भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकाचा देश आहे. सध्या भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. प्रगतिशील देश आणि जागतिक पातळीवर अनेक आघाड्यांवर अग्रेसर असलेल्या आपल्या देशात आर्थिक क्षेत्रात खूप संधी निर्माण झाल्या आहेत, पण आजही सर्वसामान्य कुटुंबात अर्थसाक्षरता खूप कमी असते.
फायनाशियल प्लॅनर का नेमावा? बँक किंवा आज वेगवेगळे मोबाइल अॅप आलेले असताना प्रोफेशनल प्लॅनरची गरज काय? असे प्रश्न आपल्याकडे सर्रास विचारले जातात. खरं पाहता आज आपल्या आजूबाजूला आर्थिक कोंडीत अडकलेली कुटुंब पाहिली की एक फॅमिली डॉक्टरसारखा प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली फायनान्शियल डॉक्टर असावा, ही काळाची गरज आहे असं वाटतं.
आपलं आर्थिक नियोजन करून देणारा, योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देणारा जाणकार मित्र ही प्रत्येक कुटुंबाची गरज आहे. विमा, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, याचबरोबरच व्यक्तिगत पैशांचं व्यवस्थापन, उद्योगातील पैशांचं व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरतेवर वेगवगळे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम निर्माण करून I4I Investments Services Pvt. Ltd. ही कंपनी यासाठी काम करते आहे.
गेली पंधरा वर्षं या क्षेत्रात कार्यरत असलेले कंपनीचे सहसंस्थापक महेश चव्हाण सांगतात, आमचा भर हा ग्राहकांच्या आर्थिक ध्येयानुसार नक्की गुंतवणूक कुठे करावी किंवा कोणता विमा घ्यावा यावर असतो. कुटुंबाने फक्त श्रीमंत होण्याचा ध्यास न धरता, आनंदी श्रीमंत म्हणजेच ‘हॅप्पी रिच फॅमिली’ कसं होईल यावर आम्ही काम करतो. २०४० पर्यंत कमीत कमी एक लाख कुटुंबांना ‘मराठी पैसा’ पोर्टलच्या माध्यमातून अर्थसाक्षर करण्याचा आमचा मानस आहे.
महेश चव्हाण यांचा जीवनप्रवास आणि काम प्रेरणादायी आहे. महेश मूळचे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी या छोट्या, परंतु सोन्याच्या व्यवसायामुळे श्रीमंतांचे गाव अशी ओळख असलेल्या गावचे. वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याने त्यांचे बालपण वरळी पोलीस कॅम्पमध्ये गेले. दादरला आयईएसच्या नाबर गुरुजी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले.
महेश हा अभ्यासात सर्वसामान्य असलेला मुलगा. दहावी झाली, पण गुण कमी मिळाल्याने हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. दोन वर्षं नाईट कॉलेजमध्ये शिकावं लागलं. बारावीत वडिलांनी ताकीद दिली यावेळी बोर्ड परीक्षेत जर गुण कमी मिळाले तर तुला बंगळुरू किंवा कोईमतूरला सोन्याच्या व्यवसायात जावं लागेल.
मुंबई सोडायची नव्हती त्यामुळे जोमाने अभ्यास केला. त्यासाठी एक क्लास जॉईन केला. इथेच महेशना व्यावसायिक पार्टनर मनोज भेटला. कोचिंग क्लासमधील सरांचे योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर दोघांनी ७० टक्के गुण मिळवले.
आपल्यामध्ये शिकण्याची क्षमता आहे याची जाणीव दोघांनाही या क्लासमध्ये झाली. ट्युशनच्या सरांनी कोचिंग क्लासमध्ये महेशला नॉन टिचींग स्टाफ म्हणून काम करण्याची ऑफर दिली. सकाळी एमडी कॉलेज परळ, मग संध्याकाळी कोचिंग क्लास असा दिनक्रम झाला.
इथेच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, असं महेश सांगतात. कारण कोचिंग क्लासचे सर स्वत: शेअर ट्रेडिंग करायचे त्यामुळे इथे त्यांना प्रथम प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. महेशची शैक्षणिक पार्श्वभूमी कॉमर्स होती. त्यामुळे यात रुची निर्माण झाली.
महेश यांनी या काळातली म्हणजे २००३-०६ ची घटना सांगितली. एका नातेवाईकाचे एका व्यक्तीकडे ८ लाख अडकले होते. पैशाच्या बदल्यात पैसे घेणार्याने कोलगेट कंपनीचे ४ लाख रुपयांचे शेअर्स देत होता. नातेवाईकांना शेअर्समधले काही कळत नव्हते. काय करावे यासाठी त्यांनी मला संपर्क केला.
८ लाख तर गेले, पण हे ४ लाख रुपयांचे शेअर्स तरी खरे आहेत का आणि हे ठेवले तर त्याचे ८ लाख होतील का? ही विचारणा केली. मी जमेल तिथून माहिती घेऊन कोलगेट कंपनीचे शेअर्स खरे आहेत आणि काहीच न मिळण्यापेक्षा तुम्ही हे शेअर्स घ्या हा सल्ला नातेवाईकांना दिला.
पुढल्या तीन वर्षात म्हणजे जवळपास २००६ मध्ये ते शेअर्स दुप्पट झाले. त्याचवेळी माझ्या वडिलांनी सरकारी बाँडमध्ये १९९५ साली केलेली गुंतवणूक २००५ मध्ये म्हणजे दहा वर्षात दुप्पट झाली. या गोष्टी एकत्रित घडून आल्या त्यामुळे गुंतवणूक आणि बचत त्यातील रिटर्न्स हा वेगवेगळ्या माध्यमात कसा आणि किती तफावतीत मिळतो हे लक्षात आलं. हा फरक वयाच्या अठराव्या वर्षी कळला.
वडील नोकरी करत असल्याने आपल्याकडे पैसा मर्यादित येतो हे माहीत होतं. त्यामुळे व्यवसाय करायचा हे महेशना लहानपणीच स्पष्ट झालं होतं. महेश बी.कॉम. झाले. येणार्या काळात म्युच्युअल फंड्स हे क्षेत्र वाढणार आहे आणि कसे त्यांच्या एका मित्राने १९९४ साली ‘इन्फोसिस’च्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली १० हजार रुपयांची गुंतवणूक आज दीड करोड झाली हे जिवंत उदाहरण त्यांच्या मामांनी त्यांना दाखवून दिलं.
मग कॉमर्सचं शिक्षण त्यात आपण शेअरबाजाराची नगरी म्हणजे मुंबईतच आहोत आणि आपल्याकडे इतर कोणता व्यवसाय करायला लाखो रुपये नाहीत तर फक्त शिक्षणाच्या बळावर आपण या क्षेत्रात शिरकाव करू शकतो हे दोघांच्याही लक्षात आलं. म्हणूनच दोघांनी एमबीए फायनान्स करायचं ठरवलं.
त्याकाळी पूर्ण वेळ एमबीएची फी परवडणारी नव्हती. मग पार्ट टाईम एमबीए केलं. कॉलेज संध्याकाळी असायचं. मग दिवसा शेअर बाजारात ट्रेडिंग करायला सुरुवात केली. या दरम्यान मनोजने मोतीलाल ओसवाल या नामांकित ब्रोकिंग कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. मनोजचं प्रॅक्टिकल आणि महेशचं थेरोटिकल ज्ञान असा या दोघांचा पाया उभारला जाऊ लागला.
एका बाजूला शिक्षण आणि दुसर्या बाजूला शेअर ट्रेडिंग सुरू झालं. २००६ च्या तेजीच्या मार्केटमध्ये नफा कमावत होतो. आता आपल्याला सगळं जमतंय असं वाटू लागलं होतं आणि यातच दोन भावांनी भांडवल दिल्याने स्वत:ची शेअर ट्रेडिंग फर्म सुरू केली. पण २००८ मध्ये जागतिक मंदी आली.
ता मंदीच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे सहा ते नऊ महिन्यात दोघांना २० लाखांचा तोटा झाला. याच काळात थोडे थांबून चांगल्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळाले आणि आम्ही कमोडिटी मार्केटमध्ये म्हणजे सोने-चांदीच्या कमोडिटी बाजारात उतरलो.
शेअरबाजार मंदीत होता आणि त्याचवेळी हे मार्केट तेजीत चाललं होते. अल्पावधीतच आम्ही इथे जम बसवला, परंतु इथेही प्रत्येक दिवसाचा संघर्ष आहे आणि दररोज रिस्क घ्यावी लागते. जे धोक्याचं आहे हे आमच्या लक्षात आलं. आपण या सगळ्यात अडकत चाललोय.
अस्थिरता मागे टाकून आयुष्यात पुढे जायचं असेल तर योग्य दिशा आणि स्थिरता असायला हवी हे जाणवू लागलं. काय करावं, या विचारात असताना एकदा रतन टाटा यांचा एका लेखामध्ये आपल्या भारतात भविष्यात काय ट्रेंड येतील हे समजायचे असेल तर अमेरिकेतील घडामोडींचा अभ्यास करा असं म्हटलं होतं. त्याचा फायदा झाला.
अमेरिकेत हा व्यवसाय कसा चालतो याची माहिती घेताना कळले की अमेरिकेमध्ये कुटुंबाचं आर्थिक नियोजन पाहण्यासाठी फायनांशियल प्लॅनर असतो आणि ते फक्त शेअरबाजार किंवा म्युच्यअल फंडमधली गुंतवणूक पाहत नाहीत तर कुटुंबाच्या संपूर्ण आर्थिक बाबींचा अभ्यास करून योग्य सल्ला देतात.
भारतातही आज ना उद्या फायनांशियल प्लॅनरची गरज भासणार हे स्पष्ट जाणवलं आणि हा आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. सुरुवातीला आम्ही फक्त शेअर ब्रोकर म्हणून काम करायचो. ‘सिद्धिविनायक इन्व्हेस्टमेंट’ ही आमची कंपनी होती. लोकांना जास्तीत जास्त नफा कमवून देणं यावरच आमचा भर होता, पण हळूहळू लक्षात आलं की लोकांना नफ्यापेक्षा गुंतवणुकीची सुरक्षितता आणि वाढत्या महागाईपेक्षा एक-दोन टक्के जास्त मिळाले तरी ते समाधानी होऊ शकतात.
अमेरिकेसारख्या देशात गुंतवणूक सल्लागाराशिवाय गुंतवणूक केली जात नाही. आपल्या देशात लोकांना त्याचे महत्त्व पटलेलं नसल्यामुळे या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. अनेक केस स्टडीजवरून आम्हाला लोकांची अचूक गरज कळली.
पूर्वी एकत्र कुटुंब होती त्यावेळी एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तरी घरातील इतर कर्त्या व्यक्ती त्याची जबाबदारी घेऊन त्याच्या कुटुंबाचाही सांभाळ करत होती. परंतु आता विभक्त कुटुंब, त्यात नोकरी-व्यवसाय करणारे नवरा बायको इतके व्यस्त असतात की त्यांना एकमेकांचे फोन, लॅपटॉपचे पासवर्डसुद्धा ठाऊक नसतात.
अशा वेळी कुटुंबात एका भागीदाराचं काही बरंवाईट झालं, तर सर्व निस्तरताना दुसर्या भागीदाराला खूप अडचणी येतात. कोणाला उसने किंवा कर्ज म्हणून पैसे दिले असतील तर त्याची नोंद नसते. कोविड काळात आपल्या आजूबाजूला अशी कुटुंब तुम्ही पाहिली असतीलच.
यातूनच मग आम्ही ‘हॅप्पी रीच फॅमिली’ हा कुटुंबाला आर्थिक साक्षर करणारा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामध्ये इमर्जन्सी फंडपासून अगदी घर घेतानासुद्धा नवरा-बायकोमध्ये बायकोचं नाव प्रथम का आवश्यक आहे? पासवर्ड कसे जतन करावेत? महिन्याला १० हजार रुपये गुंतवणूक करूनसुद्धा रिटायरमेंट प्लनिंग कसं होऊ शकतं अशा एक ना अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केलं जातं.
आम्ही विमा, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, गुंतवणूक याबरोबरच व्यक्तिगत तसेच उद्योगातील पैशांचे व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरता यावर वेगवगळे नावीन्यपूर्ण कोर्सेस सुरू केले आहेत, जे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घेतले जातात.
२०१७ मध्ये महेश आणि मनोज यांनी स्वत:च्या दहा वर्षांच्या अनुभवातून ‘स्मार्ट गुंतवणूकदार’ हे पुस्तक लिहिले. मराठी समाजात आर्थिक गुंतवणुकीविषयी जागरूकता यायला हवी यासाठी २०१८ साली ‘मराठी पैसा’ या पोर्टलची निर्मिती केली. याचे फेसबुक पेज, मोबाइल अॅप आहे.
जवळपास वीस हजार लोकांनी ते डाऊनलोड केलं आहे. याद्वारे आर्थिक विषयातले विविध लेख तसेच उद्योजकाने पैसा कसा हाताळावा, कसा वापरावा यावर मार्गदर्शन केलं आहे. शिवाय ‘मराठी पैसा’च्या माध्यमातून वेळोवेळी विविध विषयांवर ऑनलाइन वेबिनार, कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
कोविड काळात घराघरांत डिमॅट अकाउंट ओपन झाली आणि याच काळात शेअरबाजारात गुंतवणूक करून महिन्याला हमखास रिटर्न्स देणार्या फसव्या योजना सुरू झाल्या. त्यावरही ‘मराठी पैसा’च्या माध्यमातून महेश यांनी लोकांना जागरूक करण्यासाठी मोहीम उभारली.
‘मराठी पैसा’मुळे आमचे ५० लाख वाचले, आमचे १ करोड वाचले सांगणारे वाचक आजही सातारा, सांगलीमधून कॉल करतात तेव्हा केलेल्या कामाची पावती मिळते. शेअर बाजार म्हणजे झटपट पैसा दुप्पट करण्याचं ठिकाण नाही. संयम ठेवला तर पैशाला संपत्तीत रूपांतरित करण्याचं माध्यम आहे, असं महेश सांगतात.
गेल्या पंधरा वर्षांत व्यवसाय करत करत महेश यांनी वेगवगळे उच्च शिक्षण घेत आर्थिक आणि बिझनेस नियोजन विषयात जवळपास १७ कोर्सेस पूर्ण केले. या संपूर्ण प्रवासात मित्र आणि व्यावसायिक भागीदार मनोज बारावीपासून सोबत आहेच. दोघांनी शिक्षण आणि व्यवसायसुद्धा एकत्र सुरू केलाय.
याशिवाय आज सहा जणांची प्रोफेशनल टीम आहे. टीममध्ये प्रत्येकाकडे पाच-सात वर्षांचा अनुभव आहे. व्यवसायात उतरल्यावर सुरुवातीला चार-पाच वर्षं प्रचंड कठीण गेली, पण या काळात कुटुंबाने खूप साथ दिली. जेव्हा आमच्या कामाचं लोक कौतुक करू लागले तेव्हा कुटुंबालाही विश्वास मिळाला आणि २००८ पासून सोबत असणार्या ग्राहकांनीही आम्हाला वेळोवेळो साथ दिली.
महेश म्हणतात, तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचे नाही तर त्याचे नियोजन कसे करता ते महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आणि तुमचं कुटुंब एका विश्वासू फायनान्शियल प्लॅनरसोबत जोडलेलं असेल. कारण तो तुम्हाला फक्त सल्लाच देत नाही, तर तुमचा हात धरून तुम्हाला आर्थिक साक्षर करतो.
महेश चव्हाण – 9821899211
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.