कांदा-पोह्याचा ठेला ते सेन्सॉर बोर्ड सल्लागार असा पल्ला गाठलेला तरुण लेखक

कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही अडचणींनीच होते. जीवन एक संघर्ष आहे. माणूस जन्मापासून मरेपर्यंत संघर्षच करत राहतो. म्हणजे त्याचा जन्मही संघर्षानेच होतो. तो सहज होत नाही. बाळाच्या आईला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून माणसाचा जन्म काय तर जन्म देण्याची जी प्रोसेस आहे, ज्याला आपण संभोग म्हणतो. तो संभोगसुद्धा एक संघर्ष आहे.

सृष्टीचा निर्माणसुद्धा संघर्षाने झालाय. संघर्ष हा सृष्टीचा नियम आहे. संघर्षाला आपण अडचणी समजतो, हा आपला दोष आहे. मी त्यांना अडचणी न म्हणता संघर्ष म्हणतो. त्यामुळे संघर्ष बराच करावा लागला. माझा जन्म मुंबईत सांताक्रुझ येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी मुंबईत आमचे स्वतःचे घरसुद्धा नव्हते. आता आम्ही मालाडमध्ये एका चाळीत राहतो. हे चाळीतील घर आमचे स्वतःचे आहे.

माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं. काही अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मी दुसरीत असताना माझ्या वडिलांची बंगळुरूला बदली झाली म्हणून आम्ही बंगळुरूला राहायला गेलो. मुंबईत मी मराठी माध्यमात शिकत होतो, पण बंगळुरूला मराठी शाळा नव्हत्या म्हणून इंग्रजी शाळेत घालावं लागलं.

मला इंग्रजी काहीच येत नसल्यामुळे दोन वर्षे मागे घालण्यत आलं. म्हणजे दुसरीतून तिसरीत जाण्याऐवजी मी दुसरीतून युकेजीमध्ये (बालवर्ग) घातलं. कर्नाटकातल्या शिक्षणामुळे मी उत्तम कानडी बोलायला शिकलो. माझे सळगेच मित्र कानडी होते. सुरुवातीला त्यांच्यात मिसळताना भाषा आड आली, पण पहिलीत तर मीच वर्गाचा मॉनिटर झालो. कानडी या विषयात मला कानडी मुलांपेक्षाही चांगले गुण मिळायचे. तिसरी पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा मुंबईत आलो. त्यानंतर मात्र माझे शिक्षण इंग्रजीतूनच झाले.

अकरावीला मी मराठी भाषा निवडली म्हणूनच मराठी भाषिक मित्रांसोबत राहता आले. मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो. पण मला कलेत जास्त रस होता. मी लहानपणापासूनच कविता, निबंध वगैरे लिहायचो. मी अगदी लहानपणापासून कामं करत होतो. म्हणजे शाळेत असताना पेपर लाईन टाकली आहे. सुरुवातीला महिन्याचे दीडशे रुपये मिळायचे नंतर ते अडीजशे झाले.

रेड एफएम ज्यावेळी सुरू होणार होतं मी आम्ही चाळीतल्या मुलांनी त्याचे स्टिकर्स रिक्षा, टॅक्सीच्या मागे डकवले आहेत. अशी कामे बरीच केली. काही क्लासेस वगैरेंची पॅम्फलेट वाटली आहेत. कॉलेजमध्ये असताना एका साध्या कंपनीत कामाला होतो. तिथे किचेन्सना स्टिकर चिकटवण्याचे काम होते. नंतर एलआयसी एजेंटकडे कामाला होतो, ते सोडलं. डी-मार्टमध्ये कॅशिअर झालो. काही कंपन्यांमध्ये टेलिकॉलर, पिक-अप, डिलीवरी बॉय म्हणूनही काम केले. पुन्हा त्याच एलआयसी एजेंटकडे कामाला लागलो.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


आयुष्याला दिशा नव्हती. नेमकं काय करायचं? हे कळत नव्हतं. लग्न झालं तेव्हा मी एजेंटकडेच काम करत होतो. पण मला खूप मानसिक त्रास व्हायचा. कुणी मानसिक त्रास दिला नाही. आपला आपणच होऊ लागला. आतून आवाज येत होता. नोकरी सोड, नोकरी सोड. पण धाडस नव्हतं. एकदाची सोडली नोकरी आणि घरी बसलो. बायको पोटूशी होती आणि मी एक रुपयाही कमावत नव्हतो. तिथूनच माझ्या उद्योजकीय जीवनाला सुरुवात झाली. मी रस्त्यावर कांदा-पोहे आणि उपमा विकायला सुरुवात केली. आई बनवून द्यायची, मी आणि बायको विकायचे.

पुढे रस्त्यावर चहासुद्धा विकला. भेळ विकली. बर्‍याच गोष्टी सुरू होत्या, मात्र यश मिळत नव्हतं. या दरम्यान अर्थात लेखन सुरूच होतं. काही स्थानिक वृत्तपत्रांचे अग्रलेखसुद्धा मी लिहिले आहेत. अर्थात कुणाचं नाव मी घेणार नाही. मी मराठी नाटक केलं आहे. तर एका स्थानिक वर्तमानपत्रात माझा लेख वाचून हेमराज ठाकूर यांनी मला त्यांच्या ‘अपरान्त टाईम्स’ या वृत्तपत्रात Freelancer म्हणून काम करण्यासाठी विचारलं. अर्थात मी हो म्हणालो.

मी ‘अपरान्त टाईम्स’चा सहसंपादक झालो. आतापर्यंत मी अनुवादक म्हणून रुजू झालो होतो. मी काही एजेंसीसाठी कॉपीरायटींग व अनुवादन करू लागलो. पण फ्रीलॅंसर म्हणून. त्यानंतर मी माझं संपूर्ण लेखनाला दिलं. मला हळूहळू कळू लागलं होतं की आयुष्यात जर सर्वात उत्तम काम जर कोणतं करू शकत असेन तर ते लेखन आहे.

मी केवळ लेख लिहायचो. माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले होते. वाचकांनी वेळोवेळी मला फोन करून प्रोत्साहन दिलं. बर्‍याचदा असं व्हायचं की लोक लेख वाचून मला फोन करायचे आणि “अहो जावो” अशी सुरुवात व्हायची. जेव्हा त्यांना कळायचं की मी केवळ २५-२६ वर्षांचा मुलगा आहे. तेव्हा मात्र ते म्हणायचे “आम्ही तुम्हाला ‘तू’च म्हणू. तू माझ्या मुलापेक्षाही लहान आहेस.”

वाचकांशी इतक्या जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होऊ लागले. माझ्या वाचकांनीच मला जाणीव करून दिली की मी चांगला लिहितो. म्हणूनच मी लिखाणाच्या उद्योगाकडे वळलो. माझं लेखन हेच माझं सध्याचं बिजनेस मॉडेल. मला भविष्यात स्वतःची जाहिरात एजेन्सी सुरू करायची आहे. मी लेख, कथा, कविता, एकांकिका, नाटक, निबंध, पटकथा, चित्रपट समीक्षा, गाणी हे सगळं लिहितो. राजकारण, समाज आणि कला हे लेखनासाठी माझ्या आवडीचे विषय आहेत.

आता गेली पाच वर्षे मी हा व्यवसाय करतोय. त्यामुळे अनेक ओळखी होत गेल्या, मार्ग सापडत गेला. पण मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की उद्योजकाला सामाजिक भान असणं गरजेचं आहे. तुम्हाला सामाजिक जीवनातूनही अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकतात. मला अगदी तरुण वयापासून लष्कराच्या भाकर्‍या भाजायची सवय होती. त्यामुळे मी अनेक सामाजिक संस्थांमधून काम केलं. सामाजिक संस्थांमधून काम केल्यामुळेच मला चांगले लोक भेटत गेले.

फक्त बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असूनसुद्धा मला शिक्षकांचं परीक्षण करण्याचा मान मला समाजाने दिला. अर्थात तो मान मिळवण्यासाठी मला स्वतःला सिद्ध करावं लागलं. पण अनेकांचा आशीर्वाद, मदत याशिवाय ते कधीच शक्य नव्हतं. दोन वर्षांआधी माझी सेन्सॉर बोर्डाचा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. ही नियुक्तीसुद्धा सामाजिक जीवनात वावरल्यामुळेच झाली.

एक लेखक म्हणून ही नियुक्ती होती, हा विशेष आनंद. त्यामुळे उद्योजकतेसोबत सामाजिक भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे. केवळ एखाद्या संस्थेला दान करून सामाजिक भान दर्शवता येणार नाही, तर प्रत्यक्ष कामं करणं गरजेचं आहे. अनेक लोकांच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. स्वकर्तृत्व हा शब्द तसा योग्य म्हणता येणार नाही. कर्तृत्व असतंच. हिरा असतोच, पण हिर्‍याला ओळखणारी माणसेसुद्धा असावी लागतात. नाहीतर हिरा आणि कोळसा यात फरक तो काय? त्यामुळे अनेकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं.

माझे आई-वडील ज्यांनी जन्म देऊन, शिकवून मला या योग्य बनवलं. माझी पत्नी रेशमा माझ्याकडे काहीही नसताना तिने माझी निवड केली. अरविंद कुलकर्णी ज्यांनी मला राजकीय लिखाण शिकवलं, अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. किशोर नार्वेकर ज्यांनी मला स्टेजवर उभं राहायला आणि बोलायला शिकवलं.

सत्यप्रकाश मिश्र ज्यांनी मला अनुवादनाच्या क्षेत्रात आणलं. शंकर भान, आकाशआदित्य लामा, मनमोहन घुवालेवाला, राजेंद्र वैशंपायन, ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचा संपादक आणि माझा मित्र शैलेश राजपूत, अभिजित सिंह, अभय अंगचेकर. सगळ्यांची नावं घेत बसलो तर आयुष्य पुरणार नाही. म्हणून मी तर म्हणेन की या सबंध सृष्टीनेच मला मोलाची साथ दिली आहे आणि देतेय आणि अर्थात यापुढेही देत राहणार आहे.

– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
९९६७७९६२५४ / ९८३३९७८३८४


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?