Advertisement
कथा उद्योजकांच्या

बांगड्या विकून आदर्श व्यवसाय उभा करणार्‍या कमल कुंभार

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला कमल कुंभार ह्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. सर्वसाधारण कुटुंबातल्या असूनही त्यांनी जी भरारी घेतली आहे त्यास तोड नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाडी या छोट्याशा गावात कमल कुंभार राहतात. त्यांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंतचं.

आज त्या यशाच्या शिखरावर उभ्या आहेत. बऱ्याच लोकांना यश पचवणं कठीण जातं, पण कमल कुंभार यांनी उद्योग तर केला, त्यासोबत त्यांनी ४ हजारांहून अधिक महिलांना प्रेरित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना निती आयोगाचा ‘वुमन ट्रान्सफार्म’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना न्यूयार्क येथे संयुक्त राष्ट्र कार्यक्रमात ‘इक्वेटर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
कमल कुंभार

कमल कुंभार ह्यांची आई बांगड्या विकण्याचा व्यवसाय करायची. आईकडे पाहूनच त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली. व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. २००२ ला त्यांनी व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला १०० महिलांना घेऊन त्यांनी बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर साडी व्यवसाय. २००९ साली एमएससीबीचं बिल वाटपाचं काँट्रॅक्ट मिळवलं.

७० गावांतून साडेचार लाख बिलांचं वाटप केलं. या व्यवसायातून ९० महिलांना रोजगार मिळवून दिला. त्यानंतर बकरीपालन, कुक्कुटपालन, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान असे अनेक लघुउद्योग त्यांनी उभारले आहेत. हे सर्व सहजरीत्या शक्य मुळीच नव्हते.

दुष्काळी जिल्ह्यात शेती करणे अत्यंत कठीण काम; पण स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. कमल कुंभार प्रशिक्षणाला खूप महत्त्व देतात. त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलं, फिल्डवर जाऊन अभ्यास केला. त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले.

व्यवसायात बऱ्याचदा मजूर मिळणं कठीण होऊन बसतं. ग्रामीण भागात ही समस्याच असल्याचं कमल म्हणतात. पैसे देऊनही मजूर येत नाहीत. लोकांना काम करण्याची इच्छाच नाही, असा अस्सल ग्रामीण टोलाही त्या लगावतात. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यात सातत्य हवे.

बर्याचदा व्यवसाय सुरू करणे सोपे असते, पण तो सुरू ठेवणे कठीण होऊन बसते. कोणताही व्यवसाय कमीत कमी भांडवलात उभा करावा. कमीत कमी भांडवल आणि अधिक नफा हाच व्यवसायाचा मूलमंत्र आहे, असं त्या म्हणतात. व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, कुक्कुटपालनाच्या व्यवसायात मार्केटिंगची अडचण येत नाही. इतर व्यवसायांत मात्र मार्केटिंगला फार महत्त्व आहे; परंतु त्या स्वतः मार्केटिंगवर भर देतात.

कमल कुंभार यांनी कडकनाथ या कोंबडीचे पालन केले. ही कोंबडी जणू सोन्याचे अंड देणारीच कोंबडी आहे, असे म्हणता येईल. कारण या व्यवसायाने त्यांना यशस्वी उद्योजिका बनवले. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील जंगलात राहणार्या भिल्ल समाजातील लोकांकडे या जातीच्या कोंबड्या आढळतात.

औषधी गुणधर्म व चविष्ट मांस अशी या कोंबडीची खासियत आहे. म्हणून या कोंबडीचं मांस जवळ जवळ ९००/- रु. किलो आणि एक अंडं ५०/- रुपयाला विकलं जातं. या कोंबडीला प्रचंड मागणी आहे. बीपी, शुगर, दमा, टीबी या आजारांवर या कोंबडीचे मांस उपयुक्त आहे. यात प्रोटिन आणि लोहचे प्रमाण २५-७०% आहे; परंतु कोंबड्याचे मांस काळसर असल्याने सुरुवातीला ग्राहकांच्या मनात संभ्रम होता; पण त्याची चव व औषधी गुणांबद्दल जागरूकता निर्माण झाल्यामुळे या कोंबडीची मागणी वाढली आहे.

या व्यवसायाची माहिती कमल कुंभार यांना झाल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय एक व्रत म्हणून सुरू केला आणि आज त्या एक यशस्वी महिला उद्योजक झाल्या आहेत. कमल कुंभार यांच्याकडे १ एकर जमीन होती. त्यांना आपल्या स्वच्छ ऊर्जा व्यवसायामुळे एकाचे पाच एकर करता आले. त्यांनी अनेक व्यवसाय केले.

सौर ऊर्जा व्यवसायातून त्यांनी ३,००० पेक्षा अधिक घरांना प्रकाशमय केले आहे. ३७ वर्षांच्या कमल कुंभार आज ग्रामीण महिलांसाठी रोल मॉडेल झाल्या आहेत. त्या स्वतःचा व्यवसाय करून थांबल्या नाहीत, त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचं जणू व्रत घेतलं आहे. त्यासाठी त्या गावोगावी हिंडतात.

येणाऱ्या वर्षात त्यांना १० हजार महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रशिक्षण द्यायचे आहे. त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित करायचे आहे. यासाठी त्यांची योजनासुद्धा तयार आहे. त्या १००० महिलांना प्रशिक्षण देणार आहेत आणि त्या १००० महिलांपैकी प्रत्येक जण १०० महिलांना प्रशिक्षण देतील. अशा प्रकारे १० हजारांचा आकडा गाठणे शक्य आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी योजना आखल्या पाहिजे. जर तुमची योजना उत्तम व सत्यता पारखून आखली असेल तर ती योजना यशस्वी होते. आपला व्यवसाय उभारणीसाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकाला उत्तम योजना आखणे महत्त्वाचे असते, तसेच योजनेत नावीन्यताही आणता आली पाहिजे.

खूप कमी उद्योजक असे समाजकल्याणाचे व्रत हाती घेतात. कमल कुंभार त्यापैकी एक आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल आता जगभरातून घेतली जात आहे. स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी समर्पित गैरसरकारी संस्था आहे. गेल्या २० वर्षांपासून ही संस्था या कार्यात सज्ज आहे. कमल कुंभार यांनी याच संस्थेच्या माध्यमातून आपल्या यशस्वी वाटचालीला सुरुवात केली.

या संस्थेच्या साथीने त्यांनी विविध ग्रामीण उद्योग उभारले आहेत. आता या संस्थेच्या माध्यमातून त्या इतर महिलांचे सक्षमीकरण करीत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी व्यवसायात गरुडझेप घेतली आहे.

ग्रामीण भागात भाड्यावर शेतजमीन विकत घेऊन उद्योग स्थापन करण्याच्या नव्या संकल्पनेमुळे त्यांच्या कार्याची दखल दिल्लीतील CII (Confederation of Indian Industry) ने घेतली. आपण कोणतेही कार्य निष्ठेने केल्यास ते कार्य सफल होतेच व कालांतराने लोक त्याची दखल घेतातच, हे कमल कुंभार यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येते.

टीव्ही, जिल्हा परिषद, कृषी समिती या माध्यमांतून सध्या त्या व्यवसायाचे मार्केटिंग करीत आहेत. पुढे त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केटिंगवर भर द्यायचा आहे. तसेच आता त्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

न्यूयार्कवारीमुळे आणि पुरस्कार मिळाल्यामुळे त्या आनंद व्यक्त करताना म्हणतात की, यामुळे मला स्फूर्ती मिळाली आहे. आता अजून जोमाने काम करायचे आहे! पुरस्कारामुळे त्यांना उद्योजिका म्हणून ओळख मिळाली व देशभर काय तर जगभर प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्या कृतज्ञता व्यक्त करतात.

त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे व्यवसाय वृद्धिंगत होण्यात मदत होणारच आहे, परंतु त्यांनी जो महिला सक्षमीकरणाचा विडा उचलला आहे त्यासही उत्तेजन मिळणार आहे. त्यांना शहरी भागातही प्रशिक्षणाचे कार्य करायचे आहे; पण ग्रामीण भागात कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे त्या ग्रामीण भागात अधिक लक्ष देत आहेत.

गावोगावी ट्रेनिंग कॅम्प आयोजित करून त्या महिला सक्षमीकरणाचं कार्य करीत आहेत. त्या प्रशिक्षणाच्या मोहिमेत प्रचंड व्यस्त असतात. प्रशिक्षणात महिलांना सांगतात की, व्यावसायिक माणसाने प्रत्येक गोष्टीत बचत केली पाहिजे.

सध्या इंग्रजी माध्यमाचं फॅड आलंय. त्यामुळे महिना पाच ते सहा हजार कमावणारेही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दबाव येतो. घरखर्च चालवणेही कठीण होऊन बसते; पण जिल्हा परिषदेच्या उत्तम शाळा उपलब्ध आहेत. त्या शाळांमध्ये सोयीसुविधा पुरवल्या जातात; पण पालक त्याकडे पाठ करतात व आपलं जगणं कठीण करून बसतात.

याबाबत सांगताना कमल म्हणतात की, इंग्रजी शाळा ही केवळ एक फॅशन आहे. ग्रामीण भागातील अल्प उत्पन्नधारक कुटुंबीयांनी हा खर्च कमी करून स्वतःचा उद्योग उभा करून अधिकाधिक आर्थिक सक्षम झाले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे.

कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लोक पुष्कळ गुंतवणूक करतात, त्यामुळे गुंतवलेले पैसे वसूल करण्यात खूप मोठा काळ जातो. अधिकाधिक कर्जबाजारी झाल्यामुळे शेवटी व्यवसाय तोट्यात जातो व पर्यायाने व्यवसाय बंद करावा लागतो. त्यापेक्षा कमी गुंतवणूक व फारसा देखावा न करता आपला व्यवसाय सुरू करता आला पाहिजे, जेणेकरुन या व्यवसायात टिकून राहता येईल.

आता कमल कुंभार कुक्कुटपालनासोबत शेळीपालन, ससापालन, अश्वपालनसुद्धा करतात व त्यातून लाखो रुपयांचा नफा कमावतात. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शेतात शेततळे, अॅझोला चारा उत्पन्न,सेंद्रिय शेती, गांडूळ खत, कडकनाथ अंडी विक्री, पिल्लं काढायची मशीन असे उपक्रम राबवल्यामुळे कमी खर्चात त्यांना जास्त उत्पन्न मिळवता येतेे.

जो अनुभव त्यांनी स्वतः घेतला व स्वतः शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केले. आता तीच प्रेरणा प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राभरातल्या महिलांना देत आहेत. कमी शिक्षण असूनही आज त्या उद्योगनिर्माण आणि उद्योगवाढीसाठी लोकांना प्रेरित करीत आहेत. लोकांना मार्केटिंगचे फंडे शिकवीत आहेत. तसेच त्या त्यांच्याकडील सर्व वाहने चालवतात व घोडेस्वारीही करतात.

या त्यांच्या कार्यात त्यांच्या पाठीशी त्यांचे पती त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. आज कमल कुंभार ही केवळ एक व्यक्ती नसून एक इंस्टिट्यूट झाली आहे. त्यांची ही मनोवेधक कथा वाचून अधिकाधिक महिलांना स्फूर्ती मिळेल व त्या आपल्या जीवनात यशस्वी होतील, अशी खात्री आम्ही स्मार्ट उद्योजक समूह बाळगतो. कमल कुंभार यांच्या कार्याला प्रणाम…

– जयेश मेस्त्री


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!