Advertisement
उद्योगसंधी

पर्यटन : एक दुर्लक्षित परीस

माझ्या वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी बोटीने (केवळ आवड म्हणून) मी सल्तनत ऑफ ओमान या देशाला भेट दिली. हे माझे पहिले परदेशगमन. त्यानंतरच्या काळात सातत्याने व्यवसाय, तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने माझे परदेशगमन सुरूच राहिले.

वास्तुविशारद म्हणून व्यवसाय करता करता जोडीने मी १९९९ मध्ये ‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा संस्थापक तसेच प्रवर्तक व सचिव या दुहेरी भूमिकेमधून माझे परदेशगमन सुरूच राहिले. मुळात या संस्थेची उद्दिष्टे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारउदीम, आंतरराष्ट्रीय संयुक्त उद्योग प्रकल्प, आयात व निर्यात यांना हिंदुस्तानातील व्यापारी व उद्योजकांसाठी चालना देणे, आपल्या लोकांना नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा मिळवून देणे, अशी असल्याने चेंबरच्या वतीने विविध देशांना भेट द्यायची संधी मला मिळाली. हल्ली मी या संस्थेच्या माध्यमातून हिंदुस्तानी व्यावसायिक/व्यापारी/उद्योजकांची शिष्टमंडळे घेऊन परदेशी जातो, तेथील स्थानिक चेंबर्सबरोबर सामंजस्य करार करतो, तेथील प्रदर्शनांना भेट देतो व तेथील व्यापारविषयक चर्चासत्रांमध्ये भाषणे देतो.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

आज वयाच्या साठाव्या वर्षी मी सुमारे ३० देशांना भेट दिली आहे. तसेच ‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ या माझ्या संस्थेची दहा देशांमध्ये संपर्क कार्यालये सुरू केली आहेत. मी आजवर पुढील देशांना भेट दिली आहे- सल्तनत ऑफ ओमान, इराण, सौदी अरेबिया, येमेन अरब रिपब्लिक, युनायटेड अरब एमिरेट्स, इजिप्त, इथिओपिया, मंगोलिया, चीन, कझाखस्तान, पोलंड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, नेदरलँड, लक्झेंबूर्ग, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच हाँगकाँगचा राजकीय ताबा युनायटेड किंग्डम्कडून चीनने घेण्याआधी हाँगकाँगला मी भेट दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व पॅलेस्टाइन या दोन देशांचा व्हिसा माझ्या पारपत्रावर नसला, तरी हे दोन्ही देश मी बघितले आहेत.

‘केवळ नमनाला घडाभर तेल’ म्हणून वरील माहिती मी व्यापकपणे दिली नसून मी भेट दिलेल्या या सर्व देशांची भौगोलिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विभिन्नता मांडण्यासाठी या सर्व देशांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. या देशांमधील धर्म वेगळे आहेत, भाषा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळी आहे, राहणीमान वेगळे आहे, राजकीय स्थिती वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, नव्हे तर या देशांमधील नागरिकांचे वंश व रंग वेगळे आहेत; मात्र या सर्व देशांना एकत्र बांधणारे एकच समान सूत्र आहे, ते म्हणजे ‘पर्यटन!’
वर नमूद केलेले बहुतेक देश, त्यांच्या देशांतील पर्यटनासाठी सुविख्यात आहेत व हे सर्व देश पर्यटनाच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न कमावीत आहेत. यातील बहुतेक देशांतील पर्यटन, शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या भक्कम पायावर, सखोल संशोधन करून शास्त्रीयरीत्या विकसित झाले आहे व केले जात आहे.

‘पर्यटन’ हा शब्दच मुळात व्यापक आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेच्या व्याख्येनुसार पर्यटन म्हणजे ‘आपण जिथे नेहमी वावर असतो, त्या ठिकाणापासून प्रवासाच्या माध्यमातून दूर जाऊन, मौजमजा, धंदा व व्यवसाय करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राहणे!’

सर्वसाधारणपणे आपण पर्यटन म्हणजे आपल्या घरापासून प्रवास करून दूर जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन मौजमजा करणे, असे समजतो; मात्र पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जरी आपण या सर्व प्रकारांमध्ये विविध कारणांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सहभागी होत असलो, तरी आपल्याला पर्यटनाच्या या विविध प्रकारांची शास्त्रीय परिभाषा माहीत नसते. आपण आयुष्यभर करीत असलेल्या पर्यटनामध्ये आनंद, दु:ख, करुणा, साफल्य आदी मानवी भावनांचा समावेश असतो.

पर्यटनाच्या आधुनिक परिभाषेमध्ये पर्यटनाच्या पुढील प्रकारांचा स्थूलमानाने समावेश आहे. यातील बहुतेक प्रकारांमध्ये आपण कधी ना कधी सहभागी झालो असतो. यातील काही प्रकारांचा आपण ढोबळपणे ऊहापोह करणार आहोत. शेतीप्रधान पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, साहस पर्यटन, निसर्ग पर्यटन, इतिहासविषयक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन, व्यवसाय व व्यापारविषयक पर्यटन आदी तसेच शैक्षणिक पर्यटन व क्रीडा पर्यटन.

आपल्यापैकी बहुतेकांचे आयुष्यातील पहिले पर्यटन आईच्या पोटात असताना होते. बाळंतपणास आईचे माहेरी जाणे व आईच्या कुशीतून वडिलांच्या घरी परत येणे. कुटुंबातील माणसे व्यवसाय/नोकरी/शिक्षण यांच्या निमित्ताने दूर गावी राहत असले, तर एकमेकांना भेटायला जाणे, सुटीत सणासुदीला, आजारपणात घरी जाणे किंवा मयतास जाणे यांचा समावेश कौटुंबिक पर्यटनात होऊ शकतो.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

देशांतर्गतही नागरिकांच्या विभिन्न संस्कृती, धर्म, चालीरीती असू शकतात तसेच मित्रदेशांच्या संस्कृतीदेखील भिन्न असतात. अशा वेळी एकमेकांच्या संस्कृतींची माहिती एकमेकांना करण्यासाठी देशातील राज्ये किंवा दोन देश आपली कलापथके इतर राज्यांमध्ये वा दुसऱ्या देशामध्ये पाठवतात. ही कलापथके आपल्या राज्यांची व देशांची संस्कृती सादर करतात. यामध्ये स्थानिक नागरिक सामील होतात. यास ‘सांस्कृतिक पर्यटन’ म्हटले जाते.

साहस पर्यटन

जगातील सर्वच माणसांना साहस करण्यासाठी सुप्त ऊर्मी असते. जीव धोक्यात घालून, इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची ईर्षा मनात कायम स्थान करीत असते. उंच कडे चढून जाणे, पर्वतांमधील जोरात वाहणाऱ्या, खळाळत्या, धबधबे असणाऱ्या नद्यांमध्ये नौकानयन करणे, डोंगरमाथ्यावरून हॅडग्लायडरने आकाशात विहार करीत जमिनीवर तरंगत येणे, डोंगरकड्यांवरील निसरड्या, निमुळत्या पाऊलवाटांवरून दुचाकीने भ्रमंती करणे वगैरे गोष्टींचा साहस पर्यटन या प्रकारात समावेश होतो. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो, कारण साहस करण्याच्या ईर्षेला दणकट शरीराची साथ आवश्यक असते.

वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी व स्वार्थासाठी मानवाने निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. तरीदेखील माणसाला निसर्गाचा सहवास आवडतोच. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दूर जाऊन उंच डोंगरांच्या कुशीत वा शुभ्र वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर निळ्याशार लाटा बघायला आपल्या सर्वांनाच आवडते. हल्ली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदूषण, वन्यप्राण्यांची होणारी हत्या ह्या ज्वलंत विषयांबाबत जागृती करण्यासाठी बऱ्याच पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. या संस्था सोबत निसर्ग व पर्यावरणतज्ज्ञांना घेऊन निसर्गाशी जवळीक साधायला सहली काढतात व समाजजागृतीचे काम करतात. या कार्यास ‘निसर्ग पर्यटन’ म्हटले जाते.

शहरी वस्त्यांमध्ये राहणार्यांना ग्रामीण जीवनाची कल्पना नसते. शेती केल्याने धान्य पिकते, गाय किंवा म्हैस दूध देते, उसापासून साखर बनतो वा गूळ बनतो, सर्व प्रकारची फळे झाडांवर येतात, या गोष्टी शहरात जन्मलेल्या लोकांनी शाळेच्या पुस्तकात वाचलेल्या असतात. एक अभिनव कल्पना म्हणून या लोकांना ग्रामीण भागात नेऊन त्यांना शेती दाखवणे, झाडावरून पिकलेले आंबे स्वत: काढायला लावणे, उसाचा गळीत हंगाम दाखवणे, त्यांना गवळीवाड्यात नेऊन दूध कसे काढले जाते, हाताने वा यंत्राने हे दाखवणे असे शेतीविषयक पर्यटन सुरू झाले आहे. या संकल्पनेचा तरी अजून व्हावा इतका प्रचार झाला नाही. शहरातील लोकांनी ग्रामीण भागातच राहणे अभिप्रेत असून, यांची गावात राहणारे शेतकरी, आपल्या घरात या पर्यटकांसाठी जास्त खोल्या बांधून सोय करणार आहेत व करत आहेत. शेतीस जोडधंदा व उत्पन्नाचे आणखी एक साधन असा सामाजिक दृष्टिकोन या पर्यटनात जोपासला आहे.

जगातील प्रत्येक देशाला आपला असा इतिहास असतो. तसेच एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यांनाही आपला इतिहास असतो आणि देशातील वा राज्यांमधील नागरिकांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असतो. या इतिहासांशी निगडित प्राचीन वास्तू, राजवाडे, किल्ले, जलदुर्ग, स्मृतिस्थळे त्या देशांमध्ये व राज्यांमध्ये भग्नावस्थेत किंवा क्वचितच चांगल्या अवस्थेत अस्तित्वात असतात. या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला व राष्ट्राभिमान दाखवायला सर्वांनाच खूप आवडत असते. ऐतिहासिक वस्तू जतन करणाऱ्या संग्रहालयांना भेट देणे, हासुद्धा एक आवडता छंद असतो. उत्खननात उघडकीस आलेली प्राचीन शहरे, तेथील घरे, स्नानगृहे, बाजारपेठा बघण्यात लोकांना रस असतो. यास ‘इतिहासविषयक पर्यटन’ म्हटले जाते.

वैद्यकीय पर्यटन

बऱ्याच वेळी छोट्या-मोठ्या गावांमध्ये, लहान-मध्यम शहरांमध्ये किंवा बऱ्याच अविकसित गरीब देशांमध्ये असाध्य रोगांवर उपचार होऊ शकत नसतात किंवा भीषण अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर अवघड शस्त्रक्रिया व अनुरूप उपचार होऊ शकत नसतात, तसेच बऱ्याच ठिकाणी गंभीर रोगांच्या साथींना तोंड द्यायला स्थानिक यंत्रणा सक्षम नसतात. अशा वेळी रुग्णांना वा जखमींना उचित वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय/स्थानिक स्वराज्य संस्था/सेवाभावी संस्था/त्या देशांची सरकारे, जिथे योग्य वैद्यकीय उपचार व आवश्यक औषधे उपलब्ध आहेत अशा शहरांत वा अशा देशांमध्ये घेऊन जातात. ह्या रुग्णांबरोबर/जखमींबरोबर त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणारे आप्तस्वकीय, नोकर, तसेच आवश्यक असल्यास त्यांचे डॉक्टर्स, असे सर्व सहभागी असतात. या पूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित इस्पितळे, डॉक्टर्स व त्यांचे मदतनीस, परिचारक यांच्याबरोबर निवासी हॉटेल्स, विमान कंपन्या, रुग्णवाहिका, भाडोत्री वाहने, औषध कंपन्या, वैद्यकीय उपचारांसाठी देणगी वा कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था यांचाही सहभाग असतो. या सर्व प्रक्रियेस ‘वैद्यकीय पर्यटन’ म्हटले जाते. या पर्यटनामध्ये आर्थिक उलाढाल खूप मोठी असते.

हिंदुस्थानमध्ये अवघड शस्त्रक्रिया व असाध्य रोगांवर उपचार वाजवी खर्चात करण्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने हिंदुस्तान सरकार या वैद्यकीय पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना देत आहे. अर्थात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत देशांमध्येच उपलब्ध असल्याने जरी खर्च खूप जास्त असला तरी आर्थिकरीत्या सबल असणारे रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी जात आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया, चीन, सिंगापूर, थायलंड, क्युबा आदी देशांना जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आज तुलनात्मकरीत्या जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय पर्यटन क्षेत्रामध्ये नजीकच्या भविष्यकाळामध्ये प्रचंड वाव आहे.

आपल्या देशाला कच्छपासून पश्चिम बंगालपर्यंतचा हजारो किलोमीटर्सचा समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच जगातील काही सर्वात लांब नद्यादेखील आपल्या देशात आहेत. या व इतर नद्यांच्या खाड्या आणि या नद्या, तसेच देशातील नैसर्गिक व मानवनिर्मित जलाशय यांवर अत्यंत मोठ्या प्रमाणावर सागर तथा जल पर्यटनास वाव आहे. तरंगते राजवाडे भासणारी आलिशान मोठी जहाजे, मध्यम व छोट्या तांत्रिक नौका, तसेच सर्व आकारांच्या वाऱ्यावर चालणाऱ्या शीडनौका, पर्यटकांना हजारो मीटर्स समुद्रात खोल घेऊन जाणाऱ्या पाणबुड्या ही जरी सागरी पर्यटनाची साधने असली तरी विंडसर्फिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर-स्किइंग, स्नॉर्केलिंग या जलक्रीडांचाही समावेश सागर/जल पर्यटनामध्ये समाविष्ट आहे. प्राणवायूची टाकी बरोबर घेऊन शेकडो मीटर्स खोल पाण्यात खाली जाऊन प्राणघातक शार्कस्, किलर व्हेल्स, स्टिंग-रेज, ईल मासे, प्रचंड देवमासे यांचे निरीक्षण करणे, खोल समुद्रातील प्रवाळांचा अभ्यास करणे, पाण्याखाली असणाऱ्या गुहांचा शोध घेणे या सर्व साहसी गोष्टी सागर/जल पर्यटनामध्ये समाविष्ट आहेत. तसेच सागरकिनाऱ्यावर सूर्यस्नान, नौकानयन स्पर्धा वगैरे या पर्यटनामध्ये समाविष्ट आहेत.

धार्मिक पर्यटन

या जगात आज अब्जावधी माणसे राहतात. अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून, अनादी काळापासून माणसाला देव ह्या संकल्पनेचे आकर्षण वाटले आहे, तसेच भयही वाटले आहे. म्हणूनच माणसाने ‘देव’ या संकल्पनेस मूर्त वा अमूर्त स्वरूपामध्ये पूजले आहे. भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार माणसाने आपले देव व आपले धर्म निर्माण केले आहेत. आजवर जगभर कित्येक धर्म जन्मास येऊन अस्तंगतही पावले आहेत; मात्र अर्वाचीन २००० वर्षांच्या इतिहासात आजमितीस या जगामध्ये हिंदू, ज्युडाइझम्, बौद्ध, ख्रिस्तीअॅनिटी, इस्लाम, झोराष्ट्रियन हे धर्म, तसेच बहाई, शीख व जैन हे नंतर वाढलेले धर्म अस्तित्वात आहेत. या धर्मांच्या अनुयायांमध्ये आपल्या धर्माचे अधिराज्य वाढविण्यासाठी व धर्मप्रसारामध्ये भीषण रक्तलांच्छित लढाया झाल्या आहेत. या धर्मांच्या अनुयायांनी आपापल्या धर्म-संकल्पनांच्या अनुषंगाने आपापली धर्मस्थळे म्हणजे मंदिरे, सायनागॉग, विहार, चर्च, मशिदी, अग्निमंदिरे, गुरुद्वार व स्थानके बांधली आहेत. धर्म चालवण्यासाठी धर्मगुरू, वर्षातील पवित्र दिवस, धार्मिक दिवस, विशिष्ट रीतिरिवाज निर्माण झाले आहेत व या सर्व गोष्टींची सांगड घालून, अनादी काळापासून किंवा या सर्व धर्मांच्या स्थापनेपासून धार्मिक पर्यटन सुरू झाले आहे. या धार्मिक पर्यटनांच्या माध्यमातून वर्षातील विशिष्ट दिवशी, त्या धर्मांच्या विशिष्ट धर्मस्थानांना भेट देण्याचा पायंडा सुरू झाला आहे. अगदी आपल्या गावची देवीची जत्रा, हज, ख्रिसमस, दिवाळी, पपेटी, ईद, गुड फ्रायडे, मंगळवारी गणपतीस जाणे या सर्व गोष्टी धार्मिक पर्यटनामध्ये मोडतात.

शिक्षण पूर्ण होताच, राहत्या गावामध्ये वा शहरात घेतलेल्या शिक्षणानुरूप नोकरी मिळणे शक्य असते असे नाही किंवा शिक्षणानुरूप धंदा/व्यवसाय सुरू करता येणे शक्य असते, असे नाही. त्यामुळे मिळालेल्या नोकरीनुसार किंवा सुरू केलेल्या कामधंद्यानुसार स्थलांतर करणे आवश्यक ठरते. तसेच नोकरीतील कामाच्या स्वरूपानुसार वा सुरू केलेल्या कामधंद्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या शहरांना वा देशांना भेटी देणे गरजेचे असते. या भेटी वैयक्तिक स्वरूपाच्या किंवा व्यापारउदीम वाढेल, तसेच व्यापार वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना भेटी दिल्या जातात. यास व्यवसाय/व्यापारविषयक पर्यटन म्हटले जाते.

आफ्रिका, मध्य आशिया (पूर्वीचा सोव्हिएत युनियनचा भाग), नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, तसेच आग्नेय आशियातील अविकसित गरीब देशांमध्ये मूलभूत शिक्षण जरी हळूहळू उपलब्ध होऊ लागले असले, तरी तेथील महाविद्यालयांचा दर्जा अजूनही हिंदुस्तानामध्ये उपलब्ध असणाऱ्या शिक्षणाच्या तोडीचा नाही. त्यामुळे या देशांतून बरेच विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी हिंदुस्तानात येतात, कारण प्रगत देशांमध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षणापेक्षा येथील शिक्षण बरेच स्वस्त आहे आणि तुलनात्मकरीत्या आपल्या शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदीच टाकाऊ नसून बऱ्यापैकी चांगला आहे. आजही जगभर इंग्रजी बोलणाऱ्या बऱ्याच गरीब देशांमध्ये शाळा व महाविद्यालयांमध्ये हिंदुस्तानी शिक्षक/प्राध्यापक अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

शैक्षणिक पर्यटन

हे जरी असले तरी पदव्युत्तर शिक्षण घेताना किंवा प्रगत संशोधनात्मक शिक्षण घेताना आवश्यक असणाऱ्याअत्याधुनिक तांत्रिक सुविधा आपल्या देशापेक्षा प्रगत देशांमध्ये सहजतेने उपलब्ध अहेत. त्यामुळे कॅनडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंग्डम, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स या पाश्चिमात्य, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर या पूर्वेकडील देशांत सर्व विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी, तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी काही प्रमाणात रशिया, युक्रेन, बेलारूस, पोलंड, चीन आदी देशांमध्ये हिंदुस्थानातून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. दर वर्षी हजारोंच्या संख्येने हिंदुस्तानमध्ये विद्यार्थी येतात, तसेच बाहेरही जातात. या प्रक्रियेस ‘शैक्षणिक पर्यटन’ असे संबोधिले जाते. या पर्यटनातही आर्थिक उलाढाल खूप मोठी आहे.

दरवर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ठरावीक कालावधीनंतर घेतल्या जातात. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, गॉल्फ, हॉकी, फुटबॉल, कबड्डी यांच्याही स्पर्धा सातत्याने भरवल्या जातात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी क्रीडापटूंना वेगवेगळ्या देशांना जायला लागते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी, प्रेक्षकही ज्या देशात या स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत, त्या देशांना भेट देतात. या प्रकारास ‘क्रीडा पर्यटन म्हटले जाते. जगभर क्रीडा प्रकारांमध्ये वैविध्य असल्याने व स्पर्धाही खूप असल्याने क्रीडा पर्यटनामध्ये आर्थिक उलाढाल चांगली असते.

पर्यटन म्हणजे मौजमजेचे पर्यटन. या पर्यटनास जगन्मान्यता आहे, या पर्यटनास तसे म्हटले तर भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वा धार्मिक मर्यादा नाहीत. असल्यास तर फक्त आर्थिक मर्यादा आहेत, कारण आपण शेवटी करून करून किती मौजमजा करणार? खिशामध्ये पैसे असेस्तोवर. आपल्या ज्या इच्छा आपण आपल्या घरात वा आपल्या संस्कृतीमध्ये वा आपल्या देशात समाजाच्या रूढींमुळे वा धर्मबंधनांमुळे पूर्ण करू शकत नाही, ती सर्व मौजमजा वा आपल्या सर्व इच्छा आपण मौजमजेच्या पर्यटनामध्ये पूर्ण करत असतो. माझ्या या म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही व जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असाल, तर आपणास माझे म्हणणे पटेल.

२०१५ वर्षी मी इथिओपियाला छोटेसे धंदेसंबंधित शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. या शिष्टमंडळात सदाशिव पेठी बामण व फक्त पैशांचाच विचार करणारा एक बनिया होता. हिंदुस्तानात असताना ही मंडळी मद्य पिणाऱ्यांवर टीका करणार, समाजातील नीतिमत्तेवर भाष्य करणार, मांसाहारावर टीका करणार, डान्स बार प्रकरणात आपल्या आबांवर स्तुतिसुमने उधळणार वगैरे वगैरे; मात्र इथिओपियात गेल्यावर काय? माझे हिंदुस्तानातील व काही पाकिस्तानातील मुसलमान परिचित. त्यांची कथाच वेगळी. हिंदुस्तानात किंवा सौदी अरेबियात असताना दिवसात पाच वेळा नमाज करणारी ही मंडळी. यातील काही मंडळी मला पॅरिस व लंडन या दोन्ही शहरांत असणाऱ्या ‘लिडो’ या ‘स्ट्रिप जॉइंट’मध्ये भेटली. अर्थातच हातामध्ये शँपेनचे प्याले. यातील काही जणांच्या मुली मला जेव्हा न्यूयॉर्कमध्ये भेटल्या, तेव्हा मी त्यांना ओळखलेच नाही. शरीरावरील सर्व घाट दाखवणाऱ्या तोकड्या कपड्यांमध्ये या मुली बिनधास्त फिरत होत्या. असो. ही उपरोक्त मंडळी, आपापल्या गावात वा देशात असतात, तेव्हा त्यांच्यावर असणारी सांस्कृतिक/सामाजिक/धार्मिक बंधने मौजमजेच्या पर्यटनामध्ये झुगारून देतात. माझ्या मते, यात चुकीचे काही नाही, कारण प्रत्येक व्यक्तीस आचार स्वातंत्र्य आहे व आनंद उपभोगायचा हक्क आहे.

मौजमजेचे पर्यटन रोचक, बहुरंगी व अष्टपैलू आहे. या पर्यटनाचा आनंद सर्व आर्थिक स्तरांवरील माणसे त्यांच्या खिशांना पटेल अशा पद्धतीने लुटू शकतात. या पर्यटनामध्ये सर्व वंशांची, धर्माची, रंगांची माणसे सामील होऊ शकतात, कारण आनंद निर्भेळ असतो. आनंदाला कसल्या चौकटी नसतात, ना कसल्या मर्यादा! आनंदाला जातीधर्म नाही. आनंदामध्ये उच्चनीचता नाही.

अथांग सागरावरील सोनसळी सूर्यास्ताचे विहंगम दृश्य, जितक्या आवडीने, पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान खोलीच्या सज्जात बसून जगातील सर्वात धनवान बघू शकतो, तितक्याच आवडीने तितकीच रसिक वृत्ती असणारा, एखादा सज्जन बापडा मध्यमवर्गीय बघू शकतो किंवा खोपटात राहणारा, काबाडकष्ट करणारा एखादा कंगाल गरीबही बघू शकतो.

Smart Udyojak Subscription

मौजमजेच्या पर्यटनामध्ये अंतर्भूत असणाऱ्या जगन्मान्य सुविधा जगातील सर्वच देशांत उघडपणे मान्य असतातच असे नाही. या सुविधा छुपेपणाने उपलब्ध असू शकतात. अत्यंत कडव्या धर्मांध, मद्यपानास अधिकृतपणे विरोध करणाऱ्या इराणमध्ये, तसेच दारूबंदीचे प्रभावी नाटक मोहनदास करमचंद गांधींचे नाव पुढे करून सादर करणाऱ्या गुजरातमध्ये सर्व प्रकारचे मद्य मुबलकपणे उपलब्ध आहे. आपल्या आबांनी बंदी घातली होती, तरी आपल्या महाराष्ट्रात राजकारण्यांच्या व पोलिसांच्याच आशीर्वादाने डान्स बार सुरू होतेच की! माणुसकीला काळिमा फासणारा वेश्या व्यवसाय जगातील बऱ्याच देशांत अधिकृतपणे सरकारी कडक नियंत्रणाखाली सुरू आहेच, नव्हे तर त्या देशांमध्ये होत असणार्या मौजमजेच्या पर्यटनाचे अविभाज्य अंग आहे. जगातील काही मोजक्या देशांमध्ये मादक द्रव्यांचे माफक सेवन अधिकृतरीत्या मान्य केले असून, तेथील मौजमजेच्या पर्यटनास त्यामुळे चालना मिळाली आहे. बहुतेक सर्वच प्रगत देशांमध्ये जुगार खेळणे पूर्णत: कायदेशीर आहे. जुगारावरील लागू असलेल्या करांचे भरभक्कम उत्पन्न त्या देशांना मिळत आहे. सात्त्विक तत्त्वे दांभिकपणे मिरवणार्या आपल्या देशात जरी आपण दारूबंदीचा गाजावाजा करत असलो, जुगार खेळण्यासाठी कॅसिनो बांधायला परवानगी नाकारीत असलो, तरी मद्यविक्री व लॉटरीच्या माध्यमातून प्रचंड कर जमा केला जातोच आहे. अंधार्या कोपर्यातील अड्ड्यावर जाऊन मटक्यावर आकडा लावणे व सरकारमान्य लॉटरीचे तिकीट घेणे, यामध्ये तात्त्विक फरक काय? मौजमजेच्या पर्यटनामध्ये नीतिमत्तेच्या रूढीबद्ध, ठाशीव चौकटीत न बसणार्या घटकांचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेने उल्लेख केलेला पर्यटनाचा आणखी एक प्रकार म्हणजे युद्धविषयक पर्यटन. धार्मिक, राजकीय अथवा आर्थिक कारणांसाठी एका सार्वभौम देशाने दुसर्या सार्वभौम देशावर सशस्त्र सैन्यानिशी केलेले आक्रमण, विजयी देशाच्या सैन्याचे पराभूत देशामध्ये मर्यादित काळासाठीचे वास्तव्य, या युद्धाशी निगडित असलेल्या इतर नागरी संस्था, विमान व इतर दळणवळण यंत्रणा, वैद्यकीय सेवा, रसद पुरवठा करणार्या यंत्रणा, युद्धात विस्थापित झालेले निरपराध नागरिक व युद्धात पकडले गेलेले युद्धबंदी, हे सर्व घटक युद्धविषयक पर्यटनात अंतर्भूत आहेत. मात्र माझ्या मते हे पर्यटनच नव्हे, कारण या पर्यटनामध्ये (?), जीवितहानी व स्थावर मालमत्तेचा विध्वंस होत असतो. या पर्यटन(?) प्रकारात मानवी जीवनास पूरक, माणसांना एकमेकांच्या जवळ आणणारे काहीच नाही!

‘पर्यटन एक दुर्लक्षित परिस’ असे या लेखाचे नाव आहे. कारण जगभरात शेकडो वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या जगाच्या अंतापर्यंत कायम अबाधित अस्तित्व ठेवणार्या या पर्यटन क्षेत्रामध्ये आजवर अवाढव्य गुंतवणूक झाली आहे व होतच राहणार आहे. अतिप्रचंड उलाढाल असणार्या या पर्यटन क्षेत्रावर कोट्यवधी माणसांचे जीवन अवलंबून आहे. या क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या पर्यटन संस्था प्रचंड उत्पन्न कमवीत आहेत; मात्र अशा या परिसस्पर्श लाभलेल्या पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्या हिंदुस्तानचा वाटा किती? आपल्या या प्राचीन संस्कृती लाभलेल्या हिंदुस्तानचे स्थान काय? ज्या देशाला शोधायला पृथ्वी प्रदक्षिणा करून संशोधक निघाले! आज आपल्याला कर्तव्यकठोर, आत्मपरीक्षणाची नितांत आवश्यकता आहे.

सर्व प्रकारांच्या पर्यटनास आवश्यक असे आपल्या हिंदुस्तानात काय नाही? आपल्या हिंदुस्तानात बर्फाच्छादित हिमालय आहे, थळ राजस्थानचे वाळवंट आहे. गंगा/जमुना/ब्रह्मपुत्रा/नर्मदा/गोदावरी/कृष्णा/कावेरी या जगातील मोठ्या नद्यांमध्ये गणना होणार्या नद्या आहेत, दक्षिण व मध्य हिंदुस्तानात विषुववृत्तीय घनदाट अरण्ये आहेत, तराई व पूर्व हिंदुस्तानात पर्वतीय अरण्ये आहेत, माणसाच्या हत्येच्या हव्यासामुळे नष्ट होत चाललेले वन्य जीवन – सिंह, वाघ, चित्ते, हत्ती, गेंडे, विविध जातींची हरणे, माकडे, अजगर, गरुड, गिधाडे वगैरे, विविध प्रकारची दुर्मीळ वनसंपत्ती, कृमी, कीटक, सरपटणारे प्राणी, तसेच हिंदुस्तानाच्या तीन बाजूंना असणार्या समुद्रांमध्ये समृद्ध जलजीवन आहे. अंदमान व निकोबार बेटांमध्ये आधुनिक मानवी सभ्यतेशी संबंध न ठेवणारे अदिवासी आहेत, लक्षद्वीप व अमीन दिवी ही पाचूंची बेटे आहेत. अतिप्राचीन सिंधू संस्कृती- कालीन लोथाल आहे, वेरुळ/अजिंठा/कार्ले/भाजे व इतर बर्याच ठिकाणी प्राचीन बौद्ध व हिंदू गुंफा व लेणी आहेत, ताजमहाल/तेजो महालय आहे, लालकिल्ले आहेत, जलदुर्ग आहेत, मुंबई/दिल्ली/चेन्नई/ कोलकाता ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची शहरे आहेत. माहिती-तंत्रज्ञानामुळे सुविख्यात झालेली बंगळुरू/पुणे/हैदराबाद ही शहरे आहेत, जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले विमानतळ आहे. जगातील एक मोठे असणारे लोहमार्गांचे जाळे आहे.

काश्मीर/हिमाचल प्रदेश/अरुणाचल प्रदेश/सिक्कीम/उत्तरांचलसारखी हिमालयीन सौंदर्य ल्यायलेली राज्ये आहेत आणि निसर्गाच्या वैविध्याने नटलेला, हजारो किलोमीटर्स लांबीचा, जगातील सर्व भागांमधील पर्यटकांना लुभावणारा अवीट नि शांत समुद्रकिनारा जो कच्छपासून सुरू होतो, तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उडिसा व पश्चिम बंगाल येथपर्यंत पोचतो, आपल्या हिंदुस्तानमध्ये आहे आणि आजवर हिंदुस्तानमध्ये ज्वालामुखी नव्हता. अंदमान निकोबार बेटांमध्ये इंडोनेशियाच्या सरहद्दीवर काही वर्षांपूर्वी आलेल्या सुनामीच्या सुमारास ज्वालामुखी जागृत झाला आहे. असो.

आपल्या हिंदुस्तानकडे काय नाही आहे? आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रासाठी आवश्यक असणारी प्रत्येक नैसर्गिक वा मानवनिर्मित गोष्ट आपल्याकडे आहे. तरी आपल्या हिंदुस्तानचे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील मानांकन चौतिसाव्या क्रमांकावर आहे व पर्यटन क्षेत्राशी निगडित आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढालीमध्ये हिंदुस्तानचा वाटा अवघा ०.३४ टक्के आहे. किती लांच्छनास्पद गोष्ट आहे ही आपल्या दृष्टीने!

२०१२ पर्यंतचा विचार केला, तर आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटना व हिंदुस्तान सरकारने सर्वेक्षणातून प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हिंदुस्तानातील पर्यटन क्षेत्राला बर्याच आघाड्यांवर सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या देशात एक अब्ज तीस कोटी लोकसंख्येचा विचार करता, आपल्या देशामध्ये निवासी हॉटेल्स संख्येने कमी आहेत व आपल्या देशात पर्यटकांसाठी सुमारे पावणेदोन लाख निवासी खोल्या कमी आहेत. ज्या खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, त्यातील पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या सोडल्या, तर त्या खोल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नाहीत किंवा निकृष्ट दर्जाच्या आहेत व त्या खोल्यांशी संबंधित सेवा व सुविधादेखील सुमार दर्जाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासात पर्यटक रोख रक्कम घेऊन फिरत नाहीत, तसेच ट्रॅव्हलर्स चेक्स नेणार्यांचे प्रमाणही घटले आहे. बहुधा पर्यटक प्लास्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्ड्स वा डेबिट कार्ड्स घेऊन फिरतात. गरज असल्यासही कार्ड्स वापरून रोख रक्कम काढतात; मात्र आपल्या देशात क्रेडिट वा डेबिट कार्ड्स वापरण्याची सुविधा मर्यादित स्वरूपातच उपलब्ध आहे व रोख रक्कम काढण्यासाठीची ‘एटीएम्स’ तर देशभर नाहीत. टेलबँकिंगच्या ह्या सुविधा सक्षमपणे मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे. पर्यटन स्थळी पोचण्यासाठी चांगले रस्ते बांधणे आवश्यक आहे. तसेच तेथे पोचण्यासाठी आरामदायी बसेस वा टॅक्सीजची संख्या वाढवण्याची गरज आहे. देशांतर्गत महामार्गावर सुयोग्य अंतरावर हॉटेल्स, खानपान व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करण्याची गरज आहे. सागर/जल पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटनास योग्य स्थळांवर योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. छोटी बंदरे, हॉटेल्स, जलद गतीच्या नौका, शिडनौका, दूरसंचार व्यवस्था, चांगल्या दर्जाची खानपान व्यवस्था पर्यटकांसाठी उपलब्ध केली पाहिजे. विमान प्रवासास वेळ कमी लागत असल्याने देशभर छोट्या विमानतळांचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे.

आकडेवारीने तुलना करायची, तर आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रामध्ये, २०११ मध्ये यू.एस. डॉलर्स १.०५ ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल झाली, तर आपल्या हिंदुस्तानात यू.एस. डॉलर्स १२१ बिलीयनची उलाढाल झाली. आपल्या पर्यटन क्षेत्राची अत्यंत दयनीय अवस्था आहे.

आपल्या हिंदुस्तानात पर्यटनवाढीला प्रचंड वाव आहे. असे नाही, की आपल्या देशवासीयांमध्ये क्षमतेची कमी आहे; परंतु ‘ठेविले अनंते, तैसेची रहावे’, ही अनिष्ट प्रवृत्ती अंगीकारल्यामुळे, आपली इच्छाशक्ती कमी झाली आहे. ती सुधारण्याची आवश्यकता आहे. आपल्या आजूबाजूच्या व इतर काही देशांकडून आपण स्फूर्ती घ्यायला काहीच हरकत नसावी. मालदीव, सिंगापूर, मॉरिशस, स्पेन, टर्की, चीन या देशांमधील पर्यटनाची माहिती मी येथे देत आहे, कारण आजमितीला हे सर्व देश पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड उत्पन्न कमवीत आहेत. स्पेन या देशाला कोसळणारी अर्थव्यवस्था सावरण्यास पर्यटन क्षेत्राने खूपच मोठा हातभार लावला आहे. टर्कीची हीच कथा आहे.

मालदीव हा देश हिंदी महासागरातला. हा देश म्हणजे एक बेटांचा पुंजका. एकंदर १२०० बेटांपैकी १९२ बेटांवर लोकवस्ती. पूर्ण देशाची लोकसंख्या अवघी एक लाख चार हजार. ही बेटे समुद्रसपाटीपासून दीड मीटर उंचीवर फक्त! माझ्या लहानपणी भूगोलात मालदिव ही हिंदुस्तानाची बेटे असे वाचले होते. १९७२ मध्ये मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. या एक लाख लोकसंख्या असणार्या देशामध्ये दरवर्षी नऊ लाख पर्यटक येतात. चोहोबाजूंनी समुद्र असल्याने हा देश सागर पर्यटनास सुयोग्य. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवने आपले हिंदुस्तान बाजूला असूनही जर्मनी या युरोपीय देशाच्या मदतीने पर्यटन क्षेत्रात मुसंडी मारली आहे. मूळ हिंदू/बौद्ध असणारा देश १२ व्या शतकात बाटून इस्लामी देश झाला; मात्र पर्यटन क्षेत्राची प्रगती साधताना, मालदीवच्या लोकांनी त्यांचा कर्मठ इस्लाम बाजूला ठेवला व देशाची प्रगती साधली.

सिंगापूर हा देश ६३ छोटी-छोटी बेटे जोडून एक मोठे शहर म्हणून वसवलेला, दक्षिण आशियामध्ये मलेशियाच्या दक्षिणेस असलेला देश. १९६५ मध्ये मलेशियापासून विभक्त होऊन स्वतंत्र झालेला. बाजूला सिंगापूरचाच भाग असलेले सिंटोसा बेट. जगामध्ये आजमितीला, सिंगापूर हे जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच सिंगापूरचे बंदर जगातील एक अत्यंत कार्यक्षम व खूप मोठी उलाढाल करणारे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. २०११ मध्ये सिंगापूरला एक कोटी बत्तीस लाख लोकांनी पर्यटक म्हणून भेट दिली. यात मलेशियातून येणार्या पर्यटकांचा समावेश नाही. २०११ मध्ये सिंगापूरने सुमारे यू,एस. डॉलर्स १९ बिलियनची उलाढाल पर्यटन क्षेत्रात केली. सिंगापूर हे बेट वजा देश मौजमजा पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन व धंदेविषयक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

मॉरिशस हा देशपण एक बेट आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्वेस हिंदी महासागरात. हा देश १९६८ मध्ये ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. साडेबारा लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशात हिंदुस्तानी वंशाचे लोक बहुसंख्य आहेत. मॉरिशसचे ६८ टक्के लोक हिंदुस्तानी वंशाचे आहेत. त्यात मूळ मराठी भाषा असणारे लोकही समाविष्ट आहेत. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची मराठी भाषा, ते अजूनही बोलतात. माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व इतर संबंधित व्यवसाय, शेती यांच्याखालोखाल मॉरिशसमध्ये पर्यटन क्षेत्र विकसित झाले आहे. २०१२ मध्ये मॉरिशसला जवळ जवळ दहा लाख पर्यटकांनी भेट दिली. मौजमजा पर्यटन, सागर पर्यटन, साहस पर्यटन व धंदेविषयक पर्यटन यांच्याद्वारे यू. एस. डॉलर्स १३० मिलियनची उलाढाल झाली.

सागरी पर्यटन

स्पेन या युरोपीय देशाचा आर्थिक कणा जागतिक आर्थिक मंदीमुळे पूर्णत: मोडला आहे. गेली चार वर्षे ‘न भूतो न भविष्यती’ अशी अवस्था स्पेनची झाली आहे. या भीषण परिस्थितीमध्ये स्पेनला पर्यटन क्षेत्राने जबरदस्त हात दिला आहे. एके काळी दक्षिण अमेरिका, मेक्सिको, पूर्व आशिया येथे स्पेनचे साम्राज्य होते. आजही जगामध्ये स्पॅनिश ही भाषा क्रमांक दोनची बोलीभाषा गणली जाते. स्पेनला राजा आहे; मात्र लोकशाहीच्या मार्गाने स्पेन जगते आहे. पावणे पाच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला २०१२ या वर्षात सव्वापाच कोटी पर्यटकांनी भेट दिली. २०१२ या वर्षात सुमारे यू.एस. डॉलर्स ८२ बिलियनची उलाढाल पर्यटन क्षेत्रात झाली. मौजमजेचे रंगेल रात्रींचे, कॅसिनोंमधील जुगारांचे पर्यटन, निसर्ग पर्यटन, सागर पर्यटन, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, इतिहासविषयक पर्यटन आदी सर्वच पर्यटनांसाठी स्पेन हा देश प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा, बर्फाच्छादित पर्वत, भूमध्य व अॅटलांटिक महासागरातील बेटे, ऐतिहासिक ठिकाणे, फुटबॉल या खेळाचे स्टेडियम या सर्वच गोष्टी स्पेनमध्ये असल्याने पर्यटक आवर्जून स्पेनला गर्दी करतात. एरवी सुंदर असणार्या देशात बैलाला खेळवून, तलवारींनी टोचून मारण्याचा ‘बुल फाइट’ हा निर्घृण खेळही खेळला जातो व स्पनेचे आकर्षण माझ्यासारख्या प्राणिमित्राला वाटत नाही.

टर्की किंवा तुर्कीय म्हणजे तुर्कस्तान हा मस्त देश युरोप व आशिया यांच्यामध्ये वसला आहे. या देशाला अतिप्राचीन काळापासून समृद्ध इतिहास आहे. मुस्तफा केमाल अतातुर्कने या देशाच्या आधुनिकतेचा पाया रचला. हा प्रख्यात सेनानी होता. अरबी वा फारसी लिपींऐवजी रोमन लिपीमध्ये टर्कीश भाषा लिहायला याने पुढाकार घेतला, नव्हे तर मुसलमान बहुसंख्य असूनही, टर्कीला धर्मनिरपेक्ष राज्यघटना याने दिली. सव्वासात कोटी लोकसंख्या असणारा हा देश औद्योगिक क्षेत्रात पुढारलेला आहे. सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे भरपूर असल्याने पर्यटन क्षेत्रात या देशाने बाजी मारली आहे. २०१२ मध्ये सुमारे साडेतीन कोटी पर्यटकांनी टर्कीला भेट दिली व पर्यटन क्षेत्राने यू.एस. डॉलर्स २२.५ बिलियनची उलाढाल केली. मौजमजेचे पर्यटन, सागर पर्यटन, पर्वतीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, साहस पर्यटन आदी पर्यटनाच्या प्रकारांसाठी टर्की लोकप्रिय आहे.

चीन हा देश आपला शत्रू असलेला मित्र देश. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. विस्तारवादी साम्यवाद अंगीकारलेला देश. या देशाची संस्कृती आपल्या हिंदुस्तानाइतकीच प्राचीन. अनादी काळापासून चीन व हिंदुस्तानचे धार्मिक व सांस्कृतिक संबंध; मात्र आधुनिक इतिहासातील राजकीय व आर्थिक क्षेत्रामध्ये आपला प्रतिस्पर्धी. या देशाने पर्यटन क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली आहे. इतिहास व आधुनिकता यांचा भव्य मिलाप चीनला पर्यटक म्हणून भेट देताना जाणवतो. या देशाने प्रचंड औद्योगिक प्रगती साधली आहे, तसेच सर्वच क्षेत्रांमध्ये जागतिक पातळीवर इतर राष्ट्रांशी स्पर्धा करीत आहे. हिंदुस्तानसारखे पर्यटन क्षेत्रातील प्रत्येक प्रकार चीनमध्ये उपलब्ध आहेत. जर्मनीच्या खालोखाल चीनने सर्व प्रकारची प्रदर्शने भरविण्यात पुढाकार घेतला आहे. २०१२मध्ये पावणेसहा कोटी पर्यटकांनी चीनला भेट दिली, तर चीनमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये यू.एस. डॉलर्स ४६ बिलियनची उलाढाल झाली. या आकड्यांमध्ये स्थानिक पर्यटकांचा समावेश नाही. जगातील एक अवर्णनीय ऐतिहासिक बांधकाम चीनमध्ये आहे, ते म्हणजे २००० मैल लांबीची तटबंदी! चीनमध्ये मौजमजेचे ‘सर्व’ प्रकार उघडपणे उपलब्ध नाहीत. जुगार खेळण्याचे कॅसिनोदेखील मोजक्याच शहरांमध्ये उपलब्ध आहेत; मात्र इतर सर्व प्रकारची पर्यटन सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने चीनमध्ये कोणत्याही प्रकारचे केलेले पर्यटन कायम लक्षात राहण्यासारखे असते. हिंदुस्तानात चिनी जेवण व चीनमध्ये स्वस्तात बनलेल्या गोष्टींनी आपली घरे कधीच काबीज केली आहेत.

आपण सर्वांनी या सहा देशांमधील पर्यटन क्षेत्रांची हिंदुस्तानातील पर्यटन क्षेत्राशी तुलना करणे आवश्यक आहे. कुठे चीनला भेट देणारे पावणेसहा कोटी पर्यटक व कुठे हिंदुस्तानाला भेट देणारे जेमतेम पासष्ट लाख पर्यटक. स्पेन व टर्कीला भेट देणार्यांची संख्या, नव्हे तर सिंगापूरला भेट देणार्या पर्यटकांची संख्यादेखील जास्त आहे. मालदीवच्या लोकसंख्येच्या दसपट पर्यटक त्या देशाला भेट देतात, तर मॉरिशसचा आकार व लोकसंख्या लक्षात घेता, तिथे जाणार्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व देशांच्या, नव्हे तर जगातील इतर बर्याच देशांच्या अर्थकारणात पर्यटन क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. जो देश पर्यटन क्षेत्रास जवळ करेल, त्या देशाची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल! म्हणूनच मी पर्यटन क्षेत्रास परिस म्हटले आहे.

मात्र हा पर्यटन क्षेत्राचा परिस, आपल्या हिंदुस्तानात उपेक्षित आहे, पूर्णत: दुर्लक्षित आहे. राज्यकर्त्यांची उदासीनता, दूरदृष्टीचा अभाव, क्षणिक स्वार्थ, भ्रष्ट नोकरशाही व आपल्याला आलेली मरगळ या सर्व गोष्टींमुळे आपल्याकडे परिस असूनही, असो, बराच पल्ला गाठायचा आहे आणि पर्यटन परिस वापरून आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे. तेव्हा चला उठा व बॅगा भरा!

– संजय भिडे
(लेखक ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे प्रवर्तक व सचिव आहेत.)
भ्रमणध्वनी : ९८२०९६४६८७


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: