स्टार्टअप

सात मुलांपासून सुरू केलेले क्लासेस, आज महाराष्ट्रभर विद्यार्थी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


दोन शिक्षक एकत्र येत सात विद्यार्थ्यांना घेऊन अर्ध्या दुकानात सुरू केलेल्या शिकवणीने आज कल्याण आणि भिवंडीमध्ये मोठ्या ट्युटोरिअलचे रूप घेतलेले दिसते. भविष्यात हेच ट्युटोरिअल आपल्याला ग्लोबल झालेले दिसू शकेल, कारण हेच स्वप्न घेऊन महेश सर आणि सूर्यशेखर सर काम करत आहेत.

हा प्रवास आहे महेश खडके आणि सूर्यशेखर चिट्टीमल्ली या दोन शिक्षकांनी सुरू केलेल्या ‘व्ही. एम. ट्युटोरिअल’चा. महेश खडके यांची त्यांच्या या प्रवासाविषयी घेतलेल्या मुलाखतीत त्यांचा स्वतःचा आणि ‘व्ही. एम. ट्युटोरिअल’चा खडतर प्रवास उजागर होतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

महेश यांची आई ते पाचवीत असतानाच स्वर्गवासी झाली. या धक्क्यामुळे वडिलांनाही व्यसनं जडली. यामुळे त्यांच्या बालपणाची वाताहत झाली. पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशी आणि काकांनी केला. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना अर्धवेळ नोकरी करत शिक्षण करावं लागत होतं. अभ्यासात हुशार असूनही त्यांना हवं तसं करीअर निवडता येत नव्हतं. बी.ए. पूर्ण झाल्यावर त्यांना बी.एड.ला प्रवेश मिळत होता, पण कौटुंबिक अडचणींमुळे बी.एड.साठी पूर्ण वेळ देणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी एम.ए. केलं. त्यांचा मित्र सूर्यशेखर याने बी.एड. केलं.

सूर्यशेखरचं बी.एड. झाल्यावर तो एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला. त्यानेच महेश यांना त्या शाळेत संगणक शिक्षक म्हणून नोकरीला लावलं. हीच महेश यांची शैक्षणिक क्षेत्रातल्या करीअरची सुरुवात होती. ही नोकरी करतानाच दोन मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. एक वर्षानंतर सूर्यशेखर यांच्या भावाच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या अर्ध्या भागात क्लासेसला सुरुवात झाली.

पहिल्या वर्षी सात विद्यार्थी होते. तीन-चार वर्षां या जागेत क्लासेस चालवल्यानंतर भिवंडी शहरात क्लास सुरू केले आणि नाव ठेवलं ‘विद्यामंदिर ट्युटोरिअल.’

मार्गदर्शक : बिपिन सावला, नीलेश बागवे, प्रताप देसले
मोलाची साथ : सूर्यशेखर चिट्टीमल्ली, मावशी-काका आणि पत्नी
तरुणांना संदेश : धैर्य ठेवा. कष्टाला शॉर्टकट नाही.

आयसीएसई बोर्डाने सुरू करून सीबीएसई, एसएससी असे सर्व बोर्डाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले. परिस्थिती स्थिरस्थावर होताच महेश यांनी बी.एड. आणि एम.एड. दोन्ही पूर्ण केले. या दरम्यान त्यांना एक गोष्ट लक्षात आली की, ते विद्यार्थी दहावी झाल्यानंतरही त्यांच्याकडे करीअर आणि जीवनाबद्दल काऊन्सिलिंग करायला येत होते आणि त्यांना ते चांगले जमत होते. म्हणून त्यांनी काऊन्सिलिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायात हाही नवा आयाम सुरू केला.

आतापर्यंत भिवंडीत पूर्ण जम बसला होता हे लक्षात घेऊन त्यांनी कल्याणमध्ये सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी आर्थिक जुळवणी केली. कल्याण या नव्या बाजारपेठेत उतरताना परिपूर्ण तयारी केली. यासाठी वेबसाइट बनवली, सोशल मीडियावर अस्तित्व निर्माण केलं.

कल्याणमध्ये बॅच सुरू झाल्यावर पालक आणि विद्यार्थी या दोन्हींसाठी परिपूर्ण असं मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केलं. ‘विद्यामंदिर ट्युटोरिअल’ हे नाव ट्रेडमार्क मिळण्यास उपलब्ध नव्हतं म्हणून नावात बदल करून ‘व्ही.एम. ट्युटोरिअल’ हे नवं नामकरण केलं.

कल्याणमध्ये ट्युटोरिअलचा जम बसू लागला आणि तेवढ्यात लॉकडाऊन सुरू झाला. आता या समस्येला कसं तोंड द्यायचं, हा विचार सुरू झाला. कारण आपल्यासोबत आतापर्यंत २८ पूर्णवेळ शिक्षक सोबत होते. त्यांच्याही चुलीचा प्रश्न होता. मग ऑनलाइन शिकवणी घ्यायला सुरुवात केली.

पहिले एक आठवडा मोफत शिकवणी घेतली गेली. यात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी सहभागी झाले. पुढे शिकवणी सशुल्क केल्यावरही यातले बरेच विद्यार्थी कायम राहिले. विद्यार्थ्यांना दर वर्षी वेगवेगळे प्रश्नसंच खरेदी करावे लागतात आणि त्यांची किंमतही जास्त असते.

लॉकडाऊनमुळे लोकांच्या नाजूक आर्थिक स्थितीचा विचार करून यावर उपाय म्हणून ऑनलाइन प्रश्नपत्रिका संच तयार केले आणि ते अतिशय कमी शुल्कात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. यातसुद्धा मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या फोनवर प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झाले.

लॉकडाऊनच्या काळात पालकांनी या नव्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कसं सांभाळलं पाहिजे, मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, योग्य करीअरची निवड अशा विषयांवर मोफत वेबिनार ठेवले. या काळात समाजातील यशस्वी लोकांसोबत प्रेरणादायी सुसंवाद घडवून आणला.

महेश सरांशी संवाद साधताना हा व्यक्ती हाडाचा शिक्षक आहे हे तर जाणवतेच, पण त्यांची सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भवितव्याविषयी असलेली तळमळ जाणवते.

सध्या ऑनलाइन शिक्षणासाठी वेगवेगळे अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, परंतु त्याची किंमत इतकी जास्त असते की, ते सर्वांना परवडू शकत नाही. म्हणून महेश सर सर्व विद्यार्थ्यांना परवडू शकेल असे जागतिक पातळीवर वापरले जाईल असे अ‍ॅप्लिकेशन बनवत आहेत.

या माध्यमातून ‘व्ही.एम. ट्युटोरिअल’ जगभरात सर्वदूर पोहोचू शकेल. महेश सर आणि ‘व्ही.एम. ट्युटोरिअल’चा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

महेश खडके – ९२२२३१११०१


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.



Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!