Advertisement
जाणीव आपल्या मनाची
उद्योगोपयोगी

जाणीव आपल्या मनाची

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्या जीवनात यश व अपयश यांना आपण सामोरे जात असतो. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य व इतर बर्‍याच आघाड्यांवर आपण नेहमी जहाजाप्रमाणे परिस्थितीचे हेलकावे खात असतो. असे अनुभव सर्वांनाच येत असतात. प्रत्येक जण आपल्या परीने याची कारणे शोधत असतो. आपल्या अपयशासाठी घरची परिस्थिती, शिक्षण, संधी, वशिला, तब्येत, पैसा, नशीब, साडेसाती अशी अनेक कारणे आपण देत असतो.

आपण आपली कारणे (सबबी) ठरवून टाकतो अणि त्यांनाच जन्मभर दोष देत बसतो; पण आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीतून मार्ग काढून लक्षणीय प्रगती केल्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. सामान्य परिस्थितीतून लता मंगेशकर, धीरुभाई अंबानी, नारायण मूर्ती, बिल गेट्स हवे तेवढे प्रचंड यश, नाव, संपत्ती मिळवतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

रिक्षावाल्याची मुलगी सी.ए.च्या परीक्षेत पहिली येते. हाताने अपंग असलेला पायाने चित्र काढतो. अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीही अशा प्रकारचे यश मिळवताना आपण बघतो. तेव्हा प्रश्न हा आहे की, अशी माणसे यशस्वी कशी झाली? काय फरक आहे त्यांच्यात व आपल्यात? वय, शिक्षण, घरची परिस्थिती, रंगरूप, जात-पात यापैकी कोणत्याही गोष्टीचा यांना काही अडथळा येत नाही. मग, ह्या व्यक्ती काय वेगळं करतात? काय वेगळं असतं त्यांच्याकडे?

उत्तर आहे, त्यांच्याकडे काहीही वेगळं नसतं!

एक गोष्ट जी सगळ्यांकडे सारखी असते ती म्हणजे आपले शरीर, मन व बुद्धी. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील, तर सर्वात महत्त्वाचे भांडवल तुमच्याकडे आहे याची खात्री बाळगा. आपण आहार, व्यायाम यांच्या वापराने शरीर मजबूत बनवतो. वाचन, श्रवण, आकलन, अनुभव या माध्यमांतून बुद्धीचा विकास करतो. या सदरात आपण बोलणार आहोत, मनाविषयी.

आपल्याला मनाची जाणीव आहे का? कोणते विचार करतो आपण? किती प्रकारचे किती विचार करतो? त्याचा काय उपयोग होतो? त्या विचारांचा काय परिणाम होतो आपल्या शरीरावर, आयुष्यावर व नातेसंबंधांवर? आपण काय खातो याचा किती विचार करतो? आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा किती प्रयत्न करतो? पण आपण कोणते विचार करतो याकडे आपले लक्ष असते का?

मनाविषयीचा गेले हजारो वर्षे अभ्यास होत आहे. आरोग्य, कला, उद्योग, क्रीडा, विद्वान अशा अनेक विषयांत मनाचा वापर करून केलेली प्रगती आपण पाहतोच आहोत. रेडिओ, टीव्ही, कॉम्प्युटर, वाहने, अवकाशयाने, औषधे, सिनेमा अशा किती शोधांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतो? त्या शास्त्रज्ञांप्रमाणे, आज आपणही हवी ती गोष्ट ठरवून करू शकतो, मिळवू शकतो.

आपण आपल्या आयुष्याचे मालक आहोत. आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. यासाठी मनाचा व्यवस्थापक म्हणून वापर केला पाहिजे. म्हणजे असे की, तुम्ही काय करायचे व काय हवे ते ठरवा. मनाला सूचना द्या व शरीर-बुद्धीकडून हवं ते करून घ्या. तक्रार करणे, दोष देणे, रागावणे, जबाबदारी टाळणे या सर्व गोष्टींचा काहीही फायदा होत नाही, हे आपल्याला जेवढे लवकर पटेल, तेवढे चांगले!

या सार्‍या विश्वात आपले मन ही एकच गोष्ट अशी आहे; की ज्यावर आपले नियंत्रण असू शकते. आपल्याबाबत घडणार्‍या घटनांवर आपले नियंत्रण नसते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचे.

एकाच परिस्थितीतून पुढे येऊन दोन माणसे वेगवेगळे यश वा अपयश मिळवतात की नाही? दोघांवर सारखीच परिस्थिती आली असता, त्या व्यक्ती त्या परिस्थितीकडे कसे बघतात, त्यांचा दृष्टिकोन काय असतो, त्यावर पुढे काय घडते हे ठरते आणि मित्रांनो, हे मनच ठरवते.

यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून इच्छित परिस्थिती निर्माण करतात, ध्येयनिश्चिती करतात व यशस्वी होतात.

बाह्य जगतात दिसणार्‍या सर्व वस्तू सर्वप्रथम मनातच निर्माण होत असतात आणि सर्वांकडे मन आहे, त्यामुळे आपणांस काहीही करणे शक्य आहे, ज्याचा विचार आपण करू शकतो व ज्यावर आपण विश्वास ठेवतो.

– सतीश रानडे

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!