आपल्या उद्योजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली?
सतरा वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सुरुवात केली. पुढे अनेक पदांवर काम केलं आणि मग स्वत:चं कार्यक्षेत्र बदललं. आयटी क्षेत्रात काम करत असल्याने देशविदेशात फिरावं लागायचं. या काळात सर्वात जास्त जेवणाचे हाल झाले. एकदा ऑस्ट्रेलियातून नवरा आणि तीन महिन्याच्या बाळासोबत विमानाने परत येत होते.
बोर्डिंग पास घेताना तेव्हा सांगाव लागायचं की आपण शाकाहारी आहोत की मांसाहारी. आम्ही त्यांना हे सांगितलं नाही की आम्ही शाकाहारी आहोत की मांसाहारी त्यामुळे तो २७ तासांचा प्रवास आमच्यासमोर फक्त मांसाहारी पदार्थ येत होते. आम्ही संपूर्ण प्रवास फक्त ब्रेड आणि बटरवर केला. त्यावेळी तिथं नवर्यासमोर विडा उचलला.
या एअर लाइन्समध्ये मी वडापाव विकून दाखवीन त्या दिवशी थांबेन. त्यानंतर घरी परतल्यावर तो विषय तिथंच थांबला. पण मनात खोलवर कुठेतरी तो लागून राहिला आणि ठरवलं आता तेच तेच करायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. ‘इन्फोसिस’मध्ये नोकरी करणं हे माझं स्वप्न होतं, पण मी ती नोकरी तेव्हा सोडली आणि स्वत:ला ‘पूर्णब्रह्म’मध्ये झोकून दिलं. ४०० स्क्वेअर फिटच्या जागेत २४ आसनी रेस्टॉरंट सुरू केलं.
‘पूर्णब्रह्म’ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
२००६ साली ‘पूर्णब्रह्म’च्या संकल्पनेच्या माध्यमातून सुरुवात झाली. सुरुवातीला मी घरातूनच कॅटरिंग वगैरे माध्यमातून हे काम करायचे; वेबसाईट, फेसबुक पेज आदी विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘पूर्णब्रह्म’ची सुरुवात अगोदर झाली; परंतु प्रत्यक्ष कंपनी स्थापना ही २०१२-१३ मध्ये झाली.
मला सहा वर्षांचा कालावधी लागला प्रत्यक्ष या संकल्पनेला साकारण्यासाठी. घर, मुलं, संसार, आयटी क्षेत्रातील नोकरी अशा अनेक आघाड्यांवर काम करत असताना मी माझ्या संकल्पनेवरही काम करत होते. त्यामुळे या सगळ्याचा मेळ साधत कशा प्रकारे उभं राहता येईल यावर सर्वात जास्त काम करावं लागलं.
जगभरात आतापर्यंत कुठे व किती फ्रँचायजी आहेत?
आमच्या उद्योगाची सुरुवात ही २४ आसनी रेस्टॉरंटपासून झाली, पण आठ महिन्यातच तिचा विस्तार हा दोनशे आसनी रेस्टॉरंटमध्ये झाला. पुढील पाच वर्षात आम्हाला ५ हजार शाखा जगभर सुरू करायच्या आहेत. बंगळुरूमध्ये सध्या चार शाखा आहेत.
याशिवाय लंडन, मेलबर्न, ब्रिझलंड, न्यू जर्सी, जर्मनी आदी देशात येत्या दोन महिन्यात करार पूर्ण होतील. हे काम अंतिम टप्प्यात आहे. तर गुजरात, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणी येत्या काही आठवड्यात करार होतील. मुंबई येथील एक शाखा नियम व अटींचे वारंवार उल्लंघन झाल्यामुळे आम्हाला बंद करावी लागली.
सद्य परिस्थितीत आम्हाला फ्रँचायजीसाठी आमच्याकडे दिवसाला १५०० हून अधिक लोकं संपर्क करत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावर आम्ही यावर काम करतोय. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. दर आठवड्याला एक शाखा सुरू होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं आम्हाला जोडले जात आहेत.
एखादं यशस्वी बिझनेस मॉडेल उभं करण्यासाठी काय काय आवश्यक असतं?
सर्वात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे भांडवल. पैशाचं सोंग कोणीच घेऊ शकत नाही. माझ्या व्यवसायात माझा सर्वात पहिला गुंतवणूकदार म्हणजे माझा नवरा होता. भांडवल उभं करायचं म्हणजे ते किती हवं यासाठी आवश्यक असेल नियोजन. आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये काय काय आवश्यक आहे ते तपासावे.
त्यानुसार आपल्याकडे शासकीय, निमशासकीय, खासगी अशा कोणकोणत्या स्कीम्स उपलब्ध आहेत ते पाहा. ‘गुगल’सारखं माहितीचं महाजाल आपल्याकडे आहे त्याचा वापर करा. सरकार आपल्याला अनेक प्रकारच्या योजना सतत देत असते. काही चालू असतात, काही बंद होतात. याची माहिती सतत घेत राहा. तुमच्या संकल्पनेवर प्रथम तुमचा विश्वास असायला हवा. तुमचा विश्वास नसेल तर लोकही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. महिलांमध्ये टिकून राहण्याची क्षमता फार कमी असते. ती आवश्यक आहे.
तुम्ही सरकारच्या ‘सीजीटीएमएसई’ या विनातारण कर्जयोजनेचा लाभ घेतला आहे, परंतु अनेक नवोदितांना ही योजना मिळवण्यास अडचणी येतात. याबद्दल तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल?
आमच्या उद्योगवाढीसाठी ‘सीजीटीएमएसई’ या योजनेअंतर्गत आम्हाला शासनाकडून भांडवल मिळालं. सद्य:स्थितीत नुकतंच हॉटेल, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी सीजीटीएमएसई ही योजना बंद करण्यात आली, परंतु सीजीटीएमएसई ही योजना बोगस नाही.
ज्यांनी ही योजना तयार केलीय त्यांची ही संकल्पना उत्कृष्ट होती. उद्योजकतेला चालना देण्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी रिझर्व्ह बँकेशी संलग्नच सीजीटीएमएसई युनिट सुरू केलं. महिलांना यात प्राधान्य आहे. त्यांनी काय केलं तर विनातारण कर्ज देत शासन त्यांची हमी घेतं. तुम्ही तुमचे प्रस्ताव मांडा.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
प्रस्ताव असा मांडा की, तो प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासारखा आणि वास्तववादी असेल. योग्य प्रेझेंटेशन, आकडेवारी आणि अंमलबजावणी हे सादर करा. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मुद्रा अशा प्रकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. त्यांचा लाभ योग्य प्रकारे स्वत:ला प्रेझेंट करून मिळवू शकता. तुमचे प्रेझेंटेशन वास्तववादी व सकस असायला हवे. तुमच्यासोबत चांगले लोक हवेत. सर्वप्रथम तुमचा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) चांगला सक्षम हवा. गुंतवणूकदार काय मागतो? तर बॅलन्स शीट.
जर अवास्तव फुगवलेली बॅलन्स शीट असेल तर त्यामुळे तुमच्या सेल्सवर परिणाम होतो. इन्कम टॅक्स वाचवू नका, तर तो भरा. सिस्टीमवर विश्वास ठेवा. योग्य सिस्टीम वापरा तरच तुम्ही सक्षम व्हाल. म्हणून उद्योजकांना एकच सांगणे आहे, बॅलन्स शीट मजबूत करा. मग लोक विश्वास ठेवतात. मीही या सर्व गोष्टींच्या अनुभवातून हे शिकले आहे.
‘पूर्णब्रह्म’च्या मार्केटिंग या अंगाविषयी थोडं सांगाल का? उद्योगात आजघडीला मार्केटिंगचे महत्त्व कशा प्रकारे आहे, असे तुम्हाला वाटते?
मार्केटिंग कशाचं करावं लागतं? तर आपल्या उत्पादनाचं, पण आपणाला आपल्या मूल्याचं, व्हॅल्यूचं कधीच मार्केटिंग करावं लागत नाही. जेव्हा उद्योजक त्यांचे व्हॅल्यूज सक्षम करतात, तेव्हा त्यांना मार्केटिंगची आवश्यकता वाटणार नाही. आज ‘पूर्णब्रह्म’ने आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या मूल्यांना जागं केलं.
मार्केटिंग करताना विचार करा. उद्योजक हे आलेल्या महसुलातून ६० टक्के मार्केटिंगवर खर्च करतात आणि उरलेल्या ४० टक्क्यांमध्ये इतर खर्च भागवतात. असे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अभ्यासायचे असतील तर परदेशी कंपन्यांचा अभ्यास करा. पेप्सी, कोका-कोला, डॉमिनोज या संस्थांना केवळ विदेशी म्हणून हिणवण्यापेक्षा यातून व्यवसाय मूल्य समजून घ्या. त्यांचे सर्व काही सिस्टमॅटिक, स्टँडर्डाइझ असतं.
आम्हीही त्यांच्यासारखं स्वत:ला घडवतोय. आपल्याकडे हॉटेल क्षेत्रात कुणीही स्टँडर्डायझेशनने काम करत नाही. यात आम्ही पहिले आहोत. अगदी ६० ग्रॅम म्हणजे ६० ग्रॅमचा वडापाव उचलला गेला पाहिजे. ४० ग्रॅमचं पुरण उचललं गेलं पाहिजे.
हे जेव्हा निश्चित झालं तेव्हा नफ्याची गणितं ठरली. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सजग असला पाहिजेत, तुम्हाला माहीत असायला हवे की, लोकांना काय हवं आहे आणि लोकांना छातीठोकपणे सांगायला हवं की, आमच्याकडे हे हे उपलब्ध आहे.
‘पूर्णब्रह्म’च्या फ्रँचायजी फक्त महिलांना दिली जाते, असे ऐकले आहे, हे खरे आहे का?
‘पूर्णब्रह्म’ची फ्रँचायझी केवळ महिलांना दिली जाते असे नाही, तर जो कुणी फ्रँचायजी घेऊ इच्छितो त्याच्यासोबत एकतरी महिला असायला हवी, अशी आमची अट आहे. याचे कारण स्त्रीकडे उपजतच काही गुण असतात, ज्यामुळे ती अन्न व अन्न प्रक्रिया व्यवसाय क्षेत्रात प्रभावीपणे उभी राहू शकते. जसं की कोणत्याही स्त्रीला, भात शिजला का? हे शिकवावं लागत नाही तर तिला ते तिच्या नजरेनेच कळते.
आपल्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एखाद्या गरोदर स्त्रिला किंवा स्तनपान करणार्या महिलेला, वयस्कर जोडप्यांना स्त्री ही अगत्याने आणि प्रेमाने खाऊ घालू शकते. तिला आपसुकच त्यांना कोणत्या वेळी काय आवश्यक आहे हे कळते. मला वाटतं बिझनेस म्हणजे केवळ बिझनेस नसतो तर त्यात भावनाही असतात. त्या जपाव्या लागतात व टिकवाव्याही लागतात. पुरुषांमध्ये एक शिस्तबद्ध व्यावसायिक असतो त्यामुळे दोन्ही गोष्टींची सांगड असावी लागते.
भारतीय महिलेचे उत्थान होण्यासाठी आपल्या समाजात आज कोणत्या बदलाची आवश्यकता वाटते?
प्रत्येक स्त्रीला अनेक आघाड्यांवर लढावं लागतं. ती अष्टभुजाधारी आहे; परंतु तिला गरज असते एका सपोर्ट सिस्टीमची. मला असं वाटतं की, महिलांना सशक्तीकरणाची गरज नाही, तर पुरुषांच्या सशक्तीकरणाची जास्त गरज आहे. आपला समाज सशक्त असायला हवाय.
माझा बालमित्र मनीष शिरसाव हा पाचवी इयत्तेपासून माझ्यासोबत आहे. तो माझा नवरा नाही, माझा सखा आहे. आजही माझ्या या व्यावसायिक प्रवासात माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो खूप चांगल्या पद्धतीने मला ओळखतो. आपल्यासारख्या स्त्रियांना दररोज अनेक कौरवांना भिडावं लागतं.
हे सत्य तोही मान्य करतो; पण त्याचं हेही मत आहे की, त्या शंभर कौरवांसारखेच भाऊ, वडील, नवरा, मित्र अशा रूपांत पाच पांडवही आहेत की तुमच्यासोबत. तुम्ही त्यांना विसरू नका. यांच्यातूनच तुमच्यासाठी तुम्ही तुमची सपोर्ट सिस्टीम उभी करा.
स्त्री ही उपजतच परिवर्तनशील व लवचीक असते. तिचे पंख कितीही छाटले तरी ती सहज पुन्हा स्वत:च्या पंखात बळ आणून उडू शकते. ही ताकद तिच्या पंखात कुठून येते? तर ते बळ तिला आपल्या आजूबाजूचा समाज देतो. माझ्यासाठी माझा समाज म्हणजे माझा मित्र मनीष आहे.
प्रत्येक पावलावर सोबत असणारा, माझा नवरा प्रणव आहे. पूर्णब्रह्मची ग्लोबल हेड म्हणून काम पहाणारी वृषाली शिरसाव ही माझ्या सखीच्या रुपात माझ्या सोबत उभी आहे. हा माझा समाज आहे. तसंच तुमचाही सक्षम समाज तुम्ही तुमच्यासाठी तयार करा.
आज आपल्या समाजातील स्त्री ही कितीही मोठ्या हुद्द्यांवर काम करत असली तरी जेव्हा काही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा अनेक जणी कोशात जातात किंवा घरी विचारून घेते, असं म्हणतात. म्हणजेच त्या स्त्रीसाठी समाज म्हणजे तिचं घर आहे. आमच्याकडे ‘पूर्णब्रह्म’च्या फ्रँचायजी घेण्यासाठी येणार्या महिला या आजही नवरा, मुलं यांवर अवलंबून असतात. तिचा हा समाज आज सशक्त व्हायला हवा.
इतर देशांतील स्त्री व भारतीय स्त्री यांच्यातील उद्योजकीय मानसिकतेत तुम्हाला काय फरक जाणवतो?
परदेशातील पुरुष हा धोका पत्करायला तयार आहे, पण त्या तुलनेत तिथली स्त्री ही धोका पत्करायला तयार नाही. याउलट भारतातील स्त्री ही धोका पत्करायला तयार आहे. ती म्हणते, करून तर पाहू. काय होईल? पडायला होईल, पण आपण किती खोल पडू याचा अभ्यास करावा.
कामाचं स्वरूप आणि त्यातील संधी यांचा विचार करून त्यांनी ही रिस्क घ्यावी. भारतीय स्त्रीमध्ये उद्योगात उतरण्याची ऊर्मी आहे; पण महाराष्ट्रीय स्त्रीमध्ये ती ऊर्मी नाही. त्यांना मागे ओढणारे हात आपल्या समाजात कमी नाहीत.
भारतात उद्योगजगतात महिलांना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं असं तुम्हाला वाटतं का?
आपला समाज हा पुरुषप्रधान समाज आहे. या समाजात महिलांचे अनेक आघाड्यांवर खच्चीकरण होतं. स्त्री तिच्या सर्व जबाबदार्या यशस्वीरीत्या पार पाडत जेव्हा वेगळं काही करू पाहते, उद्योगात उतरू पाहते तेव्हा घर, कुटुंब या आघाड्यांवर अनेक स्त्रियांना योग्य तो पाठिंबा मिळत नाही व यामुळेच स्त्री ही पुढे येण्यात कमी पडते, स्वत:ला कोशात गुंडाळून ठेवते.
या परिस्थितीवर कशी मात करता येईल?
एकमेकींमध्ये स्पर्धा करून कुरघोड्या करण्यात जास्त वेळ घालवला जातो. हे सुधारायला हवं. आपल्याला काय करायचंय याचं नीट नियोजन हवं. उदाहरण द्यायचं तर मी जेव्हा ‘पूर्णब्रह्म’ सुरू केलं, तेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टी लिहून काढल्या.
कमीत कमी दोन ते तीन वर्षे कोणाच्याही लग्न, मुंज, बारसं, मंगळागौर अशा कोणत्याही कार्यक्रमांना जाता येणार नाही, कारण ‘पूर्णब्रह्म’ला उभं करणं हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे ते पूर्ण करण्याची जबाबदारीपण माझी आहे. त्याचं ओझं समाज अथवा आपल्या कुटुंबावर टाकून चालत नाही. असा विचार, कृती ही उद्योगिनीमध्ये गरजेची आहे.
डिजिटल मार्केटिंग याबाबत आपण जागरूक आहात. इतर उद्योजिका याबाबत जागरूक आहेत का? त्यांनी या नव्या माध्यमाचा वापर उद्योग विस्तारासाठी कसा करावा असे तुम्हाला वाटते?
आपल्याकडे महिला डिजिटल मार्केटिंगविषयी अजिबात जागरूक नाहीत, पण त्यांनी जाणकारांकडून डिजिटल मार्केटिंग समजून घ्यावे. ज्यांना याविषयी कळतं त्यांनी उद्योजकांना मदत करावी. अमेरिकेसारख्या देशातसुद्धा अनेकांमध्ये डिजिटल मार्केटिंगबद्दल म्हणावी तशी जागरूकता नाही. यातील धोके समजून घ्यायला हवेत. त्यासाठी तयार असायला हवं.
आमच्याच क्षेत्रातील उदाहरण द्यायचं तर एखाद्या अॅपवरून जेव्हा आम्ही आमची सर्व्हिस विकतो, तेव्हा चुकीचे रिव्ह्यूजसुद्धा टाकले जातात. काही लोक मुद्दाम त्रास देण्यासाठी किंवा आपले प्रतिस्पर्धीसुद्धा आपल्यावर कुरघोडी करण्यासाठी चुकीचे रिव्ह्यूज देतात. अशा वेळी संयमाने वागायला हवं.
लगेच निष्कर्षावर येऊन आपल्यातच काही कमतरता आहेत असा समज करून स्वत:ला दोष द्यायला सुरुवात केली जाते. असे न करता गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायला हवं. यामध्ये अनेक जण चुका करतात. जाणिवा जाग्या ठेवा. आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते सतत अभ्यासत राहा. इथे मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत असते त्याविषयी जागरूक राहा.
महाराष्ट्रात उद्योग संस्कार कमी आहे तो पुढील पिढीला देण्याविषयी आपलं मत काय आहे? त्यासाठी काय करायला हवं?
मी माझ्या मुलीला युटूब चॅनल कसं तयार करायचं हे शिकवते. तंत्रज्ञान त्यांना शिकू द्यावं. माझ्या मुलाला आठव्या वयातच बिझनेस मॉडेल कसं करायचं हे खूप वेगळ्या पद्धतीने शिकवतेय कारण त्याला त्याची आवड आहे. आम्ही कुठेही कॉन्फरन्स, मिटिंग, इंटरव्ह्यूला गेलो तरी मुलांना त्यांची पूर्ण माहिती देतो.
कदाचित आज त्यांना ते कळत नाही, परंतु ते त्यांच्या मेंदूत टिपलं जातं. याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल. त्यामुळे मुलं पूर्वनियोजित असतात. हे त्यांच्या वर्तणुकीतून जाणवतं. आपल्या कृतीतून आपण त्यांच्यावर नकळतपणे हा संस्कार करायला हवा.
भारतात उद्योजकीय प्रशिक्षण देणार्या संस्थांची गरज वाटते का?
हो, आपल्या देशात अशाप्रकारच्या प्रशिक्षण देणार्या संस्थांची गरज आहे आणि त्या ठिकाणी या क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन असायला हवं. ‘इन्फोसिस’ ही संस्था म्हणजे माझ्यासाठी देऊळ आहे. मी इथे घडले. सुधा मुर्ती या माझ्या आदर्श आहेत.
‘इन्फोसिस’सारखी कंपनी उभी राहताना सुधा मुर्ती यांना भविष्यात इथे कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची जाणीव होती. इथे सर्व उच्चशिक्षित आणि उच्च पदस्थित लोकं काम करणार तेव्हा त्यांना या कंपनीतील वातावरणही तसंच पोषक मिळायला हवं हे त्यांनी हेरलं होतं.
आशियातील सर्वात मोठं हाऊसकिपिंग प्रशिक्षण देणारी सेंटर्स त्यांनी इथे सुरू केली. तिथं प्रशिक्षण घेऊन ते हाऊसकिपर बाहेर पडतात आणि त्यापद्धतीने सेवा देतात. अशाप्रकारे एका छताखाली चांगली सेवा देणार्या संस्था उभ्या राहायला हव्यात. आयटी क्षेत्रात दर सहा महिन्यांनी प्रशिक्षण दिलं जातं. अद्ययावत शिक्षण दिलं जातं जेणेकरून आपण काळासोबत चालत राहू. असं एकाच छताखाली प्रशिक्षण दिलं जावं.
‘पूर्णब्रह्म’ उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे त्यासोबत इतर काही सामाजिक उपक्रमात सक्रीय आहेत का?
हो. आम्ही अनेक ठिकाणी महिला उद्योजकता विकासाच्यादृष्टीने विविध ठिकाणी कार्यशाळा घेतो. अनेक ठिकाणच्या बचत गटातील महिलांना आम्ही आमच्याकडे शेफ म्हणून सोबत घेतो. महिलांना आम्ही त्यांच्यातील उपजत गुणांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. सेवानिवृत्त, वयस्कर हातात मोकळा वेळ आहे व अनुभव आहे अशा लोकांना आम्ही आमच्यासोबत घेऊन पुढे जातोय. अशा लोकांनी आम्हाला जरुर संपर्क करावा. अशा लोकांच्या आम्ही शोधातच आहोत.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.