‘महिला उद्योजकता’ देशाच्या विकासाची गरज


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आज आपण आहोत २०१८ मध्ये. स्त्री-पुरुष समानतेविषयी आज आपण सजगतेने आपली मत मांडतो, परंतु काही अपवाद वगळता आजही सद्यपरिस्थिती म्हणावी तशी बदललेली दिसत नाही. विविध क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत.

नवनवीन क्षेत्रात महिलांचा टक्का वाढतोय ही सुखावह गोष्ट नक्कीच आहे. त्याचबरोबर आजही काही क्षेत्रात पुरुषी वर्चस्व मोठ्या प्रमाणात आढळते. अशी संमिश्र स्थिती आज आपल्या देशात पहायला मिळते. महिला आणि उद्योग याचा विचार केला तर आज आपल्या देशात महिलांचे उद्योगाकडे वळण्याचे प्रमाण वाढू लागलंय.

भारतात ५८ टक्के महिला या वयाच्या २० ते ३० दरम्यान उद्योग सुरू करतात. तर ७३% महिलांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ही १० लाखाहून अधिक आहे. भारतात ५७ टक्क्यांहून अधिक महिला स्वतंत्र एकटीने उद्योग उभा करतात असे आकडेवारी सांगते. असे असले तरी आजही खूप मोठ्या प्रमाणात स्त्रीयांनी उद्योगविश्वात पाऊलं ठेवायला हवीत.

जागतिक महिला उद्योगविश्वाचा विचार केला तर भारत इतर देशांच्यातुलनेत पिछाडीवर आहे. भारतात यापूर्वी महिला उद्योजकतेला योग्य ती चालना मिळाली नाही. त्याचमुळे आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही निवडक महिला उद्योगविश्वात स्वत:चा ठसा उमटवू शकल्या आहेत.

ही परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर आहे. जर महाराष्ट्रापुरता सिमीत विचार करायचा झाला तर त्यापेक्षाही कमी टक्का महिला उद्योजिका महाराष्ट्राच्या उद्योगविश्र्वात पहायला मिळतात. आपल्याकडे महिला या मुख्यत्वे सेवा उद्योग, आयटी क्षेत्राशी संबंधीत उद्योग, कापड उद्योग, अन्न आणि प्रक्रिया उद्योग, अवजड उत्पादन उद्योगाशी संबंधीत उद्योग क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत.

आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात क्षमता असलेले मनुष्यबळ आहे. यातील महिलांचा टक्काही तेवढाच मोठा आहे. आपल्या देशात महिलांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला आहे आणि आजही लागतोय. परंतु आजच्या काळातील स्त्री ही शिक्षणाने सक्षम झालीय.

स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभी राहतेय. उद्योगविश्र्वात असणाऱ्या स्त्रियांचा संघर्ष अनेक पातळींवर आहे. अगदी वैयक्तीक जबाबदाऱ्यांपासून सामाजिक पाठिंब्यापर्यंत. जागतिक पातळीवर १२६ मिलियनहून अधिक महिलांनी उद्योग सुरू केलेत अथवा करतायत. केवळ भारताचा विचार केला तर ८ मिलियनहून अधिक महिला उद्योगात सक्रीय आहेत.

काही वर्षांपूर्वी महिलांचे उद्योग म्हणजे स्वयंरोजगार किंवा गृहोद्योग अशी परिस्थिती आपल्याकडे होती. घरसंसार सांभाळून जे करायला जमेल ते करणे, परंतु हळूहळू यात बदल होत गेला. मोठी झेप घ्यावी. कंपनी स्थापन करावी, एक स्वतंत्र उद्योजिका म्हणून स्वत:ला प्रस्थापित करावं यासाठी आज महिला सजग होतायत. त्याला कारणंही तशीच आहेत.

आज महिलांचा उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तिचे माहितीचे स्रोत वाढलेत. समाजातूनही महिलांच्या उद्योगांना स्वीकार्हता मिळतेय. उत्तम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचे ज्ञान आज त्यांना उपलब्ध होतंय. त्याचशिवाय वित्तीय पाठिंबा आणि उद्योग विश्र्वात वाढत असलेले आदर्श याही काही जमेच्या बाजू आज आपल्याला पहायला मिळतात.

याशिवाय महिलांकडे उपजतच काही गूण असतात. जसे की उत्तम व्यवस्थापन, संगठण कौशल्य, चोख व्यवहार इ. इ. याचा तिला तिच्या उद्योगाच्या वाढीसाठी नक्कीच फायदा होतो.

वरील कारणांचा विचार करून त्याचा फायदा घेऊन उद्योग उभ्या करणाऱ्या महिलांचा टक्का मात्र आपल्या देशात आजही कमी आहे. आपण प्रगत राष्ट्रांचा विचार केला तर स्त्रीला स्वतंत्रपणे स्वत:चे वेगळे मोठे आस्थापन उभे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

आपल्याला विशेषत: महिलांना कोणत्या कोणत्या गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जसे की, उपलब्ध साधन संपत्ती, उद्योग पोषक वातावरणाची कमतरता, मानसिक जडणघडण इ. अनेक कारणं स्त्रीयांना त्यांच्या प्रगतीसाठी मारक ठरतात. यासोबत काही महत्त्वाच्या कारणांचाही आपण विचार करू.

१) ध्येय :

जेव्हा आपले ध्येय ठरलेले असते तेव्हा त्या ध्येयाच्या मागे लागून आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्नरत असतो. परंतु जर ध्येय सुस्पष्ट नसेल तर आपले प्रयत्न योग्य दिशेने होत नाहीत. आपल्या महिलांमध्ये या गोष्टीची कमतरता सर्वात जास्त आहे.

ध्येय निश्चितीच्याबाबत स्त्रीची महत्त्वाकांक्षा नक्कीच कमी पडते. २१% महिला या अशाप्रकारची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगून काम करतात तर ५०% महिला या अल्प भांडवली गुंतवणूकीमुळे ध्येय साध्य करण्यात कमी पडतात. याचमुळे त्यांची वाढ खुंटते.

२) उद्योगातील आदर्शाची कमतरता :

प्रत्येकाच्या आयुष्याचा एखादा आदर्श असतो. मला अमूक अमूक व्यक्तीसारखं व्हायचंय, त्यासारखं यश संपादिक करायचंय, अशी आपण प्रत्येकजण स्वत:ला खूणगाठ बांधत असतो. म्हणजे काय तर तो आपला आदर्श असतो. महिला उद्योगविश्र्वात अशाप्रकारचे आदर्श व्यक्ती म्हणजे (Role Model) फार कमी आहेत. त्यामुळेही महिला उद्योजकता विकासावर परिणाम होतो. अशाप्रकारचे आदर्श उद्योग विश्र्वात निर्माण करण्याची आजच्या स्त्रीचीच जबाबदारी आहे.

३) बदलती अर्थव्यवस्था :

बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार अनेक महत्वपूर्ण बदल सतत घडत असतात. याविषयी योग्य माहिती, मार्गदर्शन मिळत नाही. आणि काही सामाजिक बंधनांमुळे स्त्रिया नवीन विचार स्वीकारायलाही कमी पडतात. उदा. आजही अनेक स्त्रिया या इंटरनेट, सोशल मिडिया आदी नवीन माध्यमांचा वापर फार कमी करतात.

४) शासकीय धोरण :

कोणत्याही उद्योगात उद्योजकीय सरकारी धोरणांची खूप मोठी भूमिका असते. विविध सरकारी धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी, महिला उद्योजकांचा विचार करून त्यानुसार त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या तुलनात्मकरित्या कमी आहेत. किंवा असलेल्या सोयीसुविधांविषयी महिलांना माहिती फार कमी असते.

भारतात बँगलोर, दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैद्राबाद अशा प्रमुख शहरांमध्ये उद्योजक महिलांचे प्रमाण आज वाढतेय ही सुखावह गोष्ट आहे. महिलांनी वरील गोष्टींचा नीट विचार करून उद्योगात उतरल्यास लवकरच उद्योग विश्वात एक नव चैतन्य उसळेल आणि मोठ्या प्रमाणात उद्योजिका उदयाला येतील.

– प्रतिभा राजपूत

 

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?