Advertisement
वाचा दुष्काळग्रस्त ‘लामकानी’ गावाच्या विकासाची कथा
कथा उद्योजकांच्या

वाचा दुष्काळग्रस्त ‘लामकानी’ गावाच्या विकासाची कथा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा. त्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री, शिंदखेडा हे तीन तालुके कायम अवर्षणप्रवण. या तीन तालुक्यांत धुळे तालुका अग्रभागी. धुळे तालुक्यातील ज्या परिसरास दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. त्या बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील लामकानी हे गाव.

धुळ्याच्या पश्‍चिमेस ३५ किमी अंतरावर. आठ ते दहा हजार लोकवस्तीच्या लामकानीची बाजारपेठेचे गाव अशीही ओळख आहे. गावाला लागून असलेला डोंगर वृक्षतोड आणि चराई यामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेला; मुरूम, दगड आणि खडकांशिवाय मातीचा लवलेश नसलेला. कुठे तरी तग धरून असलेली खुरटी हिवराची व बाभळाची झाडं!

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस दिसणार्‍या लोथडी व कुसळ गवतांच्या काड्या, ज्या नंतर शेळ्या-मेंढ्यांच्या भक्ष्यस्थानी पडायच्या. डोंगरमाथ्याची स्थिती अशी. भूगर्भाची यापेक्षाही वाईट अवस्था. १९९० च्या दशकात भूगर्भातील पातळी खालावत गेली व १९९७-९८ या दोन वर्षांत कूपनलिकांद्वारे अमर्याद उपसा झाला.

ग्रामस्थांनी ७००-८०० फूट खोलीपर्यंत जाऊन उपसा सुरू केला. गावात अशा सुमारे २०० कूपनलिका झाल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के कूपनलिका पुढील वर्षी कोरड्या पडल्या. दुष्काळ-कर्ज-दुष्काळ असे आवर्तन सुरू झाले.

यावर एका निष्णात पॅथॉलॉजिस्टच्या भूमिकेतून मानवी आरोग्याचे मर्म अचूक जाणणार्‍या डॉ. धनंजय नेवाडकर यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी एक निदान केले होते. अर्थात, हे निदान एरवी लॅबमध्ये चेहर्‍यावर असंख्य ताणतणावांचं जाळं घेऊन येणार्‍या पेशंटसंदर्भात नव्हते, तर अवर्षणप्रवणतेच्या विळख्यातून ‘लामकानी’ या आपल्या जन्मभूमीस मुक्त करण्यासंदर्भातले ते अतिशय मूलगामी स्वरूपाचे निदान होते.

डॉ. नेवाडकर केवळ निदान करून थांबले नाहीत. पिढ्यान पिढ्या परिसरास जडलेली अवर्षणप्रवणतेची दुर्धर व्याधी मुळासकट दूर करण्याचा दृढ संकल्पच त्यांनी केला.

‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीचे प्रत्यंतरही आले. राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजाराच्या धर्तीवर पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचा सल्ला प्रत्यक्ष जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्याकडून मिळाला. त्यानंतर डॉ. नेवाडकर यांचे ‘ऑपरेशन लामकानी’ सुरू झाले.

डॉ. नेवाडकर यांनी बारा वर्षे नियोजनबद्ध रीतीने केलेल्या अथक परिश्रमाचे परिणाम समोर आले आहेत. अमर्याद वृक्षतोड आणि अनियंत्रित चराई यामुळे काही वर्षांपूर्वी उघडे बोडके दिसणारे माळरान आता हिरवाई लेवून वसलेले दिसते. ७००-८०० फुटांपर्यंत गेलेली भूजल पातळी आश्‍चर्यकारकरीत्या वर आली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांची संख्या वाढली. टंचाईच्या काळात हमखास चारा मिळण्याचे ठिकाण असा लौकिकही ‘लामकानी’ने मिळविला.

खरे तर याला प्रभावी पाणलोट विकास कार्यक्रमाचे बायप्रॉडक्ट म्हणता येईल. लामकानीच्या या यशोगाथेचे प्रमुख यश आहे, ते त्याची दुष्काळग्रस्त भाग ही ओळख पुसण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे, सहमतीने निर्णय घेणे आणि निर्णयांची अंमलबजावणी एकदिलाने करणे. गट-तट, जाती-उपजातींच्या अस्मिता दिवसेंदिवस प्रबळ होत असताना दुबळ्या होत चालेल्या ग्रामीण माणसास लामकानीची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते.

डॉ. धनंजय नेवाडकर

डॉ. धनंजय विष्णू नेवाडकर धुळ्यातील नामांकित पॅथॉलॉजिस्ट. मूळचे लामकानीचे रहिवासी. सप्टेंबर २००० मध्ये झालेल्या एका भीषण अपघातातून सुदैवाने बचावले.

त्या काळात तीन महिने सक्तीची विश्रांती डॉ. नेवाडकरांना घ्यावी लागली. त्या वेळी प्रेमापोटी भेटायला येणार्‍या लामकानीवासींच्या गप्पा दुष्काळ, आटलेल्या विहिरी, मान टाकलेल्या कूपनलिका या मुद्द्यांभोवती गुंफलेल्या असत. परमेश्वराने अपघातातून बालंबाल वाचविले. एक संधी दिली आहे.

गावाच्या समस्येवर काही ठोस उपाययोजना करता येईल का? उर्वरित आयुष्यात गावासाठी चिरंतन असे काम करायचेच, असा निर्धार डॉ. नेवाडकरांनी केला. त्याच काळात पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराची यशोगाथा वाचनात आली. जवळपास समस्या सारखीच. फरक होता तो लोकसंख्येचा. लाकमानीची लोकसंख्या आठ ते दहा हजार, शिवाराचे क्षेत्र मोठे. शिवाय राजकीय गटतट, जातीपातीचे राजकारण आणि अन्य राजकीय संवेदनशीलता हा मसाला ठासून भरलेला.

मार्गदर्शनासाठी पहिलेच पत्र प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळेंना पाठवले. गावाची भौगोलिक परिस्थिती बघता, पाणलोट विकास कार्यक्रम राळेगणसिद्धी व हिवरे बाजाराच्या धर्तीवर करा, हा सल्ला मिळाला. जानेवारी २००१ मध्ये काठी टेकतच डॉ. नेवाडकरांनी पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराला भेट दिली. फेब्रुवारी २००१ पासून दर रविवारी लामकानी भेटीचा धडाका सुरू झाला. प्रथम स्थानिक डॉक्टर मित्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. हिवरे बाजारची व्हिडीओ कॅसेट दाखवली.

हा कार्यक्रम पुढे गावाच्या चौकाचौकांत सभा घेऊन सुरू झाला. सुरुवातीला प्रतिसाद यथातथाच. श्रमदान, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी हे नियम पाळावे लागतील हे सांगितल्यावर, ‘डॉक्टर, रिकामटेकडे उद्योग करून आमचा व तुमचा अमूल्य वेळ कशाला वाया घालविता? गावात तंटे कशाला लावता?’ असे सल्ले ऐकण्यातच पहिले वर्ष संपले.

कामांचा प्रत्यक्ष अनुभव तसेच कुठलेही पद वा संस्था नसताना हे प्रत्यक्षात करायचे कसे, हा प्रश्‍न होताच. पुढे माथा ते पायथा तत्त्वानुसार काम करायचे ठरले. गावाचा डोंगरउतार पूर्व-पश्‍चिम जवळ-जवळ तीन किलोमीटर पसरलेला. हे सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे.

वन विभागात चकरा सुरू झाल्या. ‘प्रथम काही क्षेत्रांत चराईबंदी व श्रमदानाने फुटलेला बांध दुरुस्त करून दाखवा’, हे आव्हान तत्कालीन फॉरेस्ट अधिकारी व्ही.जे. पाटील यांनी दिले. तोपर्यंत ग्रामस्थांची बर्‍यापैकी मानसिक तयारी झाली होती. २००२ च्या एप्रिल-मे महिन्यांत श्रमदान सुरू झाले. दिवसा उन्हाचा तडाखा असल्यामुळे रात्री बत्त्या, कंदील, इमर्जन्सी लॅम्प लावून गावातील तरुण, बुजुर्ग मंडळी कामाला लागली.

प्रारंभी ५० हेक्टर क्षेत्रात चराईबंदी, कुर्‍हाडबंदी पालनाचे ग्रामसभेत ठरले. त्यासाठी वनसंरक्षण व वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. वन विभागाने आश्‍वासन दिल्याप्रमाणे सन २००२ च्या पावसाळ्यानंतर सलग समतल चरांचे (सीसीटी) काम प्रत्यक्ष सुरू केले.

सन २००७ पर्यंत रोहयो आणि श्रमदान या माध्यमातून एकूण ३०० हेक्टर डोंगरउतारावरील जल/मृदा संधारण काम पूर्ण करण्यात आले. त्याच भागात चराई/कुर्‍हाडबंदीचे पालन होत गेले. चराईबंदीचा निर्णय सुखासुखी अमलात आला नाही. त्यातून अनेक तंटे उद्भवले.

डॉक्टर नेवाडकर आणि लामकानीवासीयांना पोलीस ठाण्यापर्यंत चकरा माराव्या लागल्या. नियम मोडणार्‍यांकडून दंडापोटी एक लाख रुपये वसूलही करण्यात आले.

चराईसाठी विशिष्ट भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. जसे काम होत गेले व त्याचे दृश्य परिणाम दिसत गेले, तसा लोकांचा सहभाग वाढत गेला. सहसा रोहयोच्या कामाच्या दर्जाबद्दल चांगले बोलले जात नाही. मात्र लामकानीच्या डोंगरउतारावर झालेली कामे यास अपवाद ठरावीत.

या चळवळीस वेळोवेळी वैचारिक अधिष्ठान देण्याचे महत्त्वपूर्ण काम वर्तमान जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, डॉ. माधवराव चितळे, वॉटर संस्थेचे फादर बाकर, अरुण निकम, वन अधिकारी सुरेश थोरात, वसंतराव टाकळकर, सर्वेश्‍वकुमार निगम, तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे या मंडळींनी केले.

या प्रयोगांमुळे एके काळच्या खडकाळ डोंगरांवर अतिशय दाट स्वरूपाचे पवन्या गवत डोलताना दिसते. परिसरातील २०-२५ गावचे दुग्ध व्यावसायिक हे गवत कापून नेतात. पूर्वी वर्षानुवर्षे खुरटलेल्या अवस्थेत असलेल्या हिवर, बाभळाच्या झाडाझुडपांनी आता चांगलीच वाढ धरली आहे.

दर वर्षी केलेल्या बी रोपणाने हजारो नवीन रोपटी तयार झाली आहेत. याशिवाय या परिसरात नवनवीन पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पाखरांची वाढलेली संख्या कीटकनाशकांचा कमी वापर करण्यास कारणीभूत ठरली आहे.

बंद पडलेल्या कूपनलिका सुरू झाल्या. अस्तंगत झालेली ‘बागायती शेती’ ही संकल्पना पुन्हा मूळ धरू लागली आहे. जलसंधारणाच्या कामातून एवढ्या मोठ्या लोकसंख्येस दुष्काळचक्रातून बाहेर काढण्याचा लामकानीचा प्रयोग आणि नि:स्वार्थ भावनेतून या प्रयोगाची अंमलबजावणी करणारे डॉ. धनंजय नेवाडकर कौतुकापेक्षा अनुकरणास पात्र आहेत.

सौजन्य : महान्यूज

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!