स्टार्टअप

अपयशाने न डगमगता नव्याने उभा केला भारतातला पहिला युनिकॉर्न स्टार्टअप

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ज्या काळात तरुणाई प्रत्येक नवीन सिनेमाचा पहिला शो बघायचाच या कल्पनेने पछाडलेली होती, तेव्हा एक युवक आपल्या तीन मित्रांबरोबर बसून टवाळक्या न करता एसएमएस सर्च इंजिनचा विचार करत होता. तो युवक उच्चशिक्षित होता, शिवाय त्याच्या परिवारातील सदस्यांनाही शिक्षणाबद्दल आस्था होती. या युवकाने आपल्या तीन मित्रांसह ‘इनमोबी’ हा भारताचा पहिला स्टार्टअप स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

नवीन तिवारी हे भारतीय उद्योजक आहेत आणि ‘इनमोबी’चे संस्थापक आणि सीईओ आहेत. ते पेटीएम या डिजिटल पेमेंट सिस्टिमचे बोर्ड मेंबरदेखील आहेत. ते उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील डॉ. साचीनंद तिवारी कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक होते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

नवीनने सन २००० मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. तेथे त्यांची अमित गुप्ता आणि अभय सिंघल यांची भेट झाली, जे नंतर मोहित सक्सेनासह ‘इनमोबी’चे सहसंस्थापक बनले.

त्यांचा व्यावसायिक प्रवास बिझनेस ॲनालिस्ट म्हणून मॅकिन्से अँड कंपनीत सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी चार्ल्स रिव्हर व्हेंचर्स येथे असोसिएट म्हणून काम केले. २००५ पासून त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कुलमध्ये व्यवसाय प्रशासनातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले, जेथे त्यांना अपवादात्मक नेतृत्व आणि योगदानासाठी डीनचा पुरस्कार देण्यात आला. तिथे असतानाच त्यांनी इंडिया स्कुल हाऊस फंड नावाच्या यूएस आधारित ना-नफा संस्थेची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपदही भूषवले, जे ग्रामीण भारतातील शाळांना निधी पुरवते.

२००७ मध्ये जेव्हा तिवारी यांनी अभय सिंघल, अमित गुप्ता आणि मोहित सक्सेना यांच्यासोबत मुंबईतील एका अपार्टमेंटमधून त्यांचा उद्योजकीय प्रवास सुरू केला, तेव्हां त्यांना ‘बॉईज विथ पॉवर पॉइंट’ असे संबोधले जात असे. त्यांनी त्यांचा पहिला व्यवसाय ‘एमखोज’ या नावाने सुरू केला. ‘एमखोज’ हे एक एसएमएस सर्च इंजिन होते जे काही महिन्यातच अयशस्वी झाले.

मुंबई एंजल्स या फंड कंपनीकडून त्यांना फंड मिळाला, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ‘एमखोज’चा लवकरच गाशा गुंडाळावा लागला. मग त्यांनी मोबाइल जाहिरात तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मकडे वळवला आणि आपला मुक्काम टॅलेंट आणि टेक्नॉलॉजीचे केंद्र ‘भारताची सिलिकॉन व्हॅली’ बंगलोर येथे हलवला.

“आम्हांला तातडीने अधिक स्केलेबल मॉडेल तयार करावे लागणार होते”, नवीन तिवारी सांगतात. “आम्ही एसएमएस-आधारित सर्च प्लॅटफॉर्म‌कडून मोबाइल जाहिरातींकडे जाण्याचा निर्णय घेतला. इतकं करूनदेखील आम्हाला कुणीच पैसे द्यायला तयार होत नव्हतं. अनेक गुंतवणूकदारांनी नकार दिल्यानंतर आम्ही निराश झालो होतो.

२००८ च्या मध्यात तर आमच्या क्रेडिट कार्डची लिमिट संपली होती आणि चक्क उधारीवर तिकीट घेऊन आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. आम्ही आमची कल्पना क्लीनर पर्किन्स कॉफिल्ड आणि बायर्स या प्रसिद्ध फंडिंग कंपनीच्या समोर मांडली आणि ‘इनमोबी’साठी आमच्या पहिल्या फंडिंग ब्रेकथ्रूमुळे आनंदाने बाहेर पडलो.”

नवीन तिवारी, मोहित सक्सेना, अमित गुप्ता आणि अभय सिंघल यांनी २००८ मध्ये एसएमएस-आधारित सेवांपासून सुरुवात केली आणि २०११ मध्ये ‘इनमोबी’ या नावाने मोबाइल जाहिरातींमध्ये काम करणारी पहिली भारतीय युनिकॉर्न स्टार्टअप कंपनी स्थापन केली. कंपनीची जगामधील बारा देशांमध्ये २२ कार्यालये आहेत आणि सुमारे १,५०० लोक काम करतात. सॉफ्टबँक, केपीसीबी आणि शेरपालो हे त्यांचे प्रमुख गुंतवणूकदार आहेत.

कंपनीने साध्या मजकूर-आधारित जाहिरातींसह सुरुवात केली आणि इंटरस्टीशियल आणि बॅनर जाहिराती यासारख्या पारंपारिक जाहिरातींसह व्हिडिओ आणि जाहिराती यासारख्या इतर स्वरूपांचा समावेश केला आहे. कंपनी मोबाईल ॲप निर्मात्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटदेखील देते, जे त्यांच्या ॲपमध्ये ‘इनमोबी’ची जाहिरात समाविष्ट करू इच्छितात.

२०१४ मध्ये ‘इनमोबी’ने त्यांचे जाहिराती आणि परस्परसंवादी व्हिडिओ जाहिरात प्लॅटफॉर्म लाँच केले. ‘इनमोबी’ने ३०,००० पेक्षा जास्त ॲप डेव्हलपर्सशी करार केला आहे, ज्यामध्ये गेमिंग, सोशल, न्यूज, युटिलिटी, एंटरटेनमेंट यासह इतर विविध क्षेत्रांमध्ये मोबाइल जाहिरातींचा वापर करून त्यांच्या ॲप्सवर कमाई करण्यात मदत केली आहे.

“तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता. तुमची इच्छाशक्ती कमी होते. प्रत्येक पाऊल इतके कठीण होते की तुम्हाला सगळं काही सोडून द्यावसं वाटतं”, नवीन तिवारी म्हणतात. “पण आपण हार मानू नका. तुमच्या सर्व विरोधकांना न जुमानता तुम्ही नवनिर्मितीचा खडतर प्रवास सुरू ठेवा. उद्योजकाचा प्रवास असाच असतो. तुम्ही अपयशी ठरता, तुम्ही संघर्ष करता, तुम्ही मार्ग बदलता. परंतु अखेरीस तुमच्या चिकाटीचे फळ मिळते आणि तुम्ही तुमच्या पुढील ध्येयाकडे पूर्ण शक्तिनिशी जाता.”

नवीन तिवारी आणि त्यांच्या इनमोबी या कंपनीने अनेक सन्मान प्राप्त केले आहेत त्यापैकी काही :

  • ‘फ्युचर लीडर्स अवॉर्ड’ नरेंद्र मोदी, भारतीय पंतप्रधान, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • फॉर्च्युनचे ‘फॉर्टी अंडर फॉर्टी’ सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली आणि व्यवसायातील महत्त्वाचे लोक.
  • ‘पाथब्रेकर ऑफ द इयर’ पुरस्कार.
  • ‘उत्कृष्ट स्टार्टअप’ साठी फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड.
  • जगभरातील ‘हंड्रेड मोस्ट क्रिएटिव्ह पीपल’.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर द्वारे उद्योजकतेतील उत्कृष्टतेसाठी ‘विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार’.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पाथब्रेकर ऑफ द इयर’ पुरस्कार.
  • ‘बिझनेस इनसाइडर’च्या मोबाइल पॉवर लिस्टमधील ‘७वी सर्वात महत्त्वाची व्यक्ती’.

– चंद्रशेखर मराठे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!