स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले, पण सशाला शांत बसवेना. आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला.
विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. या वेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही, झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं, “मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू!” ससा हसला आणि म्हणाला, “एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत!” सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, “पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार!” स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला.
शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं, पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबून राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलाही.
शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेग क्षमतेवर कासवाने स्वत:च्या बुद्धिक्षमतेने मात दिली. हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं. तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला.
म्हणाला, “मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची. आजपासून एक करायचं. जिथे जमिन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू!”
प्रत्येकात सार्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काही ना काही गुण असतोच. जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो. सर्वोत्तम यश गाठता येतं.
एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसर्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता.
उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्य भावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्ये सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पना क्षमता असते; पण कल्पना सत्यात उतरवणारी कृती क्षमता नसते.
काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजन क्षमता नसते. काहींकडे संघटन क्षमता असते; पण निर्णय क्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशा वेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा, त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे.
यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं. जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या. नव्याने मैत्री करा. सार्यांच्या संपर्कात राहा. मिळून मिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टीपकागद व्हा.
संकलन : महेश डंबीर
स्थापत्य अभियंता
9029739875
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.