कायझेन : सतत चांगले बदल घडवण्याची जपानी जादू

जपान हा देश जगात ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखला जातो. पण दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी १९४५ मध्ये अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले आणि या देशाला एक मोठे संकट आले. हिरोशिमा आणि नागासाकी शहरांचा विध्वंस झाला, लाखो लोक मरण पावले आणि जपानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

देशाची अस्मिता धुळीला मिळाली. तरीही जपानी लोकांच्या चिवट वृत्तीमुळे ते हार मानले नाहीत. त्यांच्यात पुन्हा उभे राहण्याची आशा जिवंत होती. आज जपान जगातील सर्वात विकसित आणि तंत्रस्नेही देश आहे. हा चमत्कार कसा घडला? याचे मुख्य कारण आहे त्यांची अनोखी व्यवस्थापकीय पद्धती.

यापैकी एक महत्त्वाची पद्धती म्हणजे ‘कायझेन’. या लेखात आपण कायझेन म्हणजे काय, ते कसे काम करते आणि ते आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो याबद्दल चर्चा करू.

‘कायझेन’ हा जपानी शब्द आहे. ‘काय’ म्हणजे बदल आणि ‘झेन’ म्हणजे चांगला. म्हणजे कायझेन म्हणजे ‘चांगला बदल’. ही एक सतत सुधारणेची प्रक्रिया आहे, ज्यात छोट्या-छोट्या बदलांद्वारे मोठे यश मिळवले जाते. युद्धानंतर जपानकडे फार काही शिल्लक नव्हते. ते रद्दी आणि कचऱ्यापासून नवे उत्पादन तयार करू लागले, पण केवळ मेहनत नव्हती, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीत सतत सुधारणा करण्याची वृत्ती होती.

कायझेन ही तीच वृत्ती आहे. या पद्धतीत, दररोज जे काम करतो त्यात काही ना काही चांगला बदल केला जातो आणि हा बदल एकट्याने नव्हे, तर सामुहिकरीत्या – म्हणजे टीमने मिळून. नंतर या बदलाचे ‘स्टँडर्डायझेशन’ केले जाते, म्हणजे तो बदल त्या प्रक्रियेचा कायमचा भाग होतो.

समजा एखादी कंपनी कारचे भाग बनवते. पूर्वी एक भाग तयार करण्यासाठी १० मिनिटे आणि दोन कामगार लागतात. कायझेन पद्धतीत, टीम विचार करते की यात कसा बदल करून वेळ आणि श्रम वाचवता येतील? कदाचित मशीनची जागा बदलून किंवा प्रक्रिया सुलभ करून.

हा बदल केला, त्याचे परिणाम नोंदवले आणि पुढच्या वेळी हे नवे पद्धतीने काम सुरू. यामुळे वेळ ८ मिनिटांवर येतो आणि श्रम कमी होतात. असे छोटे बदल सतत करत राहिले की कंपनीची उत्पादकता वाढते, खर्च कमी होतो आणि उत्पादनाचा दर्जा उत्तम होतो. जपानच्या कंपन्या जसे टोयोटा किंवा सोनी यांनी कायझेनचा वापर करून जगात अव्वल स्थान मिळवले.

कायझेनची सुरुवात होते कमतरता ओळखण्यापासून. कोणत्याही गोष्टीत सुधारणा करण्यासाठी, प्रथम त्यात काय कमी आहे हे समजणे गरजेचे आहे. समस्या जाणून घेतली नाही तर उपाय कसा काढणार? उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यात मशीन वारंवार खराब होत असेल तर ते का होत आहे हे शोधणे.

 

कायझेनमध्ये याला खूप महत्त्व आहे. दुर्दैवाने आपण भारतीयांच्या बाबतीत हा दोष दिसतो. आपण जे करतो त्यात उणिवा दिसतच नाहीत. ‘चाललंय तर चालू दे’ अशी वृत्ती असते. यामुळे सुधारणा करण्याची इच्छाच निर्माण होत नाही. जपानी लोक मात्र सतत शोध घेतात – काय चुकतंय? कसे चांगलं करू? ही जाणीव कायझेनचा पाया आहे.

कायझेनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गॅम्बा’. याचा अर्थ आहे समस्या ज्या ठिकाणी आहे तिथे जाऊन पहाणे. कागदावर बसून चर्चा नव्हे, तर प्रत्यक्ष कारखान्याच्या मजल्यावर जाऊन माहिती गोळा करणे. कामगारांशी बोलणे, प्रक्रिया पाहणे आणि शास्त्रीय पद्धतीने उपाय शोधणे. उदाहरण द्यायचे तर, एखाद्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या तक्रारी असतील तर मॅनेजर स्वतः किचनमध्ये जाऊन बघेल – कुठे चूक होतेय? हे ‘गॅम्बा’ आहे. यामुळे समस्या मुळापासून सोडवली जाते.

कायझेन म्हणजे एकदम मोठा बदल नव्हे, तर छोट्या-छोट्या बदलांची माळ. जसे छोट्या नद्या मिळून महानदी बनते, तसे हे बदल मिळून कंपनी किंवा संस्था मजबूत होते.

यात समाधानी होऊन थांबत नाहीत, सतत सर्वोत्तमाचा शोध घेत राहतात. म्हणजे आज चांगलं आहे तरी उद्या आणखी चांगलं कसं करू? ही वृत्ती. कायझेन केवळ कारखान्यांसाठी नाही. ते जीवनाच्या प्रत्येक भागात लागू होऊ शकते.

उदाहरणार्थ, घरात स्वयंपाक करताना रोज छोटा बदल करा, जसे भाज्या कापण्याची नवीन पद्धत, ज्याने वेळ वाचेल किंवा अभ्यासात रोज थोडा जास्त वेळ द्या किंवा नवीन तंत्र शिका. कायझेन ही एक जीवनशैली आहे, ज्यात सतत प्रगतीचा प्रयत्न असतो.

भारतातही कायझेनचा वापर होऊ शकतो. आपल्या उद्योगांमध्ये उत्पादकता कमी असते कारण सतत सुधारणेची संस्कृती नाही, पण जर उद्योजकांनी कायझेनचा अभ्यास केला तर मोठा फायदा होईल. जपानी कंपन्यांसारखे इतर पद्धती जसे ‘५-एस’ (सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाइन, स्टँडर्डायझ, सस्टेन) किंवा ‘जस्ट इन टाइम’ उत्पादन यांचाही अभ्यास करावा. हे सर्व छोट्या बदलांवर आधारित आहेत. आजच्या स्पर्धात्मक जगात जे सतत बदलतात तेच टिकतात. कायझेन शिकवते की यश हे एकदम येत नाही, ते छोट्या पावलांनी मिळवले जाते.

कायझेन ही जपानच्या यशाची गुरुकिल्ली आहे. युद्धानंतरच्या खडतर काळातून ते जगाचे नेते झाले कारण त्यांनी बदलाला स्वीकारले. आपणही या पद्धतीचा अवलंब केला तर वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रगती होईल. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कायझेन आणावा छोटा बदल, मोठा फरक.

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?