गणपती आणि कार्तिकेय यांच्यातील पृथ्वीप्रदक्षिणेच्या स्पर्धेची ही कथा तुम्ही बर्याचदा ऐकली आहे. पण भगवंताच्या भक्तीपोटी. आता आपण कर्मासाठी ही गोष्ट पुन्हा नव्याने जाणून घेऊया. कार्तिकेयच्या मनात गणेशाबद्दल असूया निर्माण झाली. मुळात असूया असण्याचं काहीच कारण नव्हतं.
दोघेही एकमेकांच्या जागी श्रेष्ठच होते. पण काम, क्रोध, मोह, माया आणि मत्सर हे देवांनाही चुकले नाही. कार्तिकेय आपल्या आईला म्हणाला “माते, तू माझ्यापेक्षा गणेशवर जास्त प्रेम करतेस. मी तुझा नावडता मुलगा आहे.”
पार्वतीच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब जमीनीवर पडला. आपले अश्रू लपवत पार्वती कार्तिकेयला म्हणाली “तुला असं का वाटतं? माझं तुम्हा दोघा मुलांवर समान प्रेम आहे. तुम्ही दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. आई कधीच मुलांमध्ये भेदभाव करीत नाही”.
पण कार्तिकेयला आईचं म्हणणं पटलं नाही. गणेशविषयीचा मत्सर टोकाला पोहोचला होता. कार्तिकेय म्हणाला “सगळे देवगण गणेशाच्या बुद्धीची चर्चा करतात. अरे असे आहे तरी काय या गणेशात. मी काही काळ कैलासपसून दूर काय राहिलो, या गणेशाने तर सर्वांवर जादू केली आहे. म्हणे बुद्धीमान…”
पार्वतीला कार्तिकेयची दया आली. तिला एकवेळ वाटलं, कार्तिकेयला आपल्या कुशीत घेऊन समजूत काढावी. पण त्या हिंदू देवपत्नीने आपल्या भावना आवरल्या. वयात आलेल्या मुलाशी वागण्याची ही पद्धत नाही. लेकरु लहान असतं तेव्हा त्याला कुशीत घेऊन समजूत काढता येते. पण ते एकदा का मोठं झालं की मग आपल्या मायेच्या पदराखाली त्याला ठेवणे कठीण जाते.
पार्वती म्हणाली “तुला जर एवढंच वाटत असेल तर आपण तुमच्या दोघांची स्पर्धा घेऊया. जो जिंकेल तो श्रेष्ठ व बुद्धीवान”. कार्तिकेय जरा विचित्र हसला व म्हणाला “स्पर्धा आणि त्या कालच्या पोराशी? आता एवढंच बाकी राहिलं होतं. पण जर मी नाही म्हणालो तर तू म्हणशील की मी घाबरलो.
म्हणून केवळ तुझ्या समाधानाकरिता मी होय म्हणतोय”. असं म्हणत कार्तिकेय तावातावाने निघून गेला. दुसर्या दिवशी कार्तिकेय, गणेश, शिव, पार्वती व सगळे देवगण जमले. स्पर्धा काय असेल याचं सर्वांना कुतूहल होतं.
कार्तिकेयने एक नजर गणपतीकडे पाहिलं. गणेशाने हात जोडून त्याला नमस्कार केला. पण कार्तिकेयने त्याला प्रतिसाद दिला नाही. भगवान शिव धीरगंभीर आवाजात म्हणाले “कार्तिकेय, गणेश… तुम्हाला उत्सुकता असेल की मी काय बोलणार आहे. तुमच्या चेहर्यावरील भाव हे स्पष्ट सांगतायत. तर मग ऐका मुलांनो, तुम्हाला ७ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालायची आहे.
जो सर्व प्रथम येईल तो विजयी ठरेल”. गणपती व कार्तिकेय यांनी आश्चर्याने पाहिलं. पण आता भगवान शंकरांना प्रश्न विचारण्याची दोघांनाही हिम्मत झाली नाही. दोघांनी शिव-पार्वतीला नमस्कार केला व पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले. कार्तिकेय अतिशय घाईत निघाला.
त्याला काही करुन ही स्पर्धा जिंकायची होती व सर्वांना दाखवून द्यायचं होतं की गणेशपेक्षा तोच श्रेष्ठ आहे. पण गणेश जरा पुढे जाऊन थांबला व पुन्हा पाठी आला. शिव-पार्वती व देवगणांना कळेना की या मुलाला झालं तरी काय.
तो कार्तिकेय इतक्या घाईत निघून गेला. पण गणेश अजूनही इथेच का थांबलाय. गणेश शिव-पार्वतीसमोर येऊन उभा राहिला व त्याने आपल्या आई-वडीलांभोवती ७ प्रदक्षिणा घातल्या.
पार्वती म्हणाली “हे तू काय केलेस. तुला स्पर्धा जिंकायची नाही काय?” गणपती म्हणाला “मी माझ्या आई-वडीलांभोवती प्रदक्षिणा घातली. याचाच अर्थ मी सबंध पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. आई-वडील हे तर आपलं विश्व असतात ना?”
शिव-पार्वतीने गणेशाला आपल्या जवळ मायेने घेतलं. बह्गवान शिव म्हणाले “शाब्बास मुला. तू आज दाखवून दिलंय. तू खरंच बुद्धीमान आहेस.” जेव्हा कार्तिकेय परतला, तेव्हा त्याला सगळी हकीकत समजली. तो खजील झाला व त्याने आपला पराभव मान्य केला. कार्तिकेय गणेश जवळ आला व त्याने गणेशला घट्ट मिठी मारली.
तात्पर्य :
कार्तिकेयने जे केलं त्याला गदामजुरी म्हणतात आणि गणपतीने जे केलं त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. नेहमी स्मार्ट वर्क करा. यशस्वी व्हाल.
लेखक : जयेश मेस्त्री
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.