इस्लामिक बँकिंग उद्योजकतेचे वेगळे मॉडेल

जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये गावातले बहुतेक छोटे उद्योग आणि उद्योजक भुईसपाट झाले. त्यापूर्वी इंग्रजांच्या काळातच बारा बलुतेदार नष्ट झाले होते. चिनी स्वस्त मालाच्या पुढे येथल्या लघुउद्योगांचा पाड लागेना. अशा वेळेला ज्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अगोदरचा किंवा व्यवहार व्यापारातला पैसा आहे ती माणसे हल्ली शेअर बाजारात किंवा बँकांमध्ये किंवा अशाच मार्गाने लाभ किंवा व्याज मिळण्याच्या प्रयत्नात असतात, मात्र यामुळे एक तर घरात ऐषआरामाची संस्कृती निर्माण होते.

एवढेच नव्हे तर आपल्या भांडवलाचा स्वत: उत्पादक वा उद्योजकीय वापर नाकारण्याच्या प्रवृत्तीमुळे ही सर्व माणसे दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडत आहेत. रिकामा वेळ मिळाल्यामुळे त्यांच्या मनात सैतान वावरत असतो. बाप व्याजावर जगतोच म्हणून मुलेसुद्धा असेच आरामदायक जीवन स्वीकारतात. आरामदायक जीवन स्वत:बरोबर शारीरिक, मानसिक अध‡:पात घेऊन येतात.

एके काळी इंदोर, हैदराबाद, जयपूर, चंदिगड, कानपूर, दिल्ली, कलकत्ता वगैरे शहरे स्वत:च्या उद्योजकीय झळाळीने प्रसिद्ध होती. सुरत म्हणा, मीरत म्हणा, चेन्नई म्हणा, कोल्हापूर म्हणा, इचलकंरजी म्हणा, भिवंडी म्हणा, यांना औद्योगिक पार्श्वभूमी होती. सोलापूरच्या चादरी, इचलकरंजीच्या साड्या, हुपरीचे दागिने, मुंबईच्या कापड गिरण्या.. जाऊ द्या, झाले गेले ते दिवस.

आता सर्वत्र चालू असेल तर ते म्हणजे पठाणी व्याजाने चालणारी पैशाची देवघेव आणि अर्थातच आर्थिक तदनुषंकगिक गुन्हेगारी. इस्लामला व्याज मान्य नाही. त्यांनी बिनव्याजी भांडवलाची संकल्पना राबवली आहे. ही संकल्पना या क्षणीसुद्धा अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये यशस्वीपणे राबवली जात आहे. एवढेच नव्हे तर प्रगत पाश्चात्त्य देशांतल्या बँका कोसळल्यापासून तेथे इस्लामिक बँकिंगचा गांभीर्याने अभ्यास चालू आहे.

गेल्या काही वर्षांत आर्थिक क्षेत्रात आपण दोन टोके पाहिली. वैभवाच्या शिखरावर असणार्‍या अमेरिकेतल्या बँका बुडाल्या, तर दरिद्री बांगलादेशमध्ये भिकारणींना कर्जपुरवठा करणार्‍या महमद युनीस यांच्या बांगला बँकेत कर्जवसुली विश्वास बसणे अवघड आहे इतकी म्हणजे ९८ टक्के आहे.

आम जनतेला इस्लामविषयी फारशी माहिती नसते. तशात अतिरेक्यांनी तालिबानी पद्धतीने बुरखा वगैरे बाबतीत काळाच्या मागे अनेक शतके वाटचाल केली. इस्लामिक बँकिंग हा प्रकार काय आहे हे नीटपणे समजून घेण्यासाठी मूलभूत विचार करण्याची गरज आहे. इस्लामिक बँकिंग ही खरोखर उद्योजकतेच्या प्रगल्भतेवर आधारित संकल्पना आहे. ही प्रगल्भता उद्योगाच्या यशापयशाची वाटणी करण्यास समर्थ आहे.

आजच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाले तर ही संकल्पना इक्‍विटी म्हणजे मालकीच्या जबाबदार्‍या आणि हक्क यामधील भागीदारीवर अवलंबून आहे. आपली जनता ऐतखाऊपणे व्याजावर जगण्यापेक्षा त्याच जनतेने उद्योजकतेवर भर द्यावा या विचारांना प्रोत्साहन देणारी आहे. युरोप-अमेरिकेतील गेल्या १०-१५ वर्षांतील कंपन्या आणि बँकांमध्ये जे गडबड-घोटाळे घडले आहेत ते पाहता इस्लामिक बँकिंगचे द्रष्टेपण सहज दिसून येते.

आपल्याकडेही एन्‍रॉन, सत्यम असे घोटाळे झाले आहेतच. पतसंस्था, सहकारी बँका यातील घोटाळे वेळोवेळी समोर आले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांतील घोटाळे बाहेर पडले नसले तरी तेथे जो अनागोंदी कारभार चालू आहे त्याची किंमत राष्ट्राला आज ना उद्या चुकवावी ही लागणारच.

हा कर्माचा सिद्धांत आहे. कर्म केले फळ मिळणारच. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल. वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. मोठमोठ्या उद्योगांची बुडीत कर्जे माफ करणे किंवा जुनी कर्जे कागदावर नवीन करणे आपल्या कायद्यात बसेल;पण ईश्‍वराच्या कायद्यात बसणार नाही.

इस्लाम धर्मीयांना पवित्र अशा कुराणामध्ये व्याजाची कमाई ही हरामची कमाई मानलेली आहे. समस्त मानवजातीने सतत कार्यरत राहावे, एकमेकांच्या सुखदु:खात जाणीवपूर्वक सहभागी व्हावे, ज्या उद्योगात आपण पैसा गुंतवतोय त्या उद्योगाची जवळून देखरेख करावी, मालकीत सहभागी व्हावे आणि दीर्घकाळ जबाबदारी स्वीकारावी, या उदात्त उद्देशांसाठी त्यांनी व्याज निषिद्ध मानले.

पाश्चात्त्यांची कॉर्पोरेट ही संज्ञा मर्यादीत जबाबदारी म्हणजे ‘लिमिटेड लाएबिलिटी’ मानणारी संकल्पना. ही संकल्पना अपुरी आहे. भोपाळमध्ये गॅसगळती झाल्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणे योग्य नव्हे. मर्यादित लाएबिलिटीज ही संकल्पनाच क्रूर आहे. माणसाला माणूस म्हणून ही संकल्पना मान्यता देत नाही. ही संकल्पना मेलेला माणूस इंडियन आहे, अमेरिकेत नाही म्हणून तुटपुंजी भरपाई देते.

या संकल्पनेची सुरुवात कॉर्पोरेट संकल्पनेला सुरुवात झाली तेव्हा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सुरू झाली. इंग्लंड, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स वगैरे देशांतले साहसी दर्यावर्दी भारत शोधायला निघाले. त्यांना अमेरिकरा खंड सापडले. या नवीन सापडलेल्या खंडाची लूट करण्याला ‘एंटरप्राइज’ असे नाव दिले गेले.

उदा. लंडनसारख्या ठिकाणचे श्रीमंत एकत्र आले. त्यांनी शेअर भांडवल एकत्र करून सागरी सफरीचा खर्च उभारला आणि लाभावर डोळा ठेवला. जर फायदा झाला तर यांचा. प्रवासात जहाज बुडले तर नुकसान जेवढे शेअरमध्ये पैसे गुंतवले तेवढेच मर्यादित. प्रवासात खलाशी मेले तर त्याचे यांना सोयरसुतक नाही.

आज आपण हीच मर्यादित जबाबदारी अणुप्रकल्पांसाठी योजत आहोत. ऑस्ट्रेलियात युरेनियमाच्या खाणी आहेत. ते जगाला युरेनियम पुरवतात; पण तेथे एकही अणुप्रकल्प नाही. जर्मनीत आठ प्रकल्प आहेत. ग्रीन पीसच्या चळवळीने ते प्रकल्प ठरावीक कालावधीत बंद करण्याचा निर्णय राबवला जात आहे.

काही प्रकल्प बंद केलेले आहेत; नव्हे असे बंद केलेले प्रकल्प बंद केलेले प्रकल्प भारतासारखे अज्ञानी गिर्‍हाईक धावले तर फुकटसुद्धा देतील, कारण त्यांना धोक्याची जाणीव आहे आणि हो, ज्या अमेरिकेची आपण गेली अनेक वर्षे अणुआरती करत होते तेथे गेल्या वीस वर्षांत एकही प्रकल्प का उभा राहिला नाही? जाऊ द्या झाले.

लिमिटेड लाएबिलिटी ही संकल्पनाच खरे तर मुळापासून चूक आहे. माणुसकीला काळिमा आहे. ही पाश्चात्त्य संकल्पना भारतीय संस्कृतीतसुद्धा बसू शकत नाही. आपल्या B.I.F.R. च्या केसेस पहा म्हणजे श्रीमंत उद्योगपती श्रीमंत कसे झाले ते दिसून येईल.

हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनंतर आता सरकार जागे झाले आहे. खासगी सावकारांवर नियंत्रण आणत आहे. मात्र शेतकर्‍यांसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी विशेषत: ज्यांच्याकडे तारण द्यायला काही नाही अशा शेवटच्या शेतकर्‍यांना त्यांच्याकडे न्याय नाही.

हे सरकार कर्ज देते. कोणाला?

ज्यांच्यापासून बँका दूर आहेत, जेथे ते बसचा प्रवास करून बँकिंग अवरमध्ये पोचू शकणार नाहीत, त्यांचे अजून बँकेत खातेच नाही, त्यांनी तुमच्या योजनांचे कागद काय चाटून आनंद करायचा? गावोगावी पतसंस्था चालू झाल्या आहेत का? त्यांचा धंदा कोणता? त्या पठाणांचा धंदा करतात.

इस्लामिक बँकिंगचा सरळ सरळ अर्थ म्हणजे कर्ज हे व्याजानेच दिलेले नसून बँक भागीदार आहे. नफा- तोट्यात भागीदार आहे. अशा वेळेला चुकून तोटा झालाच तर बँकेतले तज्ज्ञ अधिकारी धंदा सुरळीत करून देऊ शकतात. बँकेचे अन्य सभासद, अकाऊंट होल्डर एक कम्युनिटी म्हणून ‘कर्जदारांच्या’ उत्पादितच वस्तू खरेदी करून त्याला गाळातून वर काढू शकतात. महात्मा गांधींची ‘ट्रस्टीशिप’ संकल्पना याहून काय वेगळी आहे.

बांगलादेशातील ग्रामीण बँकिंग, इजिप्तमधले कम्युनिटी बँकिंग, तुर्कस्थानातले कलेक्टिव्ह बँकिंग ही इस्लामिक बँकिंगच्या यशाची उदाहरणे आहेत. एवढेच कशाल जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी फ्लेक्झिबल (Flexible Home Loan) होम लोन घेता तेव्हा हीच संकल्पना असते.

जर भारतात आपण गोरगरिबांना, शेतकर्‍यांना, आदिवासींना, तळागाळातल्या जनतेला, इस्लामिक बँकिंगप्रमाणे बँकिंग सुविधा देऊ शकलो तरच या देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग अवतरेल. इस्लामिक बँकेत आपणास कर्ज मिळत नाही. आपणास भांडवल पुरवणारा भागीदार मिळतो.

– पद्माकर देशपांडे

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?