महेश सुस यांचा जन्म मिरजेतला. शालेय शिक्षण विद्या मंदिर प्रशाला, मिरज यातून तर महाविद्यालयीन शिक्षण चिंतामण महाविद्यालय, सांगली येथून झालं. तेथून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेऊन विमा क्षेत्रात आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली.
टाटा-एआयजी या कंपनीत दहा वर्ष विमा प्रतिनिधी ते विक्री अधिकारी ते ब्रँच मॅनेजर असा महेश याचा प्रवास झाला. २०११-१२ या वर्षात विमा क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे त्यांना इतर क्षेत्राकडे वळणे भाग पडले. इतर क्षेत्रात नोकरी शोधता शोधताच संयोगाने ते उद्योजकतेत आले.
खरं तर महेश यांच्यात उद्योजक होण्याची उर्मी लहानपणापासूनच होती. त्यांचे वडीलसुद्धा किराणा आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या कौटुंबिक व्यवसायात होते. नोकरीनिमित्त ते विमा क्षेत्रात आले, जिथे टार्गेट साध्य करायला उद्योजकता सिद्ध करावी लागते. स्वत:ला व टीमला नेहमी प्रोत्साहित ठेवून वेळोवेळीटार्गेट्स साध्य करावी लागतात.
महेश यांच्या प्रत्यक्ष उद्योजकीय प्रवासाला सुरुवात होण्याची कथाही रंजक आहे. २०११ मध्ये इतर क्षेत्रात नोकरी शोधत असताना योगायोगाने ते बायोमास पेलेटचा मोठा प्लांट उभा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीत मुलाखतीसाठी गेले.
या कंपनीत निवड तर झाली, पण अधिकृतपणे कंपनीच्या कामकाजाला सुरुवात व्हायला वेळ लागत होता. त्यामुळे अनौपचारिक मीटिंग्स होत गेल्या आणि फील्डवर्कसुद्धा सुरू झालं. या क्षेत्रात युरोपमध्ये काम केलेले व जैविक ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सुभाष नियोगी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू होते.
दुर्दैवाने ती कंपनी अधिकृतपणे सुरू होऊ शकली नाही. मग महेश यांनी स्वत:चं जैवइंधन त्यातही ब्रीकेटसचे ट्रेडिंग सुरू केले. मित्राच्याच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे हा व्यवसाय सुरू झाला. एव्हाना या फील्डचं भरपूर ज्ञान झालं होतं.
नेटवर्कपण चांगल होतं. त्यामुळे सुरुवातीलाच एका विदेशी कंपनीचं वार्षिक कंत्राट मिळालं. तसं हे खूप मोठं धाडस होतं, पण ते करायची मनाची तयारी झाली होती. २०१६ मध्ये कोल्हापूरमध्येच ‘KREG Ventures’ या नावाने स्वत:ची फर्म सुरू केली. याद्वारे याच क्षेत्राला वाहिलेलं पोर्टल सुरू केल आणि BriquetteBazaar.com चा जन्म झाला.
आता या नावानेच या क्षेत्रात सगळे ओळखतात. तो एक ब्रँड झाला आहे. महेश सुस यांनी ‘ब्रिकेट बाझार’ या नावाप्रमाणेच यामध्ये ब्रिकेटिंगसाठी लागणार्या सेवा व साधनांचा व्हर्च्युअल मॉलच उभारला आहे. याद्वारे बायोमास ब्रिकेटिंगचे प्रोजेक्ट केले जातात.
अगदी प्रोजेक्ट रिपोर्टपासून प्रोजेक्टची उभारणी, ट्रेनिंग व नंतर सेल्स व मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. नंतरही ग्राहकांना अपडेशनसाठी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी सहाय्य केलं जातं. पुण्याच्या आजूबाजूला सध्या सात ते आठ बायोमास ब्रिकेटिंग व पेलेटिंगची मशिन्स त्यांच्या सहकार्याने सुरू आहेत.
याशिवाय सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद तसेच महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी आमचे ग्राहक पसरलेले आहेत. ही संख्या अजून वाढतच आहे. शिवाय पूर्व आफ्रिका, व्हिएतनाम, मध्य पूर्व देशात सल्लागार सेवा दिलेल्या आहेत.
व्यवसायाची सुरुवात करताना खूप अभ्यास करून केल्यामुळे तसेच स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे अवघड गोष्टी थोड्या पटापट होत गेल्या. पटकन सुरुवातीच कंत्राट मिळालं, पण पुढे मात्र प्रचंड अडचणी आल्या. या बिझनेसमध्ये लॉजिस्टिक्स अत्यंत महत्त्वाचं असतं, पण त्याचा काहीच अनुभव नसल्याने अडचणी आल्या. ट्रान्सपोर्ट खर्च वाढत जाऊन प्रॉफिट मार्जिनपेक्षा जास्त होऊ लागला.
काही लोकांनी अॅडव्हान्स घेऊनही माल वेळेत न दिल्याने पूर्ण वेळापत्रक बिघडलं. परिणामी प्रोजेक्ट आवाक्याबाहेर व्हायला लागला, पण यातून खूप शिकायला मिळालं. लोकांची पारख करण्याची कला शिकावी लागली. टेक्निकल नॉलेजही मिळालं. मुळातच अभ्यासू वृत्ती असल्याने पाया भक्कम झाला.
सुरुवातीच्या अडचणींमधून ताऊनसुलाखून निघाल्यामुळे पुढच्या प्रवासात मदत झाली. आज प्रोजेक्ट रिपोर्ट, मशिन इन्स्टॉल करणे, ट्रेनिंग, विक्रीपश्यात सेवा, सल्ला व अपडेशन इ. वेगवेगळ्या टीमद्वारे आउटसोर्सिंगने, पण पूर्ण जबाबदारीने व काळजीपूर्वक होतात.
महेश यांच्या कंपनीकडे येणारा ग्राहक हा फक्त ग्राहक न राहता एक प्रकारची पार्टनरशिप तयार होते. मग ते प्रोजेक्ट उभा करणे असो की माल खरेदी-विक्री असो. काही ग्राहकांचा शंभर टक्के माल तेच खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकाला विक्रीची चिंता उरत नाही.
उद्योगात महत्त्वाची उपलब्धी विचारली असता, आपला प्रत्येक प्रोजेक्ट हा आमच्यासाठी एक उपलब्धीच असतो, असं महेश म्हणतात. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात खूप कमी संसाधने असताना २५ वर्षाच्या दोन तरुणांना स्टार्टअप उभा करून देणं व सात वर्षापूर्वी व्हिएतनाममधला एक जर्मन कंपनीचा कन्सल्टेशनसाठी मिळालेला प्रोजेक्ट या उपलब्धी म्हणता येतील.
यात आर्थिक फायद्यापेक्षा काहीतरी वेगळं व खूप अवघड गोष्ट साध्य केल्याचं समाधान आहे. छोट्या उद्योजकांद्वारे किमान शंभर प्रोजक्ट उभे करणे व त्याद्वारे कमीत कमी १ लाख टन इतक्या जैविक इंधनाचे उत्पादन व उलाढाल करणे हे नजिकचं ध्येय आहे. पुढे एखादा बायो-सीएनजी प्रोजेक्ट करण्याचाही त्यांचा मानस आहे.
उद्योजकीय प्रवासात कोल्हापुरातले मित्र, शाळेतला मित्र तसेच घरी पत्नी स्मिता हिची मोलाची साथ मिळाली, असे महेश सांगतात. भविष्यात व्यवसाय वाढवून डायव्हर्सिफाय करण्याचे त्यांचे विचार आहेत.
महेश सुस : 9822298825
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.