‘इन्स्टंट लोन ॲप’ हा एक अतिभयानक सापळा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कर्ज ही जवळजवळ सर्वांचीच गरज असते, मग तो श्रीमंत असो, गरीब असो की मध्यमवर्गीय. कर्ज मिळवण्यासाठी आपण पहिला पर्याय म्हणून बँकांकडे जातो. पण काही ना काही कारणांमुळे बँकेकडून कर्ज मिळत नाही. तर काहींना बँकेचे नियम, अटी, कागदपत्रांची पूर्तता आणि या सगळ्यात जाणारा वेळ हे मान्य नसते. मग अशा परिस्थितीत लोक दुसऱ्या पर्यायांचा विचार करतात, शोध सुरू करतात.

कर्ज मिळवण्याच्या अशा सोप्या पर्यायांचा शोध घेत असलेली मंडळी आता मोठ्या प्रमाणात इन्स्टंट लोन ॲप्सच्या जाळ्यात अडकत आहेत. काही तर या दरीत इतके खोल गेलेत की त्यांना आत्महत्या करावी लागली आहे.

काय आहे का घोटाळा आणि तुम्ही यात कसे अडकता?

तुम्ही कर्जाच्या शोधात असता तेव्हा इंटरनेटवरही कर्जविषयक गोष्टी शोधू लागता. त्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया आणि विविध वेबसाइट्सवर वेगवेगळ्या ठिकाणी काही ॲप्सच्या जाहिराती दिसू लागतात. ज्यामध्ये ‘विना तारण कर्ज’, ‘झटपट कर्ज’, ‘फक्त दहा मिनिटांत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील’ वगैरे अशा जाहिराती दिसू लागतात. काहींना असे एसएमएस सुद्धा येतात. त्यामध्येसुद्धा अशीच प्रलोभन दिलेली असतात.

पैशांची गरज असलेला माणूस काहीही करू शकतो. अशा वेळी सामान्य माणूस फार काही विचार न करता या जाहिरातीवर क्लिक करून ते ॲप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करतो. ॲप इंस्टॉल करताना आपल्याकडून मीडिया, कॉन्टॅक्ट इत्यादींचा access मागितला जातो. बरेच जण काही विचार न करता हा access देतात. तिथेच आपण फसतो किंवा अडकलेलो असतो. या ॲप्स ना तुम्ही access deny केलात तर ते तुमच्या फोनमध्ये इंस्टॉलच होत नाहीत.

ॲप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डचे डिटेल्स भरायला सांगतात. सोबत तुमचा सेल्फी घेतात. बस झालं. एवढं झालं की तुमच्या समोर एक रक्कम येते की तुम्हाला इतके इतके कर्ज मंजूर झालं आहे.

₹१,००० पासून ₹३०,००० पर्यंत ही रक्कम असू शकते. पुढे प्रोसेस करायला सांगितलं जातं. पुढे तुम्हाला फक्त तुमचे बँक डिटेल्स भरले की रक्कम तुमच्या खात्यात येईल असं सांगितलं जातं.

इथपर्यंत आपल्याला काहीच अडचणीचं वाटतं नाही. कारण आपण फक्त एक ॲप इंस्टॉल करून त्यात आपले काही डिटेल्स भरलेत, बाकी पैसे वगैरे काहीही भरलेले नाहीत; असं आपल्याला वाटतं. शिवाय पुढे प्रोसेस केली तर आपल्या खात्यात पैसे येणार आणि आपली पैशांची गरज झटपट भागणार, असा विचार आपण करतो.

बँक डिटेल्स भरून पुढे प्रोसेस करायला गेलं की त्या ॲप ची processing fee, कर्जावरचं व्याज आणि इतर काही काही गोष्टी सांगून प्रत्यक्ष तुमच्या खात्यात येणारी रक्कम ही २५ ते ५० टक्क्यांनी कमी झालेली दिसते. म्हणजे समजा तुम्हाला ₹५,००० चं कर्ज मंजूर झालेल दाखवत असेल तर प्रत्यक्ष बँकेत ₹३,००० ते ₹३,५०० च येतील असं दिलेलं असतं आणि हे कर्ज परतफेड करण्याची मुदत किंवा मर्यादा दिलेली असते एक किंवा दोन आठवडे.

म्हणजे तुमच्या हातात येणार ₹३,००० ते ₹३,५०० आणि एक ते दोन आठवड्यांनी तुम्ही परतफेड करायची पूर्ण ₹५,००० ची. पठाणी किंवा चक्रवाढ व्याजापेक्षाही महाभयानक पद्धतीने व्याज आणि चार्जेस आकारले जातात.

लॉकडाउन काळात लोकांना पैशांची गरज होती. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या. अशा वेळी या ॲप्सनी भारतात आपलं बस्तान बसवलं. गरजेपोटी लोकांनी काहीही विचार न करता या ॲप्सवरून कर्ज घेतली आणि या जाळ्यात अडकले.

Recovery एजंटतर्फे अतीभयानक झळ

तुम्ही कोणत्याही कारणाने या ॲपद्वारे घेतलेले पैसे परतफेड करण्यात चुकलात तर त्यांचे recovery एजंट तुम्हाला फोन आणि मेसेज करायला सुरुवात करतात. यांच्या recovery च्या महाभयानक पद्धतीमुळे गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काहींनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ‘डिस्कवरी’ चॅनलने या आत्महत्यांवर एक डॉक्युमेंटरीही तयार केली आहे.

तुम्ही ते ॲप इंस्टॉल करताना त्याला जो कॉन्टॅक्ट आणि मीडिया चा ॲक्सेस दिला होता, त्याने ते सुरुवातीलाच तुमच्या फोनमधून सर्व फोन नंबर आणि तुमच्या मीडियामधील सर्व डाटा आपल्याकडे स्टोअर करून घेतात. तुम्ही मुदतीत कर्ज परतफेड केलं नाही तर तुम्हाला त्यांचे एजंट फोन करायला सुरुवात करतात. फोनवर अतिशय घाणेरड्या भाषेत, एकेरी उल्लेख करून अश्लील भाषेत बोलतात. एका तासात, अर्ध्या दिवसांत late payment charges सह पैसे भरले नाहीत तर अमुकामुक करू अशा धमक्या द्यायला सुरुवात करतात.

या फोनवरच्या धमक्यांना भिऊन अनेकांना घेतलेल्या दोन ते पाच हजार रुपयांच्या बदल्यात आठ-पंधरा दिवसांत आठ-दहा हजार रुपये परतफेड म्हणून भरायला लावले जातात.

काही जण या धमक्यांना भीक घालत नाहीत. यांचे फोन घेत नाहीत. नंबर ब्लॉक करतात. अशा वेळी हे recovery एजंट पुढच्या पातळीवर जातात आणि ते व्हॉट्सॲपवर तुमच्याच फोनमधील तुमचे फोटो तुम्हाला पाठवून हे सोशल मीडियावर viral करू, तुमच्या कॉन्टॅक्टना पाठवू अशा धमक्या तुम्हाला देतात. काही वेळा आरबीआयच्या नावाने तुम्हाला खोट्या नोटिसाही व्हॉट्सॲपवर पाठवतात.

त्यानंतर ते तुमच्यासह तुमच्या कॉन्टॅक्टनाही फोन आणि व्हॉट्सॲप वर मेसेज करायला सुरुवात करतात. अतिशय घाणेरड्या भाषेत हे मेसेज केले जातात. या त्यांच्या धमक्यांना बळी पडून अनेकांनी घेतलेल्या रकमेच्या कित्येकपट रक्कम भरली आहे. काहींना हा अपमान, नालस्ती सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या आत्महत्याही केल्या आहेत.

जर कोणी या सापळ्यात अडकलं असेल, तर काय करायचं?

यावर उपाय एकच आहे की तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या परिचितांपैकी असे कोणाच्याही बाबतीत घडले तर लाज लज्जा याचा बाऊ करत न बसता प्रथम स्थानिक पोलीस स्टेशन गाठा आणि सायबर पोलिसांकडे झालेल्या गुन्ह्याची तक्रार नोंदवा.

तुम्ही घेतलेलं कर्ज आणि त्यावरील योग्य ते व्याज परतफेड करण्यासाठी तुम्ही बांधील आहात, पण ते घटनेच्या आणि रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांत. ग्राहकाकडून किती टक्क्यांनी व्याजदर आकारावे आणि कर्जाची परतफेड कशी करावी याचे रिझर्व्ह बँकेने सर्व वित्तसंस्थां नियम दिलेले आहेत. त्यांना त्या नियमांत राहूनच काम करावे लागेल.

झटपट कर्ज देणारी ही fraud इन्स्टंट ॲप्स असे कोणतेही नियम पाळत नाही. मुळात यांच्यापैकी अनेक ॲप्स अवैध असतात. या लेखात यापैकी कोणत्याही ॲपचे नाव घेतलेले नाही, कारण यांची नावं बदलत असतात. पोलिसांनी कारवाई केली की एक ॲप बंद होऊन दुसऱ्या नावाने ॲप येते.

हल्ली अनेक बँकासुद्धा ऑनलाइन कर्जाची प्रोसेस करून झटपट कर्ज देतात. पण बँकेचे अधिकृत ॲप आणि अवाच्यासव्वा व्याज आकारणारे हे fraud ॲप्स यांच्यात तुम्हाला खूप फरक आहे आणि तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. अशा इन्स्टंट ॲपच्या जाळ्यात कोणी अडकलं असेल आणि अधिक सल्ला हवा असेल तर फोन किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता.

– शैलेश राजपूत

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?