‘गुगल’ची सक्सेस स्टोरी ही उद्योजकतेसाठी दीपस्तंभ मानली जाते. दोन कॉलेज विद्यार्थ्यांनी सुरू केलेला व्यवसाय हा जगातील सर्वोत्तम व सर्वात मोठ्या उद्योगात परावर्तित होतो, हे एक जागतिक आश्चर्य आहे. माझ्या ‘गुगल अॅडवर्ड’सोबत काम करत असताना आलेल्या अनुभवातून २५ टिप्स तुम्हाला सांगत आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल अशी आशा बाळगतो.
१) लवकर सुरुवात : आपण म्हणतो शुभस्य शीघ्रम. जे लवकर सुरुवात करतो ते शुभ असते; परंतु अनेक नवतरुण आपण पाहतो पदवी करतात, दोन-चार वर्षे कोठे नोकरी मिळते का ते पाहतात.
सर्व मार्ग संपल्यावर उद्योग करावा म्हणतात तोपर्यंत सर्व उत्साह संपलेला असतो; परंतु गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी ब्रीन यांनी त्यांच्या कॉलेज प्रोजेक्टपासूनच गुगलला सुरुवात केली होती. तेव्हा लवकरात लवकर सुरू करा, वेळ घालवू नका.
२) आहे त्यात सुरुवात : गुगलची सुरुवात एका मित्राच्या गॅरेजमध्ये झाली. खूप भांडवल, ऑफिस, कर्मचारी आल्यानंतर उद्योग करू म्हणाल तर कधी सुरुवात होईल का हे सांगता येत नाही. एकदा एखादी आयडिया तुम्हाला क्लिक झाली की तुम्ही तुमच्याकडे आहे त्यात सुरुवात करा.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)त्यातूनच पुढे मार्ग निघत जातात. कधी सुरू करू, कसे सुरू करू असा विचार करण्याचा शक्यतो प्रयत्न करू नये यामुळे उद्योग सुरू होत नाही.

३) कल्पना : आजच्या जगात पारंपरिक उद्योगावर फारसे महत्त्व राहिले नाही. तुम्ही काही तरी आऊट ऑफ बॉक्स करणे गरजेचे आहे. डोके खाजवून नवीन कल्पना, नवीन पद्धती किंवा आहे त्या उद्योगात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जुनाट पद्धतीने काही जास्त बिझनेस होण्याची शक्यता नाही. तेव्हा बिझनेस आयडिया ही खूप मोलाची गोष्ट आहे. म्हणतात ना ‘अ आयडिया कॅन बी बिलियन डॉलर’. तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर गुंतवणूकदारांची लाइन लागेल.
४) गुंतवणूकदार : आज काळ बदलला आहे. पूर्वीसारखे फक्त गर्भश्रीमंत लोकच धंदा करू शकतात ते दिवस गेले. तुमच्याकडे आयडिया असेल, स्किल असेल तर आज गुंतवणूक मिळण्याची कमी नाही. त्यात नेचर कॅपिटल कंपन्या, एंजल फंडिंग, प्रायव्हेट इन्व्हेस्टर तयार असतात. असे हजारो गुंतवणूकदार अशा चांगल्या उद्योगात गुंतवणूक करण्याची संधी शोधत असतात.
५) संशोधन व अभ्यास : उद्योगाचे स्वरूप बदलते आहे. धोपट पद्धतीने व्यवसाय करणे कालबाह्य झाले आहे. आज सतत संशोधन व नवीन गोष्टी शिकत राहणे अपरिहार्य आहे, तरच तुमचा उद्योग जगात सतत अग्रगण्य राहील. तेव्हा तुम्हाला व्यवसायासंबंधी सतत रीसर्च करणे तसेच नवनवीन गोष्टी शिकत राहाव्याच लागतील. त्यामुळे तुमचा उद्योग सतत फायद्यात येऊन स्पर्धेत पुढे पुढे राहील.
६) उलट पिरॅमिड : गुगलची मार्केटिंग पद्धती ही उलट्या पिरॅमिडसारखी आहे. ९५ टक्के कर्मचारी हे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व रीसर्चवर काम करतात, तर फक्त ५ टक्के सेल्स करतात. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट पूर्ण संशोधन करून इतका परफेक्ट व सर्वोच्च बनवा की, त्याला फारसा सेल्स करण्याची गरज भासणार नाही, तो आपोआप विकला जाईल.
जर तुम्ही प्रॉडक्टवर काम नाही केले तर आयुष्यभर सेल्स करण्यासाठी डोकेदुखी करावी लागते. ‘फोकस ऑन क्वालिटी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’.
७) रेंज ऑफ प्रॉडक्ट्स : एकदा गुगल मोठे व्हायला लागल्यानंतर त्यांनी इंटरनेट क्षेत्रातील अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली किंवा विकत घेऊन विकसित केली म्हणजे इंटरनेट जगातील सर्व पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिले. पूर्वी याहू, रिडिफ मेल लोक वापरायचे; पण गुगलने जीमेल लॉन्च केला व इतरांचे मार्केट मारले. तेव्हा आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रॉडक्ट घेऊन या, तरच तुम्ही मार्केट लीडर बनाल.
८) नो शोबाजी, ओन्ली बिझनेस : गुगल संस्थापक हे अत्यंत कॉर्पोरेट प्रोफेशनल आहेत. त्यांना प्रसिद्धी व शोऑफ करण्याचा छंद नाही. ते फारसे प्रसिद्धी माध्यमात दिसत नाहीत. ते आपल्या बिझनेसवर फोकस करतात. आपल्याकडे लाख-दहा लाख बिझनेस केला की नगरसेवक, सरपंच होण्याची स्वप्ने पडायला लागतात व गाडीला झेंडा लागतो व काही वर्षांत धंदा पडतो. धंदा करताना कोणती शोबाजी नको हे गुगल फाऊंडरकडून शिकावे.

९) युजर फर्स्ट : तुम्ही गुगलमध्ये एखादा कीवर्ड सर्च करता तेव्हा तुम्हाला उजव्या बाजूला लहान चार ओळींत जाहिरात दिसते व डाव्या बाजूला मुख्य सर्च रिझल्ट दिसतो. म्हणजे जाहिरातीला कमी जागा, तर मुख्य माहितीसाठी जास्त जागा गुगल देते, कारण गुगलला माहीत आहे की, आपले अस्तित्व हे जाहिरातदारामुळे नव्हे तर युजरमुळे आहे. तेव्हा युजरला प्रथम प्राधान्य दिले जाते. तेव्हा तुमच्या व्यवसायात ग्राहकाला प्रथम प्राधान्य द्या, बाकी गोष्टी नंतर.
१०) अॅलडव्हर्टायजर सेकंड : म्हणतात ना ‘प्रॉफिट इज बाय प्रॉडक्ट ऑफ एनी बिझनेस.’ तुम्ही फक्त फायद्याचाच प्रथम विचार केला तर व्यवसाय संपलाच म्हणून समजा. गुगलसुद्धा हे तंतोतंत पाळतो. तो कधीही जाहिरातदाराला प्राधान्य देऊन मुख्य इंटरनेट युजरला दुय्यम स्थान देत नाही.
एका गाण्याच्या कार्यक्रमाला हजार श्रोते आले होते; पण त्या कार्यक्रमाच्या प्रायोजकाने आपली भाषणे सुरू केली व ते अर्धा तास संपेना. शेवटी श्रोते उठून गेले. तुम्ही मुख्य हेतूपासून लांब जाता कामा नये. तेव्हा तुम्ही जाहिरातदारांना दुय्यम स्थान द्या, वाचक व प्रेक्षकांना प्रथम स्थान द्या, नाही तर तुमचा मीडिया बिझनेस संपलाच म्हणून समजा.
११) कंटेंट इज किंग : गुगल हा इन्फरमेशन टेक्नॉलॉजीचा बिझनेस आहे. इंटरनेटद्वारे कंटेंट देणे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे. कपिल शर्मा शो, हवा येऊ द्या किंवा असे गाजणारे प्रोग्रॅम हे कंटेंटमुळे चालतात, मग चॅनेल कोणताही असू दे. आज कोणताही बिझनेस, नेता, पक्ष, मीडिया, उद्योगाचा कंटेंट हा मित्र आहे. सेल्फ जनरेटेड कंटेंट तसेच युजर कंटेंटवर भर द्या, तेच तुमच्या मार्केटिंगचे गमक आहे.
१२) एगेंजमेंट/चस्का लावा : गुगल, जीमेल, यूट्यूब, मॅप असे अनेक इंटरनेट प्रॉडक्ट हे तुम्हाला त्याच्या वापराचे व्यसन लावतात. एक दिवस गुगल नाही बघितले तर चुकल्यासारखे वाटते. जगातला एकही विद्यार्थी गुगलच्या वापराशिवाय प्रोजेक्ट रिपोर्ट करीत नाही.
यालाच म्हणतात तुमच्या प्रॉडक्टचा चस्का लावणे. असे बिझनेस मॉडेल तुम्ही तयार केले तर जीवनात मोठे झालाच म्हणून समजा. ग्राहकांना तुमच्यात गुंतवा. तुमच्या प्रॉडक्टचे व्यसन लावा.
१३) पेटंट/आयपी : आज सर्वाधिक पेटंट गुगलच्या नावे नोंद आहेत. गुगल सर्च ऑलगॅरीदमचे पेटंटही त्यांच्या नावे नोंद आहे, त्यामुळे असे सर्च इंजिन दुसरे कोणी काढू शकत नाही. तुम्हाला जर उद्योगात मोठे व्हायचे असेल तर तुमचे उत्पादन कल्पना या पेटंट, कॉपीराइट करून घ्या.
केवळ पेंटंट तुमच्या नावे असल्याने ते भाड्याने वापरावयास दिल्याने तुम्हाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळत राहील. आज इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी ही स्थावर मालमत्तेपेक्षा मोठी झाली आहे. सातबारा उताऱ्यापेक्षा कॉपीराइट मोठा झाला आहे.
१४) सर्वोच्चतेचा ध्यास : गुगलचे संस्थापक हे ज्यू धर्माचे आहेत. त्यांच्या धर्मात एक तत्त्व आहे की, धर्मात जन्मलेला प्रत्येक माणूस हा देवाइतकाच श्रेष्ठ देवच होऊ शकतो व हे गुगल संस्थापकांनी सिद्ध करून दाखवले. आज गुगल इंटरनेटचा देव आहे. जे काही करायचे ते जगात सर्वोच्च करायचे हे ध्यानीमनी कायम असावे.
आपले उत्पादन सर्वोच्च असले पाहिजे. त्यामुळे सर्वोच्चतेचा ध्यास तुम्हाला वेडेपिसे करतो व प्रेरणा मिळते व तुम्ही कामाला लागता व प्रचंड यशस्वी होता. संकुचित वृत्ती सोडा.
१५) फॉर ऑल जिऑग्राफी : तुमचे प्रॉडक्ट हे जगातील प्रत्येक देशासाठी, प्रत्येक शहरासाठी, प्रत्येक खेड्यासाठी, प्रत्येक वाढीसाठी असावे. जसे देव जगातील प्रत्येक जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहे तसे तुमचे प्रॉडक्ट जगातील प्रत्येक भूभागावर राहणाऱ्या लोकांच्या उपयोगाचे असावे, त्यावर प्रदेशाचे बंधन नसावे. बिझनेस विदाऊट बॉन्ड्रीज.
१६) फॉर ऑल पीपल : तुमचे प्रॉडक्ट हे लहान मुले, स्त्रिया, पुरुष, गरीब, श्रीमंत, हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध अशा प्रत्येकासाठी असावे. प्रत्येकाला ते उपयोगाचे असावे, तेे कोणत्याही भाषेत मिळावे. कितीही कमी किमतीत मिळावे, कोठेही मिळावे. जसे ऑक्सिजन तसेच गुगल, तसेच तुमचे प्रॉडक्ट असावे म्हणजे तो बिझनेस मोठा होईल. ठरावीक वर्गासाठी तयार केलेल्या प्रॉडक्टचा व्यवसाय खूप मोठा होत नाही.
१७) बी-टू-सी मॉडेल : म्हणजेच बिझनेस टू कंझ्युमरचा आता जमाना आहे. एजंटगिरी, दलाली, मध्यस्थ हा प्रकार जगभरातील बिझनेसमधून संपत आला आहे. गुगलनेही असेच मॉडेल स्वीकारले आहे.
‘गुगल’वर जाहिरात खरेदी करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा एजन्सीची गरज नसते. ग्राहक स्वत: ती विकत घेऊ शकतो. लाखो ग्राहक आज गुगलची सेवा व उत्पादने विकत घेतात. बी-टू-सी मॉडेल्स इथून पुढे जास्त चालेल.
१८) हनी बी बिझनेस मॉडेल : गुगलला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा प्रॉडक्ट म्हणजे अॅडवर्डस (पे पर क्लिक) याचा व्यवसाय गुगल या मॉडेलवर आधारित करणे. हनी बी (मधमाशी) जसे फुलातून अगदी थोडे थोडे मध काढून घेऊन मधाचे मोठे पोळे भरते तसे गुगल पे पर क्लिक (म्हणजे एक क्लिक केले की त्याचे पैसे) याद्वारे ४० बिलियन डॉलरचा बिझनेस करते. ग्राहकाला सहज परवडेल इतक्या स्वस्तात उत्पादने काढा, मग जगभर व्यवसाय पसरेल.
१९) बी सिंपल बी फास्ट : गुगल सर्च हे वापरण्यास अत्यंत सिंपल (साधे) आहे. चार वर्षांची मुलेही ते सहज वापरू शकतात, तसेच ते फास्ट आहे, सेकंदाच्या काही भागांत तुम्हाला रिझल्ट देते. तुमचा व्यवसाय, प्रॉडक्ट हे समोरच्या ग्राहकास समजण्यास, वापरण्यास अत्यंत सिंपल व सोपे असावे.
महात्मा गांधी सर्वात मोठे व प्रसिद्ध नेते होऊन गेले. अनेक ब्रँडिंग गुरू हे महात्मा गांधींना ब्रँडिंगचे तज्ज्ञ मानतात. त्यांचे साधे राहणे, साधी व सरळ घोषणा लोकांना आकर्षित करतात. सो बी सिंपल अँड बी फास्ट.
२०) सेल्फ सर्व्हिस मॉडेल : जगभरात सेल्फ सर्व्हिस मॉडेल हे वेगाने वाढत आहे. उदा. बँका, इन्शुरन्स, रेस्टॉरंट इत्यादी अनेक ठिकाणी सुरू आहे. यामुळे किंमत कमी होते व ग्राहक आपल्या पसंतीने खरेदी करतो. या मॉडेलमुळे व्यवसाय वेगात व जगभर वाढतो. प्रत्येक ग्राहकाला सेवा हे त्यासाठी कंपनीचा माणूस ठेवण्याच्या पद्धतीने तो व्यवसाय फारसा वाढत नाही. असे सेल्स सर्व्हिस मॉडेल तुमच्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करा.
२१) व्हर्च्युअल बिझनेस मॉडेल : किती जणांना माहीत आहे गुगल, फेसबुक, फ्लिपकार्ट, नोकरी डॉट कॉम, शादी डॉट कॉम, अॅरमेझॉन, इबे इत्यादीचे ऑफिस कोठे आहे. आज कंपनी/बिझनेस करण्यासाठी मोठे कार्यालय/फॅक्टरी लागते हे आता कालबाह्य झाले आहे.
कमीत कमी ओव्हरहेडस ठेवून बिझनेसमध्ये व्हर्च्युअल मॉडेल राबवणे ही काळाची गरज आहे. मोठी कार्यालये, दुकाने, कारखाने व अनेक कर्मचारी ठेवून बाराच्या भावात जाल. अनेक बँकासुद्धा ई-बँकिंगला प्रोत्साहन देऊन व्हर्च्युअल मॉडेल आणत आहेत.

२२) बेस्ट प्लेस टू वर्क : जगभरातील फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या यादीत गुगल हे नं. १ चे बेस्ट प्लेस टू वर्क आहे. जगातील सर्व टॅलेंट विद्यार्थ्यांचे गुगलमध्ये नोकरी मिळावी हे जणू स्वप्नच असते. गुगलचे कार्यालय म्हणजे स्वर्गच. संशोधनाचे पूर्ण स्वातंत्र्य.
बिझनेसचे यश हे तुमच्याकडे किती चांगले लोक काम करतात यावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्यांना चांगले वातावरण दिले तरच चांगले लोक येतील. कर्मचार्यांना काम करण्यास चांगले वातावरण ठेवा.
२३) बेस्ट पीपल इन वर्ल्ड : गुगल ही सर्वाधिक पगार पॅकेज देणारी कंपनी आहे. आयआयटीतील सर्वात हुशार विद्यार्थ्याला ते ६० लाखांहून अधिक पॅकेज देतात. म्हणजेच जगातील सर्वात बेस्ट टॅलेंट ते घेऊन जातात म्हणून ती जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी आहे. बेस्ट इन इज बेस्ट आऊट. गारबेज इन इज गारबेज आऊट. तुम्ही निकृष्ट कर्मचारी घेतले तर आऊटपुटपण निकृष्ट येणार. चांगले लोक नेमा.
२४) सिस्टीम ड्रिव्हन : संपूर्ण काम एका आपल्या गरजेनुसार तयार केलेल्या सिस्टीमवर चालावे, त्यात कोणताही ह्युमन इन्टरफेरन्स नसावा. ज्या उद्योगात ह्युमन इन्टरफेरन्स जास्त तो व्यवसाय फारसा वाढत नाही. तो त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहतो. सिस्टीमने चालणाराच उद्योग निरंतर टिकतो व वाढत राहतो.
२५) मार्केट लीडर : आपल्या क्षेत्रात नेहमी मार्केट लीडर राहा. तुमच्या सेवा किंवा प्रॉडक्टचे नाव घेतले की प्रथम तुमचेच नाव ग्राहकांच्या तोंडात आले पाहिजे. उदा. क्रिकेट म्हटले की सचिन, गाणे म्हटले की लतादीदी, योगा म्हटले की रामदेवबाबा, टुथपेस्ट म्हटले की कोलगेट, बाकरवडी म्हटले की चितळे, श्रीखंड म्हटले की अमूल.
सुमारे ९५ हजार कर्मचारी असणारी गुगल कंपनी, त्याची प्रगती, तंत्रज्ञान हे सगळे एका लेखात काय एका पुस्तकातही संपणे शक्य नाही; पण नवोदित व लहान व्यावसायिकांनी शिकण्यासारखे सोपे २५ मुद्दे मला वाटले.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.