांना हवे ते कौशल्य असलेले, हव्या त्या संख्येने व हवे तेव्हा लागणारे मनुष्यबळ निर्माण करता आले तर मागणी-पुरवठ्याचे हे गणित बसेल आणि त्यातून रोजगारनिर्मिती होईल.

आज हे गणित महाराष्ट्रात तरी बिघडलेले दिसते. स्थानिक पातळीवर पुरवठा होऊ शकला नाही तर बाहेरून हे मनुष्यबळ आणावे लागते आणि स्थलांतराला प्रोत्साहन मिळते. स्थानिकांना हवे असलेले काम मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, हा तिढा अतिशय नियोजित पद्धतीने आपण सोडवला पाहिजे.

vocational education in india

असे का होते?

व्यवसाय शिक्षणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि मूळातच सध्या मिळत असलेल्या व्यवसाय शिक्षणाची गुणवत्ता अशा दुहेरी संकटात आपण अडकलो आहोत. कमी गुण मिळाले तरच विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाकडे वळतात. पदवी न घेता केवळ व्यवसाय शिक्षण घेतले तर त्यात पुढच्या संधी कमी आहेत.

पदवी घेतल्यावर अधिक उज्ज्वल भविष्य असते. एखादा छंद जोपासायचा असेल तरच व्यवसाय शिक्षण घ्यावे. पैसा कमवण्यासाठी मात्र भक्कम पदवीचा आधार पाहिजे, इ. अनेक गैरसमज रूढ झालेले आपण पाहतो. एकूणच व्यवसाय शिक्षण कमी प्रतिष्ठेचे मानतो.

वास्तविक पाहता पदवी घेऊन बेरोजगार राहिलेल्यांची संख्यासुद्धा बरीच आहे हे आपण लक्षात घेत नाही. व्यवसाय प्रशिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही अनेकांना आज माहिती नसते. त्यामुळे हे पर्याय तपासलेच जात नाहीत. व्यवसाय शिक्षण उत्कृष्ट दर्जाचे आहे याबद्दल खात्री वाटत नाही.

ते केल्यावर पुरेसे कौशल्य मिळवता येते याची शाश्वती नसते आणि त्यातून अर्थार्जन होईल याबद्दल साशंकता असते. ही व अशी अनेक कारणे आहेत. यामुळे आपण बेरोजगारी कमी करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग दुर्लक्षित ठेवत आहोत.

आज आपल्याकडे उद्योजक बनण्यापेक्षा नोकरी करणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे असाही एक समज आहे. खरे म्हणजे उद्योजकता कुठल्याही समाजाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असते. त्यातूनच प्रयोगशीलता वाढते, नवनवीन शोध लागतात. व्यवसाय शिक्षणाचा एक भाग उद्योजकतेला प्रोत्साहन देतो. या पर्यायाकडे आपण गांभीर्याने पहायला हवे.

काय करायला हवे?

प्राथमिक शिक्षण पूर्ण करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने पदवीपर्यंत वा पुढचे शिक्षण घेणे हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाची दिशा शोधायला आणि तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवायला मदत करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट जर चांगला नागरिक, व्यक्ती घडवणे हे आहे, तर तिथून पुढच्या टप्प्याचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे ध्येय शोधायला आणि मिळवायला मदत करणे हे असायला हवे.

व्यवसाय शिक्षणाबद्दलचे गैरसमजही दूर करायला हवेत. व्यवसाय शिक्षण घेता घेता काम आणि काम करता करता व्यवसाय शिक्षण अशी सांगड घातली तरच उत्तम दर्ज्याचे व्यवसाय शिक्षण आपण देऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. नोकरी करणे किंवा स्वत: उद्योजक बनणे या दोन्हींना प्रोत्साहन द्यायला हवे.

फिनलँड, नॉर्वे, फ्राँस, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्विझर्लंड या देशांनी व्यवसाय शिक्षणाचा पर्याय सर्मथपणे उभा करून आपल्या देशातली बेरोजगारी कमी करण्यात यश मिळवले आहे. या देशांनी पदव्युत्तर शिक्षण व व्यवसाय शिक्षणाला समान महत्त्व दिले, प्रोत्साहन दिले.

व्यवसाय शिक्षण व उच्च शिक्षणाची सांगड घातली. केव्हाही आवडेल त्या विषयाचा अभ्यास करता येईल ही मुभा दिली. बाजारात कुठल्या प्रकारच्या नोकर्‍यांची गरज आहे हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्याची क्षमता ठेवली. पालक-विद्यार्थ्यांच्या बैठका घेऊन व्यवसाय शिक्षणाचा पर्याय त्यांच्यापर्यंत पोचवला.

आपल्या राज्य आणि केंद्र सरकारनेही व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व ओळखून पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने आपल्या अकराव्या तथा बाराव्या पंचवार्षिक योजनेत कौशल्य विकास कार्यक्रमावर भर दिला आहे. तसेच केंद्राने २००९ साली आपले धोरण जाहीर करून व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.

२०११ साली महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या व्यवसाय शिक्षण समितीने आपला अहवाल सादर केला. समितीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळेतून गळलेले, शाळेतून बाहेर पडून मदतनीस म्हणून काम करणारे, व्यवसाय शिक्षणाकडे वळणारे तसेच कुशल तथा अकुशल कामगार म्हणून काम करत असलेले, पण औपचारिक प्रशिक्षण नसलेले अशा सर्वांना व्यवसाय शिक्षणाचा लाभ मिळवून देणे कसे आवश्यक आहे हे अधोरेखित केले आहे.

प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, म्हणजे आठवीनंतर, ज्यांना पुढे शिकायचे नाही त्यांना व्यवसाय शिक्षणाकडे वळण्याचा पर्याय असायला हवा. व्यवसाय शिक्षणातही पदवी / पदव्युत्तर वा पी.एच.डी. पातळीवरचे उच्चशिक्षण घेता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करावी किंवा विद्यापीठांतून व्यवसाय शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करायला हवा.

व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यावर पुन्हा शैक्षणिक अभ्यासक्रमाकडे वळता येईल; तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमातून व्यवसाय प्रशिक्षणाकडे जाता येईल, अशी सोय असायला हवी.

– श्रावण गुरव
9322567546
(लेखक उद्योजक असून उद्योजकता विकास कार्यक्रम राबवतात.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?