आयटीतली नोकरी सोडून शैलेश बडगुजर यांनी स्वत:च्या आवडीनुसार सुरू केला व्यवसाय

‘काजवा’ हा शैलेश आणि त्यांची पत्नी पूनम या दोघांचा प्रवास. सोबत कुटुंबाची खंबीर साथ. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे बालपण गेलेले शैलेश बडगुजर हे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जवळपास दहा वर्षं नोकरी करतान शैलेशना जाणवू लागलं की हे आपण करतोय ते काही आपलं काम नाही. ही आपली आवड नाही.

इथून सुरू झाला शैलेशमध्ये स्वत:चा शोध घेण्याचा प्रवास. आपल्याला नेमकं काय आवडतं? आपलं मन कशात रमतं? गणपतीच्या सजावटीत आपण तहानभूक हरपून काम करतो. असं का? तो आनंद इंजिनिअरिंगमध्ये का मिळत नाही?

आपल्याच प्रश्‍नांत शैलेशना उत्तरं मिळाली. स्वत्वाची ओळख झाली आणि त्यांच्या करिअरने नवं वळण घेतलं. उद्योजकतेचं.

आपल्या आवडीला व्यवसायाचे रूप द्यायचं तर त्यासाठी स्वतःचं व्यासपीठ हवं. असं व्यासपीठ उभारायचं म्हणजे स्वत: उद्योगात उतरायला हवं. मग उद्योग कसा करावा? असे अनेक प्रश्न उभे राहिले. या प्रत्येकाचा नीट विचार करून योग्य पूर्वतयारी करून मग शैलेश यांनी नोकरी सोडली आणि उद्योगात पाऊल ठेवलं.

या काळात कुटुंबाची भूमिका मुख्य होती, पण कुटुंबाने खंबीर साथ दिली. मोठ्या पगाराची नोकरी सोडताना निर्णय घेताना थोडे दडपण होतं, पण करून बघायला हरकत नाही. पुढे जे असेल ते पाहू, या आईवडिलांच्या विचारांनी शैलेशना बळ मिळालं. सोबत पत्नी पूनमची साथ ही होतीच. म्हणूनच शैलेश हा प्रवास आमचा दोघांचा आहे हे आवर्जून सांगतात.

शैलेश म्हणतात, या संपूर्ण विचारप्रक्रियेत असताना उद्योग काय करावा हे स्पष्ट नव्हतं, पण उद्योगच करावा हे स्पष्ट होतं. काय करावं या विचारात असताना मग एक संकल्पना सुचली ती म्हणजे सेंद्रिय भाजीपालाविक्री.

व्यवसाय सुरू झाला. प्रयोग चालू होते. जमतंय की नाही हे चाचपडत होतो आणि तेव्हाच कोरोना आला. सारे काही ठप्प झाले. आम्हालाही या काळात आमचं भाजीविक्री केंद्र बंद करावं लागलं.

आता घरी बसून काय करायचं असे प्रश्न पडू लागले. हा सगळ्यांसाठी कठीण काळ होता. घरात बसून काहीतरी करावं या विचारातूनच मग रिक्षामध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यामध्ये विभाजन करण्यासाठी उपयुक्त असं शीट आम्ही तयार केलं. थोड्या कलात्मक पद्धतीने हे बनवलं असल्याने अल्पावधीत ते लोकांना आवडलं. यातूनच काही सरकारी कार्यालयातून ऑर्डर मिळाल्या.

हे इनोव्हेटिव्ह सोल्युशन त्या वेळेची गरज होती. ती शैलेश यांनी पूर्ण केली. यासाठी विविध ठिकाणांहून त्यांना चांगला प्रतिसाद आला. या सगळ्या काळात शैलेशना स्वत:ची क्षमता कळली. प्रत्येक व्यक्तीत एक तरी कलागुण असतो. त्याला दिशा आणि व्यासपीठ मिळायला हवं, हे अधोरेखीत झालं.

यातूनच मग ‘काजवा’चा जन्म झाला. ‘काजवा’चा अर्थ स्वयंप्रकाशित. प्रत्येकाला देवाने काही ना काही क्षमता दिली आहे. ही आंतरिक क्षमता वापरून जेव्हा एखादी गोष्ट केली जाते तेव्हा ती खूप चांगली असते.

ग्रामीण भारतात विविध पारंपारिक कलाकौशल्यं असलेले अनेक कारागीर आहेत. त्यांच्या कौशल्याने नानाविध कलाकृती तयार होत असतात. पूर्वी या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होती. या हस्तशिल्प, हस्तकला किंवा मानवनिर्मित अशा वस्तूंची मागणी कमी झाली आणि हळूहळू बाजारपेठ कमी झाली.

याचं कारण लोकांनी मानवनिर्मितपेक्षा यंत्रनिर्मीत वस्तूंना जास्त प्राधान्य द्यायला सुरुवात केली. यातूनच अनेक उद्योगधंदे बंद झाले. काहींनी वारसा पुढे दिला नाही. काहींनी स्वत:च नाकारला. पण काही त्यातूनही स्वत:ची आवड, वारसा जोपासत आपल्या कलाकौशल्याने उत्पादने बनवतात.

त्या सगळ्यांना शैलेश बडगुजर यांनी ‘काजवा’ हे व्यासपीठ उपलब्ध केलं आहे. कारागिरांच्या उत्पादन, सेवा या योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘काजवा’ हा दुवा आहे. कारण हे सारे कारागीर म्हणजे एक एक काजवा आहेत. या हातांना सतत काम आणि कामाचा मोबदला मिळत राहावा याचसाठी ही सारी धडपड आहे.

इंटरनेट हे आजचं प्रभावी माध्यम आहे. या माध्यमामुळे कारागीर आणि ग्राहक यांच्यात एक सहजता आली आहे. कारागिरांना नवनव्या संकल्पना आणि ग्राहकाची अचूक गरज समजायला हे माध्यम खूप मदत करते. याचा वापर करून ‘काजवा’ या दोघांना स्मार्ट काम करत जोडून देते.

सतत नावीन्याचा शोध घेणे म्हणजेच नव्या गोष्टी तयार करणे आलेच, पण जुन्याच वस्तू नव्याने कल्पकपणे ग्राहकापर्यंत पोहचवणे हेसुद्धा ‘काजवा’चे एक लक्ष्य आहे. काही गोष्टी स्वत: बनवण्यावरसुद्धा ‘काजवा’ भर देते.

मुलांसाठी लाकडी खेळणी, शो-पिस तसेच काही आकर्षक भेटवस्तू बनवतात. तसेच आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर, शाळेतील खेळणी, अशी ग्राहकाच्या मागणीनुसार प्रॉडक्ट बनवून देतात.

पूनम आणि शैलेश बडगुजर

‘काजवा’ची टीम सतत नावीन्यपूर्ण गोष्टींच्या सतत शोधात असते. शैलेश, पूनम यांची चार जणांची टीम आहे. याशिवाय अनेक काजवे म्हणजेच कारागीर देशभरातून त्यांनी जोडलेले आहेत.

शैलेश सांगतात, या संपूर्ण प्रवासात अनेक अडचणी आल्या. काही निर्णय चुकले. कामात चुका झाल्या, पण यामुळे करत असलेले काम अजून अचूक कसे होईल यावर भर देता आलं. लोकांचा मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता आम्ही आमचं दुकान सुरू केलं.

अगदी इनोव्हेटिव्ह पद्धतीने आम्ही संपूर्ण लाकडी दुकान थाटलं आहे. वर्षभर हे दुकान छान चाललं, पण शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत येणार्‍या कायद्यांनुसार प्रत्येक दुकान हे काँक्रिटचं असावं लागणार होतं. इतर दुकानं पाडली जातील. त्यामुळे पुन्हा एकदा सगळं जमीनदोस्त झालं.

यामुळे खूप नुकसान झालं. आर्थिक हानीही खूप झाली. दुकान पडले, पुढे काय? मग सगळं सामान घरी आणलं. आता हे सगळं घरातून कसं चालवणार मग एक छोटं गोडाऊन घेऊन तिथे सामान नेलं आणि ऑनलाईन विक्री, प्रदर्शनं अशी पुन्हा विक्री सुरू केली. मॉल्स, कॉर्पोरेट कंपन्या, मेट्रो अशा विविध ठिकाणी स्टॉल्स लावले जातात.

सध्या आम्ही हे पुण्यात करतोय, पण भविष्यात ‘काजवा’च्या धरतीवर राज्यात इतरत्र स्टॉल लावण्यासाठी टीम तयार करण्याचं काम करतोय. पत्नीचा विश्वास आणि प्रत्यक्ष सहभाग यामुळे जबाबदारी वाटली गेली आणि कामंही वेळेत आणि नीट पूर्ण झाली.

आज प्रदर्शनात विक्री करणे असो की कारागिरांना शोधून त्यांच्या गावी जाऊन भेटणं असो प्रत्येक पावलावर पूनम खंबीरपणे साथ देते. हे सगळं ती स्वत: उतरून करते. मित्रपरिवार, आईवडील, भावंडे यांचीही मोलाची साथ मिळतेय.

चांगली पगाराची नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय धाडसी होता, पण स्वत:च्या क्षमतांवर विश्वास असल्याने तो शैलेश बडगुजर यांनी घेतला. आज ‘काजवा’चं काम करताना ते समाधानी आहेत. हीच त्यांच्या योग्य निर्णयाची पोहपावती आहे.

शैलेश बडगुजर – 9975698023

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?